साहसी भैरवगडाची सफर
बऱ्याच दिवसापासून भैरवगड या किल्ल्याबद्दल ऐकून होतो.भैरवगडला लागून असलेला घनचक्कर या महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचा उंच शिखर याबद्दलही ऐकून होतो.याच्या नावाची सुद्धा ऐकून गंमत वाटत होती त्यामुळेच घनचक्कर व भैरवगड हे दोन्ही किल्ले यांचा ट्रेक करणे खूपच दिवसापासून मनात रेंगाळत होते.तसा सहसा आमचा ट्रेक रविवार सुट्टीचा वार बघूनच निघायचा.परंतु यावेळी या प्रथेला फाटा देत आम्ही ऐनवेळेला शनिवारी ट्रेक करायचे ठरवले.ट्रेक करण्यासाठीची आमची हौशी मंडळी किशोर,मी व सचिन भाऊ लगेचच तयार होऊन तिघेच निघायचे ठरले. नगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी जसं काही माहेरघरच म्हणावे लागेल कारण हरिश्चंद्रगड,तारामती,कळसुबाई, संधान व्हॅली,अलंग- मदन- कुलंग ही साखळी तसेच रतनगड,पाबरगड या व्यतिरिक्तही माहीत नसलेले अनेक किल्ले व शिखरे या साखळी मधील महत्त्वाचे पॉईंट्स होत. महाराष्ट्रात एकुण ६ भैरवगड आहेत. त्यापैकी २ भैरवगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगडावर टोलारखिंडी मार्गे येणार्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आहे . तर राजुर मार्गे...