देवगिरीच्या यादवांचा अंकाई - टंकाई किल्ला
महाराष्ट्रातील येवला हे शहर नुसत्या पैठणीसाठीच प्रसिद्ध आहे असे नव्हे तर येवला- मनमाड जवळील अंकाई व टंकाई या जोड किल्ल्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.देवगिरीच्या यादवांनी बांधलेला,ऐतिहासिक वारसा लाभलेला,सुबक -समृद्ध असा व जैन लेण्यांनी सजलेला असा हा अंकाई किल्ला व त्याच्याच जवळच्या डोंगरावर असलेला टंकाई किल्ला. रेंज ट्रेक मध्ये येणारे हे दोन्ही किल्ले एकाच ट्रेकमध्ये सहजतेने करता येतात.छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी हा सर्वज्ञात,सुप्रसिद्ध किल्ला यादवांच्या युद्धनीतीचा व स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून सर्वांना परिचित तर आहेच, त्याखालोखाल नाशिकमधील येवला तालुक्यातील अंकाई व टंकाई हे जोड किल्लेदेखील यादवकालीन बांधणीचे उत्कृष्ट पुरावे आहेत. मुख्यत्वेकरून सुरत - औरंगाबाद या व्यापारी मार्गावर नियंत्रण व सुरक्षा या हेतूसाठी या जोड किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.अंकाई किल्ल्यावरील अगस्ती मुनींचा आश्रम,प्राचीन जैन ल...