महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट " कळसुबाई शिखर "
हिवाळ्याचा ऋतू ,बोचणारी सुंदर गुलाबी थंडी, सगळीकडे हिरवळ दाटलेली, आल्हाददायक ऊन, उंच उंच शिखरावर चालणारा ऊन-सावलीचा विलोभनीय खेळ... एकंदरीतच आमच्यासारख्या ट्रेकर्सना ट्रेकिंग करण्यासाठी, वेगवेगळे गड ,किल्ले, पायवाटा धुंडाळण्यासाठी अगदी विहंगम असाच ऋतू... अशा ऋतूमध्ये पाय एखाद्या उंच शिखराकडे न वळते तरच नवल ! त्यातच आमच्या चामरलेणी ट्रेकर्स ग्रुपच्या ट्रेकर्सचा उत्साह तर अगदी वाखाणण्याजोगाच ! मग काय ! एका फोनवर सगळे मंडळ हजार ! व लागलीच नियोजन करून आम्ही निघालो "कळसुबाई " या शिखराकडे...! अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये बारी गावाजवळ असलेले कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. यालाच "महाराष्ट्राचे माउंट एवरेस्ट"असे देखील म्हणतात. नाशिक पासून साधारणपणे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शिखराला हौशी ट्रेकर, निसर्गप्रेमी मंडळी वारंवार भेट देतात. तसे पाहिले तर आरोग्यदायी वातावरण नाशिक मध्ये खूप आहे .त्यातच...