साहसी भैरवगडाची सफर
बऱ्याच दिवसापासून भैरवगड या किल्ल्याबद्दल ऐकून होतो.भैरवगडला लागून असलेला घनचक्कर या महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचा उंच शिखर याबद्दलही ऐकून होतो.याच्या नावाची सुद्धा ऐकून गंमत वाटत होती त्यामुळेच घनचक्कर व भैरवगड हे दोन्ही किल्ले यांचा ट्रेक करणे खूपच दिवसापासून मनात रेंगाळत होते.तसा सहसा आमचा ट्रेक रविवार सुट्टीचा वार बघूनच निघायचा.परंतु यावेळी या प्रथेला फाटा देत आम्ही ऐनवेळेला शनिवारी ट्रेक करायचे ठरवले.ट्रेक करण्यासाठीची आमची हौशी मंडळी किशोर,मी व सचिन भाऊ लगेचच तयार होऊन तिघेच निघायचे ठरले.
नगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी जसं काही माहेरघरच म्हणावे लागेल कारण हरिश्चंद्रगड,तारामती,कळसुबाई, संधान व्हॅली,अलंग- मदन- कुलंग ही साखळी तसेच रतनगड,पाबरगड या व्यतिरिक्तही माहीत नसलेले अनेक किल्ले व शिखरे या साखळी मधील महत्त्वाचे पॉईंट्स होत.
महाराष्ट्रात एकुण ६ भैरवगड आहेत. त्यापैकी २ भैरवगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगडावर टोलारखिंडी मार्गे येणार्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आहे . तर राजुर मार्गे येणार्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंज्याचा भैरवगड आहे. शिरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते.
पायथ्याच्या शिरपुंजे या गावात गाडीचा प्रवास करून आम्हि सकाळी लवकरच पोचलो. आम्ही लगेचच पदभ्रमणाला सुरुवात केली. सहसा सगळेजण आधी भैरवगड चढतात व भैरव गडाला लागून असलेले शिडीवरून मग घनचक्कर रांग पूर्ण करून खाली उतरतात.परंतु सकाळच्या ताज्या दमात आम्ही आधी उंच शिखर घनचक्कर सर करायचे ठरवले व तिथून लागून असलेल्या शिडीवरून मग भैरवगडाला जायचे ठरवले. तसं बघायला गेलं तर घनचक्कर हे शिखर सुद्धा चढायला उंचच आहे.तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणारे असेच हे शिखर आहे.वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या अशा दोन ते तीन डोंगर रांगांना,कपारींना पार केल्यानंतर साधारणतः पाऊण तासाच्या चढणीनंतर आपण घनचक्करच्या पठारावरती पोहोचतो.
या पठारावर दाट कारवीचे जंगल असलेले आपल्याला पाहायला मिळते.पावसाळ्यानंतर या फुललेल्या कारवीचे जंगल पाहण्यासाठी ट्रेकर्सचे थवेचे थवे येथे येत असतात.कारव्यांचे जंगल पायी तुडवून पुढे गेल्यानंतर येथे आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण बाब बघायला मिळते ती म्हणजे "गाऱ्या देव" .स्थानिकांना याची माहिती विचारली असता त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे :-जुन्याकाळी लोक पायी जेव्हा प्रवासाला निघायचे तेव्हा एक दिशा म्हणून किंवा लांबून एखादी सूचनेची खूण म्हणून येथे वेगवेगळ्या प्रकारच्या गारा ज्याला आपण क्रिस्टल्स म्हणतो ते या डोंगरावर जे विपुल प्रमाणात मिळतात त्या एका ठिकाणी गोळा करून ठेवत व त्यालाच गाऱ्या देव असे म्हणून त्याची पूजा देखील केली जायची.रस्त्यात जागोजागी भेटणारे असे गारांचे दगड प्रवासी गोळा करायचे व ते या एका ठिकाणी रचून जायचे व त्या ठिकाणी त्यांची श्रद्धा अशी असायची की आमचा पुढचा पायी प्रवास सुखाचा व सुरक्षित होऊ दे,यालाच ते गाऱ्या देव असे म्हणायचे. या गाऱ्या देवाजवळ मोठी घंटा देखील बांधलेली आम्हाला बघायला मिळाली.गाऱ्या देवाचे दर्शन घेऊन तसेच सोबत आणलेली शिदोरी थोडी थोडी खाऊन व आमच्या जवळचे एनर्जी ड्रिंक पिऊन,थोडा पायांना विसावा देऊन तसेच आम्ही पुढे निघालो.
घनचक्कर शिखरावरती चढताना खालच्या बाजूने लागणाऱ्या दोन मोठ्या मोठ्या आकाराच्या कपारी आहेत.या कपारींमध्ये भल्या मोठ्या आकाराचे मधमाशांचे पोळी देखील आहेत त्यामुळे या पोळ्या जवळून जाताना शांततेत जाणेच योग्य राहील कारण जास्त गोंगाट करत गेलं किंवा तीव्र वासाचा सेंट किंवा डीओ मारलेला असेल किंवा काही दगड,लाकूड फेकत गेलं तर या मधमाश्या तीव्रतेने चावण्याची भीती असते व सोबत पळायला देखील जागा नाही.त्यामुळे आपण जर घनचक्कर चढत असाल तर थोडीशी काळजी घेऊन चढलेलेच बरे !आमच्या या संपूर्ण प्रवासात शिरपुंजे गावांमधीलच एक कुत्रा आमच्या सोबत होता.
शिरपुंजे इथे 'श्रीक्षेत्र भैरवनाथ देवस्थान शिरपुंजे बुद्रुक', अशी कमान आहे. इथून स्थानिक गावकऱ्यांनी सुरूवातीला सिमेंटच्या पायऱ्या केल्या आहेत. स्थानिकांचा गडावर नेहमी राबता असतो. त्यामुळे वाट मळलेली आहे. वाट नागमोडी वळणांची आणि खड्या चढणीची आहे. अर्ध्या तासाच्या चालीनंतर कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि लोखंडी रेलिंगला सुरुवात होते. इथून १५ मिनिटांच्या चालीनंतर रेलिंगची वाट संपते आणि खिंड लागते. इथून पुन्हा कातळात छातीवर येणाऱ्या खोदीव पायऱ्या आणि रेलिंगची वाट लागते.
पायथ्यापासून माथ्यापर्यत पोहोचायला एक तास लागतो. माथ्यावर भैरौबाचे मंदिर आहे. मंदिर पाहून वरच्या बाजूला वेताळबाबाच्या मंदिराकडे गेलो. तिथेही पाण्याच्या तीन टाक्या पाहिल्यावर या ठिकाणी खूप पूर्वीपासून मानवाचा वावर असणार हे स्पष्ट झाले. गडमाथा फिरून आम्ही पायउतार झालो. पाच मिनिटांत पुन्हा पायऱ्या उतरून खिंडीपाशी पोहचलो. गार्या देवाच्या मंदिरापाशी स्थानिक सोबती भेटले. इथूनच भैरवगडला जायला वाट असल्याचे त्यांनी सांगितले. खिंडीतून आम्ही त्यांना भेटून निघालो. सुरुवातीची वीस ते पंचवीस मिनिटांची वाट अतिशय अवघड आहे. एक पाऊल बसेल एवढीच अरुंद वाट.
घनचक्कर हे महाराष्ट्रातल्या सर्वांत उंच शिखरांमध्ये क्रमांक तीनचे शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची १५०९ मीटर म्हणजेच ४ हजार ९४९ फूट आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. दुसऱ्या क्रमांकाचे शिखर गावलदेव हे घनचक्कर आणि कात्राबाईची खिंड यांच्यामध्ये आहे. हे माळशेज डोंगर रांगेत येते. याची उंची १५२२ मीटर (४९९२ फूट) आहे. घनचक्करची वाट ही शिरपुंजेच्या भैरवगडाच्या खिंडीतून पुढे जाते. वाट थोडी जोखमीची आहे. वाटाड्या सोबत असेल तरच घनचक्कर डोंगर करायला इथून जावे अन्यथा जाऊ नये. एक पाऊल बसेल एवढीच जागा आहे. थोडा हलगर्जीपणा झाला, तर थेट दरीत. जवळपास शिरपुंजे गावापासून भैरवगड माथा आणि खिंडीपासून घनचक्करचा माथा आणि पुन्हा शिरपुंजे गावात पोहचण्यासाठी जवळपास पाच तास आणि आठ किलोमीटरचे पदभ्रमण करावे लागते.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत असल्यामुळे भैरववगडावर जाण्याची वाट व्यवस्थित मळलेली आहे..या वाटेवर अनेक ठिकाणी कातळकोरीव पायर्या आणि काही ठिकाणी रेलिंग्ज लावलेले आहेत. या वाटेने १ तासात आपण भैरवगड आणि त्याच्या बाजुचा डोंगर यामधील खिंडीत येउन पोहोचतो. येथे वरच्या अंगाला एक टाक आहे. पुढे कातळात कोरलेल्या सुंदर पायर्या आहेत. या पायर्या चढुन वर आल्यावर गडाची तटबंदी आणि उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशव्दार दिसते.
प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला कातळात कोरलेली ४ टाकी आहेत. त्याच्या पुढे एक कोरड टाक आहे. ते पाहुन गुहेकडे (दक्षिणेकडे) जाण्यार्या पायवाटेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला मोठ खांब टाक आहे. टाक्यापर्यंत जाण्यासाठी असलेला मार्गही कातळ कोरुन बनवलेला आहे. या टाक्याच्या बाजुला एक रांजण खळगा कोरलेला आहे. तर टाक्याच्या वरच्या बाजूला तीन रांजण खळगे खोदलेले आहेत.टाक आणि त्यावरील रांजण खळगे पाहुन परत पायवाटेवर येउन गुहेच्या दिशेने जाताना उजव्या बाजुला कातळात कोरलेली ४ टाकी आहेत. त्याच्या वरच्या बाजुला अजुन ४ पाण्याची टाकी आहेत. टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेली गुहा आहे. या गुहेला कमान असलेल प्रवेशव्दारही आहे.

































Comments
मंदाकिनी शेलार