महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट " कळसुबाई शिखर "
हिवाळ्याचा ऋतू ,बोचणारी सुंदर गुलाबी थंडी, सगळीकडे हिरवळ दाटलेली, आल्हाददायक ऊन, उंच उंच शिखरावर चालणारा ऊन-सावलीचा विलोभनीय खेळ... एकंदरीतच आमच्यासारख्या ट्रेकर्सना ट्रेकिंग करण्यासाठी, वेगवेगळे गड ,किल्ले, पायवाटा धुंडाळण्यासाठी अगदी विहंगम असाच ऋतू... अशा ऋतूमध्ये पाय एखाद्या उंच शिखराकडे न वळते तरच नवल ! त्यातच आमच्या चामरलेणी ट्रेकर्स ग्रुपच्या ट्रेकर्सचा उत्साह तर अगदी वाखाणण्याजोगाच ! मग काय ! एका फोनवर सगळे मंडळ हजार ! व लागलीच नियोजन करून आम्ही निघालो "कळसुबाई " या शिखराकडे...!
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये बारी गावाजवळ असलेले कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. यालाच "महाराष्ट्राचे माउंट एवरेस्ट"असे देखील म्हणतात. नाशिक पासून साधारणपणे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शिखराला हौशी ट्रेकर, निसर्गप्रेमी मंडळी वारंवार भेट देतात. तसे पाहिले तर आरोग्यदायी वातावरण नाशिक मध्ये खूप आहे .त्यातच नाशिकपासून जवळच्याच पुणे व इतर जिल्ह्यांमधील लोकांना देखील भटकंतीची खूपच आवड असल्यामुळे हरिहर, हरिश्चंद्रगड तसेच कळसुबाई या ठिकाणी ट्रेकिंगला येणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय असते. त्यातच सुट्टीच्या दिवसांमध्ये तर यामध्ये खूप मोठी भर पडते. कळसुबाई शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची 1646 मीटर म्हणजेच जवळपास 5400 फूट उंच इतकी आहे.
कळसुबाई शिखरावर कळसू मातेचे मंदिर आहे. या शिखराला कळसूबाई हे नाव तीन बहिणींच्या नावावरून म्हणजेच कळसुबाई, रत्नाबाई व कात्राबाई या नावावरून पडले आहे. कळसुबाईपासून जवळच असलेला रतनगड किल्ला यालासुद्धा नाव रत्नाबाई या नावावरून पडलेले आहे.
कळसुबाई या शिखराला कळसूबाई हे नाव पडण्यामागे सुंदर आख्यायिका तेथील स्थानिकांकडून सांगितल्या जातात. त्यातली पहिली अख्यायिका म्हणजे कळसु नावाची मुलगी खालील गावामध्ये पाटलांकडे घर कामासाठी राहिलेली होती. परंतु एक अट तिने पाटलाला घातलेली होती की " तुझ्या घरची सर्व कामे करेल. फक्त भांडी घासणार नाही व केर कचरा काढणार नाही, झाडून काढणार नाही." परंतु एका दिवशी पाटलाकडे खूप मोठ्या प्रमाणावर पाहुणे आलेले असल्यामुळे गडबडीमध्ये त्यांनी कळसूला सांगून कचरा काढायला लावला, झाडू मारायला लावला व भांडी देखील घासायला लावली .त्यामुळे पाटलांनी अट मोडल्याचा राग मनात धरून कळसू ही मुलगी शेजारच्या या उंच शिखरावर येऊन बसली व तिथेच तिने देह त्याग केला व कालांतराने तिथे तिचे मंदिर बांधण्यात आले. दुसरी आख्यायिका सांगितली जाते की या गावामध्येच कळसूबाई सून म्हणून आलेली होती व तिला जंगली वनौषधींचे प्रचंड ज्ञान होते. या ज्ञानाच्या बळावरच तिने अनेक लोकांना सेवाशुश्रुषा केली व तिच्या मृत्यूनंतर त्या शिखराला लोकांनी तिचे नाव दिले व वरती छोटेसे मंदिर देखील बांधले .आदिवासींमध्ये पूर्वजांना देव मानण्याची प्रथा आहे, त्यामुळे त्यांनी कळसुबाईला देखील देवाचाच दर्जा दिला व तेथे मंदिर बांधून विधीवत पूजाअर्चा देखील केली जाते.
कळसुबाई शिखरावर पोहोचण्यासाठी आता स्थानिक प्रशासनाने जागोजागी चार मोठ्या आकाराच्या लोखंडी शिड्या लावलेल्या असल्यामुळे तितकासा धोकादायक प्रवास आता नाही, परंतु चढण उभी असल्यामुळे शिड्यांना धरूनच जावे लागते. शिखरावरती कळसू मातेचे छोटेसे सुंदर मंदिर आहे. या मंदिरापासून आजूबाजूच्या परिसरातील विलोभनीय दृश्य बघायला मिळते. उंचच उंच इतर शिखरे, ढग, धुके यांच्या रांगेमध्ये आपण शिखरावर पोचल्यावर स्वतःला पाहतो. शिखरावरती एक जागा देखील आहे तिथे कळसुआईची पावले असल्याचं सांगितलं जातं.
कळसुबाई शिखरावरून खाली पाहिले तर भंडारदरा जलाशयाचा विस्तीर्ण परिसर, सप्तशृंगी वनी गड ,मार्कंडेय पर्वत ,रामशेज ,अचला, विश्रामगड ,अलंग- मदन- कुलंग(AMK Range ) ही रांग, धोडप, माथेरान व हरिश्चंद्रगड नजरेस पडतात. कळसुबाईचा ट्रेक सुरू करण्यापूर्वी गावातच खालीदेखील एक कळसुबाईचे मंदिर नजरेस पडते व शिखरावर देखील एक मंदिर आहे. खालील गावामध्ये मंदिर असण्याचे कारण असे की, ज्यांना शिखरावर जाऊन मंदिरात दर्शन घेणे शक्य नाही, त्यांच्या सोयीसाठी खाली गावामध्ये हे मंदिर बांधलेले आहे.

कळसुबाईचे बारी जहागिरदारवाडीतील मंदिर
कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी काजवा महोत्सव देखील हे पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण असते.साधारणपणे पावसाळा सुरू होण्यापूर्वी येथे काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते तेव्हा येथे रात्री मुक्कामास येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. कळसुबाई शिखरावर पोहोचल्यानंतर त्याची उंची व भव्यता यापुढे आपलं मानवी अस्तित्व किती फिकं आहे याची आपल्याला जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
नवरात्रीमध्ये म्हणजेच दसऱ्यावेळी कळसुबाई शिखरावर व खालील गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यात्रा देखील भरते. दर मंगळवारी व गुरुवारी देखील या कळसुबाईच्या मंदिरामध्ये स्थानिकांकडून पूजाअर्चा, नैवेद्य व इतर विधी केले जातात. कळसुबाई शिखरावर जागोजागी असलेल्या पायऱ्या तसेच लोखंडी मजबूत शिड्या यांमुळे कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी तुम्ही अगदीच उत्तम ट्रेकर्स असायला हवे असे काही नाही. साधारणपणे चालायची सवय असलेला प्रत्येक व्यक्ती हळुहळु का होईना या शिखरावरती येऊ शकतो.
कळसुबाई शिखरावरती जाण्यापूर्वी काही गोष्टींची तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे .अंग पूर्णपणे झाकतील असे कपडे ,डोळ्यावरती गॉगल, डोक्यावरती कॅप तसेच पायामध्ये चांगल्या दर्जाचे घसरणार नाहीत असे शूज असणे आवश्यक आहे .साधारणपणे कळसुबाई शिखर पूर्णपणे चढण्यासाठी दोन ते तीन तास लागू शकतात त्यामुळे या काळात लागणारा आवश्यक पाण्याचा साठा आपल्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण वरती शिखरावर असलेल्या एका विहिरीमध्येच अल्प प्रमाणात पाणी असते. त्याशिवाय इतर हॉटेल्स,दुकाने येथे पाणि,चहा,मॕगी,काकडी,लिंबुपाणि,नाश्ता मिळतो पण थोडा महाग असतो. त्यामुळे पुरेसे पाणी सोबत घेतलेलेच बरे .हलकासा नाश्ता देखील तुमच्यासोबत असावा. लिंबू पाणी किंवा तत्सम ड्रिंक्स आपण सोबत घेतलेले बरे .शिखरावरती मंदिर परिसराजवळ तसेच रस्त्यामध्ये कोठेही केरकचरा होणार नाही यासाठी आपल्याकडे एखादी एक्स्ट्रा पिशवी देखील असलेली चांगलीच आहे.
घोटी सिन्नर महामार्गावरून पुढे गेल्यानंतर बारी जहागीरदारवाडी या गावांमधून कळसुबाईच्या शिखराकडील ट्रेकच्या प्रवासाला सुरुवात होते. बारी जहागीरदारवाडी या गावाच्या रोजगाराचे प्रमुख साधनच मुळात पर्यटन किंवा ट्रेकशी संबंधित व्यवसायावर चालते. या गावांमध्ये तुम्हाला नाईट मुक्कामासाठी टेंट मिळतात ,गाईड मिळतात राहण्यासाठी तात्पुरती सोय देखील इथे केली जाते तसेच घरगुती सुंदर प्रकारचे जेवण देखील व्हेज - नॉनव्हेज आपल्याला बनवून मिळते ,त्यामुळे आपण अचानक जरी गेलात तरी येथे राहण्यापासून जेवणापर्यंत सर्व प्रकारची सोय ऐन वेळेला तुम्हाला मिळते .कळसुबाईच्या ट्रेकला शक्यतो शनिवार ,रविवार ,सरकारी सुट्ट्यांचे वार टाळूनच गेलेले बरे कारण कळसुबाई शिखराच्या जवळ पोहोचल्यानंतर ज्या मोठ्या दोन शिड्या आहेत, त्या शिड्यांजवळ चिंचोळा मार्ग असल्यामुळे तेथे पर्यटकांची गर्दी सुट्टीच्या दिवशी जास्त असते. त्यामुळे तेथे अत्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते .अशावेळी गर्दीमुळे आपल्याला गैरसोयीचा सामना करावा लागतो तसेच दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे ऑफ डे ला कळसुबाईच्या ट्रेकला गेले तर अधिक उत्तम. शक्यतो चालायची, डोंगर चढायची, ट्रेकिंग -हाईकिंगची सवय असणाऱ्यांनीच कळसुबाईला जाणे योग्य राहील.
माहितीचे स्त्रोत :- " चामरलेणी ग्रुप व सदस्य ", विकिपिडीया, स्थानिक ग्रामस्थ, युट्युब .
*** काहि इतर क्षणचित्रे ***























Comments