चार युगांचा साक्षीदार-हरिश्चंद्रगड

 



                महाराष्ट्रामधील क्वचितच एखादी व्यक्ती अशी असेल की ज्याने हरिश्चंद्रगड -कोकणकडा याचं नाव देखील ऐकलेलं नसेल किंवा समाज माध्यमातून त्याचे फोटो,व्हिडिओ पाहिलेले नसतील,इतका हरिश्चंद्रगड व त्यावरील कोकणकडा,महादेव मंदिर सुप्रसिद्ध आहे.तसं बघायला गेलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा त्या परिसरामधील गड- किल्ल्यांसाठी,विविध भव्य- दिव्य डोंगररांगांसाठी सुप्रसिद्ध आहे.या रांगेमध्ये खूपच  भव्य -उंच -विशाल,ट्रेकर मंडळींना खुणावणारे गड किल्ले व सुळके आढळतात.पावसाळ्यात व हिवाळ्यामध्ये तर यांचे सौंदर्य अधिकच बहरलेले बघायला मिळते. अलंग -मदन- कुलंग- रतनगड-भैरवगड, आजोबा किल्ला याशिवाय विविध उंच सुळके,धबधबे यांनी हा प्रांत बहरलेला आहे.या भागातील विपुल पर्जन्यमान, वृक्षराजी, दाट जंगल व येथील निवासी ग्रामस्थांनी राखलेले जंगल यामुळे या भागाचे गावपण व नैसर्गिक स्थिती आजही शाबूत आहे,त्यामुळे विविध प्रकारचे प्राणी,पक्षी व जैवविविधता, निसर्गाची विविध रूपे,मुक्त रंगाने निसर्गाची उधळण बघायची असेल तर एकदा या भागामध्ये येऊन मुक्कामी राहिलेले अगदी सोन्याहून पिवळे !



                पुणे -मुंबई -नाशिक यासारख्या मोठ्या शहरांमधून अकोले तालुक्याकडे दळणवळणांच्या साधनांच्या विपुलतेमुळे कनेक्टिव्हिटी जास्त असल्याकारणाने निसर्ग- पर्यटन तसेच ट्रेकिंग व गड -किल्ल्यांवर कॅम्पिंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.ही एका अर्थाने चांगली गोष्ट आहे कारण या निमित्ताने ग्रामीण संस्कृतीचे दर्शन शहरी भागाला होते आहे तसेच ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना मिळत असून ग्रामीण भागामध्ये विपुल रोजगार देखील उपलब्ध होत आहेत.गड किल्ल्यांचे संवर्धन याबाबत आता तरुण पिढी जागी होताना दिसत आहे.नाशिक पासून साधारणपणे 120 km अंतरावर तर पुणे मुंबई पासून जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावर असलेला हा हरिश्चंद्रगड व त्यावरील उल्लेखनीय कोकणकडा.पर्यटन प्रेमी तसेच ट्रेकर मंडळी या कोकण कड्याच्या अक्षरशः प्रेमात पडतात.उभा संपूर्ण कातळामध्ये असलेला डोंगर केवळ आणि केवळ वाऱ्याच्या झोतामुळे,पर्जन्याच्या माऱ्यापुढे इंग्रजी उलट्या c या अक्षराप्रमाणे बनलेला असल्यामुळे हा कोकण कडा बघण्यासाठी याच्या शिखरावरून उभे राहून बघता येणे शक्यच नाही तर तो पूर्ण बघण्यासाठी ह्या कोकण कड्यावर झोपून रांगत जाऊन खाली मान करून बघावे लागते,तेव्हा निश्चितच आपले डोळे विसरतात व निसर्गाच्या या चमत्कारिक कलाकृतीपुढे आपण नतमस्तक होतो.इतका प्रचंड -इतका अभेद्य -इतका टणक कातळ वर्षानुवर्षांच्या ऊन, वारा, पाऊस याच्या माऱ्यामुळे असे रूप धारण करतो की बघणाऱ्याची दूरवरूनच पाचावर धारण बसावी.कोकणकडा हे निश्चितच हरिश्चंद्रगडावरील प्रमुख आकर्षणाचे केंद्र असले तरी या गडावरील हरिश्चंद्रेश्वर मंदिर,अति विशाल महादेव मूर्ती असलेले केदारेश्वर मंदिर, तारामती शिखरावरून पुढून दिसणारा संपूर्ण माळशेज घाटाचा परिसर,तारामती शिखराच्या मागील बाजूस असलेली काळभैरवाची टेकडी  व आजूबाजूच्या परिसरामधील उंच उंच दिसणारी इतर सर्व शिखरे व सुळके,पावसाळ्यामध्ये जागोजागी वाहणारे विपुल धबधबे व काही ठिकाणी तयार होणारे रिवर्स वॉटरफॉल या सर्व बाबी पाहण्यासाठी इथे वर्षभर पर्यटकांची रीघ असते.त्यामुळे हरिश्चंद्रगडाच्या पठारावर कॅम्पिंग ची सोय पुरवणारे तसेच घरगुती जेवण बनवून देणारे खूप सारे छोटे-छोटे स्टॉल्स वर्षभर असतात.निसर्गाचे हेच सौंदर्य लुटण्यासाठी,अस्सल गावठी जेवणावर ताव मारण्यासाठी तसेच या सगळ्या आठवणी आपल्या कॅमेरामध्ये साठवून ठेवण्यासाठी तरुणाई निश्चितच हरिश्चंद्रगडाकडे वळते.याशिवाय हरिश्चंद्रगडाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्य अश्मयुगीन कालखंडातील मनुष्याचे काही प्रमाणात अवशेष या गडावर आढळलेले आहेत.विविध पुराणांमध्ये तसेच प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये हरिश्चंद्रगडाचा उल्लेख केलेला आढळतो.सहाव्या शतकामध्ये कालचुरी राजघराण्याच्या काळात या गडाची निर्मिती करण्यात आली तर या गडावरील लेणी अकराव्या शतकामध्ये कोरल्या गेल्याचा संदर्भ देखील आढळतो.महान ऋषी चांगदेव हे चौदाव्या शतकामध्ये या गडावर ध्यान करत असल्याची नोंद आहे.


                        नाशिक वरून हरिश्चंद्रगडाच्या कॅम्पिंगसाठी असलेले बेस व्हिलेज पाचनई.या गावापर्यंत येणारा रस्ता अगदी सुस्थितीत आहे. खाजगी गाड्यांनी तसेच मोठ्या टेम्पो ट्रॅव्हलरने इथपर्यंत येण्यात कुठलीही अडचण नाही.बेस व्हिलेज पासूनच हरिश्चंद्रगडाच्या अलीकडील उभ्या कातळ भिंतींचे दर्शन होते.याच कातळ भिंतींच्या पोटापोटाने चालत गेले असता साधारणपणे पाऊण तासानंतर आपण हरिश्चंद्रगडाच्या पठारावरती पोहोचतो.वाटेत विविध दऱ्याखोऱ्या,कडे,सुळके,विविध धबधबे -झरे,उंचच उंच कातळ भिंती,विविध रानफुलांनी डवरलेले जंगल या बाबी पाहत -पाहत हरिश्चंद्रगडाच्या पठारावर कसे पोहोचलो हे देखील आपल्याला समजत नाही.



                     गडाचे पठार खूपच विस्तीर्ण व रुंद आहे.आपण गडावर पहिल्या वेळा येत असाल तर गाईड सोबत घेतलेला कधीही बरा.कारण धुक्यामध्ये येथे वाट हरवण्याची भीती असते.पठाराच्या आजूबाजूने खोल दऱ्या असल्यामुळे धुक्यात वाट चुकलेल्या अवस्थेमध्ये येथून आपला कडेलोट होण्याची दाट शक्यता असते. हरिश्चंद्रगडाच्या पठारावरून उजव्या बाजूने सव्वा किलोमीटर अंतरावरच सुप्रसिद्ध कोकणकडा आहे. या कोकण कड्याच्या बाजूने फॉरेस्ट विभागाने आता रेलिंग लावलेले आहेत.तरीही काही हौशी पर्यटक रेलिंग ओलांडून खाली पाहायचे धाडस करतात. संपूर्ण कोकण कडा व तेथील सुळके पाहायचे असतील तर रेलिंगच्या डाव्या हाताने समोर असलेल्या विस्तीर्ण पठारावर गेलात तर सर्व कोकणकडा आपल्याला विस्तीर्णपणे पाहता येतो.खालील भागातून वारा जोरदारपणे कोकणकड्यावरून वरती वाहत येत असल्यामुळे कोकणकड्यावर उभे राहून आपण झाडाची फांदी किंवा तत्सम एखादी कमी जड वस्तू खाली फेकली तर ती खाली जाण्याऐवजी वाऱ्याच्या झोतामुळे उलट वरती येऊन उंचावर जाते.हे पाहिल्यावर निश्चितच आपले डोळे विस्फारतात.




                        कोकणकड्याचे दर्शन घेतल्यानंतर वरतीच शिखरापासून पुढे तारामती सर्वोच्च शिखर लागते.तारामती शिखरावर केवळ महादेवाच्या कोरलेल्या एका छोट्याशा पिंडी शिवाय कुठल्याही प्रकारचे अवशेष बघायला मिळत नाहीत परंतु समोरून बाजूस दिसणारा संपूर्ण माळशेज घाटाचा नजारा,काळभैरवाची धडकी भरवणारी टेकडी व इतर उंचच उंच कडे तसेच विमानांमधून दिसतो,तशा प्रकारचा नजारा बघण्यासाठी तारामती शिखरावर आवर्जून जावे.



            तारामती शिखराच्या डाव्या बाजूने उतरलात तर खाली उतरताना टप्प्याटप्प्याने दोन लोखंडी मजबूत शिड्या लागतात.या शिड्यांवरून उतरताना आजूबाजूचा समृद्ध निसर्ग व ट्रेकर मंडळींचा कस पाहणारा भूभाग एक वेगळा आनंद देऊन जातो.या बाजूस असणारे उंचच उंच खडक, दाट जंगल व उभी उतराई ट्रेक केल्याचे समाधान देऊन जाते.या बाजूने दिसणाऱ्या कोकणकड्याचे सौंदर्य काही औरच असते.सर्वच सुळके आपल्याला या बाजूने उतरताना खालीपर्यंत एक नयन मनोहर सुख देत जातात.कोकणकड्याच्या या बाजूने फिरताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते कारण वाऱ्याचा उलट बाजूने येणाऱ्या तीव्र झोतामुळे आपला तोल जाण्याची शक्यता असते.



                               कोकणकडा पाहून परत हरिश्चंद्रगडाच्या पठारावर आल्यावर उताराच्या डाव्या बाजूने हरिश्चंद्रेश्वर महादेव मंदिर लागते. उभा कातळ करून अत्यंत सुंदर कलात्मक पद्धतीने कोरलेले हे महादेव मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक आदर्श नमुनाच होय.बारीक कलाकुसर व कोरीव काम करण्यासाठी घेतलेली मेहनत आपल्याला लगेचच लक्षात येऊन जाते व हीच मेहनत आपल्याला विस्मयचकित करून टाकते.हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या परिसरात एक विस्तृत पुष्करणी सप्ततीर्थ पाण्याचे कुंड आहे.





                 या कुंडाच्या परिसरात विविध देवी-देवतांची मंदिरे अत्यंत सुबकपणे कोरून ठेवलेली आहे.यातील काही मंदिरांमध्ये आज मुर्त्या नसल्या तरी काही मुर्त्या सुस्थितीत आहेत.हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या परिसरात विविध पाण्याचे छोटे छोटे कुंड व गुहासुद्धा आहेत.तसेच मंदिर परिसरामध्ये यक्ष गंधर्व नर्तकी विविध पाना -फुलांच्या नक्षी दगडामध्ये व्यवस्थितपणे कोरलेल्या आजही आहेत.दगडामध्येच कोरलेल्या महादेवाच्या पिंडीच्या पुढे व मागील दोन्ही बाजूस दोन सुबक नंदी आपल्याला बघायला मिळतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मुख्य द्वारावर चेहऱ्याच्या आकाराची शिल्पे आहेत.ती मंदिराच्या रक्षकांची शिल्पे आहेत असे सांगण्यात येते.

     

 


       
 

             हरिश्चंद्रगडावरील अजून एक आकर्षणाची बाब ती म्हणजे केदारेश्वर महादेव मंदिर. चार युगांचा साक्षीदार असे या महादेव मंदिराला संबोधले जाते कारण या मंदिराचे चार खांब म्हणजेच साक्षात चार युगे असल्याचे बोलले जाते.सत्ययुग, द्वापारयुग,त्रेतायुग व कलियुग या चार युगांचे प्रतिनिधित्व या मंदिराचे चार खांब करतात असे सांगितले जाते.त्यापैकी तीन खांब कोसळलेले असून एकच दगडी खांब सध्या शाबूत आहे.व हा खांब कलियुगाचे प्रतीक आहे असे संबोधले जाते.स्थानिक आख्यायिकेप्रमाणे,जेव्हा हा चौथा खांबदेखील तुटेल तेव्हा जगाचा अंत होईल असे सांगण्यात येते.केदारेश्वर महादेव मंदिरांमधील महादेव मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.अकरा ते बारा फूट उंच व सहा ते आठ फूट रुंद इतक्या भव्य आकारांमधील कातळामध्ये कोरलेली ही प्राचीन मूर्ती तिच्या भव्यतेमुळे आजही प्रत्येकाला आकर्षून घेते.मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच काही लेणी देखील कोरलेल्या आहेत.पावसाळ्यामध्ये या मूर्तीच्या आजूबाजूच्या गाभाऱ्यामध्ये कमरेपेक्षा उंच जास्त पाणी असते.अशावेळी मुख्य द्वारापासून मूर्तीपर्यंत पोहोच इथपर्यंत यावे लागते.पावसाळ्यामध्ये या मंदिराच्या इतर तीनही भिंतींमधून पाणी मंदिरामध्ये ओसरत राहते.या मूर्तीची भव्यता व मंदिराचे कोरीव काम करण्यासाठी लागलेली मेहनत पाहून आपसूकच आपले हात याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केलेल्या सर्वांसाठी जोडले जातात.

       


             हरिश्चंद्रगडावरून दिसणाऱ्या इंद्रवज्र या घटनेचा अनुभव घेण्यासाठी खूप लोक येथे पावसाळ्यामध्ये येतात.आपण जेव्हा कोकण कड्यावर उभे असु तेव्हा कोकणकड्याच्या खाली खूप मोठ्या आकारात ढग साचलेले असतात व पावसाळ्यात आपल्या डोक्यावरती जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा एका रेषेत तयार होणाऱ्या या संरचनेमुळे कोकणकड्याच्या खाली असलेल्या ढगांवर आपली सावली तयार होते व सावलीच्या आजूबाजूने संपूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्य तयार होते. याच नैसर्गिक अद्भुत घटनेला इंद्रवज्र असे म्हणतात.आपण सहसा जमिनीवरून उंच आकाशामध्ये अर्धवर्तुळाकृती इंद्रधनुष्य बघतो परंतु इतक्या उंचावरून आपण जेव्हा खाली पाहतो तेव्हा हेच इंद्रधनुष्य संपूर्ण वर्तुळाकृती दिसते.ही एक आश्चर्यचकित करणारी घटना असते.

   

 

             याशिवाय या हरिश्चंद्रगडावरील अजून खूप साऱ्या बाबी आहेत ज्या आपल्याला डोळ्यांमध्ये साठवून ठेवता येतात. हरिश्चंद्रगड संपूर्ण फिरताना निवडक ठिकाणे धोकादायक जरी असली तरी संपूर्ण गड परिसर केवळ चालत आपण पूर्ण करू शकतो. चालण्याची सवय असलेला प्रत्येक व्यक्ती हरिश्चंद्रगडाची सफर करू शकतो.हरिश्चंद्रगडाची तीव्रता मध्यम स्वरूपाची आहे.याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 4670 फुट इतकी आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये तुम्हाला मुक्कामाची तसेच घरगुती जेवणाची सोय आरामात होऊ शकते.याशिवाय शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या इतर दिवसांमध्ये हरिश्चंद्रगड पठारावरती सुद्धा मुक्कामाची व जेवणाची सोय करणारे स्टॉल्स उपलब्ध असतात. हरिश्चंद्रगडावर वर्षभर कधीही भेट देता येऊ शकते.फक्त पावसाळ्यामध्ये विशेष काळजी व सुरक्षितता बाळगून फिरलेले कधीही बेहत्तर. नाशिक मधून आपण येत असाल तर नाशिक मुंबई मार्गाने घोटी - राजुर- पाचनई मार्गे हरिश्चंद्रगडावर येता येते.

   **********************************

 हरिश्चंद्रगडावरील विविध ठिकाणे पाहण्यासाठी व या ट्रेकचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी  येथे टच करा.

 *************************************

          हरिश्चंद्रगड -तारामती -कोकणकडा ट्रेकमधील सहभागी सदस्य :-

 पोपटराव सोनवणे 

 नितीन गांगोडे 

 भरत पवार 

 श्याम रसाळ 

 किशोर अहिरे

 सुहास कोळेकर

   **********************************

                    काही इतर क्षणचित्रे 













   
     **********************************

Comments