सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

 


     

    

                  शिवरायांचे गड - किल्ले,शिवकालीन इतिहास याबाबत यापूर्वी एक प्रकारची मूर्छित अवस्था मधल्या काळात आलेली आपणास बघायला मिळत होती. परंतु आताच्या काळात एक आशादायक चित्र आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहते आहे. विशेषतः तरुण पिढीच्या मनात सोशल मीडिया इन्फ्लुएन्समुळे का होईना परंतु गड-किल्ल्यांवर भटकायची क्रेझ तयार झाली आहे. वीकेंडला तसेच जोडून सुट्ट्या आल्यानंतर गड -किल्ल्यांवर मुक्कामी जाण्याचे,खास टेन्टमध्ये मुक्काम करण्याचे तसेच ग्रामीण भागातील आयुष्य जगण्याचे अनुभव घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे.यातील काही उणीवा निश्चितच असतील,मात्र यामुळे निश्चितच काही अंशी का होईना,मी तर म्हणेन बऱ्याच अंशी शिवराय जनमानसाला कळत आहेत. जागोजागी याबाबत सांघिक उठाव होताना आपल्याला दिसून येतात जसे की,शिवकालीन अभ्यास शिबिरे, शस्त्र प्रदर्शन, मोडी लिपी अभ्यास वर्ग, व्याख्यानमाला, परिसंवाद,गड भ्रमंती,विविध मोहिमा, इ.

                 याच प्रयत्नांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी तसेच ट्रेकिंग करण्याबाबत दक्षता,गडकिल्ल्यांबाबत जाणीव जागृती, राज्यस्तरावरील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मोहिमा व या क्षेत्रातील दिग्गज,पारंगत व्यक्ती व त्यांचे प्रयत्न तसेच गडकिल्ल्यांच्या सुरक्षित भ्रमंतीसाठी लागणारे साहित्य व याबाबत झटणाऱ्या विविध छोट्या-मोठ्या सर्व संस्था व आयोजक हे सर्व एकाच छताखाली उपलब्ध व्हावे याच निस्वार्थ हेतूने कैलासवासी अविनाश जोशी स्मृति प्रित्यर्थ सह्यमित्र फाउंडेशन आयोजित सह्याद्री मित्र संमेलनाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. यंदाचे म्हणजेच २०२५ हे वर्ष या संमेलनाचे तिसरे यशस्वी वर्ष होय.आणि याच सह्याद्री मित्र संमेलनाच्या नागरिकांमधील प्रमोशनसाठी अकोले तालुका,जिल्हा अहिल्यानगर येथील सर्वश्रुत किल्ले विश्रामगड उर्फ पट्टा किल्ला येथे ट्रेक आयोजित केला होता ज्याला अभूतपूर्व प्रतिसाद उत्साही गिरीप्रेमी,सह्यप्रेमी,निसर्गप्रेमी ट्रेकर मंडळीमधून मिळाला.सह्याद्री मित्र संमेलन आयोजन समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास ३०० पेक्षा जास्त ट्रेकर रविवार दिनांक २२ जून २०२५ रोजी आयोजित केलेल्या किल्ले विश्रामगड येथील ट्रेकला आवर्जून उपस्थित होते.




                दाट धुक्याची दुलई पांघरलेला विश्रामगड, विविध विपुल शिवकालीन अवशेषांनी व्याप्त असलेला विश्रामगड, शिवरायांच्या महिन्याभराच्या सानिध्याने पावन झालेला विश्रामगड नेहमीच सर्व नागरिकांना खुणावत राहिलेला आहे.आबाल वृद्धांपासून सर्वच या गडावर चढण्यालायक परिस्थिती असल्यामुळे विश्रामगड उर्फ पट्टा किल्ला सर्वांमध्येच लोकप्रिय आहे. शिवाय शिवरायांचे सानिध्य लाभलेले असल्यामुळे या किल्ल्याभोवती एक प्रकारचे वलय देखील प्राप्त झालेले आहे. वनविभाग तसेच स्थानिकांनी या किल्ल्याची योग्य देखभाल वेळीच ठेवल्यामुळे आजदेखील बरेचसे अवशेष सुस्थितीत आहेत.गडाच्या अगदी पायथ्यापर्यंत वाहने जाण्याची सुविधा असल्यामुळे येथे वर्दळ दिसून येते.पायथ्याशी असणाऱ्या विविध छोट्या हॉटेलमधून राहण्याची, जेवण -नाश्त्याची उत्तम सोय माफक दरात ठेवली जाते.त्यामुळे देखील हा गड सर्वांमध्ये लोकप्रियच आहे.आणि नेमकी ही बाब हेरूनच आयोजन समितीने आमच्या जल्लोष ट्रेकिंग ग्रुपवर प्रमोशनल ट्रेक आयोजित करण्याची जबाबदारी दिली तेव्हा, जल्लोष ग्रुपने किल्ले इंद्राई व किल्ले विश्रामगड या दोन पर्यायांमधून एकमताने विश्रामगड किल्ल्याची निवड केली.ही आमच्यावर खूप मोठी जबाबदारी होती कारण,नाशिक तसेच नाशिक बाहेरूनदेखील येणाऱ्या ट्रेकर मंडळींची संख्या अभूतपूर्व राहणार होती.मागील दोन वर्षांमधील प्रमोशनल ट्रेकचा इतिहास व अनुभव लक्षात घेता आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वांची सुरक्षितता तसेच कुठल्याही प्रकारची होणारी गैरसोय टाळणे, वनविभाग,स्थानिक विविध ट्रेकर,रेस्क्यू टीम  यांच्याशी सुसंवाद साधून हा प्रमोशनल ट्रेक यशस्वी करणे हा आमचा मुख्य हेतू होता.प्रमोशनल ट्रेक २२ जून रोजी घ्यावयाचे ठरले होते.त्यापूर्वी सर्व नियोजन करणे आवश्यक होते.त्यासाठी दिनांक ३१ मे २०२५ रोजी आमची जल्लोष ग्रुपमधील एक टीम विश्रामगड किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्कामी गेली व दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ जून २०२५ रोजी आम्ही आठ सदस्यांनी विश्रामगड किल्ल्याची यथावकाश रेकी केली.




                  रेकी वेळी प्रत्यक्ष प्रमोशनल ट्रेक दिवशी एकत्र जमण्याचे ठिकाण,ट्रेकचा मार्ग,बघावयाचे शिवकालीन अवशेष,ट्रेक दरम्यानची धोकादायक ठिकाणे,तेथे करावयाच्या सुरक्षा उपाययोजना,मोठा पाऊस आल्यास आडोशाची जागा,वक्त्यांना बोलण्यासाठीचा वेळ व जागा,बसेसचा सुरक्षित प्रवास मार्ग,प्रवासादरम्यानचा नाश्ता या व इतर सर्व गोष्टींची पाहणी केली व त्यावर दुसऱ्या दिवशी ग्रुपमधीलच अनुभवी ट्रेकर्स सोबत सांगोपांग चर्चा केली.प्रमोशनल ट्रेक आयोजित करण्याची जबाबदारी ज्या अर्थाने आमच्या जल्लोष ग्रुप वर देण्यात आली होती त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडून या प्रमोशनल ट्रेकला तसेच लवकरच होणाऱ्या सह्याद्री मित्र संमेलनाला गालबोट लागू नये याची सर्व जल्लोष ग्रुप सदस्य व आयोजक समिती खबरदारी घेत होते. रेकी यथावकाश पार पडली व प्रत्यक्ष ट्रेकचा दिवस उजाडला.

🚩 विश्रामगड किल्ल्याचा थोडक्यात इतिहास :-



                       बहामनी राजवटीच्या काळात विश्रामगड किल्ल्याचे बांधकाम झाल्याचे दाखले मिळतात.बहामनी राजवटीचे तुकडे झाल्यानंतर स्थानिक महादेव कोळी समाजातील किल्लेदारांनी व वंशजानी या किल्ल्याचा कारभार पाहिला.पुढे चालून अहमदनगरच्या निजामशहाने हा किल्ला जिंकून घेतला.मुघल राजवटीचा अमल आल्यानंतर मुघलांनी या किल्ल्यावर आक्रमण केले.त्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी विश्रामगड उर्फ पट्टा किल्ला स्वराज्यामध्ये जिंकून घेतला.तत्कालीन जालनापूर म्हणजेच आताचे जालना येथील दक्षिण मोहिमेच्या वेळी केलेल्या आक्रमणातील प्राप्त सोने,चांदी,जडजवाहीर,घोडे व इतर मौल्यवान ऐवज घेऊन स्वतः शिवराय राजधानी रायगडाकडे संपूर्ण लवाजम्यासह निघालेले होते.त्यामुळे शिवरायांच्या संपूर्ण सैन्याची गती धीमी होती.ही बातमी कळताच औरंगजेबाचा सेनापती रणमस्तखान मोठ्या फौजफाट्यासह शिवरायांच्या मागे आला.तेथे तुंबळ युद्ध चालले.शिवाय मागाहून मुघलांची मोठी कुमक येत असल्याची बातमी हेरामार्फत हंबीरराव मोहिते यांना समजली होती.त्यामुळे स्वराज्याचा धनी वाचविण्यासाठी स्वतः हंबीरराव मोहिते यांनी शिवरायांना जवळीलच विश्रामगडावर जाण्याचे सुचविले.शिवरायांना सुरक्षित गडावर पोहोचवण्याची जबाबदारी शिवरत्न गुप्तहेर खात्याचे प्रमुख व सह्याद्रीची खडा न् खडा माहिती असलेले बहिर्जी नाईक यांच्यावर सोपवण्यात आली.व महाराज गडावर पोहोचले.या गडावर शिवरायांना कायमच्या मोहिमांमधील अतिश्रमामुळे व दगदगीमुळे आलेल्या अस्वास्थ्याला पोषक असे वातावरण असल्यामुळे जवळपास महिनाभर शिवरायांनी या गडावर विश्राम केला.त्यामुळे या गडाचे नाव पट्टा हे बदलून विश्रामगड असेच पडले. गडाचा वरतून आकार दांडपट्ट्यासारखा दिसत असल्यामुळे याचे तत्कालीन नाव पट्टा किल्ला असे होते.येथून शिवराय नंतर रायगडावर गेले,परंतु दुर्दैव असे की विश्रामगड सोडल्यानंतरच्या मोजून तीन महिन्यांनी शिवराय अनंतात विलीन झाले.शिवरायांच्या शेवटच्या काळातील साथीदार म्हणून या विश्रामगडाला अद्वितीय महत्त्व आहे.

                        अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा पावसाचे माहेरघरच मानला जातो.मुळात विश्रामगड किल्ल्याचे स्थान अत्यंत उंचावर असल्यामुळे येथे जोरदार वाऱ्याचे झोत व सोसाट्याचा पाऊस कायमच असतो.तरीही ट्रेकर मंडळीचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.जवळपास ३०० पेक्षा जास्त ट्रेकर यामध्ये सहभागी झाले होते. ज्यात छोट्या मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांचादेखील समावेश होता.नाशिक मधून पहाटे लवकर ६ बसेस मधून निघून सिन्नर - डुबेर - कोकणवाडी -पट्टेवाडी मार्गे विश्रामगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सर्वांची एकदा शीरगणती झाली,बेसिक सूचना देऊन झाल्यानंतर शिवगर्जना,जयघोष यांनी ट्रेकला सुरुवात झाली.संपूर्ण ट्रेक दरम्यान यावर्षीच्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री नितीनजी ठाकरे पूर्णवेळ ट्रेकर मंडळी सोबत उपस्थित होते.मुख्य कमानी जवळ असणारी प्राचीन तोफ,पहिल्या टप्प्यावरील गुहा व भुयारे,पट्टाई उर्फ पट्टादेवी / अष्टभुजा देवी मंदिर, जवळच असलेले विस्तीर्ण खांब टाके तसेच त्र्यंबक दरवाजा,त्र्यंबक दरवाजा समोरील बुरुज इत्यादी सर्व अवशेष पाहून झाल्यानंतर सर्व ट्रेकर मंडळी मेघ डंबरीजवळ जमली.तेथे नितीनजी ठाकरे यांच्या हस्ते मेघडंबरी मधील शिवमुर्तीचे पूजन झाले.यावेळी मुकुल वांद्रे यांनी आपल्या गगनभेदी आवाजाने सुंदरपणे गारद दिली.त्यानंतर बौद्धिक घेण्यासाठी मेघडंबरीच्या मागेच असलेल्या अंबरखाण्यामध्ये सर्व ट्रेकर्स जमले.तेथे उपस्थितांची मनोगते झाली.वक्ते मुकुल वांद्रे यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने गड कसा पाहावा याची माहिती दिली.नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशनचे श्री निलेश पवार यांनी विश्रामगडच या ट्रेकसाठी निवडण्याचे कारण स्पष्ट केले व सह्याद्री मित्र संमेलनाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.जल्लोष ट्रेकिंग ग्रुपचे माजी अध्यक्ष श्री संदीपजी काकड यांनीदेखील विश्रामगडाचा इतिहास उपस्थितांना सांगत प्रत्येक गड -किल्ल्यावर स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.संमेलनाध्यक्ष श्री नितीनजी ठाकरे यांनी देखील ट्रेकर्स मंडळींना संबोधित केले.सेवानिवृत्त लष्करी अधिकारी श्री उल्हास कुलकर्णी यांनी आपल्या खड्या आवाजात महाराष्ट्र गीत सादर केले.









                 तिथून पुढे अंबरखाण्यामागील विस्तीर्ण हौद टाके व गडशिखरावरील विस्तीर्ण पठारावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर,कोकणकडा या निसर्गसुंदर दृश्यांचा ट्रेकर मंडळींनी आस्वाद घेत न्याहारी केली. गडशिखरावरील सुंदर नैसर्गिक दृश्य,दाट धुके, धुक्यामागून क्षणात बदलणारा निसर्ग,विविध कडे, निसर्गाची विविध नयनमनोहर रूपे हे सर्व जो-तो आपल्या कॅमेरामध्ये टिपण्याचा प्रयत्न करत होता.एकंदरीत अत्यंत आनंदी व उत्साहवर्धक वातावरणात हा प्रमोशनल ट्रेक पार पडला.त्यामुळे विश्रामगड प्रमोशनल ट्रेक नियोजन समितीच्या सदस्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण होते.आता सर्वांना वेध होते ते ५ व ६ जुलै २०२५ रोजी  गुरुदक्षिणा हॉल, BYK कॉलेज, नाशिक येथे होणाऱ्या सह्याद्री मित्र संमेलनाचे.

     

        आवाहन :-

         सर्वांना नम्र निवेदन करण्यात येते की,दिनांक ५ व ६ जुलै २०२५ रोजी गुरुदक्षिणा हॉल,BYK कॉलेज,नाशिक येथे सह्याद्री मित्र संमेलन होणार आहे.या संमेलनाच्या निमित्ताने राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय ट्रेकर,गिरीप्रेमी,सह्यप्रेमी व्यक्तींना ऐकायला मिळणार आहे. विविध फोटो तसेच व्हिडिओ प्रदर्शने आणि सुरक्षित ट्रेकिंगच्या संदर्भाने सर्व प्रकारच्या अत्याधुनिक साहित्यांचे स्टॉल्स येथे मांडण्यात येणार आहेत.जेथून आपण आपल्या ट्रेकिंगसाठी  सवलतीच्या दरात खरेदी करू शकता.त्यामुळे ही संधी दवडू नका व दिनांक ५ व ६ जुलै २०२५ रोजी सह्याद्री मित्र संमेलनाला आवर्जून उपस्थित रहा. 

************************************

 🚩 किल्ले विश्रामगड 🚩 येथील ट्रेकचा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी येथे टच करा. 🚩

*************************************



























Comments

Popular posts from this blog

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई