छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई
सातमाळाचे रत्न असलेल्या किल्ले राजदेर येथील ट्रेकवेळीच रेंज ट्रेक असलेल्या व राजदेर समोरीलच इंद्रायणी/ इंद्राई या किल्ल्यावरील ट्रेकचा आमचा प्लॅन ठरलेला होता.श्रावण सुरू असल्यामुळे पावसाची बऱ्यापैकी उघडीप होती,सुंदरसे धुके गड माथ्यावर नेहमी बघायला मिळत होते.एकूणच वातावरण अत्यंत आल्हाददायक होते. मुळात इंद्राई ट्रेकची खूपच धमाल आली,त्याला कारण ही तसेच होते.सर्वात आधी न्हावी गडाच्या ट्रेकचा प्लॅन ठरला...तो काही कारणास्तव कॅन्सल होऊन साल्हेर व सालोटा हा प्लॕन ठरला...तोही काही कारणास्तव रद्द होऊन अंकाई व टंकाई या जोड किल्ल्यांचा ट्रेक करायचे ठरवले... ठरल्याप्रमाणे रविवारी बाहेर पडलो...गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरून पुढे आल्यानंतर चालू गाडीमध्ये अचानक पुन्हा प्लॅन बदलला व आम्ही आमच्या सगळ्या गाड्या इंद्राई किल्ल्याकडे वळवल्या. हा प्लॅनमधील अनपेक्षितपणे झालेला बदल खूपच आनंद देऊन जाणाराच होता.जीवनात असे इंटरेस्टिंग बदल येणे खूपच आवश्यक आहे,त्याशिवाय जगण्याची मजा देखील राहत नाही.इंद्राई किल्ल्याबद्दल बरीच माहिती ऐकून होतो व आता ती प्रत्यक्ष बघायला मिळणार,तेथील चोरवाट,तुरुंग व इतर सर्वच ऐतिहासिक वास्तूंबद्दल आकर्षण मुळातच होते.ती हौस आता पूर्ण होणार होती.यामुळे जीव आनंदलेलाच होता.मुळात सर्वच ट्रेकर मंडळी इतकी हौशी होती कि कुठल्याही किल्ल्याचा ट्रेक ठरला तरी नकार देणारी ही मंडळी मुळातच नव्हती.त्यामुळे तडकाफडकी सगळेजण लगेचच इंद्राईकडे निघालो.
इंद्राईकडे जाण्यासाठी वडबारी या चांदवड तालुक्यातील गावामध्ये आपल्याला यावे लागते.तेथून गाड्या लावून पायीच गावाच्या मागून इंद्राई कडे जाणारा ट्रेक सुरू होतो.उजव्या बाजूस असणाऱ्या डोंगरावरून चालत आपल्याला इंद्राईच्या खालील बाजूला असणाऱ्या पठारावर देखील पोहोचता येते.वडबारी या गावाकडे जातानाच चांदवडचा किल्ला व चांदवड किल्ल्याच्या समोरील डोंगरावरच असणारे सुळक्यासारखे महादेव मंदिर हि दोन्ही ठिकाणे खुणावत होती.वडबारी गावातून ट्रेक सुरू झाल्यानंतर दिसणारे निसर्गरम्य दृश्य मनाला मोहून टाकत होते.जागोजागी दिसणारी डोंगरं,त्यांच्या शिखरावर दाटलेले दाट धुके,वाहणारे निखळ धबधबे,हिरव्यागार गवतांची मोठमोठाली पठारे,पाण्याने तुडुंब भरलेले बंधारे,शेवटी निसर्गाची किमयाच न्यारी ! उजव्या बाजूने जाणाऱ्या डोंगरावरून किल्ल्यापर्यंत पोचणारी वाट बऱ्यापैकी सोपी होती,परंतु आम्ही थोड्याशा अवघड वाटेचाच आसरा घेतला.
काट्याकुट्यांमधून,डोंगरदऱ्यांमधून,उभ्या कातळांवरून आणि शेवाळांवरून आमचा प्रवास सुरू होत इंद्रायणी किल्ल्याच्या डोंगरासमोरील पठारावर येऊन थांबला.तेथे समोरच एक प्राचीन दगडी मंदिर दिसत होते.त्या मंदिराच्या पाठीमागूनच इंद्रायणी किल्ल्याच्या विस्तीर्ण पायथ्याशी आपण येऊन पोहोचतो.इथून सुरू होतो तो आपला खरा ट्रेक.पायथ्याशी असणाऱ्या मोठ्या डोंगरामधून डोंगर कापून त्याच्या पोटामधून भव्य पायऱ्या कोरलेल्या आहेत.या पायऱ्यांमधून वरती निघून जुन्या दगडी कमानिमधून आपल्याला किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेला पोहोचता येते.ही वाट खूपच सोपी,विस्तीर्ण व रुंद आहे.या दगडी कोरीव वाटेच्या आधी एका उभ्या शिळेमध्ये कोरलेला भव्य मारुती देखील आपल्या निदर्शनास पडतो.
राजदेर प्रमाणेच इंद्राई किल्ल्याचा विस्तीर्ण परिसर देखील धडकी भरवणारा असाच भव्य दिव्य आहे व तितक्याच त्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या देखील ! अत्यंत मेहनतीने छिन्-नी हातोड्याने या पायऱ्या उभा डोंगर कोरून कशा बनवलेल्या असतील असा बघता क्षणीच मनाला प्रश्न पडतो व ही मेहनत घेणाऱ्यांच्या श्रमाला व त्यामागील कल्पनेला देखील आपण नतमस्तक होतो ! या पायऱ्यांच्या सुरुवातीलाच उजव्या व डाव्या बाजूला सैनिकांसाठीच्या देवड्यादेखील तेवढ्याच सुबकतेने कोरलेल्या आहेत.पायऱ्या चढून वरती आल्यानंतर दगडी जुनी व सध्या जीर्ण अवस्थेत असलेली कमान दिसते.
या कमानीच्या एका बाजूला फारसी भाषेमध्ये कोरलेला शिलालेख आजही सुस्थितीमध्ये आढळतो.फारसी भाषेतील या शिलालेखावर मुघल सरदार अलावर्दीखान याने तत्कालीन चांदवड प्रांतातील व नाशिक मधील १६ किल्ले जिंकून मुघल साम्राज्यामध्ये सामील केले होते त्याचा उल्लेख या शिलालेखावरती आहे.कमानी मधून वर पोहोचल्यानंतर आपण गडाच्या विस्तीर्ण,रुंद पठारावरती येऊन पोहोचतो.
आमच्या काही ग्रुप मेंबरने याआधी इंद्राई किल्ल्याला चोर वाटेने भेट दिलेली होती.त्यांनी सुचविल्याप्रमाणे आम्ही या दगडी पायऱ्या टाळून पायथ्यापासून गड उजव्या हाताला राहील अशा बेताने चोर वाटेने गड चढायचे ठरवले.चोरवाटेकडे जाताना पायथ्याशी आपल्याला सर्वप्रथम कसल्याशा खोल्यांवजा बांधकाम व त्याजवळ रुंद टाके व गुहा देखील आढळते.त्यावेळच्या सैनिकांसाठी बांधलेल्या त्या असाव्यात.तेथून डोंगराच्या कडेकडेने जाताना पुन्हा काही गुहा व काही पाण्याची टाकी आपल्याला दिसून येतात. या टाक्यामधील पाणी पिण्यायोग्य आहे.येथेच हे पाणी काढण्यासाठी एक बादली व दोर देखील ठेवलेला असतो.आपण उन्हाळ्यामध्ये जर ट्रेक करत असाल आणि इंद्रायणी किल्ल्यावर येत असाल तर या टाक्यातील पाणी पिण्यास वापरू शकता.समोर नजरेच्या टप्प्यात दिसणाऱ्या इंद्राई किल्ल्याच्या पायथ्याच्या डोंगराला एक वळसा झाल्यानंतर मग आपल्याला चोरवाट नजरेस दिसू लागते.खालून पाहता क्षणीच काळजात धडकी भरवणारी अशीच नागमोडी वळणे घेत वरती चढणारी,खिंडी कपारीतून वर चढत नागाप्रमाणे जाणारी ही पायवाट खऱ्या ट्रेकर मंडळींची जीव कि प्राणच म्हणावी लागेल.या चोरवाटेच्या सुरुवातीलाच अगदी विस्तीर्ण मोठ्या आकाराची टाकी आढळतात व त्या टाक्याच्या उजव्या बाजूपासूनच ही चोरवाट वरती चढत जावे लागते.
चोरवाट चढून वर जातानाच वाटेत दोन ठिकाणी आपल्याला परत गुहेप्रमाणे बांधकाम लागते.येथे देखील पहाऱ्यावरच्या सैनिकांसाठीची ही सोय केलेली असू शकते.या ठिकाणापासून पुढे गेल्यानंतर एक छिद्रासारखी जागा लागते तेथून थोडेसे सरपटत आपण चोरवाटेच्या वरच्या टप्प्यात येऊन पोहोचतो व तेथून एकच व्यक्ती एका वेळी जाऊ शकेल अशी अरुंद खिंडवजा वाट सुरू होते.त्याच्यापुढे डाव्या बाजूला डोंगरातच कोरलेले एक महादेव मंदिर सुद्धा आपल्याला दिसते.तेथून पुढे आल्यानंतर काहीशा पायऱ्या ओलांडून आपण गडाच्या पठारावर येऊन पोहोचतो व चोरवाट संपते.संपूर्ण गडाच्या ट्रेकचा या चोरवाटेने प्रवास हा एक उत्कंठावर्धक व तितकाच मनाला आनंद देणारा असाच ठरतो.
एका बाजूला उंचच- उंच काळाकभिन्न पहाड,खाली केवळ एकच पाऊल बसेल इतकीच जागा व खाली अतिशय खोल अशी दरी ! शरीराचा संपूर्ण तोल सावरत दगड-धोंड्यांवरून सांभाळत आपल्याला या चोरवाटेने वरती चढावे लागते.जराही चूक झाली तर आपला कपाळमोक्ष खाली दरीत निश्चितच ! चोरवाटेने वर पोहोचल्यानंतर अगदी शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणेच गड जिंकल्याची भावना मनात आल्या वाचून राहत नाही.
चोरवाटेतून वरती पोहोचल्यानंतर आम्ही मनसोक्त फोटोग्राफी करून घेतली,कारण नजाराच तेवढा सुंदर होता.वातावरणात पावसाळा असून देखील उष्मा भयंकर असल्यामुळे सर्वजण घामाने थबथबलेले होते.
गार वाऱ्यामध्ये सर्वांनी एका मोठ्या खडकावर पेट पूजा करून घ्यायचे ठरवले.सर्वांच्या डब्यांचा गोपाळकाला करून,पोट यथावकाश भरून,लिंबू पाणी वगैरे पिऊन आम्ही गडावरील इतर ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पुढे निघालो.
पुढे आल्यानंतर पहिल्याच पठारावर उजव्या बाजूला अत्यंत विस्मयचकीत करणारी वास्तू आपल्याला समोर दिसते.काहींच्या मते हे जुने दारूगोळ्याचे भांडार असावे तर काहींच्या मते हा तेथील तत्कालीन तुरुंग होता.दारूगोळ्याच्या भांडारापेक्षा याची रचना तुरुंगाप्रमाणेच मिळतीजुळती अधिक दिसते.डोंगराला अत्यंत कलात्मकरीतीने छिन्नी हातोड्याने कोरून केवळ एका खिडकी एवढी जागा सोडून खाली कमीत कमी सात ते आठ फूट खोल अशा प्रकारे बनवलेली ही रचना त्याकाळचा तुरुंगच असावी.यामागील कल्पना व मेहनतीला आजच्या जमान्यात देखील तोड नाही.तेथून पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला राहण्यायोग्य बनवलेल्या व संख्येने खूप असलेल्या गुहा व लेण्या दिसून येतात.या रांगेमध्ये ३० ते ४० पेक्षा जास्त असू शकतात.सर्वच लेण्या किंवा गुहा कलात्मक रीतीने कोरलेल्या असून त्यांच्या वायुविजनाची व्यवस्था देखील अत्यंत सुंदर प्रकारे केलेली आढळून येते.
सर्वच गुहा लेण्यांमध्ये प्रकाश व्यवस्थित पोहोचेल तसेच डोंगरावरून वाहून येणारे पाणी त्या गुहांमध्ये उतरणार नाही यासाठीची देखील व्यवस्था कलात्मक पद्धतीने केलेली आढळून येते.एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी व राहण्याच्या व्यवस्था या गडावर असल्यामुळे हा गड तितकाच महत्त्वाचा होता,वर्दळीचा होता व येथे बाजारपेठा,यात्रा,जत्रा.प्रशासकीय कामकाज मोठ्या प्रमाणावर होत असावे याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.निवासासाठीच्या या मोठमोठ्या गुहा आज दगड,माती,गाळ व पाण्याने जरी अर्धवट भरलेल्या असल्या तरी समृद्धीच्या काळामध्ये येथे किती मोठ्या प्रमाणात वावर असेल याची कल्पना लगेचच येऊन जाते.जुन्या वाड्यांचे,बालेकिल्ल्याचे व माचीचे अवशेष देखील आपल्याला जाताना रस्त्यामध्ये बघायला मिळतात.
गडाच्या वरच्या बाजूला असलेल्या पठारावर एक अतिशय प्राचीन असे दगडात कोरलेले महादेव मंदिर देखील आहे.या मंदिराच्या समोरच एक विस्तीर्ण तळे देखील आहे.महादेव मंदिराच्या अगदीच वरच्या बाजूस असलेल्या डोंगरावरदेखील एक खूप मोठ्या आकाराचे तळे बांधिव असलेले आपल्याला दिसते.गडावर टाक्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे या गडावर मनुष्य वस्ती देखील तितकीच जास्त असावी.गडाच्या पश्चिम बाजूस असलेल्या पठारावर ऐतिहासिक वास्तू काही नसल्या तरी तिकडे दोन मोठ्या आकाराचे धबधबे आहेत जे पडत्या पावसामध्ये खळाळून कोसळत असावेत.
गिरीदुर्ग या प्रकारातील असलेल्या इंद्राई या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४४९० फूट इतकी आहे.वडबारी या गावामधून संपूर्ण ट्रेक पूर्ण करून वापस येण्यासाठी आपल्याला जातायेता १५ ते १६ किलोमीटर ट्रेक करावा लागतो.किल्ल्याचे पठार विस्तीर्ण असल्यामुळे संपूर्ण ट्रेकला साधारणपणे तीन तास लागू शकतात.देवगिरीच्या यादवांनंतर निजामाच्या ताब्यात हा किल्ला होता.निजमानंतर अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण करून हा किल्ला त्याच्या ताब्यात घेतला त्यानंतर मुघलांचे साम्राज्य काही काळ या किल्ल्यावर होते.किल्ल्यावर असलेल्या फारसी भाषेतील शिलालेखावर त्यावेळचा मुघल किल्लेदार अलावर्दिखान याने जिंकलेल्या किल्ल्यांची नावे फारसी भाषेत कोरून ठेवल्याची नोंद आहे.बागलाण प्रांत ताब्यात घेतल्यानंतर हा किल्ला देखील मराठ्यांच्या ताब्यात गेल्याची नोंद आढळते व त्यानंतर सन १८१८ मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला. असे सांगितले जाते की इंद्राई किल्ल्यावरून राजदेर किल्ला जळताना पाहिल्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
दुर्दैवाची गोष्ट एकच की या किल्ल्याचा एवढा दैदिप्यमान इतिहास असताना प्रशासनातर्फे या किल्ल्यावर कुठल्याही प्रकारे मार्गदर्शक सूचना,किल्ल्याचा इतिहास,दिशादर्शक फलक वा नावे कुठेही आपल्याला दिसत नाहीत.प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून हा पुरातन वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
एक उत्कंठावर्धक ट्रेक जर करायचा असेल तर निश्चितच इंद्राई किल्ल्यावर चोरवाटेने वरती येणे सोयीस्कर राहते व उतरताना दगडी कातळ कोरीव पायऱ्यांमधून उतरावे.इंद्रायणी किल्ल्यावरील चोरवाट,दगडी पायऱ्या व पठारावरील ऐतिहासिक सर्व वास्तू पाहिल्यानंतर तत्कालीन परिस्थितीची जाणीव होते.शिवकालीन आपल्या पूर्वजांनी किती मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलेले होते तसेच स्वराज्य या शब्दामागील गांभीर्य देखील लक्षात यायला वेळ लागत नाही.
इंद्राई किल्ल्याचा संपूर्ण सविस्तर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
******************************
माहितीचे स्त्रोत:-
युट्युब ,विकिपिडीया,स्थानिक ग्रामस्थ वडबारी,ता:चांदवड.
*****************************
या ट्रेकमधील सहभागी सदस्य:-
श्याम रसाळ
धिरज गायकवाड
पोपटराव सोनवणे
सुहास कोळेकर
प्रशांत करपे
प्रविण कोकाटे
अरूण निकम
सचिन गोसावी
प्रेम गोसावी
सनी गोसावी
तुळशिराम बागुल
बाळासाहेब बेलगावकर
******************************
काहि इतर क्षणचित्रे
*********************************












































Comments