गणेशोत्सवात शोधते बालपणाचे सोनेरी दिवस!
|
|
|
- कोमल गावडे, फलटण
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 - 12:49 PM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=EAXBGA
|
|
|
Tags:
Exclusive, Ganpati, Ganeshotsav, eSakal, Komal Gawde
|
|
वडील नोकरीसाठी फलटणला असायचे. त्यामुळे माझं शालेय शिक्षण फलटणमध्ये झाले. पहिली घटक चाचणी परीक्षा झाली, की आम्हा मुलांना गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले असायचे. कारण सगळ्या भावंडांना मिळून एकत्र धमाल करता यायची. प्रत्येक गणपतीच्या वेळी नवी सजावट करण्याचा आमचा प्रयत्न असायचा. गणपतीच्या मागे बॅटरीच्या सेलवर फिरणाऱ्या, चकमक भरलेल्या चक्राचं आम्हाला फार आकर्षण होतं. आधी मंडप बांधणं, मग बाप्पांची बैठक तयार करणं, ठराविक रंगसंगतीच्या साड्या-ओढणीच्या कमानी तयार करणं, ही तर आमच्या आवडीची कामं होती. आजीनं तांब्या-पितळेची देवांची भांडी, समया रांगोळीनं घासून लख्ख केलेली असायची. वाती, फुलवाती तयार करून ती त्या बंद डब्यात ठेवायची. आम्ही दारात सडा टाकून रांगोळी काढायचो.. दुर्वा, जास्वंदीची फुलं यांची जमवाजमव करायचो. स्वयंपाक घरात नैवेद्यासाठी बाप्पांच्या आवडीचे गूळ-खोबरे घातलेले कणकेचे उकडीचे मोदक बनवायचे.. दिवाळीसारखाच सगळा फराळ बनवायचा.. या साऱ्यांनी आमचं घर बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज असायचे..
एखादी सुबक गणपतीची मूर्ती ही आधीच कुंभाराकडे जाऊन आम्ही मुलं हेरून ठेवायचो आणि तीच मूर्ती घेण्याचा हट्ट करायचो.. आजोबा पंचांग पाहून मुहूर्त काढायचे आणि मग गणपतीची शास्त्रोक्त पूजा करून प्राणप्रतिष्ठापना केली जायची. खरंच! ती चौरंगावर विराजमान झालेली मूर्ती सजीव वाटायची.. नंतर आरती व्हायची, आरतीसाठी घंटा कोण वाजवणार, यावरून लुटूपुटूची भांडणं व्हायची. धुपाचा सुगंध दरवळायचा.. आजोबा शेवटी प्रारंभी ‘विनंती‘ या प्रार्थनेची एक-एक ओळ आधी म्हणायचे आणि मागोमाग आम्ही सर्वजण म्हणायचो.. आजही ही प्रार्थना म्हणतान्ना आम्हाला दादांची फार आठवण येते. ‘गणपती बाप्पा मोरया‘चा जयघोष करून आम्ही मोदकांवर तुटून पडायचो..
गणपतींपाठोपाठ दोन दिवसांनी गौरींचं आगमन व्हायचे. ‘गौरी या गणपतीबरोबर का येत नाहीत‘ असा प्रश्न मला नेहमी पडायचा. कदाचित, कैलासात बाप्पांवाचून करमत नसेल किंवा आपला लेक भक्तांच्या घरी नीट पोचला की नाही, हे पाहायला येत असाव्यात, असं वाटायचं.. आजी सांगायची, त्या माहेरवाशिणी आहेत.. दोन दिवसांसाठी माहेरी येतात.. त्यांचे सगळे लाड पुरवायचे असतात..
गौरींच्या आगमनासाठी दारात सडा टाकून तुळशी वृंदावनापासून ते देवघरापर्यंत रांगोळीनं पावलं काढली जायची. तुळशी वृंदावनाजवळ पाटावर गौरीचे दोन्ही मुखवटे ठेवून त्याची ओटी भरून शास्त्रोक्त पूजा-आरती केली जायची. एक सुवासिनी कुंकवाचे दोन्ही हातांचे ठसे दारात काढलेल्या पावलावर उमटावीत.. मागे गौराईला घेऊन येणाऱ्या दुसऱ्या सुवासिनीला विचारायची, ‘गौराई आल्या कशाच्या पायी?‘.. मग मागून येणारी सुवासिनी गौराईला त्या प्रत्येक पावलावर टेकीत टेकीत उत्तर द्यायची, ‘सुखसमृद्धीच्या पायी, धनधान्याच्या पायी, गुराढोरांच्या पायी..!‘ उंबऱ्यावर ठेवलेलं तांदुळाचं माप ओलांडून प्रत्येक पावलावर ठेवलेली धान्याची भांडी सांडत सुखसमृद्धीच्या पावलांनी गौरी घरात यायच्या.
जरीच्या काठापदरांच्या साड्या नेसवून मंगळसूत्र, ठुशी, मोहनमाळ, नथ, बांगड्या असे पारंपरिक दागिने घालून मोठी ताई गौराईला छान तयार करायची. गणपतीच्या डाव्या-उजव्या बाजूला डोक्यावर पदर, एका हाताने आशीर्वाद, दुसऱ्या हातात पानाचा विडा, कुंकवाचा करंडा घेऊन, पायात खणा-नारळानं भरलेली ओटी आणि धान्यांच्या राशी घेऊन गौरी विराजमान व्हायची.
पहिल्या दिवशी संध्याकाळच्या आरतीनंतर धपाटी-शेपूची भाजी, वरणभात असा नैवेद्य दाखवला जायचा. खरा उत्सवाचा दिवस असायचा तो गौरी पूजनाचा. पुरणपोळीच्या नैवेद्याबरोबरच दिवाळीसारखा फराळ बनवायचा, तो गौरी-गणपतीच्या समोर मांडणीवर वेगवेगळ्या आकाराच्या डिशमध्ये ठेवला जायचा. चिनी मातीचे प्राणी, फुलं यांनी ही मांडणी सजवली जायची.
प्रसन्न चेहऱ्याचे, डोळ्यांत अपार ममता असणारे गौरी-गणपतीचे हे रूप कितीही डोळे भरून पाहिले, तरीही कमीच असते. हे कायम आपल्या घरीच राहावेत, असंच वाटायचं. या दिवशी घरोघरी हळदीकुंकू असायचे.
प्रत्येकाच्या घरच्या गौरी-गणपती, त्यांची सजावट पाहण्यासाठी आम्ही मुलं खूप फिरायचो. गौरी-गणपतीच्या हातातून सुरू होणाऱ्या आणि खाली परातीत पडणाऱ्या नोटांच्या माळा, परातीतील पाण्यावर फिरणारी बोट, रूळावर इकडून-तिकडे धावणारी आगगाडी यांचं आम्हाला खूप कुतूहल आणि आकर्षण वाटायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी मांडणी व फराळही दिसायचा नाही. ‘रात्री गौरी-गणपतीनं फराळ खाल्ला; तुम्ही लवकर झोपलात‘ असं म्हणत ताई-दादा आम्हाला चिडवायचे आणि आम्हीही ‘पुढच्या वर्षी त्यांना नक्की पाहायचं‘ असं ठरवायचो..
गौरीचं विसर्जन झालं, की तिची उणीव बाप्पा भरून काढायचे. सकाळ-संध्याकाळची आरती, नंतर वाटली जाणारी खिरापत, सार्वजनिक गणपती मंडळांचे देखावे पाहण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा, गल्ली-बोळातून केलेली पायपीट यात उरलेले दिवस पटकन निघून जायचे.. मग नको वाटणारा विसर्जनाचा दिवस यायचा..
‘एक-दोन-तीन-चार, गणपतीचा जयजयकार‘ असा जयघोष करत आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या‘ असे बजावून सांगत निरेच्या काठावर शेवटची आरती व्हायची. कंठ दाटून यायचा. चुरमुऱ्यांची आणि गूळ-खोबऱ्याची शिदोरी उपरण्यात बांधून बाप्पा निरेच्या प्रवाहाशी एकरूप व्हायचा.. आम्ही त्याला निरोप देऊन त्याच्या आशिर्वादाची अखंड शिदोरी घेऊन घरी परतायचो..
त्या घरातील गणेशोत्सवाची सर आताच्या सिमेंटच्या घरातील गणेशोत्सवाला नाही. आज मी मुंबईत नोकरी करते; पण पावसाची पहिली ‘टर्म‘ संपली, की मला वेध लागतात गावच्या गौरी-गणपतींचे.. याच गणेशोत्सवामध्ये मी माझ्या बालपणीचे सोनेरी दिवस पुन्हा एकदा शोधते..
Comments