देवभूमी उत्तराखंड श्री केदारनाथ यात्रा
![]() |
| देवभूमी उत्तराखंड श्री केदारनाथ मंदिर |
उत्तराखंड- देवभूमी...
व या देवभूमीमधीलच एक रत्न ते म्हणजे केदारनाथ.पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काय हे जर अनुभवायचं असेल तर एकदा प्रत्येकाने उत्तराखंड यात्रा करायलाच हवी.शहाजीबापू पाटील म्हणतात ना... काय झाडी! काय डोंगर ! एकदम ओके! अशाच प्रकारचा काहीसा अनुभव उत्तराखंडला गेल्यावर येतो.जिवंतपणी जर स्वर्ग "याची देही याची डोळा" अनुभवायचा असेल तर एकदा नक्कीच उत्तराखंड,केदारनाथ ही यात्रा करायला हवी.
"केदारनाथ" या नावाचा अर्थ "क्षेत्राचा स्वामी" आहे. केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १९ किलोमीटर चा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मुर्ती उखीमठ ह्या स्थानवर आणल्या जातात व तेथेच पुजल्या जातात. पांडवांनी त्यांच्या चुलत भावांचा - कौरवांचा पराभव केला आणि त्यांचा वध केला. त्यांनी युद्धादरम्यान भ्रातृहत्या (गोत्रहत्या) आणि ब्राह्मणहत्य केल्याच्या पापांचे प्रायश्चित करायचे होते.त्यासाठी त्यांनी त्यांच्या राज्याचा लगाम त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविला आणि भगवान शिवाच्या शोधात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघून गेले. प्रथम, ते वाराणसी (काशी) या पवित्र शहरात गेले, ज्याला शिवाचे आवडते शहर मानले जाते. परंतु, शिवाला त्यांना टाळायचे होते कारण तो कुरुक्षेत्र युद्धातील मृत्यू आणि अप्रामाणिकपणामुळे खूप संतापला होता.म्हणून, त्याने बैलाचे रूप धारण केले आणि गढवाल प्रदेशात लपले.वाराणसीत शिव न सापडल्याने पांडव गढवाल हिमालयात गेले. भीम दोन पर्वतांवर उभे राहून शिवाचा शोध घेऊ लागला. त्याने गुप्तकाशी जवळ एक बैल चरताना पाहिला. भीमाने तो बैल शिव असल्याचे लगेच ओळखले. भीमाने बैलाला शेपटीने आणि मागच्या पायांनी पकडले. पण बैलाचे रूप असलेला शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाला, केदारनाथमध्ये कुबड उंचावत, तर तुंगनाथमध्ये हात दिसला, रुद्रनाथमध्ये चेहरा, मध्यमेश्वरमध्ये नाभी,पोट, पृष्ठभाग तर केस दिसले कल्पेश्वर मध्ये. पांडव हे शिवरुप पाच वेगवेगळ्या रूपात प्रकट झाल्यामुळे प्रसन्न झाले, त्यांनी शिवाची पूजा करण्यासाठी पाच ठिकाणी मंदिरे बांधली.हेच ते पंचकेदार होत. मला अपघातानेच या यात्रेला जाण्याचा योग आला,त्याचेच प्रवासवर्णन करण्याचा हा शब्दप्रपंच. त्याचे झाले असे की,आमच्या चामरलेणी जॉगिंग ग्रुपतर्फे आम्ही दर रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक आयोजित करतो.अशाच एका ट्रेक वेळी आम्ही अंजनेरी पर्वत येथे ट्रेक काढलेला असताना ट्रेक संपला व तेथे आमचे मित्र श्री.सचिन गोसावी यांनी केदारनाथ यात्रे बद्दल सविस्तर मला माहिती दिली व या यात्रेस येण्याबाबत आग्रह केला.शेवटी हो नाही, हो नाही करत यात्रेस येण्याचे कबूल केले व तिथून आमची तयारी सुरू झाली. यथावकाश रेल्वेचे रिझर्वेशन ही झाले.सुरूवातीला आमचे रिझर्वेशन कन्फर्म झाले नव्हते, परंतु काही दिवसानंतर ते रिझर्वेशन सुद्धा कन्फर्म झाले.आम्ही सहा जण जाण्यासाठी तयार झालो.ऐनवेळी त्यातील एक जण कमी झाला व शेवटी आम्हा पाच जणांची उत्तराखंड केदारनाथ यात्रेस जाण्यासाठी तयारी झाली. केदारनाथ संदर्भात भरपूर ऐकलेलं होतं,व्हिडिओ मधून माहिती पाहिलेली सुद्धा होती, तेथील वातावरण वेळोवेळी बदलतं राहतं या संदर्भात माहिती मिळाली होती, त्यामुळे आम्ही थंडीचे, उन्हाचे, पावसाचे सर्व प्रकारचे कपडे सोबत घेतले व बाजारामधून इतर आवश्यक साधनांची सर्व प्रकारे खरेदी करून तयारी केली,बॅगा भरल्या व आम्ही प्रवासाला निघण्यासाठी सज्ज झालो. प्रवासाच्या तारखेपर्यंत रोज यादीप्रमाणे एकेक वस्तू बॅगमध्ये टाकणं सुरु होतं व शेवटी प्रवासाचा दिवस येऊन ठेपला. जय भोले, हर हर महादेव च्या गजरात आम्ही रेल्वे स्टेशन वरून हरिद्वार एक्सप्रेस ने आमचा प्रवास सुरु केला.
हरिद्वारला उतरण्यासाठी तब्बल 24 ते 26 तास लागणार होते, त्यामुळे निघताना आम्ही दोन वेळचा डबा सोबत घेतलेला होता तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणचे व टिकणारे खाद्य साहित्य बरेचसे प्रत्येकाने सोबत ठेवले होते. त्यामुळे आम्हाला हरिद्वारला दुसऱ्या दिवशी उतरेपर्यंत काहीही अडचण आली नाही.
हरिद्वारला उतरल्यानंतर तेथील प्रवासाची कल्पना असल्यामुळे आम्ही तेथून खाजगी प्रवासी कार बुक केली. उत्तराखंड मधील सर्व रस्ते घाट रस्त्याचे, वळणावळणाचे, धोकादायक असल्यामुळे सहसा आपणही उत्तराखंड प्रवासाला निघत असाल तर हरिद्वार येथून खाजगी कारच बुक करून निघावे.
तिथून आमचा पहिला मुक्काम रुद्रप्रयाग येथे ठरला. रुद्रप्रयाग येथील मराठा लाईट इन्फंट्री आर्मी रेजिमेंट मधील संदीप कड यांची व सचिन भाऊंची नेमकी ओळख निघाली. साधारणतः सायंकाळच्या सुमाराला आम्ही आर्मी रेजिमेंट मध्ये पोचलो तेव्हा संदीप भाऊंनी आमचे उत्साहात स्वागत केले तेथेच आम्ही नाश्ता केला. संदीप भाऊंच्या ओळखीमुळे आमचा बराचसा खर्च रुद्रप्रयाग मधील वाचला. त्यांनी आम्हाला आर्मीसाठीच्या बुक केलेल्या खोल्या सवलती मध्ये दिल्या. दोन खोल्यांमध्ये आम्ही पाच जणांनी रात्रीचा मुक्काम तेथे केला. आम्हाला तेथे असे सांगण्यात आले की उत्तराखंडमध्ये नुकताच भरपूर पाऊस पडून गेलेला असल्यामुळे तुम्ही जास्त थांबा न घेता लगेच दुसऱ्या दिवशी केदारनाथच्या प्रवासाला सुरुवात करा त्यामुळे आम्ही त्या रात्री आराम करून दुसऱ्या दिवशी लगेचच केदारनाथच्या प्रवासाला निघण्याचे ठरवले व रात्री केदारनाथच्या मुक्कामाच्या दृष्टीने आमच्या बॅग परत भरून घेतल्या,आवश्यक तेवढेच साहित्य घेतले, कारण केदारनाथमध्ये आमचा एक मुक्काम परत होणार होता.त्यामुळे केदारनाथ चढताना आवश्यक तेवढेच हलकं सामान सोबत घेतलं. रेनकोट, बॉडी वॉर्मर, ग्लुकोज वॉटर, पाण्याची बाटली, थंडीचे कपडे अशा प्रकारे सर्व साहित्य सोबत घेतलं व भल्या पहाटे साडेतीन वाजता आमचा केदारनाथ कडे प्रवास सुरू झाला. पोलीस दलातील आमचे मित्र श्री.अमोल मानकर यांनी आमच्या केदारनाथ यात्रेसाठी एकसारख्या प्रकारचे पाच टी-शर्ट बनवून घेतले होते,तेच टी-शर्ट घालून आम्ही केदारनाथ यात्रा करायचे ठरवले.
रस्त्यातुन मग घाट रस्ते, उंच उंच पर्वत ,दऱ्या,नद्यांचं सौंदर्य न्याहाळत आमचा प्रवास चालू होता.जागोजागी कोसळलेल्या दरडी काळजाचा वेध घेत होत्या.खाली खोल नदीचे पात्र तर वरती उंच उंच पर्वत शिखरे व टोकदार वळणाचे घाट रस्ते,डोंगरांमधून निघणारे ढग,स्वच्छ निसर्ग,खळाळणाऱ्या नद्यांचे सुंदर स्वच्छ प्रवाह,फेसाळलेले दुधासारखे पाणी, नदीच्या प्रचंड पात्रांमध्ये पर्वतामधुन कोसळलेल्या दरडींमधुन आलेले मोठमोठाले दगड हे सर्व निसर्गाचे चमत्कार पाहताना मन हरखून जात होतं. गौरीकुंड च्या अलीकडे पार्किंग मध्ये गाडी आम्ही लावली व तेथून उंच टायरवाल्या गाड्यांमधून गौरी कुंडला आम्ही उतरलो. कारसाठी पार्किंग तेथे 12 तासांचे असते. बारा तासांच्या पुढे वेळ गेला तर त्याचा एक्स्ट्रा चार्ज देखील द्यावा लागतो.केदारनाथच्या प्रवासासाठी लागणारे आवश्यक साहित्य गौरीकुंडच्या मार्केटमध्ये सुद्धा मुबलक प्रमाणात मिळते परंतु तेथे त्याची किंमत खूपच जास्त असल्यामुळे आपण निघताना आपल्या गावातून,आपल्या शहरातूनच प्रवासाच्या सर्व साहित्याची तयारी करूनच निघणे उत्तम राहील.गौरीकुंड पासून केदारनाथ मंदिरापर्यंतचे अंतर एका बाजूने एकोणवीस किलोमीटरचे आहे.गौरीकुंडच्या पायथ्यालाच आपल्याला घोडे देखील उपलब्ध आहेत,तेथे खेचर बहुसंख्य प्रमाणात आहेत. आपण तेथूनसुद्धा खेचर करू शकता किंवा रस्त्यात कुठेही आपल्याला खेचर उपलब्ध होऊ शकतात तसेच पाठीवरतून बास्केट मधून प्रवाशांना वाहून नेणारे पिठ्ठू देखील तेथे आपल्याला उपलब्ध होतात.सर्वांनी घोडा करण्याचे ठरवले.पण माझा पायिच जायचा विचार असल्यामुळे मी केदारनाथ यात्रा पायीच करायचे ठरवले. परत एकदा जय भोले च्या गजरात पायि केदारनाथ यात्रेस सुरुवात केली.
सुरुवातीचे दोन ते तीन किलोमीटर आपल्याला पायि जाणारी लोकं तसेच खेचर,पिठु यांचा खूपच त्रास होतो.चालण्यासाठीची वाट खूपच अरुंद आहे. एका बाजूला उंच उंच पर्वत तर एका बाजूला खाली खोल दरी अशा अवस्थेतून गर्दीतून आपल्याला चालत जावे लागते.रस्त्यात मध्येच खेचरांनी घाण केलेली असते,त्यावरून पाय घसरण्याचा देखील धोका असतो त्यामुळे सोबतीसाठी एखादी काठी ठेवलेली बरी. पूर्ण पायि प्रवासामध्ये आपण केवळ पाण्याची एक रिकामी बाटली सोबत ठेवावी.रस्त्यामध्ये उंच पर्वतावरून कोसळणारे धबधबे खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.झरे देखील मुबलक प्रमाणात आहेत.त्या झऱ्यांचे पाणी खुपच शुद्ध व मिनरल्सनी भरपूर असतं त्यामुळे आपण पाण्याच्या बाटल्या विकत घेण्यापेक्षा या झऱ्यांचे पाणी वेळोवेळी भरून ते बिनधास्तपणे आपण पिऊ देखिल शकता.मीही वेळोवेळी त्या झऱ्याचं पाणी घ्यायचो व तेच पीत पीत पायी चालणं सुरू ठेवलं होतं.आपल्याला जर पायी चालायची सवय असेल,डोंगरांमध्ये फिरायची,ट्रेकिंगची सवय असेल तरच आपण केदारनाथचा प्रवास पायी करावा अन्यथा आपण खेचर केलं तर अधिकच उत्तम. बडासु,फाटा या ठिकाणापासून हेलिकॉप्टर्स उपलब्ध आहेत.हेलिकॉप्टरमधून केवळ पाच मिनिटांमध्ये खालून केदारनाथ मंदिराच्या अलीकडे असलेल्या हेलिपॅडवर आपल्याला पोचवण्यात येतं. परंतु या हेलिकॉप्टरचे बुकिंग खूप आधी करून ठेवावं लागतं. ऐन वेळी आपल्याला हेलिकॉप्टर राईड साठीचे बुकिंग मिळत नाही. भीमबली, लिंचोली येथे येईपर्यंत आपल्याला नद्या,वेगवेगळे धबधबे सोबत करत असतात.येथे मंदाकिनी नदिचेच राज्य आहे.भीमबली पासून साधारणतः दोन वेगवेगळे रस्ते आपल्याला तेथे दिसतात.येथील केदारनाथकडे जाणारा एक रस्ता थोडासा जास्त उंचीचा आहे तर उजव्या बाजूने जाणारा दुसरा रस्ता थोडा कमी उंचीचा आहे परंतु जास्त वळणावळणाचा आहे.जसजसे आपण पुढे चालत राहू तसं निसर्गाचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळते. तसेच 16 जून 2013 या दिवशी केदारनाथ येथील चोराबारी झीलमध्ये जो महाप्रलय झाला होता व त्यामुळे जी हानी झालेली होती त्याचे आजही पडसाद तेथे आपल्याला पाहायला मिळतात व त्यामुळे मन जरासं उदास होऊन जातं. पाण्याच्या प्रवाहाने कापलेले डोंगर,झालेली हानी व जुन्या रस्त्यावरून झालेलं नुकसान पाहिलं की निसर्गापुढे मनुष्य किती क्षुद्र आहे, आपण किती हतबल आहोत याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.रस्त्यात चालत असताना जय भोले,हर हर महादेव चा जयघोष प्रत्येकाच्या मुखातून चालूच असतो. तुम्हाला रस्त्यामध्ये जागोजागी लिंबू पाणी,सरबत,मोसंबी ज्यूस यांचे स्टॉल्स पाहायला मिळतात परंतु वरती त्याच्या किमती खूपच आहेत तसेच जागोजागी मेडिकल सेंटर सुद्धा उपलब्ध आहेत.छोटेखानी दवाखाने सुद्धा उपलब्ध आहेत.आपल्याला काही गरज लागली तर आपण त्याचा लाभ देखील घेऊ शकतात. छोटेखानी शौचालय सुद्धा जागोजागी उपलब्ध असलेल्या आपल्याला दिसून येतात.थकलेल्या व्यक्तींना बसण्यासाठी बाकांची सोयदेखील जागोजागी आहे.मला पायि प्रवासामध्ये काही दिव्यांग व्यक्ती देखील भेटल्या.मला त्यांच्या धाडसाचे खूप कौतुक करावेसे वाटले कारण इतक्या उंचावरच्या ठिकाणी इतक्या दूरपर्यंत केवळ महादेवाच्या भक्तीपोटी ती लोकं एवढ्या दूर प्रवासाला पायी निघाले होते.त्यातील एक भाविक होता ज्याला डावा पायच नव्हता.मी त्याच्याशी गळाभेट घेतली तेव्हा मला खूप आनंद झाला.साधारणपणे सहा ते सात किलोमीटर प्रवास बाकी असताना आपल्याला लांबून केदारनाथचे बर्फाने झाकलेले डोंगर,उंचच उंच पर्वतांवरून कोसळणारे फेसाळ धबधबे दिसायला सुरुवात होते. तेव्हा तर प्रवासाला अधिकच उत्साह येतो.परंतु शेवटच्या पाच किलोमीटर मध्ये खडतर प्रवास सुरू होतो कारण याच पाच किलोमीटर पासून आपल्याला ऑक्सिजन कमी असल्याची प्रकर्षाने जाणीव होते.अशावेळी आपण चार पावले देखील चाललात तर आपल्याला जोरजोराने धापा लागतात.अशा वेळी एकच खबरदारी घ्यावी ती म्हणजे हळूहळू,जवळजवळ छोटि पावले टाकत थोडसं वाकून गुडघ्यामध्ये बाक ठेवून हळूहळू चालतच राहावं.आपण जास्त थांबलात तर आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो.केदारनाथ बेस कॅम्प च्या अलीकडे मेडिकल सेंटर्स उपलब्ध आहेत.जर आपल्याला श्वासाचा खूपच त्रास जाणवत असेल,ऑक्सिजन खूपच कमी झाल्यासारखा वाटत असेल तर तेथे आपण उपचार करून घेऊ शकता.
बेस कॅम्पला खेचर,पिट्ठू तेथे सोडून देतात व तेथून तुम्हाला पायी जावे लागते.मी चालत बेस कॅम्पला पोहोचलो तरीही तेथून लांबून सुद्धा केदारनाथ मंदिराचे दर्शन होत नव्हते. तुम्ही पुन्हा थोडं पुढे गेल्यानंतर नदीला थोडासा वळसा घेतल्यानंतर केदारनाथ ची वस्ती व मंदिर लांबून दिसायला सुरुवात होते तेव्हा या जन्माचे सार्थक झाल्याचा आनंद होतो. साधारणपणे 19 किलोमीटरच्या प्रवासासाठी मला सलग चालण्यासाठी नऊ तास लागले. सकाळी साडेनऊ वाजता चालायला सुरुवात केलेली होती व साधारणपणे सात साडेसात वाजेच्या सुमाराला मी केदारनाथ मंदिरासमोर पोचलेलो होतो.आपली शरीर क्षमता, शारीरिक कस तपासून पाहण्याचा हा देखील एक मार्ग आहे व मला आनंद वाटला की मी या प्रवासामध्ये कुठेही न थकता, न हताश होता फार नऊ तास ट्रेकिंग करून वरती पोचू शकलो. केदारनाथ येथे वरती पुढे पोचलेल्या माझ्या मित्रांनी तोपर्यंत रुमची सोय करून ठेवलेली होती.आम्ही नंतर रूम मध्ये जाऊन फ्रेश झालो,मंदिरामध्ये दर्शन घेतले व दुसर्या दिवशी पहाटे अभिषेक करण्यासाठीची तयारी करून ठेवली.
केदारनाथ गावामध्ये अति प्रचंड थंडी असते त्यामुळे आपल्याला जास्त थंडीची सवय नसेल तर आपण थंडीचे एक्स्ट्रा कपडे सोबत नेलेले बरे .तेथे जाडजूड पांघरुन आपल्याला उपलब्ध करून दिलं जातं परंतु सर्वच गोष्टींची किंमत वरती खूपच महाग आहे त्यामुळे आपण सोबत आपल्याला आवश्यक सर्व साहित्य आपल्या सोबत नेलेलं अति उत्तम. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये झोप येणं मुश्कील असतं तरीही आम्ही थोडा वेळ आराम केला व पहाटे लवकर उठून मंदिरामध्ये अभिषेकाच्या रांगेमध्ये उभे राहिलो. अभिषेक सुरू झाल्यानंतर तेथील ब्राह्मणाने आमची सुंदर अशी पूजा करून दिली, मोक्षप्राप्तीची पूर्वजांसाठीची पूजा देखील त्यांनी केली.केदारनाथ मंदिरामधील पिंड अगदी वेगळ्या प्रकारची आहे.इतर ठिकाणी शिवलिंग असतं तसे याठिकाणी शिवलिंग नाही.त्याची देखील खूप रंजक कथा आहे.आपण त्याची माहिती युट्युबवरून घेऊ शकता.पहाटेच्या सुमारास अभिषेक व मंदिरामधील दर्शन यथासांग पार पडले.
त्यानंतर आम्ही मंदिराच्या आसपासच्या परिसरात असलेल्या इतर मंदिरांकडे वळलो. तेथेच शंकराचार्यांची सुंदर अशी भव्य मूर्ती देखील स्थापन केलेली आहे व मंदिराच्याच डाव्या बाजूला भैरवबाबांची टेकडी देखील आहे.तेथे जाऊन आम्ही दर्शन घेतले.मंदिराच्या मागच्या बाजूने दिसणारे बर्फाचे डोंगर काही केल्या नजर हटू देत नव्हते.
हलकासा नाश्ता केला, प्रसाद व मित्रांसाठी इतर वस्तू खरेदी केल्या व रूम मध्ये जाऊन परत फटाफट पॅकिंग केले व परतीच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली.बेस कॅम्प च्या अलीकडे एक रेतास कुंड नावाचे तुम्हाला एक कुंड पाहायला मिळेल.याठिकाणी तुम्ही मोठ्याने ओम नमः शिवाय असा उच्चार केलात तर तेथे असलेल्या पाण्याच्या खालून बुडबुडे येताना बघायला मिळतात.
जाताना मी व सचिन भाऊ सोबतच होतो.आम्ही पायी उतरण्यासाठीचा प्रवास सकाळी लवकरच सुरू केला.उतरताना आम्हाला तितकेसे कष्ट जाणवले नाही आणि जागोजागी शॉर्टकट घेत आमचा उतरण्याचा प्रवास अखंड सुरू ठेवला.क्षणात ढग दाटून यायचे तर क्षणात ऊन पडायचं तर क्षणात धुक्याने सर्व वाट हरवून जायची.डोक्यावरती माशा गुणगुणल्यासारखे हेलिकॉप्टर्स भिरभिरत होते.पावसाचे थोडेसे थेंब पडू लागले तेव्हा मात्र आमची चांगलीच घाबरगुंडी उडाली कारण महाप्रलयाचा अनुभव पाठीशी होता त्यामुळे काही दुर्घटना होईल अशी भीती मनामध्ये होती.परंतु सुदैवाने तसे काहीही घडले नाही व आम्ही परत उतरताना सलग सहा तास उतरल्यानंतर सुखरूप गौरीकुंडला पोहोचलो.तेथे आम्ही परत आवश्यक ती खरेदी केली,मित्रांसाठी काही खरेदी केली व पार्किंग केलेल्या गाडीमध्ये आम्ही बसलो. तेथून आम्ही जगातील शंकराच्या मंदिरांपैकी सर्वात उंच मंदिर अशी ओळख असलेले चोपता येथील तुंगनाथ मंदिराकडे वळलो व आमचा रात्रीचा प्रवास आम्ही चोपता हिल स्टेशन येथे केला. भल्या पहाटे उठून आम्ही लगेचच तुंगनाथाच्या मंदिराकडे पायि ट्रेकिंग करत जायचा निर्णय घेतला.पायी जाताना रस्त्यातून दिसणारा निसर्ग खरच मन मोहून टाकत होता.जम्मू-काश्मीरचा फिल् देणारी पठारे,उंच उंच सरळ सोट वाढलेली झाडे,दाट धुक्याने वेढलेले पर्वत,खोल दऱ्या अशा निसर्गाने मनाला आनंद होत होता.पंचकेदार मंदिरांपैकी हे तृतीय केदार मंदिर एक वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेले मंदिर आहे.एका पौराणिक मान्यतेनुसार, शिवाला प्रसन्न करण्यासाठी पार्वतीने याच पर्वतावर तपस्या केली होती. हे मंदिर पंच केदारनाथपैकी एक आहे.याची रचना केदारनाथ मंदिरासारखीच आहे.तुंगनाथाच्या शिखरावरतीसुद्धा तुम्हाला रात्रीच्या मुक्कामासाठी खोल्या उपलब्ध होऊ शकतात तसेच येथे जेवण नाश्त्याची सुद्धा सोय उपलब्ध आहे परंतु किंमत काहीशी जास्तच आहे.
तुंगनाथाच्या पर्वताचे सौंदर्य डोळ्यांमधे साठवून ठेवत आम्ही परत खाली पायि उतरून आलो.खाली उतरल्यानंतर भरपेट नाष्टा केला व आमचा प्रवास पुन्हा रुद्रप्रयाग कडे सुरु झाला.
केदारनाथ यात्रा प्रवासात मनामध्ये एकाच गोष्टीची थोडी हुरहुर होती,ती म्हणजे घरी गणेशोत्सव सुरू होता... गणपती आम्हा सर्वांच्या घरी विराजमान झालेले होते...अशातच गणपती घरीच सोडून आम्ही निघालेलो होतो व विसर्जनाच्या आधी पर्यंत आम्ही आपापल्या घरी पोचू शकणार नव्हतो...म्हणजे पर्यायाने आम्हाला आमच्या घरच्या विसर्जनाला उपस्थित राहता येणे शक्यच नव्हते...कारण त्या काळात आम्ही केदारनाथ यात्रा प्रवासात राहणार होतो,परंतु जसं काही ही सुद्धा आमची मागणी देवाने ऐकली.केदारनाथ प्रवास झाल्यानंतर व चोपता येथील तुंगनाथांचे दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आम्ही रुद्रप्रयागला वापस आलो तेव्हा जशी काही आमच्या मनातील इच्छाच देवाने ऐकली व संदीप भाऊ यांच्या रूपाने देवच आमच्या मदतीला धावून आला.संदीप भाऊंनी आम्ही रुद्रप्रयागला वापस आल्यानंतर लगेचच दहाव्या मिनिटाला फोन करून आम्हाला त्यांच्या आर्मी रेजिमेंट मधील बसवलेल्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी निमंत्रित केले.तेव्हा आम्हाला तर जसं काही आकाश ठेंगणं झालं होतं कारण विसर्जन,तेही उत्तराखंडमधील गणपतीचे... हि आमच्यासाठी एक आनंदाची पर्वणीच होती.प्रचंड पाय दुखत असताना,सर्व अंग ठणकत असताना व चालायची एकामध्येही शक्ती राहिलेली नसतानासुद्धा जशी काही एक वेगळीच ऊर्जा आमच्या सर्वांच्या अंगामध्ये धावत होती.आम्ही पटापट आवरलं व लगेचच आम्ही आर्मी रेजिमेंट मधील गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालो.या विसर्जन मिरवणुकीमधील धमाल व उत्साह अक्षरशः आम्हाला तोंडात बोट घालायला लावेल असाच होता.सर्व जवान इतक्या तालासुरात, इतक्या जोशात,इतक्या आवेगात झांज पथकामध्ये सामील झाले होते,जोरजोराने घोषणा देत होते.गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.उत्तराखंडमध्ये फडकणारा शिवरायांचा भगवा ध्वज, गणेशोत्सवाची दगडूशेठच्या रूपामधील प्रसन्न व सुंदर मूर्ती,समोर जोशाने..आवेगाने..नाचणारे आमचे जवान..कडक तालामध्ये वाजणार्या झांजा व तितकाच तडफदार वाजणारा ढोल हे सर्व पाहून अक्षरशः आपण उत्तराखंड मध्ये नाहीच आहोत,आपण महाराष्ट्रातीलच एखाद्या शहरामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये आहोत असाच आम्हाला भास होत होता.प्रचंड उत्साहात व तितक्याच आनंदात ही मिरवणूक पुढे जात रुद्रप्रयाग येथील संगम स्थळावरती पोचली.तेथे सर्व जवानांनी दगडूशेठ गणपतीची मूर्ती आपल्या हातांवरती तोलत संगम स्थळावरती नेऊन यथोचित पूजा करुन गणरायाला संगमामध्ये विसर्जित केले.तेथे आम्ही भरपेट मोदक देखील खाल्ले.आमच्या मनातील ही अतृप्त इच्छा संदीप भाऊंच्या निमंत्रणामुळे पूर्ण झाली याचं आम्हाला खूप कौतुक वाटले. त्याबद्दल संदीप भाऊंचे आम्ही खूप खूप आभार देखील मानले.त्या रात्री व्यवस्थित आराम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही आर्मी कॅम्प मधील आर्मी स्टोअर मध्ये मनसोक्त खरेदी केली व तेथेच संदीप भाऊनि आम्हाला तेथील आर्मी कॅम्प मधील नाष्टा देखील पोट भरून खाऊ घातला.
रात्री रुद्रप्रयाग ला पोचल्यानंतर पुन्हा संदीप भाऊंची भेट घेऊन दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही संदीप भाऊ यांना सोबत घेऊन बद्रीनाथ कडे जाण्यासाठी निघालो.पंच केदार मंदिरांमध्ये भगवान शिवाच्या दर्शनाची यात्रा पूर्ण केल्यानंतर, भगवान विष्णूचे बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेणे हा एक अलिखित धार्मिक विधी आहे.
रुद्रप्रयाग ते बद्रीनाथ कडे जाणारा रस्ता खुपच त्रासदायक व भीतीदायक होता.डोंगराला विळखा घालून झोपलेल्या अजगराप्रमाणेच नागमोडी वळणे घेणारी तीव्र खोल दर्या असणारा हा रस्ता होता.जागोजागी दरडी कोसळलेल्या होत्या तर काही दरडी कोसळण्याच्या बेतात होत्या त्यामुळे प्रवासामध्ये काहीअंशी भीती मनामध्ये होती.आम्ही प्रवास सुरू केला तेव्हा पावसाची भुरभुर सुरू झालेली होती त्यामुळे आम्ही काहीसे नाराज झालो कारण पावसामुळे आमच्या पुढच्या प्रवासामध्ये व्यत्यय येऊ शकला असता परंतु आमच्या सुदैवाने तसे काहीच झाले नाही.हा आमचा प्रवास बद्रीनाथ पर्यंत अगदी निर्विघ्नपणे पार पडला.बद्रीनाथच्या मंदिरामध्ये देखील निर्विघ्नपणे आमचे दर्शन पार पडलं.बाहेर गरम पाण्याचे कुंड आहेत तेथे आम्ही आंघोळीचा आनंद घेतला.
बद्रीनाथ मंदिरापासून केवळ दोन किलोमीटरच्या अंतरावरच भारताचे चीनच्या सीमेजवळ असणारे माना हे शेवटचे गाव आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण गाव देखील आम्ही पाहिले.या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की येथेच श्री व्यास मुनींनी गणपतीला वेद सांगितले होते व तेथील गुहेमध्ये बसूनच गणपतीनी ते वेद लिहीले होते तसेच या माना गावातूनच पांडव स्वर्गामध्ये गेले होते अशी आख्यायिका सांगितली जाते.हे छोटेसे परंतु सुंदर आदर्श गाव अगदी व्यवस्थित रित्या वसवलेले आहे व येथील पर्यटनाचा,आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले हे गाव आहे. या छोट्याशा,कमी लोकवस्तीच्या गावातीलच बरेचसे मुलं-मुली मोठ्या पदावर भारताच्या वेगवेगळ्या टोकांमध्ये सेवेला असलेलं आम्हाला स्थानिकांशी बोलून समजलं.माना येथील कारागिरांनी स्वतःच्या हाताने विणलेल्या कलाकुसरीच्या वस्तु,गरम कपडे हे येथील वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.
आता बराच उशीर झालेला असल्यामुळे आम्ही लगेचच परतीच्या प्रवासाला सुरुवात करत रूद्रप्रयागला रात्री उशिरा येऊन पोहोचलो. आमच्या यात्रेमधील ट्रेकिंगचे सगळे पॉइंट जवळ जवळ संपले होते त्यामुळे रुद्रप्रयागला रात्री मुक्काम केल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच हरिद्वारकडे निघालो.
रुद्रप्रयाग वरून रस्त्यातच जाताना थोडेसे खाली उतरून जावे लागणार अशा ठिकाणी महादेवाचे एक सुंदर असे मंदिर होते ते मंदिर म्हणजे कोटेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर आम्हाला संदीप भाऊ यांनी सुचवलेले होते .अत्यंत नयनरम्य सुंदर अशा ठिकाणी असलेले हे महादेव मंदिर आम्हाला बघायला मिळाले हे आम्ही आमचे भाग्य समजतो .या मंदिराच्या ठिकाणी पाण्याचा प्रचंड जलप्रपात पाहायला मिळतो .इथे संगम स्थळ देखील पाहायला मिळते .प्रचंड मोठे डोंगर, या दोन डोंगरांमधून वाहत येणारी नदी ,त्या नदीचे पात्र ही खूप मोठे व प्रचंड रोरावत येणारे होते .तसेच या कोटेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी डोंगरामध्ये नैसर्गिकरित्या पाणी पडून पडून एक सुंदर अशी गुहा देखील तयार झालेली होती व या गुहेमध्ये खूप सारे नैसर्गिक शिवलिंग देखील तयार झालेले बघायला मिळाले होते. ही नजरेसाठी देखील एक पर्वणीच होती .अत्यंत भक्तिभावाने आम्ही कोटेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेतले व पुढे निघालो.
हरिद्वारला गंगा नदीच्या काठावर तिथेच असलेले एक हॉटेल आम्ही घेतले व तेथे आम्ही थांबलो.रात्री गंगा नदी व तेथील मार्केट पाहून येऊन हरिद्वारला मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा लवकर उठून आम्ही लगेच ऋषिकेश येथे निघालो.ऋषीकेश येथील निळकंठ मंदिर खूपच प्रसिद्ध आहे.समुद्रमंथनातून निघालेले विष शंकराने तेथेच पिले होते व त्यामुळे शंकराचा गळा निळा पडला होता त्यामुळे त्या मंदिराला निळकंठ मंदिर असे नाव पडले अशी याची आख्यायिका असलेले हे मंदिर आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निळकंठ मंदिराचे दर्शन घेतले.निळकंठ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर उत्तराखंडचा धाडसी खेळाचा भाग,ॲडव्हेंचर स्पोर्ट म्हणजे रिव्हर राफ्टिंग.
ऋषिकेश येथील गंगा नदीच्या संगम प्रवाहात आम्ही रिव्हर राफ्टिंग केली त्यावेळी हा रिव्हर राफ्टिंग चा अनुभव खरंच थरारक होता व मनाला मोहून टाकणारा असाच होता.सुरुवातीला काहीशी भीती मनामध्ये होती परंतु नदीमध्ये उतरल्यानंतर सगळ्यांना खूपच हुरुप आला.गंगे मैया की जय,हर हर महादेव चे नारे देत आम्ही यशस्वीपणे रिव्हर राफ्टिंग बारा किलोमीटरचे पूर्ण केले.तेथून तसेच आम्ही ऋषिकेश येथीलच संगम स्थळावरती पोहोचलो व तेथील नदीच्या प्रवाहामध्ये आम्ही आंघोळी केल्या. सायंकाळची आरती सुरुच झालेली होती,तेथे आम्ही गंगा आरतीला देखील उपस्थिती लावली.रात्री उशिरा परत हरिद्वार येथील आमच्या लॉजवरती येऊन आराम केला.हरिद्वार येथून जवळच असलेले माता मणसा देवीचे मंदिर व चंडी देवीचे मंदीर खूपच प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी रोप-वेची सुविधा उपलब्ध आहे.आम्ही वेळ न दवडता सकाळी उठून माता मनसा देवीचे दर्शन घेतले व रूममध्ये येऊन परतीच्या प्रवासाच्या पॅकिंगला सुरुवात केली.आमचा हा संपूर्ण प्रवास अगदी सुरक्षित,सुखरुप,कुठल्याही प्रकारची दगदग,त्रास न होता झालेला होता त्यामुळे आता सगळ्यांना दहा दिवसानंतर आपापल्या घराचे वेध लागले होते.जो तो उठून आपापल्या बॅग पटापट पॅकींग करत होता व बाजारामधून आपापल्या परिवारासाठी सुंदर अशा वस्तू विकत घेत होता.सर्व पॅकिंग झाल्यानंतर मात्र आमची खरी धांदल उडाली कारण सगळ्यांच्याच जवळपास चार चार बॅगा प्रत्येकी झालेल्या होत्या त्यामुळे आम्हाला तब्बल दोन ऑटोरिक्षा कराव्या लागल्या व स्टेशन वरती आम्ही पोहोचलो. जेव्हा रेल्वे आली तेव्हा घराच्या ओढीने प्रत्येकाने आपापले सामान पटापट रेल्वेत ठेवले व सगळ्यांनी घरी फोन करत हरिद्वार चा निरोप घेतला.आयुष्यातील संस्मरणीय असाच हा केदारनाथ,उत्तराखंड यात्रेचा प्रवास होता जो आमच्यासाठी अगदी सुरक्षित व सुलभ ठरला.हा प्रवास निश्चितच काहींसाठी त्रासदायक असेल,काहींना आयुष्याची वाईट आठवण,अनुभव देऊन जाणारा असेल परंतु महादेवाच्या कृपेने आम्हाला या प्रवासामध्ये काहीही अडचण आली नाही.उलट सुखकर सोपा व सुलभ असाच हा आमचा प्रवास ठरला.
या प्रवासामध्ये सचिन गोसावी,शशांक गोसावी,जितेंद्र वझरे, अमोल मानकर या मित्रांची खूपच सुंदर साथ मिळाली.पूर्ण प्रवास हसत-खेळत मजेत मजा करत कसा पार पडला हे आम्हाला वापस आपापल्या घरी येईपर्यंत जरा देखील समजले नाही.दहा दिवसांचा आमचा हा प्रवास आयुष्यातील एक लक्षात राहण्यासारखीच घटना ठरला.
महादेव शिवशंभो महाकाल कि जय !
जयश्रीकेदार जयश्रीकेदार ! केदारनाथ यात्रा करणे हा एक सोहळा जरी असला तरी केदारनाथ प्रवास सुरू करण्यापूर्वी पुढील गोष्टींची काळजी प्रकर्षाने घ्यावी अन्यथा या यात्रेमध्ये तुम्हाला मनस्ताप होऊ शकतो तसेच प्रचंड शारीरिक इजा देखील होऊ शकते त्यामुळे काही बाबींची निघण्यापुर्वी तयारी करून घेणे खूप आवश्यक आहे त्यासाठी खालील बाबींची माहिती असणे आवश्यक आहे :- केदारनाथ यात्रा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला शारीरिक कष्टाची सवय असणे खूपच आवश्यक आहे.जर तुम्ही खेचरावरती किंवा पायी प्रवास करणार असाल तर तुम्हाला सपाटीवर चालण्याची, तसेच डोंगरदऱ्यांमध्ये चालण्याची,उतरण्याची सवय असणे खूपच आवश्यक आहे आणि जर तशी सवय नसेल तर किमान महिनाभर आधी आपण चालणे,फिरणे सुरू करणे,सराव करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा पायाला गोळे येणे,पेटके सुजणे पिंडर्यांना दुखापत होणे,गुडघे दुखावून लंगडणे अशी इजा होऊ शकते. जर तुम्ही केदारनाथ धामला भेट देण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा की हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त जाणे टाळा. डोंगराळ भागात पावसाळ्यात पूर किंवा भूस्खलनाचा धोका खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत या काळात प्रवासाचे नियोजन करू नका. सहलीला जाताना हे लक्षात ठेवा की तुम्ही उन्हाळ्यात जात असाल तरीही हिवाळ्यातील कपडे सोबत घेऊन जा.डोंगरात कधीही पाऊस पडू शकतो, त्यामुळे प्रवास करताना छत्री, रेनकोट सोबत ठेवा. सामान्य माणसाला गौरीकुंड ते केदारनाथ धाम जायला एकूण 8-9 तास लागतात, त्यामुळे घाई न करता आरामात चालत जा. चालताना चेंगराचेंगरी करू नका अन्यथा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.तुमचा प्रवास सकाळी लवकर सुरू करा जेणेकरून तुम्ही दिवसा आरामात केदारनाथ धामला पोहोचू शकाल. दर्शनानंतर येथे रात्रीची विश्रांती घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीकुंडकडे परतीचा प्रवास सुरू करा.उत्तम फोन नेटवर्कसाठी केदारनाथ यात्रेला जाताना Reliance Jio चे सिम सोबत ठेवा.तुमचे प्रवास कार्ड आणि आधार कार्ड सोबत ठेवायला विसरू नका.जाण्यापूर्वी फ्लॅशलाइट आणि अतिरिक्त बॅटरी सोबत ठेवा.केदारनाथ धामला भेट देण्याच्या काही दिवस आधी श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. यामुळे तुम्हाला तेथे श्वास घेण्यास जास्त त्रास होणार नाही.आगाऊ हॉटेल बुकिंग करा. गर्दीच्या मोसमात खोली मिळण्यात खूप त्रास होतो कारण यावेळी लोकांची गर्दी जास्त असते. केदारनाथला निघण्यापूर्वी साहित्याची निवड करणे हे खूपच आवश्यक कार्य आहे,कारण तेथील वातावरण सारखे बदलत राहते.त्यामुळे त्याला अनुसरूनच तुमचे साहित्य हवे.तुम्हाला सोबत एखादी टॉर्च बॅटरी,पावर बॅंक,एखादा एक्स्ट्रा मोबाईल, ors वॉटर,चालण्यासाठी वॉकिंग स्टिक किंवा मजबूत काठी,जास्तीचे कपडे व अंतर्वस्त्र,रुमाल,गॉगल,ट्रेकिंगचे शूज,थंडीचे हॅन्ड ग्लोज व स्लिव्ज्, आवश्यक मेडिसिन्स,सुट्टे पैसे व आवश्यक ती रक्कम असे साहित्य हाताशी असणे खूप आवश्यक आहे. केदारनाथला पोचल्यानंतर तुमचं लोकेशन तुमच्या निवडक नातेवाईकांना,मित्रांना नेहमी सांगत राहणे,अपडेट करत राहणे,कळवत राहणे खूप आवश्यक आहे. कारण एखादी एमर्जन्सीची घटना घडली तर तुम्हाला रेस्क्यू करणे सोपे जाते. संपूर्ण प्रवासामध्ये तुमच्या सामानाची काळजी घेणे आवश्यक आहे.कारण रेल्वेमध्ये,प्रवासामध्ये,हॉटेलमध्ये सामानाची चोरी होणे ही सामान्य गोष्ट आहे.अशावेळी सामान चोरीला गेले तर दूर अंतरावर तुम्हाला नवीन साहित्य घेणे खर्चिक पडू शकते तसेच त्याचा मानसिक व शारीरिक त्रास देखील होऊ शकतो. नाशिक वरून केदारनाथ ला कसे पोहचाल केदारनाथ ला जाण्यासाठी नाशिक वरून सर्वात संयुक्तिक व उत्तम मार्ग तो म्हणजे मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी हरिद्वार एक्सप्रेस .या एक्सप्रेसचे साधारणतः दोन ते तीन महिने आधीच रिझर्वेशन करून ठेवावे जेणेकरून आपल्याला कन्फर्म सीट मिळेल व आरामात प्रवास होईल. या लोकमान्य टिळक टर्मिनस हरिद्वार एक्सप्रेस ने आपण हरिद्वार येथे उतरावे. हरिद्वार ते रुद्रप्रयाग हे अंतर साधारणत 70 ते 90 किलोमीटर आहे.आपण रुद्रप्रयाग ला पहिला मुक्काम करणे जास्त सोयीचे ठरेल कारण रुद्रप्रयाग वरूनच आपल्याला केदारनाथ व बद्रीनाथला जाता येते तसेच तिथून आपल्याला वापस हरिद्वार व ऋषिकेश येणे सुद्धा सोयीचे ठरते.हरिद्वारला उतरल्यानंतर टुरिंगची खाजगी कार करून घेणे अगदी योग्य राहील कारण सरकारी बसेसने प्रवास करताना आपल्याला वेळेवर साधने उपलब्ध होऊ शकत नाहीत.तसेच कारची निवड करताना शक्यतो ग्राउंड क्लिअरन्स जास्त असलेली व उंच टायर असलेली कार निवडणे जास्त फायद्याचे व सुरक्षित ठरू शकते परंतु तत्पूर्वी ड्रायव्हरची चौकशी करूनच व्यसनी ड्रायव्हर नसेल तर अशाच ड्रायव्हरची निवड करणे योग्य ठरेल.खाजगी कार केल्यानंतर ड्रायव्हरला किंवा मालकाला संपूर्ण रक्कम न देता केवळ 25 टक्के रक्कम देऊन ठेवा व आपला प्रवास संपल्यानंतरच उर्वरित रक्कम नंतर द्यावी. ऋषिकेश,हरिद्वार,रुद्रप्रयाग,गौरीकुंड या सर्वच ठिकाणी जेवण चांगले मिळते,घरगुती मिळते. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरील स्त्रोतांवर अवलंबून न राहता आपण पाण्याचे जार सोबत घेतलेत किंवा पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या तर ते योग्य राहील जेणेकरून आपल्या प्रवासामध्ये तब्येत बिघडणार नाही. शक्यतो कपड्यांचे व आंतरवस्त्रांचे जास्तीचे जोड सोबत असलेले बरे,म्हणजे आपल्याला धुवत बसण्याची गरज राहणार नाही व वेळेवर कोरडे कपडे देखील उपलब्ध होतील. केदारनाथ यात्रेसंदर्भात विविध व्हिडीओ पाहण्यासाठी युट्युबवर suhasshrirangkolekar असे सर्च करा व व्हिडीओ बघा.
हा ब्लॉग लिहिण्यामागची प्रेरणा :- चामरलेणी जॉगिंग ग्रुप,नाशिक. फोटो सौजन्य :- सुहास कोळेकर,सचिन गोसावी,शशांक गोसावी ,जितेंद्र वझरे अमोल मानकर. सूचना व सहकार्य :- श्री संदिप कड जय बाबा केदारनाथ ग्रुप. माहितीचे स्त्रोत:- श्री संदिप कड स्थानिक ग्रामस्थ केदारनाथ. स्थानिक ग्रामस्थ माना. स्थानिक ग्रामस्थ ऋषिकेश व हरिद्वार.






























































Comments