अजिंक्य किल्ले रामशेज

 

                  तसा रामशेज किल्ला माझ्या खूप आवडीचा, माझ्या घरापासून खूप जवळचा व वेळोवेळी खुणावणारा असाच किल्ला. माझ्या शाळेला जातानाच्या मार्गावर या किल्ल्यालाच वळसा घालून मला नेहमी जावे लागते. किल्ल्यावर ट्रेक खूप वेळा केले परंतु एक हा किल्ला जसा काही वेळोवेळी खुणावतच राहतो. मराठ्यांनी तब्बल साडेसहा वर्ष मुघलांपासून हा किल्ला अजिंक्य असाच ठेवला.यामुळेच की काय, या किल्ल्यावर गेल्यानंतर इतर ट्रेकपेक्षा एक वेगळीच ऊर्जा व प्रेरणा मिळत राहते. दिवाळी सुट्टीच्या काळात तब्बल 15 दिवस ट्रेकिंगला,व्यायामाला खंड पडलेलाच होता. त्यामुळे दिवाळी सुट्टी संपताच ट्रेकला सुरुवात केली ती पुन्हा एकदा रामशेज किल्ल्यावरील ट्रेकनेच.

 रामशेज हा किल्ला नाशिक शहरापासून खूप जवळ आहे.नाशिक मध्यवस्तीपासून साधारणपणे  12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे तर माझ्या घरापासून जवळपास सहा ते सात किलोमीटर एवढ्या अंतरावर हा किल्ला आहे.मधल्या बाजूतील दोन ते तीन किलोमीटर पर्यंतचा रस्ता बांधकाम चालू असल्यामुळे खराब आहे व धुळीचा आहे, परंतु किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रस्ता चांगल्या सुस्थितीत आहे तसेच किल्ल्याच्या खालील बाजूला पार्किंग देखील आहे जेथे आपण आपली वाहने पार्क करू शकतो. या पार्किंग मध्येच असलेल्या छोट्या दुकानांमधून आपल्याला एनर्जी ड्रिंक तसेच फळे व नाश्त्याचे किरकोळ साहित्य उपलब्ध होते.

हा किल्ला मराठ्यांनी साडेसहा वर्ष मुघलांविरुद्ध लढवला होता. ह्या किल्ल्याबद्दल अशी आख्यायिका सांगतली जाते की येथे श्रीराम जेव्हा श्रीलंकेकडे जात होते तेव्हा येथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले होते. प्रभु श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगडप्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या जागेवर,अगदि कमी उंचीच्या डोंगरावर आहे.त्यामुळेच चढाईस हा किल्ला बराचसा सोपापण आहे.अशी सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता.



             गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नाशिक-पेठ - सुरत या कॉंक्रीट मार्गावरील आशेवाडी ह्या गावातून किल्ल्यावर जायला डांबरी वाट आहे.अर्ध्या तासात किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ल्याचा विस्तार प्रचंड असला तरी पाण्याचे टाके, स्थानिक देव-देवतांची मंदिरे आणि पडझड झालेली तटबंदी ह्याखेरीज किल्ल्यावर फारसे बघण्यासारखे काही नाही. हा किल्ला मराठ्यांनी मुघल सैन्याला केलेल्या चिवट प्रतिकाराबद्दल प्रसिद्ध आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकायचा चंग बांधला होता. मोठ्या सैन्यबळानिशी तो इ.स. १६८२ला महाराष्ट्रावर चाल करून आला. आपल्या शहाबुद्दीन फिरोजजंग ह्या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली. फिरोजजंगाने रामशेजपासून सुरुवात केली. किल्ल्यावर (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) नावाचे किल्लेदार होते. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. ते रामशेजच्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.

शहाबुद्दीन फिरोजजंग ३५ ते ४० हजार फौजफाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला तेव्हा किल्लेदार (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) ५००-६०० मावळ्यांसोबत गडावर होता. मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकू. पण मराठ्यांच्या गनिमी काव्याने त्याच्या सैन्याला पुरते जेरीस आणले. गडावरील दगडगोट्यांच्या वर्षावाने मुघल सैन्याचे स्वागत झाले. गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती. अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत.

संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी जनारावरांचे कातडे लावून लाकडाच्या तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगरून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.

मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि किल्ल्याच्या उंचीचा ८०-९० तोफा आणि 200 सैनिक बसतील एवढा मोठा लाकडी बुरूज बनवला. (याला लाकडी दमदमा असेही म्हणतात). या लाकडी बुरुजांवरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठेसुद्धा या लाकडी बुरुजांवर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे हटायला तयार नव्हते. शहाबुद्दीनच्या हाती यश येत नव्हते.

दोन वर्षांनंतरही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला. 

मग मात्र औरंगजेबाने शहाबुद्दीनला परत बोलावून घेतले. त्याने रामशेजची मोहीम फतेह खान नावाच्या जिगरबाज सरदारावर सोपविली. मग फतेहखान २० हजारीची फौज घेऊन आला. आणि त्याने रामशेजवर जोरदार आक्रमण चढवले. पण तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगड गोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे की बरेचसे सैनिक जागेवरच ठार व्हायचे. त्या फतेहखानाला मावळे तसूभरहि पुढे सरकू देईनात. या मरहट्ट्यांनी फतेहखानच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले. इतका खटाटोप करूनही किल्ला काही शरण येईना. फतेहखानच्या हाती फक्त निराशा, अपमान आणि माघारच आली.

फतेहखानाच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे. त्या तोफ्याच्या गोळ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरुंजाची पडझड होत असे. ते पाहून फतेह फार खुश व्हायचा. पण रात्र सरून सकाळ झाली की ती पडझड झालेली तटबंदी किंवा बुरूज परत बांधून झालेला असायचा. ते दृश्य पाहून फतेहखान आश्चर्यचकित व्हायचा मग मात्र त्याचा राग अनावर होत होता. किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच ही पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे.तटबंदी बांधण्यासाठी चुना उगाळायच्या जागेचे गोलाकार  अवशेष अजूनही गडावर बघायला मिळतात.इकडे फतेहखानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला, त्याला वाटू लागले की या मरहट्ट्यानां जादूटोणा येतो, भुताटकी येते, आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत परत आहे तशी सुस्थितीत असायची.

चुना उगाळायच्या जागेचे अवशेष



अनेक महिने सरले, हजारो मुगल सैनिक मारले गेले, खूपसारा दारुगोळा हकनाक वाया गेला, तरीही किल्ला हाती यायचे नाव नव्हते. मग एके दिवशी फतेहखानच्या एका सरदाराने फतेहखानाला सांगितले की युद्ध तर करून बघितले, आता एका मांत्रिकाला बोलावून बघा. फतेहखानला हे पटले नाही, पण किल्ला जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. मग त्याने आपल्या सरदाराकडून मांत्रिकाला बोलावून घेतले. मांत्रिक आला, तो फतेहखानला म्हणाला, – -हुजूर, चिंता मत करो, मैने तो भूत प्रेत भी वश किये है, ये मरहट्टे क्या चीज है? आप बस मुझे एक सोने का नाग दे दिजीये बाकी मी संभाल लेता हूॅं – मग त्या मांत्रिकाने मागितल्याप्रमाणे त्याला सोन्याचा नाग बनवून देण्यात आला.

मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्याजवळ जायला निघाला. मांत्रिक पुढे आणि फतेहखानाचे सैन्य त्याच्या मागे. मांत्रिक किल्ल्याचे दिशेने पुढे सरकत होता. तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्यावरून गोफणीचा एक दगड जोरात मांत्रिकाच्या छाताडाला जोरात लागला.मांत्रिक डोळे पांढरे करून पडला. मांत्रिक तिसरीकडे, सोन्याच्या नांग दुसरीकडे , फत्तेखान पळत मागे.

फतेहखानने अजून एक डाव आखला, त्याने मध्य रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरू केला. या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता. त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुरुंजाजवळ येऊन फतेहखानची करामत बघत होते. पण किल्ल्यावर एक पण तोफ गोळा पोहोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते. जवळपास सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या. पण फतेहखान मात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच. कारण तो होता एका वेगळ्याच बेताच्या तयारीत. त्याने आपल्या सोबतीला काही निवडक मोगल सैनिक घेतले आणि तो निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेने. दबक्या पावलांनी, बिलकुल आवाज न करता. किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोहोचल्यावर फतेहखानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला, – -उपरवाले का नाम लो और उपर किले पार चढो, अगर कामयाब हो जोगे तो तुम्हारा नाम होगा- – वर जायला कोणी तयार होत नव्हते, पण फतेहखान सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता, मग त्यातले काही सैनिक जिवावर उदार होवून किल्ल्यावर चढाई करायला तयार झाले. अंधाराचा फायदा घेऊन झाडाझुडपाच्या साहाय्याने ते हळूहळू वर चढू लागले. त्यांनतर एका मागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जाऊ लागले.

एकंदरीत फतेहखानाचा बेत असा होता की, किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने तोफगोळ्यांमध्ये गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे. मग दोरखंड लावून खाली उरलेले सगळ्या सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा. ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेहखानाचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजून चालू होता. किल्ल्यावर किल्लेदार (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) पुढच्या बाजूला मुख्य बुरुजाजवळ होते. ते आणि त्यांचे सर्व मावळे फतेहखानच्या तोफांच्या करामती बघत होते. पण ते संभाजी राजांचे पराक्रमी सरदार होते, अशाही परिस्थितीत गाफील राहणारे ते नव्हते. २ गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्या म्हणजे एक तर आज अचानकच फतेहखानाने रात्रीचा मारा सुरू केला आहे आणि दुसरे म्हणजे तोफांचे एकपण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत होते, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते आहे. मग ते तडक घोड्यावर बसले आणि तडक निघाले, आपल्या सोबतीला त्यांनी २०० मावळे घेतले, त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारे देण्यास सुरुवात केली. ज्या वेळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात चाललेला फतेहखानचा डाव समाजाला, तसे ते आणि त्यांचे मावळे बुरुजावर दबा धरून मोगल सैनिकांवर पाळत ठेवून बसले.

वर चढणाऱ्या मोगल सैनिकांपैकी एक दोघे तटावर पोहोचले, ते आणखी वर येणार इतक्यात मावळ्यांच्या गोफणीत दगड धरले गेले आणि सप्प करून गोफण चालली, त्या मोगल सैनिकाच्या डोक्यात इतक्या जोरात धोंडा बसला की तो घायाळ झाला आणि गडावरून खाली पडला. मग मात्र सगळे मावळे धावले तटबंदीच्या जवळ. त्यांनी वर चढणाऱ्या मोगलांवर गोफणीने दगडांचा जोरदार मारा केला, किल्ल्यावरच्या मोठ मोठाल्या दगडी शिळा ढकलून दिल्या. इतकेच नव्हे तर तेलात बुडवलेली कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैनिकाच्या अंगावर फेकून दिली. अचानक झालेल्या या मृत्युतांडवामुळे सगळे मोगल सैनिक जिवाच्या आकांताने ओरडू लागले. काही सैनिक दगडांनी घायाळ होऊन मेले तर काही पेटत्या कापडांनी भाजून मेले, आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंच डोंगरावरून उड्या मारल्या. ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले फतेहखान आणि त्याचे मोगल सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. गनीम (शत्रू) पळून जाताना बघून किल्ल्यावर मावळे आनंदित झाले, आणि जोर जोरात आरोळ्या देऊ लागले, – -हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंभूराजे!!!!



   औरंगजेबाने फतेह खानाला परत बोलावून घेतले. आणि कासम खानला पाठवले. कासाम खान नव्या दमाची फौज घेऊन रामशेज वर चालून आला. कासम खान ने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले. किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही. किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्न धान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाट त्याने रोखून धरल्या होत्या. किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रूपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते. पण कासमखानच्या त्या कडक बंदोवस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरचे अन्न धान्य संपत आले होते. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते, अन्नावाचून सगळ्यांचे हालहाल होत होते. ही परीस्थिती पाहता ४ ते ५ दिवसात किल्ला कासमखानच्या हातात जाईल असे वाटत होते. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. खूप जोराचा पाऊस पडला. हा पाऊस सलग २ दिवस पडत होता. या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी झाले होते. किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावारचे मांस सडू लागले. त्यामुळे सर्वत्र खूप दुर्गंधी पसरली होती. इतका घाण वास येऊ लागला तो बिलकुल सहन होत नव्हता. त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले. मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होऊ लागले. मग कासमखानाने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला. एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले.तो दिवस सरला, रात्र झाली. रात्रही सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्ववत करण्यात आले. तेवढ्यात कासमखानाने किल्ल्यावर पहिले आणि त्याच्या लक्षात आले की, किल्ल्यावरील मावळे ताजेतवाने दिसत होते, त्यांच्या जिवात जीव आला होता. इतकेच नव्हे तर तिथे काही नवीन मावळेहीहि दिसत होते. कासम खान चक्रावून गेला. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. आदल्या रात्री दुर्गंधीमुळे त्याने पहारे क्मी केले होते, त्याच्याच फायदा घेऊन दबा धरून बसलेली रूपजी आणि मानाजी यांची फौज नवीन रसद, अन्न धान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोहोचवून आले होते. कासमखानाला कळून चुकले की रामशेज काबीज करणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे.दिवसा किल्ल्यावरून मराठे मोगलांवर मारा करायचे आणि रात्री संभाजी राजांनी पाठवलेली फौज मोगलांवर हल्ला करायची.किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे. मोगालंना सळो की पळो करून सोडले होते.कासमखान देखील किल्ला जिंकू शकला नाही. तब्बल साडेसहा वर्षे हा किल्ला मराठ्यांनी लढवत ठेवला होता. आणि रामशेज शेवटपर्यंत अजिंक्य राहिला.

रामशेज किल्ल्यावरील प्रेक्षणीय ऐतिहासिक वारसा :-


ऐतिहासिक भुयार :-





                खालून किल्ला चढायला सुरुवात केल्यानंतर किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचल्यानंतर आपले स्वागत होते तेच मुळात किल्ल्यावरील भुयाराच्या छोट्याशा टोकाने.भुयाराच्या बाहेरच्या बाजूस असलेले हे टोक अत्यंत निमुळते,छोटे असून त्यामधून एकावेळी केवळ एखादी छोटीशी वस्तूच देता येईल इतके ते छोट्या आकाराचे बाहेरील टोक आहे.या भुयाराच्या बाहेरील बाजूच्या टोकाला खालील बाजूने मोठी गुहा कोरलेली असून त्या गुहेमध्ये बरेचसे पाणी साचलेले असते. याच गुहेच्या समोरच्या तोंडाला महादेवाची दगडामध्ये कोरलेली पिंड,एक नंदी व त्रिशूल असलेला आपल्याला बघायला मिळतो.
        


     पहाऱ्यावर असलेले सैनिक, मावळे यांना शस्त्रास्त्रे किंवा खाद्यपदार्थ गडामधूनच देणे सोपे व्हावे यासाठी या प्रकारच्या वास्तुशास्त्राची रचना केलेली असावी. भुयाराच्या बाहेरील बाजूस गुहेसारखी केलेली रचना सुद्धा पहारेकऱ्यांच्या देवडीप्रमाणेच केलेली आपल्याला बघायला मिळते.किल्ल्याच्या रक्षणासाठी एकावेळी दोन ते तीन पहारेकरी किंवा मावळे या देवडीमध्ये बसू शकतील अशीच याची रचना आहे. या भुयाराची अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्याचे कारण असे की वळसा घालून किल्ला वरती चढून येणे अवघड ठरले असते परंतु या भुयाराच्या गुप्त मार्गामधून चटकन एखादा संदेश पोहोचवणे तसेच छोट्या वस्तू,शस्त्रे देणे सोपे ठरते. भुयाराची ही बाजू बाहेरची बाजू असून याच भुयाराची आतील बाजू खूपच विस्तीर्ण अशी आहे.या भुयाराच्या आतील विस्तीर्ण बाजूमध्ये एका वेळी दोन ते तीन लोक उतरून आत मधून खालील बाजूला पाहू शकतात अशी विस्तीर्ण रचना असून येथे नऊ ते दहा पायऱ्या देखील खाली उतरणाऱ्या अशा दगडामध्ये कोरलेल्या आहेत. 
              किल्ल्याच्या पठारावरून या भुयाराकडे उतरण्यासाठी 20 ते 25 पायऱ्या दगडामध्ये कोरलेल्या असून प्रचंड कातळ साधारणपणे 15 फूट खाली पर्यंत कोरत नेऊन एक विस्तीर्ण कमान बनवून त्याच्यापुढे या भुयाराची रचना केलेली आहे.तत्कालीन परिस्थितीमध्ये हे काम केवळ छिन्नी व हातोड्याच्या सहाय्याने केलेले असल्यामुळे हे अत्यंत जिकिरीचेच ठरलेले असणार यात शंकाच नाही. 






              भुयाराच्या आतील बाजूने बाहेर संदेश देणे तसेच बाहेरील दृश्य पाहणे सोपे ठरायचे परंतु भुयाराच्या बाहेरील बाजूने आतील दृश्य पाहता येणे शक्य नव्हते तसेच तेथून एखादी व्यक्ती,यवन आतमध्ये शिरू शकेल अशीही त्याची रचना नसल्यामुळे गडाच्या रचनेसाठी व एकंदरीत सुरक्षेसाठी हे भुयार महत्त्वाची भूमिका बजावत असणार यात शंकाच नाही.


प्रभु श्री राम मंदिर व पवित्र बाणगंगा जलकुंड :-




                  गड चढून वरती आल्यानंतर भुयाराच्या डाव्या बाजूने आपण गडाच्या पठाराकडे जातो त्यावेळी त्या चिंचोळ्या मार्गावरती उजव्या बाजूलाच प्रभू श्रीरामांचे सुंदर असे छोटेखानी गुहेमध्ये असल्यासारखे मंदिर आहे.या मंदिरामध्ये संगमरवरामध्ये कोरलेल्या प्रभू श्रीराम,लक्ष्मण तसेच सीता,मारुती, दत्तगुरु,गणपती यांच्या मूर्ती देखील आहेत. या ठिकाणी प्रभू श्रीराम निजावयास येत असत,येथेच प्रभू श्रीरामांची शेज असल्याची वदंता आहे,त्यामुळेच या किल्ल्याला या मंदिरावरून देखील रामशेज असे नाव पुरातन काळी पडलेले ऐकायला मिळते.तसेच या मंदिराच्या उजव्या बाजूला या मंदिराच्या मुख्य महंतांची गादी तसेच छोटेसे घर बनवलेले देखील आहे.याच मंदिराच्या खालच्या बाजूने पवित्र बाणगंगा जलकुंड देखील आहे.या कुंडामधील पाणी खालील आशेवाडी गावातील ग्रामस्थ सकाळी आंघोळ केल्यानंतर हंड्यांमधून घेऊन जातात व गावांमधील मंदिरांमधील सर्व मूर्तींच्या अभिषेकासाठी या किल्ल्यावरील बाणगंगेमधील पाणी वापरले जाते.

उंच भगवा ध्वज :-



                 रामशेज किल्ल्यावरील उंच उंच भगवा ध्वज हे येथे येणाऱ्या,भेट देणाऱ्या ट्रेकर्सचे एक प्रमुख आकर्षण असते.जवळपास 35 ते 40 फूट उंचीचा हा भगवा ध्वजाचा खांब असून याला 15 फूट लांबीचा भगवा ध्वज येथे डौलाने फडकत असलेला आपल्याला बघायला मिळतो तसेच 15 ऑगस्ट,26 जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशीसुद्धा येथे तिरंगा सुद्धा फडकवला जातो.या तिरंग्याचे वजन साधारणपणे 15 ते 20 किलोच्या जवळपास असते आणि या दिवशी हा तिरंगा उचलून वरती नेण्यासाठी ट्रेकर मंडळी मदत करतात तसेच दीपावली दिवशी सुद्धा या भगव्या ध्वजाच्या आसपासच्या परिसरात तसेच पूर्ण रामशेज किल्ल्याच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ट्रेकर्स मंडळींकडून,वेगवेगळ्या संस्थांकडून दिवाळीमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येतो.दिवे,पणत्या लावून दिवाळी येथे सुरक्षितरित्या साजरी केली जाते. मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत हा उंचच उंच विशाल भगवा आजही तत्कालीन परिस्थितीची जाणीव येथे येणाऱ्यांना करून देत असतो व येणाऱ्या सर्वांचीच छाती अभिमानाने रुंद करण्याचे कार्यही करत असतो.

चोरवाट बुरुज :-



                 येण्या जाण्याच्या प्रमुख रस्त्यांवरती नजर ठेवण्यासाठी एक छोटासा टेहळणी बुरुज येथे बांधलेला आपल्याला बघायला मिळतो.या बुरुजामध्ये एका वेळी पाच ते दहा मावळे उभे राहून पहारा देऊ शकतील अशी आडव्या बाजूची याची रचना केलेली बघायला मिळते. गडाच्या विस्तीर्ण पठारावरून थोडेसे खाली उतरून गेल्यानंतर हा बुरुज बघायला मिळतो.येथे छोट्या छोट्या चार चार पायऱ्यांच्या दोन कमानी उतरून गेल्यानंतर आपल्याला समोरून सर्व परिसर न्याहाळता येतो. या कमानी आजही सुस्थितीत आहेत. या कमानींमधून खालच्या बाजूला असलेले काही बांधकामाचे अर्धवट अवशेष आजही उपलब्ध आहेत.येथूनच दगड फोडून देखील बुरुजांसाठी घेत असावेत किंवा काही प्रकारचे बांधकाम अर्धवट राहिलेले असावे. या टेहळणी बुरुजाच्याच खालच्या बाजूने डोंगराच्या उंच कड्यावरून एक चोरवाट देखील रामशेज किल्ल्यावरती येते. ही चोरवाट चढण्यासाठी खूपच खडतर आहे.जेव्हा सर्वच बाजूने तटबंदी बंदिस्त झालेली होती,यवनांनी विशाल वेढा घातलेला होता,तेव्हा याच चोरवाटेमधून मावळ्यांची येजा गुप्तपणे सुरू होती जी यवनांना माहीत नव्हती.आजही धाडसी ट्रेकर मंडळी या चोरवाटे मधून येऊन ट्रेक यशस्वी करताना दिसून येतात.

बालेकिल्ला व पाण्याचे टाके :-





                टेहळणी बुरुजाच्या वरच्या बाजूने आल्यानंतर थोडेसे चढून वरती गेल्यानंतर आपल्याला उजव्या व डाव्या बाजूला पाण्याचे विस्तीर्ण टाके दिसतात ज्यामध्ये आजही पाणी सुस्थितीत उपलब्ध असलेले बघायला मिळते.प्रथमदर्शनी दिसणाऱ्या या टाक्यांपैकी उजव्या बाजूला असलेले टाके विहिरीसारखे खोल आहे.एक छोट्या हौदाप्रमाणे मोठे आहे तर डाव्या बाजूला असणारे चार एका ओळीतील टाके साधारणपणे तीन फूट खोलीचे असून सात ते आठ फूट रुंदीचे आहेत,ज्यामध्ये आजही पाणी उपलब्ध आहे. या टाक्यांमधून वरच्या बाजूने गेल्यानंतर बालेकिल्ल्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात.आज तेथे दगडांची जिर्ण कमान जरी असली तरी एक छोटेसे कुंडहि या बालेकिल्ल्यांमध्ये बघायला मिळते. तसेच याच बालेकिल्लामधून गडाच्या मागच्या बाजूने चोरवाटेच्या दिशेने थोडेसे उतरून खाली गेले तर पश्चिमेकडील बाजूस गडाच्या मागच्या बाजूला देखील चार मोठ्या आकारामधील टाके गडाच्या मागे असलेले आपल्याला बघायला मिळतात ज्यामधील पाणी आजही चांगल्या स्थितीमध्ये असलेले आढळून येते. गडावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये,इतक्या मोठ्या संख्येने टाके असणे हे या गडावरती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नेहमीच वर्दळ असल्याचे सूचक चिन्ह आहे.याचाच अर्थ गडाला त्याकाळी खूपच महत्त्वाचे स्थान होते. एकंदरीतच गडाच्या तीनही बाजूंनी आपल्याला पाण्याचे टाके विस्तीर्ण प्रमाणात असल्याचे आढळून येते. हे देखील हा गड अजिंक्य,अभेद्य राहण्याचे एक लक्षण आहे.

देवी मंदिर व शिवमुर्ती :- 





                   पाण्याच्या टाक्यांपासून वरती गेल्यानंतर डोंगराच्या एका बाजूला भवानी देवीचे मंदिर आहे जे अतिशय प्राचीन नसले तरी बरेचसे जुने असे आहे.या मंदिराच्या उजव्या बाजूला नाशिक मधील मित्र मंडळाने बसविलेली शिवरायांची सुंदर व देखणी मूर्ती व त्याला केलेली सुंदर कमानीची सजावट देखील आहे.येणारा प्रत्येक ट्रेकर येथे नतमस्तक होऊनच पुढे जातो.


रामशेज किल्ल्यावर कसे पोहोचाल !

 नाशिक मधून गुजरात कडे जाताना पेठ सुरत या मार्गावर साधारणतः 12 ते 13 किलोमीटर अंतरावरच आशेवाडी हे गाव आहे.या आशेवाडी गावांमधून विस्तीर्ण अशी विटांची कमान बांधलेली आहे.या कमानीच्या खालूनच आपल्याला रामशेज किल्ल्याकडे जाता येते. किल्ला खूप कठीण नसून लहान मुले देखील या किल्ल्यावरती चढू शकतील अशी सोपी याची रचना असून बाराही महिने या किल्ल्यावरती आपण कोणत्याही वेळेला जाऊ - येऊ शकतो.सुरक्षित रित्या जाण्यासाठी योग्य असाच हा किल्ला आहे. बऱ्याचश्या किल्ल्यांवरती जाण्यासाठी गाईड घेण्याची आवश्यकता असते परंतु या किल्ल्यावरती आपण गाईड घेतला नाही तरी चालतं इतकी सरळ व सोपी वाट याची आहे.

फोटो सौजन्य :- सुहास श्रीरंग कोळेकर,जितेंद्र वझरे.
माहिती सौजन्य :- गुगल,विकीपिडीया,स्थानिक विक्रेते.
या ट्रेकमागील प्रेरणा :- चामरलेणी जॉगिंग ग्रुप,नाशिक

****काही क्षणचित्रे****








Comments

Unknown said…
Superb khup chan.
....
Unknown said…
खूप छान सर तुमच्या वर्णनशैलीतून आम्हाला सुद्धा प्रत्यक्ष गडावर फिरून आल्यासारखे वाटते.सुंदर वर्णन व उपयुक्त माहिती👍👍 मंदाकिनी शेलार😊

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई