सांदन दरी ट्रेक(संधान व्हॕली)
![]() |
| चामरलेणी ट्रेकर्स |
आडवाटेवरचे,आडवळणाचे ट्रेक कोणाला आवडत नाहीत ! आणि त्यातल्या त्यात अशा ट्रेक्सना ज्यांना काही ऐतिहासिक-भौगोलिक पार्श्वभूमी असेल तर अशा ठिकाणी ट्रेक करण्याची मजाच काही और असते.त्यातल्या त्यात खुल्या मैदानात तंबूमध्ये रातकिड्यांचा आवाज ऐकत, वाऱ्याची सळसळ,थंडगार वाऱ्याचा शहारा अनुभवत,वरतून काजव्यांची टिमटिम पहात जर रात्रीचा मुक्काम करून नंतर ट्रेक असे नियोजन असेल तर ते म्हणजे सोने पे सुहागा !
तुम्ही कोणत्याही मोसमामध्ये सह्याद्रीमध्ये ट्रेकला जा,सह्याद्री कधीच तुम्हाला निराश करत नाही.सह्याद्री मधील काही ट्रेक तर डोळे विस्फारायला लावतील,अगदी तोंडात बोटे घालायला लावतील असेच आहेत.सह्याद्रीच्या या अखंड-अफाट रांगेपुढे आपण किती क्षुल्लक आहोत याची जाणीव तेथे ट्रेकला गेल्यानंतरच आपल्याला कळते.यातील काही ट्रेक आपण पहाटे लवकर जाऊन दुपार-सायंकाळपर्यंत संपवू शकतो असे आहेत.तर काही ट्रेक आवर्जून तेथे रात्री मुक्कामी जावे,रात्री निसर्गाचा आनंद घ्यावा व सकाळी दुसरा ट्रेक करून मग परतीच्या वाटेला लागावे असेच आहेत.त्यातीलच आमच्या "चामरलेणी" चमुने ठरवलेला एक ट्रेक म्हणजेच भंडारदरा जवळील नाईट कॅम्पिंग,काजवा महोत्सव व दुसऱ्या दिवशी सकाळी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची खोल घळी असलेली दरी म्हणजेच सांदन दरी,जिला सगळीकडे संधान व्हॅली म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे.या संधान व्हॕलीबद्दल खूप काही ऐकून होतो,सोशल मीडिया मधून याचे फोटो-व्हिडिओ बघितलेले होते,बऱ्याच वेळेला इकडे जाण्याचा योगदेखील आला होता,परंतु काही कारणास्तव तो टळलेला होता.आता प्रत्यक्ष तिथे जाण्याची व कॅम्पिंग करण्याची वेळ आलेली होती,त्यामुळे मनामध्ये एक विलक्षण उत्सुकता दोन-तीन दिवस अगोदर पासूनच होती.
आपण जिथे ट्रेकला जाऊ तिथला निसर्ग,राहणीमान,नागरिक,व्यवसाय,तिथलं खाणं पिणं,तिथली संस्कृती,पाहूणचार याशिवाय अशा बऱ्याचशा गोष्टी ट्रेकर्सनी अनुभवायला हव्यात असं माझं मत आहे,कारण उभ्या महाराष्ट्रामध्ये आता ट्रेकची चळवळ चांगल्या प्रकारे रुजलेली आहे.तरुणाई आता शनिवारी-रविवारी हौसेखातर का होईना,परंतु आवर्जून ट्रेकला जाताना दिसतात,यामागील काही निगेटिव्ह गोष्टी जरी असल्या तरी,ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की या निमित्ताने आपली संस्कृती,आपला इतिहास आपल्या पुढील पिढीकडे मौखिक स्वरूपाने तसेच डिजिटल स्वरूपाने आता हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे. सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक अनमोल रत्न आहे.चाकरमान्यांना तसेच इतर हौशी पर्यटकांना सुट्टी मिळाली की विरंगुळ्यासाठी तसेच एडवेंचर स्पोर्ट्स साठी सह्याद्रीच आठवतो.सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणे,किल्ले,पर्यटन स्थळे नेहमी पर्यटकांना आकर्षित करत असतात.अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा तर पर्यटकांसाठी,ट्रेकर्ससाठी,एडवेंचर स्पोर्ट्स करणाऱ्यांसाठी स्वर्गच जणू !यासाठीच ट्रेकला जाण्यापूर्वी आवश्यक साहित्याची जमवाजमव केली तसेच सांदन दरीचा इतिहास बऱ्याचशा ठिकाणावरून डिजिटल माध्यमातून तसेच काही जाणकारांकडून मिळवायचा प्रयत्न केला.व ट्रेकच्या आदल्या दिवशीच आम्ही तिन गाड्या करून चामरलेणी ग्रुपचे १७ सदस्य अकोले तालुक्यातील सांदन दरीकडे निघालो.
नाशिक शहरापासून सांदन दरीचे अंतर साधारणपणे ९० ते ९१ किलोमीटर पडते.त्यासाठी आपल्याला जायला दोन ते सव्वा दोन तासांचा अवधी लागू शकतो. नाशिक-घोटी-भंडारदरामार्गे आपण संधान व्हॅलीला पोचू शकतो. संधान व्हॕलीचे मुंबईपासूनचे अंतर १८० किलोमीटर तर पुण्यापासूनचे अंतर २२० किलोमीटर आहे.मुंबईवरून येण्यासाठी कसारा येथून गाड्या उपलब्ध असतात.
![]() |
| साम्रद गाव |
अहमदनगर जिल्ह्यातील साम्रद हे गाव या ट्रेकचे बेस कॅम्प म्हणायला हरकत नाही.इथून दीड ते दोन किलोमीटर पर्यंत रुंद असलेली ही घळ आजही अनेकांना मोहित करते. आशिया खंडामधील सर्वात खोल दऱ्यांमध्ये सांदन दरीचा दुसरा क्रमांक लागतो.त्यामुळे जगभरातून इथे पर्यटकांची संख्या खूप जास्त असते.सांदन दरीमध्ये वर्षभर पाणी असते.पावसाळ्यामध्ये हे पाणी खूप वाढते.त्यावेळी ही दरी पर्यटकांसाठी बंद केली जाते तर इतर मोसमांमध्ये या दरीमध्ये थोडेसे सांभाळूनच जावे लागते. दरी खूप खोल असल्यामुळे दरीच्या तळाकडील काही भागापर्यंत सूर्यप्रकाशदेखील पुरेसा पोचू शकत नाही. जिओग्राफिक फॉल्टलाईन म्हणजेच भौगोलिक प्रस्तरभंगातून या सांधण दरीची निर्मिती झालेली आहे. म्हणजेच भूगर्भातील हालचालींमुळे जमिनीला खूप मोठी घळ पडलेली आहे.त्यामुळे हा निसर्गाचा अदभूत आविष्कार पाहण्यासाठी लोक खूप मोठ्या संख्येने इथे येत असतात. ही सांदन दरी तब्बल 300 ते 400 फूट खोल आहे तर जवळजवळ तीन ते चार किलोमीटरवर पसरलेली आहे.
या मार्गामध्ये भंग पावलेले मोठमोठाले खडक,शिळा,जागोजागी साचलेले उथळ तर काही ठिकाणी खोल असे पाणी आहे.त्यामुळे सांदन दरी पूर्ण पार करण्यासाठी कुठल्याही प्रकारची रुळलेली पायवाट नाही.येथे वेगवेगळ्या दगडांवरून-खडकांवरून-शिळांवरून आपल्याला पुढे जात राहावे लागते.अतिखोल असलेली घळ,प्रस्तरभंगामधील खडक यामुळे सांदन दरीमध्ये पावसाळ्यामध्ये भेट देणे,ट्रेक करणे अत्यंत अवघड असते.त्यामुळे सांदन दरीमध्ये भेट देण्याचा उत्तम कालावधी म्हणजे हिवाळ्यातील शेवटचे दिवस किंवा उन्हाळा.या कालावधीमध्ये सांदन दरीमध्ये ऊन सावल्यांचा विलोभनीय खेळ बघायला मिळतो. स्थानिक प्रशासन तसेच वनविभागाच्या वतीने सांधन व्हॅलीमध्ये ज्या ठिकाणी खोल पाणी आहे अशा ठिकाणी लोखंडी छोट्या पुलांची निर्मिती केलेली दिसून येते. संधान व्हॅलीमध्ये चालत असलेल्या ऊन- सावल्यांच्या विलोभनीय खेळामुळे या व्हॅलीलाच " व्हॅली ऑफ शॕडोज " असेदेखील म्हटले जाते. संधान व्हॅलीच्या परिसरातच "अलंग-मदन-कुलंग(AMK RANGE)" अमृतेश्वर मंदिर(रतनवाडी),रंधाफॉल,भंडारदरा बॕकवॉटर,कळसूबाई हे शिखर(महाराष्ट्राचे माउंट एवरेस्ट), रतनगड,आजोबा,पाबरगड,खुट्टा,बाण (शिखर)हे काही प्रमुख किल्ले देखील आहेत.
सांदन दरीमध्ये ट्रेकिंग,कॅम्पिंग,रॅपलिंग तसेच रॉक क्लाइंबिंग असे अॕडवेंचर स्पोर्ट करता येतात.साम्रद गावामधून संधान व्हॅलीला साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये पोचता येते.सुरुवातीला छोटे मोठे असे खडक आपल्याला लागतात.व्हॅलीमध्ये दोन ठिकाणी खोल पाणी आहे,त्या ठिकाणी आता लोखंडी पूल टाकलेले आहेत.एका ठिकाणचे पाणी साधारणतः दोन ते चार फूट खोलआहे,तर दुसऱ्या ठिकाणचे पाणी चार ते सहा फूट इतके खोल आहे.
व्हॅलीमध्ये काही ठिकाणी वरच्या बाजूने खडक एकमेकाला चिकटलेले दिसतात तर खालच्या बाजूने मोठी घळ,खडक दिसतात.सांदन दरीमध्ये अर्धा तास चालल्यानंतर आपणाला पुढे खूप मोठमोठ्या आकारचे खडक दिसतात व त्याच्यापुढे गेल्यानंतर उभा मोठा ४५ ते ५० फुटांचा कातळ कडा दिसतो.इथून आपण रॅपलिंग करत देखील खाली उतरू शकतो.यासाठी साम्रद गावामधील गाईड किंवा टेक्निकल टीमची मदत घ्यावी.सांदन दरीमध्ये रॅपलिंग,क्लाइंबिंग केल्यानंतर परत साम्रद गावामध्ये आपण परत येतो.साम्रद गावामध्ये मोठे हॉटेल्स जरी नसले तरी आपण स्थानिकांच्या घरी किंवा मोकळ्या जागांवरती,मंदिरामध्ये,शाळेच्या आवारामध्ये आपण टेंट लावून किंवा उघड्यावर मुक्काम करू शकतो तसेच स्थानिक गाईड किंवा जे वाटाडे असतात अशांच्या घरी घरगुती व्हेज-नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय देखील होऊ शकते.एकंदरीतच होम स्टे चे पुरेपूर पर्याय साम्रद गावामध्ये उपलब्ध आहेत. पावसाळ्यामध्ये अकोले तालुका,सांदन दरी या परिसरात अतिवृष्टी चालू झालेली असल्यास या ठिकाणी पर्यटकांना येण्यासाठी प्रतिबंध केला जातो.कारण सांदन दरीमध्ये यावेळी पाण्याचे प्रमाण वाढते.यावेळी स्थानिक तसेच वन विभागाकडून या परिसरामध्ये प्रवेशासाठी तसेच ट्रेकिंग,कॅम्पिंग,रॉक क्लाइंबिंग व मुक्कामासाठी प्रतिबंध केला जातो.सांधण दरीमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत पाणी पूर्णपणे ओसरेपर्यंत सर्व प्रकारच्या एडवेंचर स्पोर्टला बंदी असते.
ट्रेकिंग,रॉक क्लाइंबिंग तसेच रॅपलिंग झाल्यानंतर बराचसा थकवा येतो.अशा वेळी एखाद्या घरामध्ये चुलीवर बनवलेला स्वयंपाक मिष्टान्न अमृताची अनुभूती देऊन जातो.रात्री उघड्या आकाशाखाली आकाशातील तारे-तारका समूह न्याहाळत झोपण्यात काही न्यारीच मजा येते.शहरांमधील उंचच उंच बिल्डिंगच्या गर्दीमधून न दिसणारे वेगवेगळे तारकासमूह इथे अगदी सहज नजरेत भरतात.पुण्या-मुंबईवरून येणारे हौशी ट्रेकर्स रात्रीच्या अंधारात हातामध्ये मोठ-मोठाले टॉर्च,स्थानिक गाईड्सना घेऊन रतनगड तसेच जवळील इतर किल्ल्यांवरती चढाई करतात व वरतीच मुक्काम करतात.हे सगळे रात्री आपल्या डोळ्यांना समोरून दिसते. थोड्याफार फरकाने सांदन दरीची तुलना अमेरिकेतील ग्रँड कॅनियन या स्थळाशीदेखील केली जाऊ शकते.अजय देवगन अभिनीत सुप्रसिद्ध चित्रपट " तानाजी द अनसंग वॉरियर " या चित्रपटांमध्येदेखील मुघल व मराठे सैन्य यांच्यामधील युद्धाचा एक प्रसंग या सांदन दरीमधीलच चित्रीत केलेला आहे.सह्याद्री मधील सर्व प्रकारचे ट्रेक करण्यासाठी इथे एक काळजी आवर्जून घ्यावी लागेल ती म्हणजे तुमच्या पायांमध्ये सी टी आर चे उत्तम दर्जाचे शूज असणे अत्यावश्यक आहे.
साम्रद गाव व आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी काजवा महोत्सव आयोजित केला जातो.हा महोत्सव बघण्यासाठी दूरदूरवरून लोक आवर्जून येत असतात.येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी वनविभागाने जागोजागी भरपूर सुविधा करून ठेवलेल्या दिसतात.टॉयलेट,बाथरूम,पिण्याचे पाणी,पर्यटकांचे टेन्ट लावण्यासाठी जागोजागी चबुतरे तसेच खाण्यापिण्यासाठी येथे रिसॉर्ट,हॉटेल्सची भरमार बघायला मिळते.साम्रद गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर जागोजागी "काजवास्थळे"आहेत,तिथे आपण रात्रीच्या वेळी थांबून काजव्यांचा आनंद घेऊ शकतो.संपूर्ण जंगल,जंगलातील झाडे काजव्यांच्या टिमटिमणाऱ्या प्रकाशाने उजळून निघालेली दिसतात.अगदी केवळ काही दिवसांपुरताच चालणारा हा काजवा महोत्सव एक डोळ्यात साठवून ठेवणाराच अनुभव असतो.हा काळ काजव्यांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे या काळात काजवे बघण्यासाठी बॅटरी,टॉर्चलाईट,गाड्यांचा प्रकाश बंद करूनच काजवे बघणे कधीही उत्तम तसेच ज्या झाडांवर काजवे बसलेले आहेत त्या झाडांखाली आरडाओरड करणे,झाड हलवणे,तेथे बॅटरीचा प्रकाश मारणे या गोष्टी टाळणे काळजीपूर्वक ध्यानात घ्यावे.
साम्रद गावात आमच्या गाड्या पोचल्यानंतर स्टार सांदन या छोट्याशा रिसॉर्टचे मालक गोरक्ष बांडे यांच्या घरी आम्ही मुक्कामी थांबलो. येथे जेवण,नाश्ता,चहा,आंघोळ,रात्रीच्या मुक्कामाची उत्तम सोय अगदी अल्प दरात यांनी ठेवली. स्वतः गोरक्ष बांडे व त्यांचा भाऊ मच्छिंद्र बांडे हे सांदन दरीमध्ये जाण्यासाठी आमचे गाईड होते तसेच रॅपलिंग साठीचे हार्नेस व सर्व दोर,सुरक्षा साहित्यदेखील यांच्याकडीलच आम्ही घेतलेलं होतं.रॅपलिंग करतानाच्या सर्व आवश्यक सूचना,सुरक्षा विषयक मार्गदर्शन यांनी छान प्रकारे आम्हाला करून दिले. साम्रद गावापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरच सांदन दरी आहे.गावापासून सांदनदरीकडे जातानाच्या रस्त्यावर निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण केलेली दिसून येते.समोरच दिसणारे विविध गड,किल्ले,डोंगर,त्यामधून उठणारे ढग,विविध रानमेव्यांची झाडे हा खुला निसर्ग आपल्याला आत्मिक आनंद देऊन जातो.रस्त्यात जागोजागी गावातील मुले,महिला रानातील फळे घेऊन विकायला बसलेली असतात.अशावेळी आपण त्या रानमेव्यांचा आनंद घेऊ शकतो.त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार देखील उपलब्ध होऊ शकतो.
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी असलेल्या सांदन दरीमध्ये रॅपलिंग करणे हा एका ट्रेकरसाठी सुंदर अनुभव असतो.जिओग्राफिकल फॉल्ट लाईन म्हणजेच प्रस्तरभंगामुळे उभ्या डोंगराला मधोमध घळ पडलेली असते अशा घळी मधून तुम्हाला त्या घळीवर शरीर 75 ते 85 कोनात त्या घळीला ठेवून रॅपलिंग चे दोर ऍडजेस्ट करत खाली उतरावे लागते.येथील रॅपलिंगचा हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहण्यासारखाच असतो.रॅपलिंग केल्यानंतर पुढे आपण संपूर्ण घळीमध्ये फिरू शकतो.घळी मधून तुटून पडलेले मोठमोठाले खडक,शिळा यावरून पाण्याने निसरड्या झालेल्या खडकावरून आपल्याला तोल सांभाळत पुढे जायचे असते.दोन ठिकाणी लागणाऱ्या पाण्यामधून ही घळ पार करावी लागते. सांधण दरी व आजूबाजूच्या परिसरामध्ये नैसर्गिकरित्या राखलेले जंगल भरपूर प्रमाणात असल्यामुळे या दरीमध्ये फिरताना,रॅपलिंग करताना साप मोठ्या प्रमाणावर आढळतात.त्यामुळे त्याबाबत विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
सांदन दरीच्या टोकालाच झिप लाइनची सुद्धा सुविधा आहे.वरती बॉक्समध्ये बसून उंचावरून घसरगुंडी करत तुम्ही सांदन दरी संपूर्ण वरून पाहू शकता. सांदन दरी मधून बाहेर आल्यानंतर वरच्या बाजूलाच सांधण दरीचा कोकणकडा आहे.हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यासारखा जरी नसला तरी अतिशय उंच,अतिशय खोल व विस्तीर्ण असाच हा कडा आहे.येथे आवाज इको खूप सुंदर प्रकारे होतो. वन विभागामार्फत पर्यटकांसाठी बसण्यासाठी सुंदर प्रकारच्या बेंचेस व छोट्या हट्सची निर्मिती येथे करण्यात आलेली आहे तसेच किरकोळ वस्तू विकणारे छोटे-मोठे विक्रेते या ठिकाणी आढळून येतात. जून-जुलैमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर सांदन दरीमध्ये खूप पाणी साचते.अशावेळी रॅपलिंग,झिपलायनिंग व प्रत्यक्ष दरीमध्ये उतरण्यास प्रतिबंध केला जातो.साधारणपणे दिवाळीनंतर किंवा फेब्रुवारीमध्ये पुन्हा व्हॅली पर्यटकांसाठी सुरू करण्यात येते. सांदन दरीमधील कोकणकड्याजवळच मोठ्या झोक्याची सुद्धा सुविधा यापूर्वी केलेली होती परंतु आता तो बंद केलेला आहे.
एकंदरीतच निसर्गाच्या कुशीत जाण्याची इच्छा ज्या-ज्या भूमिपुत्रांना मनापासून वाटते त्यांनी सांदन दरीमध्ये एकदा आवर्जून जाऊन मुक्काम करूनच यावे.
माहितीचे स्त्रोत:- चामरलेणी सदस्य,गुगल,युट्युब,विकीपिडीया,स्थानिक साम्रद नागरिक,गाईड गोरक्ष बांडे,मच्छिंद्र बांडे-(प्रोप्रायटर:- स्टार सांदन होम स्टे, साम्रद 7741874658. )
*************************************
सांदन दरी ट्रेकमध्ये सहभागी सदस्य:-
1. श्री देविदास आप्पा घाडगे
2. श्री भरत पवार
3. श्री पोपटराव सोनवणे
4. श्री सुहास कोळेकर
5. श्री कृष्णा वळवी
6. श्री मनोहर दरगोडे
7. श्री अनिल लोखंडे
8. श्री वसंतराव भोये
9. श्री चंदूलाल विधाते
10.श्री काशिनाथ कदम
11.श्री हनुमंतराव महाले
12.श्री प्रभाकर पिंगळे
13.श्री वसंतराव महाले
14.श्री कैलास तांदळे
15.श्री सुभाष हडस
16.श्री शिवाजीबाबा पारधी
17.श्री वसंतराव कोराळे
********** काही क्षणचित्रे **********



















































Comments