दिव्यत्वाची प्रचिती देणारी ब्रह्मगिरी परिक्रमा,त्र्यंबकेश्वर.

 


                          एखाद्या पवित्र स्थानाची किंवा मूर्तीची घड्याळाच्या ( clockwise ) दिशेने एक पूर्ण परिक्रमा किंवा पायी भटकंती पूर्ण करण्याच्या ऐतिहासिक विधीला फेरी किंवा प्रदक्षिणा असे म्हटले जाते.केवळ हिंदूच नव्हे तर जैन,बौद्ध,शीख व इतरही धर्मांमध्ये अशी परिक्रमा पूर्ण करण्याकडे भाविकांचा कल असतो.ब्रह्मगिरी प्रदक्षिणा किंवा त्र्यंबकेश्वर फेरी हि त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थापासून सुरू केली जाते.कुशावर्त तीर्थामध्ये स्नान करून या फेरीची सुरुवात होते.पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भाविक ही फेरी पूर्ण करतात.ही फेरी २२ किलोमीटर व ४० किलोमीटर अशा दोन भागांमध्ये विभागलेली असून भाविक आपापल्या इच्छेनुसार व श्रद्धेनुसार व शरीरस्थितीनुसार फेरी पूर्ण करतात.स्वतःमधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी,शारीरिक क्षमतेचा कस आजमावून पाहण्यासाठी,आपल्या धर्म-संस्कृती-ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी,आपल्या पुढील पिढीकडे हा वारसा मौखिकरित्या हस्तांतरित करण्यासाठी,उत्तम शरीरस्थिती प्राप्त करण्यासाठी व अशा विविध हेतूंसाठी ही फेरी करणे योग्यच राहते.निसर्गाच्या विविध रूपांमधून चालत जाताना एक वेगळा आस्वाद या फेरीचा मिळतो.जंगल,दर्या-खोऱ्या,डोंगर-झरे-धबधबे,रिमझिम बरसणारा पाऊस-मध्येच पडणारे ऊन,प्रदक्षिणेच्या वाटेमध्ये उन सावल्यांचा होत असलेला खेळ...एकंदरीतच निखळ,नितळ व तितकाच शुद्ध निसर्ग या परिक्रमेच्या मार्गामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो.ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा आनंददायी प्रवास आहे.सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्त‌िनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला व भागवत धर्माची स्थापना झाली.अशा पुराणकाळापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलीत आहे.पुण्यप्राप्तीसाठी तर कधी पापक्षालणासाठी प्रदक्षिणा झाल्या आहेत.बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्रंबकराजचे हे मंदिर श्रावणात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतभरातून सर्वात जास्त भाविकांनी भेट दिले जात असलेले मंदिर आहे.


                          ज्या ब्रह्मगिरी पर्वताला ही परिक्रमा पूर्ण केली जाते,ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या या ब्रह्मगिरी पर्वताचे खूप असाधारण महत्त्व आहे.ब्रह्मगिरी पर्वताच्या शिखरावरच गोदावरी नदीचे उगमस्थान आहे तसेच हिंदू धर्मातील मान्यतांनुसार भगीरथाच्या प्रयत्नांनंतर जेव्हा गंगा नदी पृथ्वीवर अवतरणार होती तेव्हा तिच्या प्रचंड प्रपातामुळे पृथ्वीचे दोन तुकडे झाले असते.तेव्हा शिवशंकराने आपल्या जटांमध्ये ही गंगा म्हणजेच गोदावरी धारण केली व ब्रह्मगिरी पर्वतावरील एका ठिकाणाजवळ आपल्या जटा आपटून तेथेच गंगेला मुक्त केले.आजही त्या ठिकाणी मूळगंगा मंदिर व शिवशंकराचे जटामंदिर,शिव शंकराच्या जटा आपटलेल्या खुणा आपल्याला बघायला मिळतात.खूप मोठ्या श्रद्धेने भाविक या दोन्ही ठिकाणांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात तसेच येथील पवित्र जल भाविक आपल्या घरी देखील नेतात.या ब्रह्मगिरी डोंगराची समुद्रसपाटीपासूनची उंची ४२४८ फूट इतकी आहे.

                         गौतम ऋषी तसेच त्यांची पत्नी अहिल्या यांच्या संदर्भातील इतिहास देखील याबाबत रंजक आहे.जुन्या सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिकेनुसार त्र्यंबकेश्वर व परिसरात अत्यंत भीषण दुष्काळ पडलेला होता.गौतम ऋषींच्या तपश्चर्येमुळे वरूण देव त्यांना प्रसन्न झालेले होते व आश्रमाच्या परिसरामध्ये नित्य पर्जन्यवृष्टी होत होती.त्यामुळे त्या भागामध्ये समृद्धी नांदत होती.ऋषीमुनी,गाई,जनावरे यांचे तेथे वास्तव्य होते.गौतम ऋषींच्या या आचरणामुळे सर्व ऋषीमुनींमध्ये त्यांचे स्थान वाढलेले होते व नेमक्या याच कारणामुळे इंद्राला गौतम ऋषींची असूया जाणवली व एके दिवशी ऋषीमुनींचा एक जत्था भोजनासाठी आलेला असतानाच इंद्राने दर्भाच्या काडीने म्हणजेच गवताच्या टोकदार काडीने एका गायीस इजा केली व त्यामुळे ती गाय मरण पावली.त्यामुळे ऋषींच्या त्या गटाने गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये भोजन करण्यास नकार दिला व गौ हत्येचे पातक गौतम ऋषींच्या माथ्यावर मारले.या पापातून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी उपाय विचारता त्या ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन तपश्चर्या करून शिव शंकरास प्रसन्न करून गंगेत स्नान करण्याचा उपाय सांगितला.त्यावेळी १००० वर्षे तपश्चर्या करून गौतम ऋषींनी शिव शंकरास व गंगेस प्रसन्न करून घेतल्याची वदंता आहे.कठीण तपश्चर्येनंतर गंगा व शिवशंकर गौतम ऋषींना प्रसन्न तर झाले परंतु ही गंगा शिवशंकराच्या जटेमधून शिवशंकरापासून विलग होण्यास तयार नव्हती.शंकराने विनंती करून देखील गंगा ब्रह्मगिरीवर उतरण्यास तयार नव्हती.हे बघून शिवशंकर रागावले व त्यांनी ब्रह्मगिरी वरतीच तांडव नृत्य सुरू केले व तांडव करत असताना आपल्या जटा एका ठिकाणी जोरदार आपटून गंगेला तेथेच त्यांनी मुक्त केले.परंतु मुक्त झालेली गंगा ठिकठिकाणी लुप्त होऊन बसली.याच ठिकाणांना नंतर कालांतराने गंगाद्वार, वराह तीर्थ,राम-लक्ष्मण तीर्थ, गंगासागर तीर्थ अशी नावे देखील पडली.नंतर गौतम ऋषींनी आपल्या दिव्यशक्तीने या वेगवेगळ्या गंगेच्या वाहत्या प्रपातांना एकत्र करून गवताचा बांध बनवून ते पाणी त्र्यंबकेश्वराच्या एका ठिकाणी अडविले व तेच आज कुशावर्त तीर्थ म्हणून ओळखले जाते.व शेवटी याच गंगेच्या कुशावर्त तीर्थामध्ये गौतम ऋषींनी स्नान करून आपल्या गौहत्येच्या पातकामधून मुक्ती मिळवली.त्यामुळे आजदेखील भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण करण्यापूर्वी या कुशावर्त तीर्थामध्ये स्नान करतात तसेच परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर देखील स्नान करून त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतात.


                        ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा हा मार्ग यापूर्वी पायवाट होता तसेच प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट पडायचे.निसरडी वाट,काट्याकुट्यातून चालणारा रस्ता असल्यामुळे भाविकांना त्रासच व्हायचा परंतु आता प्रशासनाने संपूर्ण परिक्रमा मार्ग सुरक्षितरित्या बांधलेला असल्यामुळे आता परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भाविकांची संख्या देखील अमुलाग्र वाढलेली आहे.


                             पारंपारिक प्रदक्षिणामार्ग गौतम ऋषींच्या मंदिरापासून पुढे सरळ चालू होतो परंतु आमच्या टीमने एक चोखंदळ मार्ग निवडत गौतम ऋषींच्या मंदिरापासून उजवीकडे वळण घेत जंगलामधून मेटघर किल्ल्याच्या पायथ्याशी निघायचे ठरवले व एका वेगळ्या मार्गाने ही फेरी पूर्ण करायचा निश्चय झाला.या मार्गाने निसर्गाचे अतिशय विहंगम दर्शन होते.खळाळत वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी इतके शुद्ध असायचे की ते पिण्यालायक होते.दाट जंगलामधून जाताना निसर्गाची विविध रूपे बघायला मिळत होती.एक ऐसपैस खडक बघून आम्ही सगळ्यांनी आपापले डबे मोकळे करून गोपाळकाला करून यथावकाश जेवणं केली.शेजारीलच झऱ्यांमधून पोटभर पाणी पिऊन बाटल्या परत पुढच्या प्रवासासाठी भरून घेतल्या.मजल दरमजल करत पुढे आल्यानंतर मेटघर किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यानंतर दुर्गभांडार किल्ला नजरेच्या टप्प्यात येतो.


                     हा किल्ला आतापर्यंत बुरुजावरून पाहिलेला असतो परंतु किल्ल्याची दाट जंगलामधील झाडीझुडपांमधील अगदी तळाची बाजू बघणे हे देखील एक विलक्षण दृश्य होते.उंचच उंच अवाढव्य व आज देखील तितकीच मजबूत,कठीण,भरभक्कम व सरळसोट अशा किल्ल्याच्या भिंतीच्या बाजूबाजूने त्र्यंबकेश्वर गावाच्या मागील टेकडीवरून खाली उतरून आमची ही प्रदक्षिणा पार पडली.साधारणपणे १९ किलोमीटरची ही पायी भटकंती झाली व पाच ते सहा तास ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी पुरेसे ठरले. ब्रह्मगिरी व दुर्गभांडार या दोन्ही किल्ल्यांच्या पायथ्यापासून जंगलामधून आम्ही केलेली फेरी शेवटी मेटघर या गावामध्ये येऊन संपते.या गावापासूनच खाली उतरून त्र्यंबक नगरीमध्ये फेरीची सांगता आम्ही केली.मेटघर किल्ल्याच्या पायथ्यापासून खालील बाजूस असणाऱ्या त्र्यंबक नगरीचे उंचावरून दिसणारे दृश्य अगदी नजरेत साठवून ठेवावे असेच विहंगम होते.


                           प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर त्र्यंबक नगरी भाविकांच्या व दुकाने-हॉटेल-विविध व्यवसायिकांच्या गर्दीने तुडुंब फुलून गेलेली होती. विविध ठिकाणी महादेवाच्या आकाराची,पिंडीच्या आकाराची शोभायात्रा तसेच देखावे,रचना आकर्षकरीत्या करण्यात आलेले होते.म्हणायला गेलं तर शारीरिक दृष्टीने ट्रेक तर ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या एक मोठे धार्मिक अधिष्ठान पूर्ण करून आम्ही ट्रेकर् मंडळी त्र्यंबक नगरीमधून आता बाहेर पडत होतो व निघतानाच पुढच्या रविवारी कुठला ट्रेक करायचा याबद्दल खलबते चालूच होती.



**********************************

      ब्रह्मगिरी फेरीमध्ये सहभागी सदस्य:-



पोपटराव सोनवणे

वसंतराव भोये

भरत पवार

सुहास कोळेकर 

किशोर अहिरे

शाम रसाळ

धिरज गायकवाड़

वसंतराव महाले

सुधीर पवार

बाळासाहेब बेलगावकर

शंकर माळेकर

पंडीत पिंगळे

**********************************

                  काही इतर क्षणचित्रे


















**********************************

Comments

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई