देवगिरीच्या यादवांचा अंकाई - टंकाई किल्ला
महाराष्ट्रातील येवला हे शहर नुसत्या पैठणीसाठीच प्रसिद्ध आहे असे नव्हे तर येवला- मनमाड जवळील अंकाई व टंकाई या जोड किल्ल्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.देवगिरीच्या यादवांनी बांधलेला,ऐतिहासिक वारसा लाभलेला,सुबक -समृद्ध असा व जैन लेण्यांनी सजलेला असा हा अंकाई किल्ला व त्याच्याच जवळच्या डोंगरावर असलेला टंकाई किल्ला. रेंज ट्रेक मध्ये येणारे हे दोन्ही किल्ले एकाच ट्रेकमध्ये सहजतेने करता येतात.छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी हा सर्वज्ञात,सुप्रसिद्ध किल्ला यादवांच्या युद्धनीतीचा व स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून सर्वांना परिचित तर आहेच, त्याखालोखाल नाशिकमधील येवला तालुक्यातील अंकाई व टंकाई हे जोड किल्लेदेखील यादवकालीन बांधणीचे उत्कृष्ट पुरावे आहेत.
मुख्यत्वेकरून सुरत - औरंगाबाद या व्यापारी मार्गावर नियंत्रण व सुरक्षा या हेतूसाठी या जोड किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.अंकाई किल्ल्यावरील अगस्ती मुनींचा आश्रम,प्राचीन जैन लेणी,कोरीव टाकी या वास्तू या मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात.सातमाळा डोंगर रांगेमध्ये येणारे हे दोन्ही जोड किल्ले नाशिक व मनमाड पासून जवळच आहेत.डोंगरी किल्ला या प्रकारात मोडत असलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३१७० फूट इतकी आहे.सुरुवातीच्या काळात यादवांनी बांधल्यानंतर त्यांची सत्ता या किल्ल्यावर होती.त्यानंतर मुघलांनी आक्रमण करून हा किल्ला ताब्यात घेतला.नंतरच्या काळात मराठ्यांची सत्ता देखील काही काळ या किल्ल्यावर होती व शेवटी ईस्ट इंडिया कंपनी पर्यायाने ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये हा किल्ला गेला.साधारणपणे १००० वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या अंकाई किल्ल्यावरील जैन लेणी,गुहा,कोरीव नक्षीकाम,जीर्ण अवस्थेतील परंतु तरीही सुबक व सुंदर दिसणारे किल्ल्याचे बांधकाम या काही आकर्षणाच्या बाबी आहेत.
मनमाड पासून दहा किलोमीटर व नाशिक पासून एक तासाच्या अंतरावर हे जोड किल्ले असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची भरपूर गर्दी असते.त्यामुळे पहाटे लवकर येऊन सर्वप्रथम अंकाई व नंतर टंकाई किल्ला सावकाशपणे पहावा.कारण सामान्यतः टंकाई किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी नसते.किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे अंकाई हे गाव या ट्रेकचे बेस व्हिलेज म्हणता येईल.पुणे मुंबई येथून येणाऱ्यांसाठी नाशिक किंवा मनमाड हे सोयीचे ठिकाण उतरण्यासाठी चांगले राहते.अंकाई व टंकाई हे दोन्ही जोड किल्ले व्यवस्थितपणे पाहण्यासाठी साधारणपणे तीन तासांचा वेळ लागू शकतो.सकाळच्या वेळी सर्वप्रथम अंकाई किल्ला व सायंकाळपर्यंत टंकाई किल्ला पाहणे योग्य राहते.दोन्ही किल्ले दोन वेगवेगळ्या टेकड्यांवर उभारलेले असून दोन्ही किल्ल्यांना सुरक्षा भिंतीने सुरक्षित केलेले आहे.मुख्य दरवाजा,मनमाड गेट,ब्राह्मणी लेणी,राजवाडा,काशी तलाव,तुळशीचे भांडे,दगडी पाण्याचे सुबक टाके इत्यादी व इतरही किल्ल्यावरील आकर्षणाची ठिकाणे सविस्तरपणे बघण्यासाठी दीड ते दोन तास लागतात.
इसवी सन १६३५ मध्ये अंकाईच्या किल्लेदाराला शहाहानचा सेनापती खान खानन याने लाच देऊन अंकाई ताब्यात घेतला.तेव्हापासून अंकाई यादवांनंतर मुघलांच्या ताब्यात गेला.मुघलांकडून हा किल्ला निजामाने ताब्यात घेतला व नंतर निजामाकडून हा मराठा साम्राज्यामध्ये आला.शेवटी इसवीसन १८१८ मध्ये इंग्रजांनी हे दोन्ही किल्ले जिंकून घेतले.
अंकाई जवळील टंकाई हा नाशिक जिल्ह्यामधील सर्वात मजबूत डोंगरी किल्ला असून समुद्रसपाटीपासून याची उंची 3200 फूट इतकी आहे.अंकाई व टंकाई दोन्ही किल्ल्यावर ट्रेकिंगला जाण्यासाठीचा मार्ग अतिशय रुंद, मोठा व सुरक्षित आहे.येथील जैन लेण्यांमध्ये,पायथ्याशी असणाऱ्या मंदिरांमध्ये मुक्काम देखील करता येतो शिवाय जवळ असलेल्या मनमाड या शहरामध्ये देखील लॉजिंग भेटून जाते.अंकाई गावामधील ग्रामस्थ ट्रेकिंगसाठीचे,मुक्कामासाठीचे साहित्य माफक दरामध्ये देखील उपलब्ध करून देतात.
या दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी सर्व प्रथम या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत जावे लागते.या खिंडीत पोहोचल्यावर मात्र या दोन किल्ल्यांवर जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटा आहेत. खिंडीत जाण्यासाठी दोन रस्ते असून पहिली व प्रचलित वाट ही या किल्ल्यांच्या दक्षिणेकडील असलेल्या अंकाई गावातून येते.तर दुसरी वाट उत्तरेकडून मनमाड शहराच्या बाजूला असलेल्या दरवाजातून येते.या दोन्ही वाटा अंकाई- टंकाई मधील खिंडीत एकत्र येतात आणि तिथून दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी वाटा विभक्त होतात.
गड चढाईला प्रारंभ होताना पुरातत्त्व विभागाने तेथे बांधलेल्या पायऱ्या दिसून येतात.थोड्या चढाईनंतर टंकाई किल्ल्याच्या डोंगराच्या पोटात असलेला जैन लेणी समूह दिसतो. एकूण दहा लेण्यांचा समूह असून ही लेणी दोन स्तरात खोदलेली आहेत.या लेण्यांचा कालखंड हा दहावे ते बारावे शतक असा आहे.येथील एका लेण्यात देवनागरी शिलालेख असून काही लेण्यांमध्ये कमळ,प्राण्यांवर आरूढ असलेल्या देवता,अप्सरा,कोरीव द्वारशाखा अशी शिल्पकला आढळून येते.
या लेण्यांपासून पुढे गडाचा पहिला दरवाजा दिसतो.हा दरवाजा पूर्वाभिमुख असून हे दोन दरवाजांचे मिळून असलेले एक संकुल आहे. बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन अर्धवर्तुळाकार बुरूज आहेत.आतला दुसरा दरवाजा हा पहिल्या दरवाजाशी काटकोन करून उभा आहे. हा दरवाजा दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे.या दरवाजाची बांधणी भक्कम असून बांधकामातील लाकडी तुळया आणि दरवाजाच्या फळ्यांचे अवशेष अद्यापि दिसून येतात.या दरवाजातून आत गेल्यावर अंकाई- टंकाई या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत प्रवेश होतो.
अंकाई टंकाई किल्ल्याच्या डोंगरांना उत्तम ताशीव कातळकडे लाभलेले असल्यामुळे तटबंदीची फारशी गरज भासलेली नाही,परंतु या दोन्ही डोंगरांना जोडणारी खिंड मात्र सर्व बाजूंनी अतिशय उत्तम तटबंदी बांधून नीट संरक्षित केलेली आहे.तटबंदीवर संरक्षणात्मक दृष्टीने चऱ्या बांधलेल्या दिसतात.अंकाई किल्ल्याच्या दिशेने थोडे वर चढून गेल्यावर अंकाई गावच्या दिशेला कातळाममध्ये तीन लेण्या आहेत.यांपैकी दोन गुहा पाहता येतात,परंतु तिसरी गुहा गाळाने भरलेली आहे.
खिंडीतून थोडे चढून गेल्यावर गडाचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा दिसतो.हा दरवाजा देखील दोन दरवाजांचे मिळून एक संकुल आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजूस दोन भक्कम बांधणीचे अष्टकोनी बुरूज आहेत.यांपैकी पहिला दरवाजा हा आयताकृती चौकट आणि वरच्या बाजूस कमान अशा प्रकारचा असून आत दोन्ही बाजूंस देवड्या आहेत.पुढे आणखी एक कमानयुक्त दरवाजा आहे. पुढे उजवीकडे कातळात प्राचीन हिंदू लेणी आहेत. यांतील मुख्य लेण्यात व्हरांडा आणि एक गर्भगृह आहे.हे शैव लेणे असून गर्भगृहाच्या बाजूच्या भिंतीवर शिवाचे द्वारपाल कोरलेले आहेत.लेण्याच्या बाहेरील बाजूस खांबांवर स्त्रीशिल्पे असून यांपैकी एक शिल्प हे गंगेचे आहे.गाभाऱ्यामध्ये घारापूरी येथे असलेल्या त्रिमूर्तीसदृश सदाशिवाचे शिल्प आहे.इतिहास तज्ज्ञांच्या मते, या लेण्याचा कालखंड हा इ. स. नववे ते दहावे शतक असा आहे.अंकाई किल्ल्यावरील शिखरावर अगस्ती मुनींचा आश्रमदेखील आहे.
तलावापासून पुढे गडाच्या पश्चिम टोकावर एका मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. आज या वास्तूच्या भिंती, कोनाडे, कमानी अवशेष रूपाने शिल्लक आहेत.या वाड्याच्या मध्यभागी एक विस्तीर्ण चौकोनी कोरडा हौद आढळून येतो. पूर्वी हा एक मोठा महाल असण्याची शक्यता आहे. याच वास्तूमध्ये एका टोकाला पिराचे एक ठिकाण आहे,परंतु मूळ वास्तूशी संबंधित नाही.अंकाई किल्ल्यावर पाण्याचे तीन तलाव असून काही ठिकाणी खडकात पाण्याची टाकी कोरलेली आहेत.किल्ल्याच्या टेकडीवर म्हणजे बालेकिल्ल्यावर कुठलेही अवशेष आढळून येत नाहीत.गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून पश्चिम दिशेला गोरक्षनाथ,कात्रा किल्ला तसेच हडबीची शेंडी असा परिसर दिसतो.
टंकाई किल्ला पाहाण्यासाठी अंकाई किल्ला उतरून दोन्ही किल्ल्यांमधील खिंडीत परत यावे लागते.खिंडीत आल्यावर मनमाड शहराच्या बाजूला उत्तर दिशेला असलेला दरवाजा पाहता येतो.हा उत्तराभिमुख दरवाजा भक्कम बांधणीचा असून बुरुजाचा आडोसा घेऊन बांधण्यात आला आहे.टंकाई किल्ल्याच्या वाटेवर सुरुवातीला कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि काही पाण्याची टाकी दिसून येतात.थोड्या चढाईनंतर किल्ल्याचा पश्चिमाभिमुख मुख्य दरवाजा दिसतो. या दरवाजाची चौकट आणि कमान पुरातत्त्व विभागाने दुरुस्त केली असून (२०१९) बाजूच्या तटबंदीची पडझड झालेली आहे.प्रवेशद्वाराच्या आत डावीकडे एक पिराचे ठिकाण आहे.मूळ बांधकामात हा पीर त्या जागेवर नसावा.टंकाई किल्ल्याला मोठे प्रशस्त पठार लाभलेले आहे.या पठारावर एक तलाव असून समूहामध्ये खोदीव पाण्याची टाकी आढळून येतात.
पठाराच्या मध्यावर एक यादवकालीन भग्न शिवमंदिर आहे.मंदिराच्या भिंती शाबूत असून छत मात्र नाही.गडाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व टोकावर प्रत्येकी एक बुरूज असून गडावर काही इमारतींचे अवशेष आढळून येतात.
फ्रेंच प्रवासी थेवेनोट याने इ. स. १६६५ साली अंकाई किल्ला हा सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठाणे असल्याचा उल्लेख केला आहे.हा किल्ला दीर्घकाळ मुसलमानी सत्तेच्या अमलाखाली होता.मोगल काळात या किल्ल्याचा वापर मुख्यत्वे सामान साठवणुकीसाठी केला जात होता.पुढे पेशवा निजाम संघर्षात भालकी येथे तह झाला (१७५२).या तहानुसार अंकाई टंकाई हे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. पुढे मराठी साम्राज्याचा अस्तानंतर (१८१८) इंग्रज अधिकारी मैकडॉवेल याने गडावर तोफांचा मारा केला,तेव्हा गडावरील शिबंदीही इंग्रजाना शरण गेली आणि अंकाई -टंकाई हे जोड किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले.
आमची टीम शक्यतो रविवारचा दिवस ट्रेकसाठीच राखून ठेवते.नाशिक पासून पेठ रस्त्यावर असलेल्या चामरलेणी या शिखरावर आम्ही सरावासाठी दररोज जात असलो तरीही रविवार हा आमचा ट्रेकसाठीचा हक्काचा वार असतो.आणि नेमका रविवारच्या ट्रेकसाठीच दोन ते तीन किल्ल्यांचा प्लॅन ठरलेला असूनही तो दरवेळी रद्द होत होता.शेवटी ऐनवेळी अंकाई टंकाई या दोन जोड किल्ल्यांचा प्लॅन रात्री दहा वाजता ठरला तरीही ऐनवेळेला ८ मेंबर तयार झाले.दोन गाड्या करून पहाटे राज स्वीट्स,नाशिक येथून आमचा संपूर्ण चमू निघाला.सोबत ट्रेकची पूर्ण सामग्री,डबे व आवश्यक साहित्य घेतलेलेच होते.यथावकाश ट्रेक झाल्यानंतर एक छानशी जागा बघून आम्ही सगळ्यांनी पेटपूजा करून घेतली.अंकाई व टंकाई किल्ल्यावरील ठिकाणे अगदी नयनरम्य असल्यामुळे जो-तो हि ठिकाणे आपापल्या कॅमेऱ्यात कैद करून घेत होता.एकमेकांची चांगली -चांगली छायाचित्रे काढण्याची जणू काही चढाओढच लागली होती.सविस्तरपणे दोन्ही किल्ले पाहून झाल्यानंतर आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली व पुढील रविवारचे नियोजन करत आम्ही नाशिककडे परतीच्या मार्गाकडे कूच केले.
अंकाई टंकाई किल्ल्याचा माहितीपूर्ण संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी येथे टच करा.
ट्रेकिंगचे इतरहि व्हिडीओ पाहण्यासाठी येथे टच करा.
***********************************
अंकाई टंकाई ट्रेकमधील सहभागी सदस्य:-
श्याम रसाळ
सुहास कोळेकर
किशोर अहिरे
प्रशांत करपे
सचिन गोसावी
तुळशिराम बागुल
नितिन गांगुर्डे
विशाल पिंगळे
***********************************
काहि इतर क्षणचित्रे





































Comments