नाशिकचा कलावंतीण - न्हावीगड ट्रेक.

 


                            अतिकठीण श्रेणीमध्ये गणला जाणारा न्हावीगड खऱ्या ट्रेकर्सचा कस पाहणाराच आहे.अत्यंत उभी चढाई,जागोजागी तुटलेल्या पायऱ्या,शेवाळलेले अर्धवट कडे,छातीवर येतील इतक्या उभ्या व मोठाल्या पायऱ्या,जरा जरी पाऊल चुकले तरी कपाळमोक्ष नक्कीच होणार असा बेलाग कडा...एवढी बिकट स्थिती असतानादेखील या गडाचे सौंदर्य शब्दात वर्णन पलीकडचे आहे.गडाच्या पहिल्या सोंडेला आल्यानंतर गड उजव्या हाताला राहील अशा बेताने डाव्या हाताने गड चढायला सुरुवात केल्यानंतर आधी आपल्याला वाघदेवाचे छोटेसे मंदिर लागते व त्यापुढे पाण्याच्या विस्तीर्ण टाक्यांमध्ये सप्तशृंगी देवीची दगडात कोरलेली मूर्ती व छोटेसे सुंदर मंदिर लागते.



                 इथून डाव्या हाताने चालत गेल्यानंतर छोटीशी पायरी वाट देखील लागते तसेच मंदिराच्या उजव्या बाजूने जुन्या बुरुजाच्या बाजूने जाऊनदेखील आपल्याला गडमाथ्यावर पोचता येते.एवढ्या कठीण गडावर त्याकाळी वर्दळ,रहदारी,जाणे येणे,लढाया कसे होत असेल याची कल्पना करूनच आपले पूर्वज किती शक्तिमान,सहनशील तसेच धैर्यवान होते याची कल्पना येते.गडाच्या शिखरावर एक टेहळणी बुरुज,दोन विस्तीर्ण पाण्याचे टाके व वाड्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात.गडाच्या शेवटच्या टोकाला एक विस्तीर्ण सुळका आहे परंतु त्याच्या शेवटच्या टोकाला जाता येत नाही.त्याच्यापुढे एक नेढे असून तिथपर्यंत पोहोचणे जीव घेणे आहे.कलावंतीण दुर्ग ज्यांनी पाहिला असेल किंवा तेथील ट्रेक केला असेल तसेच हरिहर किल्ल्याचा ट्रेक ज्यांनी केला असेल त्यांना कलावंतीण दुर्गाचा फिल या न्हावीगडावर आल्याशिवाय राहत नाही.उतरताना देखील न्हावीगडावर अत्यंत जपून उतरावे लागते कारण आधारासाठी काहीही नाही.अशावेळी आपली जरादेखील चूक जीवघेणी ठरू शकते. गडाच्या शिखरावरून सटाणा प्रांतातील बहुतांशी सर्व किल्ले व शिखरे सहजपणे दिसतात.शक्यतो खूप प्रसिद्ध असलेल्या किल्ल्यांवरतीच जाण्याचा सगळ्या लोकांचा कल असतो त्यामुळे रविवारी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी हरिहर व इतर गाजलेल्या किल्ल्यांवरती भयंकर गर्दी बघायला मिळते.परंतु न्हावीगड हा काहीसा आऊटसाईड असलेला किल्ला आहे तसेच याची चढाई अतिशय जीवघेणी असल्यामुळे सहसा इकडे कोणी फिरकत नाही.ट्रेकिंगच्या मोकळ्या व एका नितांत सुंदर अनुभवासाठी न्हावीगड म्हणजे ट्रेकर्सची पंढरीच आहे. 

             


 

              सह्याद्री पर्वताच्या उत्तर - दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणार्‍या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी आणि डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत तर दुसर्‍या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, हरगड, साल्हेर, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत.न्हावीगड या किल्ल्याला "रतनगड" असे देखील म्हणतात.दुसरा रतनगड अकोले ,जिल्हा अहमदनगर येथे आहे. इसवी सन १४३१ मधे अहमदशहा बहामनी व गुजरातचा सुलतान यांच्या सैन्यात न्हावीगडाच्या पायथ्याशी तुंबळ युध्द झाल.पण दोन्ही बाजुंचं प्रचंड नुकसान झाल्याने दोन्ही सैन्यांनी रात्रीच्या अंधाराचा फ़ायदा घेऊन माघार घेतली.पुढील काळात शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा गड होता. शिवकालिन कागदपत्रात या गडाचा उल्लेख "नाहावागड" असा आला आहे.

       

 

                           नाशिकवरून ताहराबाद मार्गे न्हावीगडाचे एकेरी अंतर १२५ किलोमीटर इतके पडते.पाताळवाडी हे या किल्ल्याचे बेस् व्हिलेज आहे.या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४१०० फूट इतकी आहे.गड संपूर्ण फिरण्यासाठी गाईड घेणेच योग्य राहते.वाटेवरती पाण्याचं २ खांबी टाक आहे , त्याच्या पुढे अजुन एक टाकं आहे. ही वाट मघाशी आपण ज्या बुरुजा खालून आलो त्या बुरुजावर येते. बुरुजावरुन परत डोंगर सोंडेने थोडे चढून गेल्यावर गडावर जाणार्‍या पायर्‍या लागतात.



                       या सरळसोट उभ्या कातळकोरीव पायर्‍यांवर माती पडलेली असल्याने व पावसाळ्यात पाणि,शेवाळ असल्यामुळे इथे जपून चढावे लागते. गडमाथ्यावर मुख्य कमान व महादरवाजा असावा परंतू आता याजागी दरवाज्याचा मागमूसही नाही. किल्ल्याच्या माथ्यावर प्रथम एक मोठे चौकोनी टाकं लागतं. त्याच्या पुढे उध्वस्त वाड्याचे अवशेष दिसतात. वाड्याच्या मागे पाण्याचं अजून एक टाकं आणि पुन्हा उध्वस्त घराचे काही अवशेष दिसतात. गडाच्या दक्षिणेला त्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळका आहे. तो अतिशय कठिण असुन एकच पाऊल जेमतेम बसेल असा हा सुळका चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण आवश्यक आहे.


               या सुळक्यात एक नेढं आहे.परंतू कठिण असल्यामुळे या नेढ्यात कोणीहि आजपर्यंत गेलेले नाहि.या नेढ्याखाली एक पाण्याच कोरडं टाकं आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो. गडावरुन पूर्वेला तांबोळ्या, मांगीतुंगी तर दक्षिणेला मुल्हेर, मोरागड, हरगड, साल्हेर आणि सालोटा हा परिसर दिसतो.गडावर जाण्यासाठी शेवटच्या टप्प्यात असलेल्या पायर्‍या जपून चढाव्या लागतात.पायर्‍यांवर माती साचल्याने घसरण्याची शक्यता आहे.त्यामुळे बरोबर ३० फुटी दोर बाळगल्यास उत्तम. मांगीतुंगी हे सुळके, साल्हेर- सालोटा -मुल्हेर -मोरा- हरगड इत्यादी या भागातील किल्लेदेखील आपणास करता येतात.

    

      "न्हावीगड ट्रेकचा संपूर्ण सविस्तर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे टच करा."




********************************


               ट्रेकमधील सहभागी सदस्य:-



किसन काकड

शिवाजी पारधी

पोपटराव सोनवणे

प्रशांत कर्पे

शाम रसाळ

धिरज गायकवाड 

भरत पवार

सुहास कोळेकर


********************************


                     काहि क्षणचित्रे 















Comments

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई