८० अंश कोनातील पायऱ्या, थरारक किल्ले हरिहर

 



                         हरिहर किल्ल्याचे नाव ऐकलं नसेल,त्याबद्दल माहिती ऐकली नसेल,त्याचे थरारक व्हिडिओ युट्युब किंवा इतर सोशल मीडियावर पाहिले नसतील असा महाराष्ट्रात क्वचितच एखादा व्यक्ती आढळेल इतका हरिहर किल्ला त्याच्या थरारकतेसाठी,ट्रेकर्सना ऍडव्हेंचरसाठी प्रसिद्ध आहे.ट्रेकिंग करणाऱ्या व न करणाऱ्या सहसा प्रत्येकाला हरिहर किल्ल्याचे किमान नाव तरी ऐकून आहे.हरिहर किल्ल्याला इतकी प्रसिद्धी मिळण्यास कारण म्हणजेच त्याच्या ८०° कोनातील कातळ कोरीव उभ्या उंचीच्या पायऱ्या.या पायऱ्यांची,या किल्ल्याची मोहिनी प्रत्यक्ष इंग्रजांना देखील पडलेली होती त्यामुळेच त्यांनी या किल्ल्याच्या पायऱ्या उध्वस्त न करता आहे तसे याचे सौंदर्य अबाधित राहू दिले. अन्यथा महाराष्ट्रामधील बऱ्याचशा किल्ल्यांची नासधूस इंग्रजांनी करून त्याच्या पायऱ्या पूर्णपणे उध्वस्त केल्या आहेत जेणेकरून तिथे कोणी पोहोचू शकू नये.नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर तालुक्यापासून जवळ असलेला,साधारणपणे नाशिक पासून तास- सव्वा तासाच्या अंतरावर असलेला हा किल्ला अगदी प्रत्येकालाच आकर्शून घेत असतो. दुरून पाहताक्षणीच याचे सौंदर्य,याचा बलाढ्यपणा व यामागील असलेला थरार या हरिहर किल्ल्याच्या जमेच्या बाजू. गुडघाभर उंचीच्या पायऱ्या, या पायऱ्या चढण्यासाठी दोन्ही बाजूला केलेली खाचांची व्यवस्था,बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर गडशिखरावर जाण्यासाठी डोंगर कोरून बनविलेली व्यवस्थित जागा,शिखरावरती डौलाने फडकणारा भगवा... या व अशा इतर आश्चर्यचकित करणाऱ्या तत्कालीन मराठ्यांच्या सामर्थ्याची, प्रयत्नांच्या पराकाष्ठेची, वीरतेची साक्ष देणाऱ्या या बाबी पाहण्यासाठी प्रत्येकाने एकदा हरिहर किल्ला पाहायलाच हवा.

               


              हरिहर किल्ल्यालाच हर्षगड असे देखील म्हणतात.या किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो तो मुळात हर्षेवाडी या गावापासून.त्यामुळेच याला हर्षगड असे देखील नाव आहे.हर्षेवाडी किंवा निरगुडपाडा या ठिकाणावरून या किल्ल्यासाठीचा ट्रेक सुरू करता येतो. समुद्रसपाटीपासून हरिहर किल्ल्याची उंची सुमारे ३६७६ फुट इतकी आहे. अवघड श्रेणीमध्ये मोडणारा हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारामध्ये येतो. अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात असलेला हा किल्ला शहाजीराजांनी १६३६ मध्ये निजामशाहीची पुनर्स्थापना करताना त्र्यंबकगड किल्ल्यासोबत जिंकून घेतल्याची नोंद इतिहासामध्ये आढळते.यादव काळामध्ये साधारणपणे १४ व्या शतकामध्ये हा किल्ला बांधला असावा असे मत मांडले जाते.यादव काळापासून ते निजामापर्यंत, निजामानंतर मराठ्यांच्या युद्धांमध्ये व त्यानंतर ब्रिटिशांच्या संघर्षामध्ये या किल्ल्याने अनेक लढाया पाहिलेल्या आहेत.


                     हरिहर किल्ला ज्यासाठी प्रसिद्ध आहे त्या म्हणजे त्याच्या ऐंशी अंशातील उभ्या सरळसोट पायऱ्या.या एकूण ११७ पायऱ्या असून पहिल्या पायरी पासून शेवटच्या पायरी पर्यंतचे अंतरच २०० फूट इतके आहे. हरिहर किल्ल्याला पोहोचायचे झाले तर या पायऱ्या शिवाय गत्यंतर नाही कारण पायऱ्यांच्या उजव्या व डावीकडील बाजू तीव्र उभ्या असल्यामुळे या गुळगुळीत उभ्या बाजूंवर चढून जाणे अजिबात शक्य नाही.तत्कालीन किल्ल्याचे बांधकाम करताना किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी या गोष्टीचा किती प्रकर्षाने विचार केला असेल याची कल्पना येऊन जाते.या पायऱ्या चढताना आधारासाठी तसेच अपघात होऊ नयेत यासाठी या पायऱ्यांनाच उजव्या-डाव्या बाजूने हात धरून ठेवता येईल अशा प्रकारच्या खाचा  करून ठेवलेल्या दिसून येतात.अशीच काहीशी रचना कोथळीगड,न्हावीगड या ठिकाणी देखील दिसून येते.


                 मुळात हरिहर ट्रेक सुरू करण्यासाठी हर्षेवाडी,निरगुडपाडा या ठिकाणावरून ट्रेक सुरु करता येतो. आमच्या चमुने त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे पहिने फाट्यापासून ब्रह्मगिरी प्रदक्षिणामार्गामध्ये लागणारे गाव कोटमवाडी येथून ट्रेक सुरू करण्याचे ठरविले. भल्या पहाटे नाशिक मधून निघालेलो आम्ही वेळेत बेस् व्हिलेज कोटमवाडी येथे पोहोचून ट्रेक सुरु केला. डोंगररांगांच्या उभ्या चढणी मधून वर वर चढत जाणाऱ्या रस्त्यांमधून उजव्या हाताला हरिहर गड दिसत राहील अशा बेताने आमचा ट्रेक चालू होता. रस्त्यामध्ये शेतीच्या कामांची लगबग करणारे गावकरी दिसत होते.बऱ्यापैकी उंचावर आल्यावर दुरून फण्या डोंगर व विशाल काय उटवड किल्ला तसेच इतरही डोंगर रांगा स्पष्ट दिसत होत्या. होता होता आम्ही हरिहर किल्ल्याच्या पायथ्याच्या सोंडेपाशी येऊन पोहोचलो. तेथून आजूबाजूचा दिसणारा परिसर व समोर बलाढ्य विशाल 80° च्या कोणामधील पायऱ्या असलेला व दोहोबाजूने सरळसोट उभा कातळ कडा असलेला,ट्रेकर्सची पंढरी मानला जाणारा थरारक हरिहर साक्षात आमच्या साठी जसे काही स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. खरोखरच हरिहर साक्षात समोर उभा असताना,आपण त्याच्याकडे पहात असताना सर्वकाही विसरून केवळ आणि केवळ त्या पायऱ्या आणि तो उभा बेलाग कडा पहातच राहतो. काळजीपूर्वकरीत्या 80 अंशाच्या कोणात कोरलेल्या कातळ कोरीव पायऱ्या व चढणे सुकर व्हावे म्हणून पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस हात धरून चढण्यासाठी कोरलेल्या खाचा, वरती उभी सरळसोट चढाई तर खाली भीतीदायक उभा कडा हे दृश्य पाहूनच यवनाच्या छाताडात तेव्हा धडकीच भरत असावी.

     
              सकाळी लवकर पोहोचलेलो असल्यामुळे गडावर तुरळक गर्दी होती, परंतु माकडांचा उच्छाद होताच. या पायऱ्या चढताना या माकडांकडे न पाहिलेले बरेच! त्यांना खाद्यपदार्थ टाकू नयेत तसेच त्यांच्याशी नजरा नजर करू नये यामुळे ते अधिक चेतावून आपल्यावर हल्ला करू शकतात व उभ्या पायऱ्यांवरती दुर्घटना घडण्याचा संभव असतो. या पायऱ्या बेताबेताने चढून गेल्यानंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार लागते व गड उजव्या हाताने राहील अशा प्रकारे गडकोरून पुढे जाण्यासाठी पुरुषभर उंचीची वाट देखील काळजीपूर्वकरीत्या व कलात्मकतेने बनविलेली आहे. या वाटेवरून जाताना खालील बाजूस दिसणारी उभी खोल दरी पाहून निश्चितच काळजात धडकीच भरते. इथून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूने जाणाऱ्या डोंगरावर आपण गेलो असता गड किल्ल्याच्या शिखरावर असणाऱ्या पठारावर येऊन पोहोचतो. तिथून आपल्याला वेगवेगळी शिखरे तसेच मोठा ब्रम्हा डोंगरही दिसतो.





                  या ठिकाणी पाण्याची तीन मोठाल्या आकाराची टाकी,एक मोठे तळ्यासारखे टाके, महादेवाची पिंड व नंदी तसेच एक पहाऱ्याची चौकी बुरुजवजा इमारत दिसते. सध्या ती जीर्ण अवस्थेत असली तरी बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. तिथून पुढे गेल्यानंतर हरिहर किल्ल्याचे सर्वोच्च शिखर आपल्यासमोर राहते.येथे चढताना थोडी कसरतच करावी लागते. किल्ल्याच्या शिखरावरून आजूबाजूच्या संपूर्ण परिसरावर 360 अंशात लक्ष ठेवणे सहज शक्य होते.



              संपूर्ण हरिहर चढणे व काळजीपूर्वक रित्या उतरणे हा आमच्यासाठी एक विलक्षण अनुभव होता. सर्वोच्च शिखर उतरून खाली आल्यानंतर पठारावर आम्ही सविस्तरपणे जेवणे केली. व आमच्या टीम मध्ये व्यवस्थित अंतर ठेवून काळजीपूर्वकरीत्या आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. संपूर्ण गड उतरून खाली आल्यानंतर नेहमी नेहमी मागे वळून पाहावेसे वाटत होते. हरिहर किल्ल्याचे सौंदर्य अगदी शब्दातीत आहे. इतके कि कितीही पाहिले तरी असेच वाटते की आपण हरिहर किल्ला डोळे भरून पाहिलाच नाही. 80 अंश कोणातील पायऱ्या, स्कॉटिश कडा, किल्ल्याचे शिखर, किल्ल्याची बेलाग उंची....सर्वकाही नजरेत कितीही सामावून घेतले तरी अधाशीपणे पाहूनदेखील मन काही भरत नव्हते.
 हे सगळे पाहून एकच विचार मनामध्ये येत होते... "धन्य ते शिवराय...धन्य ते मावळे...धन्य ती स्वराज्यनिष्ठा...धन्य ती स्वामीनिष्ठा...! "

************************************

 हरिहर किल्ल्यावरील ट्रेकचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टच करा.

 आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला जॉईन होण्यासाठी येथे टच करा.

 गड किल्ले भ्रमंती तसेच ट्रेकिंग संदर्भात व्हिडिओ बघण्यासाठी येथे टच करा.

*************************************

हरिहर किल्ल्यावरील ट्रेकमधील सहभागी सदस्य :



 देविदास घाडगे 

मनोहर दरगोडे 

सुधीर पवार 

 कल्पेश हिरे 

भरत पवार

 श्याम रसाळ 

तुळशीराम बागुल 

कृष्णा वळवी

सुहास कोळेकर 

************************************

                      काही क्षणचित्रे 



























                         समाप्त.धन्यवाद.

**************************************

Comments

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई