मराठ्यांचे शस्त्रागार,रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार-किल्ले कोथळीगड. शिवजयंती विशेष ट्रेक.

 



                   दिनांक १९ फेब्रुवारी हा दिवस माहित नसेल असा एकही महाराष्ट्रीयन शोधून सापडणार नाही.स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात,धुमधडाक्यात प्रत्येक घराघरात जल्लोषाने ढोल-ताशांच्या गजरात साजरी करण्यात येते.गड-किल्ले सजवून,भगव्या पताका लावून,शस्त्रांच्या धाडसी खेळांचे आयोजन करून,शिवप्रतिमा तसेच छत्रपती शिवरायांच्या मुर्त्यांना अभिषेक व पुष्पहार अर्पण करून याशिवाय विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून देखील शिवजयंती साजरी करण्यात येते.शिवजयंती दिवशी आमच्या जल्लोषच्या टीमनेदेखील दुरून शिवरायांच्या जिरेटोपाप्रमाणे दिसणारा,तळ कोकणावर वर्चस्व स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका असलेला,जिल्हा रायगड, तालुका कर्जत येथील "किल्ले कोथळीगड" येथील ट्रेक करून,तत्कालीन इतिहासाला उजाळा देऊन शिवजयंती आगळ्यावेगळ्या मार्गाने साजरी करण्याचे ठरविले.

🚩 किल्ले कोथळीगडचा इतिहास :-

      -------------------------------------

                         तालुका कर्जत,जिल्हा रायगड येथील किल्ले कोथळीगड हा स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला होय.या किल्ल्यालाच "मराठ्यांचे शस्त्रागार" असे देखील म्हणणे योग्यच ठरेल कारण त्या प्रांतातील सर्व मोहिमा करण्यासाठी आवश्यक असलेला सर्व शस्त्रसाठा,दारूगोळा कोथळीगड किल्ल्यावरच सुरक्षित गोळा करून ठेवला जायचा व येथूनच विविध मोहिमांसाठी तो पुरविला देखील जायचा.कोथळीगड किल्ल्याचा वापर या भागातील इतर किल्ले,टेकड्या,प्रांत,व्यापारी मार्ग यावरती लक्ष ठेवण्यासाठी प्रामुख्याने केला जायचा.आधीच तळकोकणावर औरंगजेबाची नजर होतीच त्यातच या शस्त्रागारावर औरंगजेबाचा एक सरदार अब्दुल कादिर याची नजर पडली.कोथळीगड किल्ल्याच्या परिसरात वास्तव्याला जाऊन अब्दुल कादिरने फंदफितुरी करून गडाच्या आतमध्ये प्रवेश मिळविला.मोठ्या निकराच्या लढाईदरम्यान मराठ्यांचा या युद्धामध्ये पराभव झाला.त्यानंतर बऱ्याचवेळा मराठ्यांनी विविध मोहिमा आखून हा गड स्वराज्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आले.नारोजी त्रिंबक हे कोथळीगडचे किल्लेदार होते.त्यांच्या अनुपस्थितीमध्ये माणकोजी पांढरे हे किल्ल्याचा कारभार सांभाळत.शिवरायांच्या कारकिर्दीमध्ये स्वराज्याचा लिपिक असलेला,व्यवहार सांभाळणारा काझी हैदर हा छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेबाला फितूर झाला होता.अब्दुल कादिरने काझी हैदरला हाताशी धरून नारोजी त्रिंबक हे किल्लेदार गडावर नसताना काम पाहणाऱ्या माणकोजी पांढरे यांना मनसब देण्याचे आमिष दाखवून फितूर करून घेतले होते.किल्लेदार गडावर नसताना माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादिर व त्याच्या मुघल सैन्याला आपलेच मावळे गडावर रसद घेऊन जाण्यासाठी आले आहेत असे भासवून गडावरती प्रवेश दिला,गडावरील सर्व मावळे कापून काढले व आयताच गड मुघलांच्या ताब्यात गेला.हा प्रकार मराठ्यांच्या लक्षात आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी गडाला वेढा दिला,घनघोर लढाई झाली.दुसऱ्या दिवशी झालेल्या या लढाईमध्ये धनुष्यबाण व बंदुका यांचा सगळ्यात जास्त वापर करण्यात आला.अब्दुल कादिर व त्याचे मुघल सैन्य गडामध्ये तर खालील पायथ्याला मावळ्यांनी गडाला वेढा दिलेला होता.अशा स्थितीमध्ये रसद मिळत नसल्यामुळे अब्दुल कादिर व त्याच्या सैन्याची दयनीय अवस्था झाली होती.जवळपास आठ-दहा दिवसानंतर वेढ्याची माहिती मिळताच जुन्नरचा मुघल किल्लेदार अब्दुल अजीज खान याने त्याचा मुलगा अब्दुल खान याला अब्दुल कादिरची मदत करण्यासाठी पाठविले.परंतु अब्दुल खान याची वाट रस्त्यात कोथळीगडचे किल्लेदार नारोजी त्रिंबक यांनी अडविली.तेथे देखील घनघोर लढाई झाली.परंतु या लढाईमध्ये नारोजी त्रिंबक व इतर सेनापती धारातिर्थी पडले व सरतेशेवटी कोथळीगड मुघलांच्या ताब्यात गेला.दुसरा मुघल सरदार इद्दतम खान याने नारोजी त्रिंबक यांच्या पार्थिवाचे तुकडे केले व त्यांचे मुंडके रस्त्यावरती टांगले जेणेकरून मुघलांची दहशत आजूबाजूच्या परिसरात बसावी.गड ताब्यात आल्यानंतर या गडाची सोन्याची किल्ली बनवून ती औरंगजेबाला भेट म्हणून पाठवण्यात आली व गडाचे नाव बदलून मिफ्ताह-उल-फतेह म्हणजेच विजयाची किल्ली असे मोघलांनी ठेवले.यानंतर मराठ्यांनी खूप सार्‍या मोहिमा आखत हा किल्ला परत स्वराज्यामध्ये घेण्याचा आटोकाट रक्तरंजित प्रयत्न केला परंतु वेळोवेळी त्यांना अपयश आले.मुघलांनंतर इंग्रजांकडे या किल्ल्याचा ताबा गेला.नंतर पेशव्यांनी त्यांच्या शूर सेनापती मार्फत हा किल्ला लढवून स्वराज्यामध्ये शामिल केला.


 🚩भौगोलिक वैशिष्ट्य :-

      ------------------------

                    ८० अंश कोनामधील उभ्या-सरळसोट कातळामध्ये कोरलेल्या गोल-गोल जिन्यासारख्या पायऱ्या,पावसाळ्यामधील नितांत सुंदर दृश्ये,विविध ऐतिहासिक पुरावे व वास्तू आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतात.समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची सुमारे ३१०० फूट इतकी आहे.या किल्ल्याची श्रेणी अत्यंत कठीण नसून चढाई तुलनेने सोपी आहे.दरीच्या बाजूने काही ठिकाणी व कातळकोरीव पायऱ्यांवरती काही ठिकाणी मात्र तोल सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे.आंबिवली-पेठ या गावापासून या किल्ल्याचा ट्रेक सुरू करता येतो त्यामुळे या किल्ल्याला पेठचा किल्ला असेदेखील म्हणतात.




 🚩 ट्रेक व प्रवास वर्णन :-
       ------------------------

         जल्लोष ग्रुपचे माजी अध्यक्ष श्री संदीप(दादा) काकड यांच्या नाशिक येथील लक्ष्मी लॉन्स येथून आम्ही प्रवास सुरू केला.नाशिक पासून आंबिवली पर्यंत तब्बल १२२ किलोमीटरचा हा प्रवास होता त्यामुळे प्रवासामध्ये आम्ही धमाल गाणी गोष्टी करत प्रवासाचा आनंद लुटला.आंबिवली गावात रात्री  उशिरा आम्ही पोहोचल्यानंतर गावातीलच मंदिरामध्ये असलेल्या ऐसपैस ओट्यावर आम्ही मुक्काम केला व सूर्य उजाडण्यापूर्वीच पहाटे लवकर हनुमान चालीसा म्हणून, चहा घेऊन ट्रेकला सुरुवात केली.तेव्हा शिवजयंती निमित्ताने शिवज्योत घेऊन जाण्यासाठी युवकांचे जत्थेच्या जत्थे आम्हाला रस्त्यात भेटत होते.आंबिवली पासून पुढे आल्यावर पेठ या गावामध्ये नाश्ता करून आम्ही पुढील ट्रेकला सुरुवात केली.इकडील भागाची कल्पना असल्यामुळे सर्वांनी सोबत जबाबदारी वाटून घेऊन सातू पीठ,गुळ पाणी,लिंबू पाणी व तत्सम साहित्य सोबत आणलेले होते.


आंबिवली पासून पुढे आलेल्या पेठ या गावामधून ट्रेक सुरू केला असता साधारणपणे १ तासानंतर आपण गडटोपीजवळ येऊन पोचतो.



          कोथळीगडाला दोन महादरवाजे असून यापैकी एका महादरवाज्याच्या खाली जुने गुप्त भुयार देखील आहे जे आता स्थानिक ग्रामस्थांनी बंद केलेले आहे.जुन्या जीर्ण अवस्थेतील असलेल्या गडावरील तटबंदी आपल्या स्वागताला आजदेखील दिमाखात उभ्या असतात.या तटबंदीपासून पुढे गेले असता डाव्या बाजूला पाण्याची मोठमोठाली टाकी आपल्याला दिसून येतात.या टाक्यांच्या बाजूनेच डाव्या हाताला जुन्या तटबंदीचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात व पुढे पुन्हा काही पाण्याचे टाके दिसतात.गडावर जितक्या जास्त प्रमाणात टाके,तितका तो गड महत्त्वाचा असे समजावे.टाक्यांपासून आणखी काही अंतर थोडे पुढे गेल्यानंतर गडटोपीच्या खालीच एका गुहेसारख्या भागाचे अवशेष आढळतात.बहुतेक टेहळणीसाठी या जागेची निर्मिती केलेली असावी व टेहळणी करणाऱ्या सैनिकांची एक तुकडी या ठिकाणी तैनात केलेली असावी.आज या ठिकाणी कॅम्पिंग करण्यासाठी या जागेचा वापर केला जाऊ शकतो.जवळपास दहा लोकांच्या राहण्याची या ठिकाणी व्यवस्थितपणे सोय होऊ शकते.



                    या टेहळणी वजा गुहेपासून आणखी थोडे पुढे गेल्यानंतर गडाच्या विस्तीर्ण कातळाला आतमध्ये कोरून दोन मोठाल्या आकाराच्या खोल्यांसारखी रचना केलेल्या गुहा बघायला मिळतात व त्याला मधोमध एक कातळाचीच भिंत कोरलेली इमारतीसदृश्य रचना दिसते.या गुहांच्या जवळदेखील एक मोठ्या आकाराचे पाण्याचे टाके आहे.किल्ल्याच्या गड टोपीला ३६०° फिरताना जागोजागी जाणवणारी एक गोष्ट ती म्हणजे जागोजागी केलेली पाण्याच्या टाक्यांची सोय व काही ठिकाणी असणाऱ्या गुहा.




                  टाक्यांपासून उजव्या बाजूनेच गडाच्या शिखरावर जाण्यासाठी गुहेसारख्या उंचच-उंच भागामधून कातळकोरीव गोल जिन्याच्या पायऱ्यांची रचना आहे.अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व बारकाईने कोरलेल्या या पायऱ्या आपल्याला भगव्या ध्वजस्तंभापर्यंत,गडशिखरापर्यंत घेऊन जातात.गडाची ३६० अंश कोनामधील सैर पूर्ण झाल्यानंतर आपण गडटोपीला येतो.तेथील छोट्याशा पठारावर बैलगाड्यावर ठेवलेल्या दोन तोफा जसं काही इथे भेट द्यायला येणाऱ्या प्रत्येकाला इथला इतिहास सांगून दाखविण्यासाठी आसुसलेल्या आहेत असे वाटते.या तोफांना असलेला गाडा जरी आत्ताच्या काळात बसवलेला असला तरी तोफा मात्र अत्यंत प्राचीन आहेत.या तोफांच्या मागेच बुरुज आहे.











               आणखी थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या टोपीजवळ असलेले भैरोबाचे मंदिर दिसते.मंदिर बरेच प्राचीन असून गावकरी येथे येऊन याची पूजादेखील करतात.मंदिराच्या एका बाजूला मोठ्या हॉल सदृश्य रचना असून येथे आकर्षक कोरीव काम केलेले प्राचीन खांब बघायला मिळतात.यातील काही खांबांची अवर्षणामुळे बरीचशी झीज झालेली आहे परंतु काही खांब आजदेखील भक्कम स्थितीत आहेत.मंदिरापासून जिन्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या गुहांमध्ये देखील कोरीव कामाचे नमुने बघायला मिळतात.व येथून पुढूनच आपला प्रवास सुरू होतो तो शिखरावर जाणाऱ्या गुहेतून कोरीव काम केलेल्या कातळ कोरीव पायऱ्यांच्या जिन्याकडे.भैरोबाच्या मंदिराच्या अगदी लागून उजव्या बाजूलाच गुहा कोरून आश्चर्यकारक रीतीने उभ्या ऐंशी अंश कोणात या पायऱ्या कोरलेल्या आहेत.या पायऱ्यांची रचना पाहून खरोखर आपल्याला विस्मय चकित व्हायला होते.या दगडी पायऱ्यांना पाहून नाशिकच्या हरिहर किल्ल्याची,न्हावी गडाची व रायगडच्या कलावंतीन दुर्गाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.




             पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर मोठी दगडी कमान व मुख्य प्रवेशद्वार लागते.कमानीच्या एका बाजूला शरभाचे शिल्प कातळामध्ये कोरलेले आढळते.या कमानी मधून जाऊन आपण गड शिखरावर पोहोचतो.गडाचे पठार तितकेसे विस्तीर्ण नाही परंतु तेथेदेखील पाण्याचे मोठ्या आकाराचे टाके आहे.


        गडशिखरावर पोहोचल्यानंतर ध्वजस्तंभाजवळ सर्वांनी एकत्र होऊन शिवजयंती साजरी केली.ध्वजस्तंभावर आम्ही भगवा फडकविला व शिवप्रतिमा व शिवटाके पूजन केले.शिवरायांच्या घोषणांनी,गारदेने परिसर दणाणून गेला.शिवरायांची थोरवी,शिवरायांचे महान कार्य याला उजाळा देत व त्याचे स्मरण करत आम्ही मनःपूर्वक भगव्याला व शिवरायांना नतमस्तक झालो.






                          कौल्याची धार नेढे ट्रेक 

कौल्याची धार नेढे 

          गडाच्या पठारावरून आपल्याला आजूबाजूचा परिसर ठळक दिसून येतो.कोथळी गडाच्या शिखरावरून अगदी समोरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर हत्तीच्या सोंडेप्रमाणे एक मोठे नेढे दिसून येते.जल्लोष टीमने या नेढ्यामध्येदेखील ट्रेक करायचे ठरवले.या नेढ्याला कौल्याची धार असे म्हणतात. कोथळीगड उतरून खाली आल्यानंतर पेठ गावाच्या शेतांच्या रस्त्यांमधूनच साधारणपणे तास-दिड तासभर ट्रेक करून गेल्यानंतर या नेढ्यामध्ये पोहोचता येते.परंतु नेढ्याकडे जाणारी वाट वरचेवर तीव्र चढाईची बनत जाते.येथे आपल्या शारीरिक क्षमतेचा खरा कस लागतो.पायाखाली असलेली चिंचोळी वाट,तीव्र उतार,औषधाला देखील सावलीचे झाड भेटत नाही, वरून तीव्र कडक लागणारे ऊन,वारा जसा काही गायब झालेला,अशा अवस्थेत वरचेवर तीव्र निमुळत्या होत जाणाऱ्या डोंगरकड्याकडे वाटचाल करत जावे लागते व सरते शेवटी आपण पवनचक्कीच्या खाली असणाऱ्या विशाल नेढ्यामध्ये येऊन पोहोचतो. 


 कौल्याची धार नेढ्यामधून दिसणारा कोथळीगड किल्ला 






           या नेढ्याच्या खालील बाजूस पाण्याचे मोठ्या आकाराचे एक टाके असून छोट्या आकाराचे तीन टाक्यांसारखे भाग आहेत.नेढ्याकडे जाताना साधारणपणे पन्नास फूट खालील बाजूस देखील एक नितळ गार पाण्याचे टाके असून या टाक्यामधील पाणी पिण्यास अगदी योग्य आहे.उन्हाचा तडाखा लागलेले आम्ही सर्व ट्रेकर सावलीमध्ये आसरा घेत असताना आमच्या मधील काही मंडळींनी जाऊन तिथून हे गार पाणी आणले.अमृतापेक्षा गोड व उन्हाची काहिली झालेली असताना आत्मा तृप्त करणारे हे पाणी पिऊन आम्ही धन्य झालो.नेढ्यामध्ये शिवरायांची गाणी गात,घोषणा देत काही काळ आम्ही नेढ्यातुन वाहणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या झोताचा आनंद घेतला, प्रसन्न झालो व परतीच्या मार्गाला लागलो.

                बऱ्यापैकी दमदार ट्रेक झालेला होता. शिवजयंती उत्तम रीतीने साजरी केल्याचा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता.कोथळीगड संपूर्ण ट्रेक साठी साधारणपणे अडीच ते तीन तास व कौल्याची धार ट्रेक साठी साधारणपणे अडीच तास व श्रमपरिहारासाठी थोडा-थोडा वेळ असे साधारणपणे सहा तासांच्या जवळपास आम्हाला संपूर्ण ट्रेक साठी वेळ लागला.स्वराज्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या या कोथळीगड किल्ल्याच्या पावन भूमीवर येऊन जल्लोष टीमच्या सोबतीने येथे शिवजयंती साजरी केल्याचा  मनस्वी आनंद वाटला.

*************************************

 कोथळीगड किल्ल्यावरील ट्रेकचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टच करा.

*************************************

"जल्लोष ग्रुप शिवजन्मोत्सव,किल्ले कोथळीगड" ट्रेक मधील सहभागी सदस्य 🚩 :-

1. सुदाम धोंगडे

2. संदीप काकड

3. रत्नाकर भामरे

4. सुनील मानकर

5. भास्कर सोनवणे

6. सुहास कोळेकर

7. विष्णु खैरनार 

8. हेमंत गोसावी

9. मनोहर दरगोडे

10. ज्ञानेश्वर डाहोरे

11. शाम रसाळ 

12. सचिन भावसार

13. ⁠उमेश शार्दुल

14. कैलास बोडके

15. पंकज घुगे 

16. हिरालाल फड 

17. तुषार वीर 

18. दिपक भंडारे

19. जीवन सूर्यवंशी

20. किसन काकड 

21.देविदास घाडगे 

22. उल्हास कुलकर्णी 

*************************************

                    काही इतर क्षणचित्रे 



















































*************************************

Comments

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई