एक समृद्ध करणारा अनुभव, अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा , वाबळेवाडी



अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा,वाबळेवाडी,ता.शिरुर,जि.पुणे

एक समृद्ध करणारा अनुभव
शिक्षक कभीभी साधारण नहिं होता । प्रलय और निर्माण उसकी गोदमें खेलतें हैं ।
 "वाबळेवाडी हेच आमचे सरकार "...

 "शिक्षकाने शाळेकडे व विद्यार्थ्यांकडे आईच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे"...
 "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे"...
  या सर्व वाक्यांचा प्रत्यय प्रत्यक्ष जीवनात येईल  अशी आमची अनाकलनीय व तितकीच उत्स्फूर्त भेट. एकाहून एक आश्चर्याचे धक्के पचवत  या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये केलेले कार्य व उपक्रम, शिक्षकांचा आत्मविश्वासू व पॉझिटिव्ह दृष्टिकोन, चुणचुनीत विद्यार्थी व तितकेच चुणचुणीत प्रायमरी गटाचे ही मुले, रोबोट निर्मिती, लेझर कटर ,3d प्रिंटर  सर्व प्रकारच्या ख्यातनाम लेखकांच्या इंग्रजी भाषेतील पुस्तकांनी समृद्ध अशी लायब्ररी, स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ, जे आजपर्यंत फक्त पेपर मध्येच वाचलं होतं चीन व जपानमध्ये प्रायमरी गटातील मुलांना  जेवणा नंतर च्या काळात थोडी वामकुक्षी घेण्याची परवानगी होती  अगदी तीच पद्धत या शाळेमध्ये पाहिली. या व याशिवाय अजूनही इतर भरपूर गोष्टी ज्यांची कुणीही नागरिक किंवा कोणीही शिक्षक अपेक्षाही करू शकणार नाही अशा भरपूर गोष्टी जेव्हा आम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या तेव्हा आमचे डोळे विस्फारलेले ते विस्फारलेलेच राहिले. सिंथेटिक टर्फ  टाकलेले भलेमोठे मैदान,त्या विस्तीर्ण मैदानाच्या बाजूने असलेल्या आठ आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वर्गखोल्या  ज्या खोल्यांना भिंती नाहीत ,कुलपं नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या खिडक्याही नाहीत, अशा झिरो एनर्जी वाबळेवाडी शाळेतील आमचा शैक्षणिक अभ्यास दौऱ्यानिमित्त ची भेट आम्हाला शिक्षकांनाच अगदी समृद्ध करणारी होती.


शाळेतील विविध उपक्रम व सविस्तर माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच विस्तृत माहिती पाहण्यासाठि इथे क्लिक करा. शाळेच्या अधिकृत युट्युब चॕनलला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.  पालकांकडून मदत मिळवण्यासाठी आपण आधी सिद्ध असले पाहिजे व आपले कार्य ही तसे असले पाहिजे हे मर्म ओळखलेले वारे गुरुजी असो ,त्यांचे सहकारी शिक्षक खैरे गुरुजी असो की त्यांना मदत करणारे सतीश अण्णा वाबळे यांच्यासारखे दानशूर इतर ग्रामस्थ असो ज्यांनी आपल्या सर्व रितीभाती ,प्रथा -परंपरा, सण-उत्सव- चालीरीती नाकारून केवळ आणि केवळ शाळेच्या विकासासाठी अहोरात्र झटणा-या या शैक्षणिक यज्ञामध्ये हवा तो त्याग करण्याची वृत्ती जोपासलेली ग्रामस्थ असो... या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून केवळ सात वर्षांमध्ये लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष होताना आपल्याला दिसून येते. नाशिक वरून चाकण मार्गे पुण्याला जात असताना शिक्रापूर या मोठ्या गावापासून जवळ असलेल्या एका छोट्याशा वाडीमध्ये  जेमतेम पाचशे ते साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या या आटोपशीर पण टुमदार गावाला व तेथील शाळेतील शिक्षकांना हे इतके अवाढव्य कार्य,इतक्या सार्‍या गोष्टी कशा काय शक्य झाल्या या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न होता.




 वाडीमध्ये पोहोचल्यानंतर प्रथमदर्शनी आपल्याला सामोरी जाते ती जिल्हा परिषदेच्या शाळेची जुनी सुंदरशी इमारत व तिचे आटोपशीर असलेले फुलांनी बहरलेले छोटेसे प्रवेशद्वार.
आतमध्ये प्रवेश करताच चप्पल-बूट काढून ते व्यवस्थित ठेवण्यासाठी असलेले भरपूर स्टॅन्ड व त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपापल्या चपला तितक्याच व्यवस्थितपणे ठेवलेल्या आपल्या निदर्शनाला येतात.विपुल वृक्षारोपण ,झाडांची हिरवळ व फुलांच्या दाटीवाटी मधूनच उजव्या बाजूलाच आपल्याला दिसते ते रोबोटिक्स स्पर्धेसाठी बनवलेले छोटेसे मैदान .
याच शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट ज्या रोबोट ची किमया देशपातळीवर चांगलीच गाजली. नवल वाटले नाही ऐकून ! हो पण हे तितकेच खरे आहे .या शाळेतील विद्यार्थी स्वतः रोबोटिक्स चे शिक्षण घेतातच पण रोबोट्स बनवण्याचे ही कार्य इथे करतात.
 खास या साठीच या शाळेचे स्वीडन या देशाशी टायअप असून तेथील विद्यार्थी सुद्धा या शाळेमध्ये अभ्यासासाठी येतात व येथील विद्यार्थी व नागरिक सुद्धा स्वीडन या देशांमध्ये तेथील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी जाऊन आले आहेत .तेथून ते शिकून आले ती म्हणजे पहिली गोष्ट उद्योगाभिमुख शिक्षण .याचाच परिपाक त्यांच्या शाळेवर ते दिसतो तो म्हणजे 3d प्रिंटर व लेझर कटर .येथील विद्यार्थी हेच थ्रीडी प्रिंटर ,लेझर कटर अगदी सहजतेने हाताळताना दिसतात.





या शाळेचा स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ असून विद्यार्थी येथे सर्व त्यांचे व्हिडीओज ,ऑडिओ रेकॉर्ड करतात व ते डेव्हलप करण्याची सोय येथे  उपलब्ध आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांनी कॉंम्प्युटर कोडींग लैंग्वेज आत्मसात केलेली असून  सेन्सर वर काम करणारी विविध उपकरणे या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहेत .जसे की अंध व्यक्तींसाठी काठी, सेंसर ऑपरेटिंग वर चालणारी डस्टबिन त्याचप्रकारे सेन्सर वर काम करणारी ड्रायव्हर लेस कार  या व अशा इतर प्रोजेक्टवर यांचे काम सुरू आहे.




शाळेमध्ये सुसज्ज ग्रंथालय असून विविध ख्यातनाम लेखकांची अगणित पुस्तके या ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहेत .नीटनेटके ग्रंथालय ,पुस्तके ठेवण्यासाठी सुंदर प्रकारांमध्ये बनवलेली कपाटे, व मुलांच्या वाचनासाठी सोयीस्कर अशी वाचनासाठी रचना हे येथील वैशिष्ट्य होय.


विद्यार्थी गुणवत्ता येथे उत्तम प्रकारे दिसून येते.इयत्ता दुसरी मधील विद्यार्थी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर आलेला दिसून येतो. त्याने सादर केलेल्या छोटेखानी एकपात्री नाटकाने उपस्थित आम्हा सर्वांची मने जिंकून घेतली. तसेच पहिली मधील विद्यार्थिनीने साईन लँग्वेज ने आमच्या सर्वांशी साधलेला संवाद आम्हा सर्वांना ही अचंबित करून गेला.




  या शाळेची इमारत हे या शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल .बिना भिंतींची ,बिना कुलपाची ,बिना खिडक्यांची ही अशी वैशिष्ट्यपूर्ण इमारत आहे, तितकीच तिची रचना सुद्धा व बांधकाम सुद्धा अगदी सुंदर व वैविध्यपूर्ण आहे. वर्गांचे बांधकाम करताना  ऊन ,वारा ,पाऊस ,थंडी व विद्यार्थ्यांची मानसिकता या सर्वच बाबींचा अगदी काळजीपूर्वक विचार केलेला दिसून येतो .उत्तम बांधकामामुळे ,काचेच्या भिंतीमुळे व प्रशस्त बैठकीमुळे उन्हाळ्यामध्ये ,पावसाळ्यामध्ये तसेच हिवाळ्यामध्ये सुद्धा येथे विद्यार्थ्यांना अध्ययन करणे सहज शक्य आहे. तसेच या वर्ग खोल्यांच्या खाली रेन वॉटर हार्वेस्टिंग करून त्या माध्यमातून वर्गांच्या खालच्या बाजूला सव्वा लाख लिटर पाणी साठवून ठेवतील एवढ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत.

 या वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी अमेरिकास्थित बीएनवाय मेलॉन या बँकेने यांना अर्थसहाय्य पुरवलेले आहे .एकूण रकमेपैकी 30 टक्के रक्कम ग्रामस्थांनी उभी केलेली असून 70 टक्के रक्कम या बँकेने उपलब्ध करून दिलेली आहे .शाळेसाठी लागणाऱ्या सर्व खर्चाच्या रकमेची तरतूद या ग्रामस्थांनीच केलेली असून गावांमध्ये असणारा कुठलाही सार्वजनिक सण गाव साजरा करत नाही .गणेशोत्सव असो ,नवरात्रोत्सव असो वा जत्रा - यात्रा व इतर कुठलाही सण - समारंभ असो, गावकरी साजरा न करता त्या समारंभासाठी ची सर्व रक्कम गोळा करून शाळेसाठी आणून देतात . या रकमे मधूनच अतिरिक्त चार शिक्षकांची शाळेमध्ये शिकविण्यासाठी अनौपचारिक पद्धतीने नेमणूक सुद्धा करण्यात आलेली आहे .तसेच संगीत विशारद शिकविण्यासाठी सुद्धा येथे ग्रामस्थांनीच शिक्षक उपलब्ध करून दिलेला आहे वयात त्यांचाही खर्च ग्रामस्थ स्वतः करतात. औत्सुक्याची गोष्ट अशी आहे की महिन्याकाठी ग्रामस्थ अनौपचारिकरीत्या नेमलेल्या ४ शिक्षकांच्या पगारासाठी लाख - सव्वालाखाची गुंतवणूक करतात. यात्रा ,अखंड हरिनाम सप्ताह ,जत्रा ,गणेशोत्सव ,नवरात्र उत्सव असे सण टाळून या गावाने आदर्श उदाहरण घालून देत 17 ते 18 लाख रुपये आतापर्यंत शाळेसाठी दिलेले आहेत.


 शाळेच्या या सर्व प्रगतीला मूळ कारणीभूत व्यक्ती म्हणजे दत्तात्रय वारे गुरुजी .गुरुजींनी सर्वस्व वाहून घेतलेले आहे शाळेसाठी. सन 2012 मध्ये वारे गुरुजी या शाळेवर ती बदलून आले तेव्हा स्वातंत्र्यदिना दिवशी वारे गुरुजींनी व त्यांचे सोबती खैरे गुरुजींनी शाळेमध्ये ग्रामस्थांची एक मीटिंग घेतली व या मिटींगमध्ये त्यांनी वाबळेवाडी येथील ग्रामस्थांना सन 2020 मधील आपल्या शाळेचे भविष्यातील रूप कसे असावे याची कल्पना बोलून दाखविली व भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना जी आव्हाने पेलावी लागणार आहेत त्या संदर्भात माहिती देऊन शाळेमध्ये जे बदल आपणास करावे लागतील त्याची पूर्वकल्पना दिली. तत्पूर्वी मागील काही वर्षांमध्ये त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवलेला होता.सलग तीन वर्षे शाळेचे विद्यार्थी वेगवेगळ्या गुणवत्ता यादिमध्ये झळकत होते. स्कॉलरशिप परीक्षांमध्येही शाळेतील विद्यार्थ्यांचे नाव गाजलेले होतं .त्यामुळे गावकऱ्यांनी वारे गुरुजींचा शब्द प्रमाण मानत लगेचच त्या दिशेने कामकाजाला सुरुवात केली .त्यांनी सर्वप्रथम एक दंडक स्वतःवरती लादून घेतला तो म्हणजे राजकीय पुढाऱ्यांकडून कसल्याही प्रकारची आर्थिक मदत स्वीकारायची नाही आणि हा उपक्रम खरोखरच स्तुत्य होता. सर्व प्रकारच्या नकारात्मकतेला दूर सारत  यशस्वी कामकाज केलेल्या वारे गुरुजींना खरंच सलाम करावा लागेल.


 शाळेस भेट द्यायला गेले असता येथील सर्व शाळे संदर्भातील माहिती वाबळेवाडी येथील ग्रामस्थ स्वतःहून सांगतात .या ग्रामस्थांनी पैकी एक म्हणजे सतीश अण्णा वाबळे .या व्यक्तीने शाळेसाठी स्वतःची तब्बल 80 लाख रुपयांची शेतजमीन शाळेत दान करून दिलेली आहे. तरीही कुठलाही अहंभाव न मानता कुठलाही गर्व अहंकार न ठेवता ही व्यक्ती शाळेमध्ये आलेल्या सर्वांचे नम्रतेने स्वागत करते व शाळेसंदर्भातील सर्व शंका निरसन ही स्वतः करते ,जसे काही या शाळेचे प्राचार्य हे स्वतः आहेत. या शाळेमध्ये अण्णा इतके रमलेले आहेत की इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव त्यांना तोंडपाठ तर आहेच पण इथल्या प्रत्येक उपक्रमाची खडानखडा माहिती अण्णांना असते. स्वीडन या देशामध्ये शाळेच्या शिष्टमंडळासोबत गेलेले एकमेव ग्रामस्थ म्हणजे अण्णा. शाळेची पूर्ण माहिती सांगताना अण्णांचासुद्धा ऊर वारे गुरुजीं इतकाच भरून येतो.
 शाळेने स्वतःचे इंजीनियरिंग फाउंडेशन क्लासेस सुरू केलेले असून संगीत विशारद चे शिक्षण देणारी ही जिल्हा परिषदेची एकमेव शाळा असावी. याचबरोबर धनुर्विद्या व इतर तत्सम कलांची शिक्षण या शाळेमध्ये दिले जाते. भविष्यात बारावी पर्यंतचे वर्ग या शाळेमध्ये उघडून या शाळेमध्येच या गावांमध्येच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पूर्ण सोय करण्यासंदर्भात वारे गुरुजी ग्रामस्थ व शिक्षक प्रयत्नशील आहेत. युट्युब ,फेसबुक व इतर सर्वच प्रसारमाध्यमांवरति ही शाळा नावाजलेली आहे. प्रादेशिक बातम्या तसेच महाराष्ट्रातील आघाडीच्या विवीध बातम्यांच्या वाहिन्यांवरति या शाळेसंदर्भात डॉक्युमेंटरीज तसेच इतर बातम्या प्रसारित झालेल्या आहेत. एक प्रेरणादायी भेट म्हणून आम्ही सर्व शिक्षक या शाळेच्या भेटीकडे पाहतो .आम्हालाही या शाळेकडून करण्यासारखे व शिकण्यासारखे खूप मिळाले. एक नवे चैतन्य ,एक नवी दिशा घेऊन आम्ही या शाळेतून बाहेर पडलो.

...काही क्षणचित्रे ...





















वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस,शिक्षकांसाठी खुर्ची नाहि.

प्रि-प्रायमरी गटातील विद्यार्थ्यांना जेवणानंतर काहि वेळ झोपायला सांगितले जाते.







गुरुकुल पद्धतीने वर्गांची रचना,ना दारे,ना खिडक्या,भरपुर हवा,सुर्यप्रकाश,चारहि बाजुंनी उघडणार्या काचेच्या भिंती.





Comments

Unknown said…
Nice Wording..keep it up.
Unknown said…
Mast na sir jiiii......aplya pan shala ashya hvayla pahije kiiiii
Very Nice sir💐💐💐👌👍
व्वा, खूपच छान

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई