केंद्र कुंभाळे अध्यक्ष चषक स्पर्धा
![]() |
| अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा, केंद्र - कुंभाळे. |
ज्या प्रकारे एखादा कारागीर त्याच्या अणकुचीदार शस्त्रांनी दगडांमधील अनावश्यक भाग दूर करून त्यातून सुंदर अशी रेखीव मूर्ती घडवीत असतो, त्याच प्रकारे या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या अंतर्गुणांना वाव देण्याचे कार्य अगदी चपखलपणे करत असतात.
याच धर्तीवर कुंभाळे केंद्रामध्ये जिल्हा परिषद नाशिक आयोजित अध्यक्ष चषक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा केंद्रस्तरीय पातळीवर जिल्हा परिषद शाळा ,राजबारी येथे अगदी उत्साहीपणे व आनंदाच्या वातावरणामध्ये पार पाडण्यात आल्या . या स्पर्धांमधील लालित्य व सर्व स्पर्धक विद्यार्थी व शिक्षकांची झोकून देण्याची वृत्ती ही या स्पर्धांच्या उत्तम नियोजन व वेळेवरूनच सहज लक्षात येईल.
सकाळी लवकरच सुरू झालेल्या या स्पर्धा सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू होत्या. तरीही सर्व शिक्षक, स्पर्धक विद्यार्थी अगदी उत्साहीपणे राजबारी शाळेमध्ये हजर होते. विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी नैपुण्य दाखवत उपस्थित सर्वांचीच मने जिंकली. विविध सांस्कृतिक वैविध्य तसेच आदिवासी व शेतकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध नृत्यप्रकार हा या स्पर्धांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
मग त्यामध्ये भवानी देवीचे सादरीकरण करणारा संघ असो कि खेड्यांमधील शेतकऱ्यांचे राहणीमान दर्शविणारे व त्यांचे सण- उत्सव -समारंभ यांना प्रदर्शित करणारे वैयक्तिक व सामूहिक नृत्यप्रकार असोत किंवा गीत गायन व वक्तृत्व असो. या सर्वच स्पर्धा प्रकारांमधून जसे काही पेठ तालुक्यामधील एक प्रकारची सांस्कृतिक एकरूपता या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या रूपातून सर्वांना अनुभवायला उत्तमरित्या मिळाली.
स्पर्धेचा उत्कंठावर्धक क्षण होता तो म्हणजे बक्षीस वितरणाचा. जसजशा विजेत्या संघांच्या व विजेत्या स्पर्धकांच्या घोषणा होत होत्या तसतसा टाळ्यांचा कडकडाट वाढताच राहत होता. दिवस मावळला असला तरीही विद्यार्थ्यांच्या उत्साहाला जसे काही उधाण आलेले होते .जो तो संघ, विजेता स्पर्धक आपले बक्षीस मिळविण्यासाठी मान्यवरांकडे अगदी आनंदित व प्रसन्न मुद्रेने जात होता. व बक्षीस मिळाल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद काही औरच होता.
एक उत्तम कलागुणांचा आविष्कार ,उत्तम नियोजनाचे उदाहरण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र राबणाऱ्या शिक्षकांचे प्रतिबिंब असे या स्पर्धांना म्हणायला निश्चितच हरकत नसावी.
आयोजक राजबारी शाळा व राजबारी शाळेतील शिक्षकवृंद यांची मेहनत या स्पर्धा यशस्वी घडवून आणण्यासाठी खूप उपयोगी ठरली. तसेच कुंभाळे केंद्रामधील सर्वच शिक्षक बांधवांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनमोल असे योगदान दिले. आदरणीय केंद्रप्रमुख सहारे साहेब यांनी आपल्या नेतृत्व गुणांची चुणूक दाखवीत सर्वच शिक्षकांकडून उत्तमरित्या कर्तव्य बजावून घेतले.
आभार प्रदर्शनाच्या गोड कार्यक्रमाने या केंद्रस्तरीय स्पर्धांची सांगता सहारे साहेब यांनी केली. परीक्षकांच्या परीक्षणावर एकमताने विश्वास ठेवत सर्वच विजेत्या संघांनी आता बीटस्तरीय स्पर्धांमध्येही कुंभाळे केंद्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठी कंबर कसली आहे. एकंदरीत आजच्या या स्पर्धा कुंभाळे केंद्राची हातोटी दर्शविणाऱ्या होत्या असे म्हणायला हरकत नसावी.सदर स्पर्धेसाठी पिठुंदि शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री बावा सर यांनी स्व- खर्चाने विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने आकर्षक प्रमाणपत्रे प्रिंट काढून आणली व वाटपहि केली.कुंभाळे केंद्रामध्ये हा नावीन्यपूर्ण व प्रथमच राबविला गेलेला उल्लेखनीय उपक्रम होता व सर्वच स्तरातून त्याचे कौतुक झाले.कालच्या स्पर्धांसाठी श्री .बावा सर यांनी स्वखर्चाने विजेत्या स्पर्धकांसाठी आकर्षक प्रमाणपत्रे मोठ्या संख्येने प्रिंट करुन आणलेली होती ,जी काल मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. बावा सरांची हि लाखमोलाची भेट विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहिल व इतरांनाहि प्रेरणा देत राहिल.💐💐🙏🏻


















Comments