पांडा - ढेबा - टिंगा - कोंबडी


         
          .....पांडा - ढेबा - टिंगा - कोंबडी.....

                        हे आहेत आमचे पांडा, ढेबा ,टिंगा व कोंबडी ! ऐकून कोणालाही नवल वाटणे साहजिकच आहे.पण हि आमच्या दाखलपात्र वयोगटातील मुलांची- मुलींची नावे आहेत. सुरुवातीला यांची नावे ऐकून मी सुद्धा चक्रावून गेलो होतो.परंतु ही मुले इतकी गोंडस दिसतात की यांची ही नावे गावातीलच इतर लोकांनी लाडाने ठेवलेली आहेत.त्यांची मूळ नावेसुद्धा तितकीच सुंदर आहेत,जितकी यांची घरी लाडाने ठेवलेली नावे !
                यांचा दिवसभराचा रुटीन सुरू होतो तो शाळेची घंटा वाजल्यानंतर .शाळेच्या परिपाठावेळी आम्ही शाळेची घंटा दिली की हे चौघे गावांमध्ये असतील तिथून असतील तशा अवस्थेतून शाळेकडे धावत येतात. मग साहजिकच ती त्यावेळी अंगणवाडीमध्ये असतात.अंगणवाडी मदतनीस त्यावेळी त्यांना सोडायला तयार नसतात, परंतु त्यांना शाळेमध्ये इतक्या आतुरतेने यावे वाटते की ते अंगणवाडी मधून लगेच पळ काढतात व शाळेतील वर्गामध्ये येऊन दंगा करत बसतात. त्यांचे ते बोबडे बोल,गोंडस चेहरे,निष्पाप वागणं व त्यांच्या पराकोटीच्या निखळ व सुंदर हावभावांमुळे, त्यांच्या वर्गांमधील तितक्याच समरसतेने वावरण्यामुळे मलाही त्यांना वर्गामधून जायला सांगावेसे वाटत नाही.हे चौघे माझ्या वर्गाचा जणू काही भाग झालेत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा ही गोष्ट माहित आहे.
 
                          मी वर्गात पोचलो की त्यांच्या घरातील व्यक्तीच त्यांना जिथे असतील तिथून आणून शाळेमध्ये सोडून निघून जातात. मग ते शाळा सुटेपर्यंत माझ्याच ताब्यात असतात  व दिवसभर सुरू होतात त्यांचे नाना प्रकारचे निष्पाप प्रश्न,अखंड बडबड !
             शाळा जशी काही त्यांच्या मालकीची,वर्ग जणु काही त्यांचे घर व वर्गांमधील साहित्य इतकेच काय माझी पिशवी, माझ्या बाटल्या जणू काही त्यांच्या घरातील साहित्याची सवयच असल्यासारखे ते हाताळायला सुरू करतात.मध्येच खोड्या करतील, याचे केस ओढ, त्याला मार, याला चिडवू ,त्याची टिंगल करु,मध्येच माझ्या नावाने मोठमोठ्याने हाका काय मारतील !  सगळं कसं गमतीशीर पण तितकंच आवडणारंसुद्धा !

                     या शब्दप्रपंचाचे कारण असे की, वेगवेगळ्या अभ्यासातून ,निष्कर्षातून हे सिद्ध झाले आहे की शाळेतील सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये मुलांची ग्रहणशक्ती खूप चांगली असते.यावेळी त्यांच्या बौद्धिक आकलनानुसार जे ते ग्रहण करतील ते आयुष्यभर ते विसरत नाहीत.त्यामुळेच शाळेत इयत्ता पहिलीला विद्यार्थी टाकण्यापूर्वी काही वर्ष औपचारिक किंवा अनौपचारिक पद्धतीने त्याचे शिक्षण व्हायला हवेच.आजकाल बऱ्याच शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जातो.जिल्हा परिषदेच्या शाळासुध्दा त्याला अपवाद निश्चितच नाहीत.अशी खूप सारी यशस्वी उदाहरणं सांगता येतील की जेथे इयत्ता पहिलीच्या आधी अंगणवाडी- बालवाडी यांचे वर्ग शाळेला जोडलेले आहेत.त्यामुळे त्या शाळांच्या गुणवत्तेमध्ये अमूलाग्र बदल घडताना दिसून येतोय.सातारा येथील कुमठे बीट असो किंवा पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी ची आंतरराष्ट्रीय शाळा असो,या सर्व उदाहरणांवरून हीच गोष्ट सिद्ध होते की पहिलीच्या आधी काही वर्ष त्या मुलांना शाळेमध्ये आणून बसवायलाच हवे व त्यांचे अनौपचारिक शिक्षण सुरू करायलाच हवे.


                         या प्रकारच्या वयोगटांसाठी असा काही निश्चित अभ्यासक्रम नसतो किंवा कुठल्याही प्रकारचे दिशानिर्देश निश्चित नसतात.शिवाय त्यांना या ठराविक एका वयोगटापर्यंत इतक्या-इतक्या क्षमता आल्या पाहिजेत असे कुठल्याही प्रकारचे बंधन या वयोगटातील मुलांवर नसते किंबहुना ते नसायलाच हवे. छोटी मुलंच ती! त्यांना खेळायला ,बागडायला,व्यक्त व्हायला एक मोकळे व्यासपीठ मिळायलाच हवे, जे शाळेमधून मुक्तपणे मिळू शकते .शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार शिक्षकाची भूमिका ही एका मार्गदर्शकाची असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यानुसार शिक्षक आपली भूमिका या वयोगटातील मुलांसाठी निश्चितपणे वठवू शकतो. नुकत्याच एका टीव्ही चॅनेलवर बातमीपत्र चालू असताना एका छोट्याशा मुलीचा शिक्षण व्यवस्थेबद्दल चा त्रागा बघितला.किती प्रमाणात शिक्षणासाठी त्यांना अधिक गुंतवून ठेवले जाते,व्यस्त केले जाते.वास्तविक त्या वयातील मुलांसाठी असे व्हायला नको.

 त्यामुळे शाळेबद्दलची गोडी वाढण्यासाठी व शिक्षण तसेच एकूणच शिक्षण प्रक्रियेबद्दल त्यांना प्रेमभावना जागृत होण्यासाठी त्यांना शाळेत आणणे,शाळेत राखून ठेवणे व त्यांच्या उपस्थितीमध्ये सातत्य बाळगणे हे खूप आवश्यक आहे जे खेळांच्या माध्यमातून व कृतीयुक्त शिक्षणामधून अधिकाधिक सिद्ध होऊ शकते. माझ्या वर्गामध्ये पांडा,ढेबा, टिंगा व कोंबडी हे चौघेही हीच कामे करताना दिसून येतात.
यांचा दिवसभराचा उद्योगच हा ! ते दिवसभर वर्ग डोक्यावर घेतील पण शाळेमध्ये येताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो जो मला त्यांना दिवसभर वर्गात राखून ठेवायला बाध्य करतो. तसं बघायला गेलं तर माझी शाळा अति दुर्गम भागामध्ये आहे .जाण्या-येण्यामध्ये वेळ तर खूप जातोच,शिवाय चालत जाण्यामुळे ,डोंगर चढण्या-उतरण्यामुळे अधिक श्रम होतात. तरीही हे चौघे शाळेमध्ये येऊन एखाद्या दिवशी बसले नाहीत तर जसं काही तो दिवस सत्कारणी लागलाच नाही अशीच भावना मनामध्ये येते. 
यापुढील काळात माझा प्रयत्न असाच राहणार आहे की गावातील जास्तीत जास्त दाखल पात्र मुले शाळेमध्ये आणून बसवायची व वर्षभर त्यांना शाळेची गोडी लागण्यासंदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवायचे.यासाठी आम्हाला अधिकारीक पातळीवरून छानसे मार्गदर्शन व प्रोत्साहन तर उपलब्ध होत आहेच.त्याचबरोबर आमचे हे प्रयत्न गावपातळीवरील शिक्षणाचे वारे बदलण्यास निश्चितच पॉझिटिव्ह मदत करतील अशी अपेक्षा वाटते.







Comments

खूपच सुंदर सरजी, तुमच्यासारख्या शिक्षकामुळे शिक्षणक्षेत्राचे नाव उंचावत आहे.
खूपच सुंदर सरजी, तुमच्यासारख्या शिक्षकामुळे शिक्षणक्षेत्राचे नाव उंचावत आहे.
Suhaskolekar said…
धन्यवाद मोरे सर.आपल्या प्रतिक्रिया अनमोल आहेत.
Unknown said…
शेवटापर्यंत वाचावा असा लेख. खुपच सुंदर. तुमच्या कार्याला लेखणीची जोड आहे ही खुप जमेची बाजू आहे. कदाचित गावाकडची शाळा करण्याचा पुन्हा तुमच्याच शाळेवर योग येईल असं वाटतं. 🙏🙏
Suhaskolekar said…
निश्चितच .खूप खूप धन्यवाद .
Unknown said…
खूप सुंदर लेखन सर.
Unknown said…
खुपच अप्रतिम लेखन आणि अनुभव समृद्ध
Suhaskolekar said…
धन्यवाद
Suhaskolekar said…
धन्यवाद
It's Really Amazing thing You're doing for Such a beautiful childrens..
We Need Such kind of Teachers more for Development of nation..
Keep Doing Sir..
We are Always with you and Those child's also..
All Our Blessings are With You..
Unknown said…
खूप छान कोळेकर सर 👍🌷 कार्य आणि शब्दांकन सुध्दा
Suhaskolekar said…
धन्यवाद
Suhaskolekar said…
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद !
Unknown said…
सुहासराव आपण विध्यीर्थी दशेपासुनच आदर्श विध्यार्थी आहात हे आम्ही जवळून सहआध्याही म्हणून अनुभवलय आपल्यासारखे शिक्षक ज्या गावाला लाभले ते गावच खरतर भाग्यवान.मराठवाड्यात बदली करून लवकर या.
Suhaskolekar said…
खूप खूप आभारी आहे.
Anjali kolekar said…
Kharach khup Chan keep it up derapada school n teacher well done ��
बालाजी केंद्रे said…
सुहास सर खूप सुंदर ब्लॉग लिहिला आहे आणि त्यात वास्तविकतेची जोड आहे. शाळेत दाखल होण्यापूर्वी मुलांचे शाळेबद्दल आकर्षण निर्माण झाले तर अर्धे काम झालेच म्हणावे लागेल. पांडा - ढेबा - टिंगा - कोंबडी यांना उज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
Suhaskolekar said…
धन्यवाद बालाजी सर

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई