ट्रेकिंगची भटकंती

 



!!  ट्रेकिंग !!


ट्रेकिंग करणारी माणसं जरा बदनाम च असतात,

चारचौघात मात्र वेगळी उठून दिसतात !!


शनिवार रविवार आला की यांचे डोळे चमकतात,

ट्रेक ला जायचं म्हणून भरभर कामे उरकतात !!


आज हा गड ,उद्या ती दरी ,परवा वेगळाच घाट,

पूर्णविराम नसणारी यांच्या पायाखालची वाट !!


अनवट जागा ,रानवाटा, किल्ले आणि दऱ्या

सामान्यांपेक्षा अधिक यांनाच माहीत बऱ्या !!


सलग सुट्टी बघून यांचे दौरे ठरतात,

घरचे फक्त यांची धावपळ न्याहाळत बसतात !!


घरचे म्हणतात मॉल किंवा मल्टिप्लेक्स ला जाऊ,

हे म्हणतात तुम्ही या जाऊन ,आम्ही नंतर पाहू !!


पहाटे लवकर उठायचं म्हणून यांची रात्रभर चुळबुळ,

न जाणे कधी संपणार भटकंतीच वेडं खूळ !!


उजाडता निघण्याची पहाट उत्साह वाहतो ओसंडून,

अनोळखी ठिकाण खुणावते ओळखीचा उंबरठा ओलांडून !!


जवळचा असो वा दूरचा ,प्रवास करतात अथक,

मित्र मैत्रिणी च्या सवे दिवस होई सार्थक !!


चढता चढता विश्रांतीसाठी सावली मध्ये विसावतात,

दमलेल्या पाऊलांना हळूहळू सरावतात !!


ऊन ,वारा ,पाऊस अंगावरती झेलतात

वजनदार सॅक पाठीवरती पेलतात !!


माथा गाठताच दिसते दृश्य स्वर्गीय अलौकिक,

अदृश्य होतात क्षणभर दुःख ,अडचणी लौकिक  !!


आता मात्र गरजेचा असतो एक फक्कड चहा,

जेवण नसले तरी चहा मात्र हवा !!


डाळ ,खिचडी ,पिठलं-भाकरी यांचं आवडतं खाद्य,

वाढत्या वजनावर नियंत्रण यानेच होते साध्य !!


अंधाऱ्या गुहेत झोपायचं म्हणून इतर लोकं त्रस्त

हे तिथे सुखाची झोप काढतात मस्त !!


डोंगरातील वाहत्या झऱ्यांचे स्वच्छ अमृत पितात,

बिसलेरीचा आग्रह धरणारे यांना नावे ठेवतात  !!


असे पाणी पिऊन ही हे राहतात निरोगी

गर्दीत जीव गुदमरून 'बिसलेरी' वाले मात्र रोगी !!


डोळ्यांचे दिपविणारी छायाचित्रे यांनाच नामी मिळतात,

कारण त्यांचे सूर निसर्गाशी अधिक जुळतात !!


फोटो बघताना कमावतात लोकांची वाहवा,

काही हळूच विचारतात आता कोणता ट्रेक नवा !!


निसर्ग यांचं पूजास्थान ,सोबती आणि गुरू

चालू भटकंती संपण्याआधीच पुढच्याचे वेध सुरू !!


छंद हा बेभान , हीच खरी साधना

परतीच्या प्रवासाची कशी करावी कल्पना !!











Comments

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई