सातमाळचे रत्न-किल्ले राजधेर

 



                      महाराष्ट्रामध्ये रेंज ट्रेक करता येतील असे सह्याद्री मधले खूप किल्ले आहेत.रेंज ट्रेक म्हणजे एका ओळीमध्ये असलेले व सवडीने एकापाठोपाठ एक करता येतील असे किल्ले ! अलंग -मदन -कुलंग ,रावळ्या -जावळ्या , अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यामधील खूप सारे किल्ले,राजधेर -कोलधेर- इंद्राई व अजून असे बरेचसे किल्ले आहेत जे आपल्याला रेंज ट्रेक मध्ये करता येतात. यापैकीच एक म्हणजेच किल्ले राजधेर. राजधेर व राजदेहेर या नावांमध्ये साधर्म्य असणारे दोन वेगवेगळे किल्ले आहेत.आमच्या जल्लोष चमुने करायचा ठरवला तो म्हणजे राजधेर किल्ला.



                      चांदवड शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेला हा राजधेर किल्ला इतिहासाच्या खुप सार्‍या पाऊलखुणा,वेगवेगळ्या साक्षी आपल्या अंगावर मिरवत आजदेखील जीर्ण अवस्थेत असला तरी दिमाखात उभा आहे.या किल्ल्याचा म्हणावा तितका विस्तृत इतिहास आज कुठेही सापडत नाही परंतु किल्ल्याची रचना व किल्ल्यावरील बांधकाम पाहिले तर निश्चितच हा किल्ला देखील शिवकालीन महत्त्वाचा किल्ला होता, असे म्हणायला हरकत नाही.विविध पाण्याचे टाके,चौसोपी बांधीव विहीर,बालेकिल्ला,वीरगळी,कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या,किल्लेदाराचा वाडा,दारूगोळ्याच्या भांडारासाठी कोरलेल्या गुहा अशा व इतरही अपरिचित इतिहासाच्या खुणा आजही हा किल्ला अंगावरती मिरवत दिमाखात उभा आहे.



                           गिरीदुर्ग या प्रकारात मोडणारा हा किल्ला मध्यम स्वरूपाचा आहे.दोन पठार ओलांडून गेल्यानंतर या किल्ल्याचा पायथा येतो, जिथून आपण शिडी मार्गाने वरती जाऊ शकतो.नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यातील राजधेरवाडी या गावापासून आपल्याला ट्रेक करता येतो व याच गावापासून कोलधेर, इंद्राई अशा किल्ल्यांवरतीसुद्धा जायला आपल्याला हे गाव बेस व्हिलेज म्हणून परिचित आहे.सातमाळ डोंगर रांगेमध्ये येणाऱ्या या किल्ल्याची अवस्था सध्या अगदीच बिकट अशी झालेली बघायला मिळते.देवगिरीच्या यादवांच्या काळामध्ये या किल्ल्याचे बांधकाम झालेले होते.त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात हा किल्ला आक्रमण करून ताब्यात घेतल्याची नोंद आढळते.नंतरच्या काळात शिवरायांच्या ताब्यात असलेला हा किल्ला अहमदनगरच्या निजामशहाने पेशव्यांच्या ताब्यात दिल्याची नोंद बखरींमध्ये आढळते.त्याकाळी या किल्ल्याचा वार्षिक महसूल दहा हजार रुपये इतका असल्याची नोंद देखील आढळते. इसवी सन १८१८ मध्ये ब्रिटिश कर्नल प्रोथेर याने हा किल्ला लढाई करून पेशव्यांकडून जिंकून घेतला.     

                               समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची सुमारे ४४१० फुट इतकी आहे. देवगिरीचे यादव, खिलजी,मुघल, मराठा ,पेशवे व ब्रिटिश  इतक्या राजसत्ता या एकट्या किल्ल्याने पाहिलेला आहेत इतका दैदिप्यमान इतिहास या किल्ल्याचा आहे. राजधेरवाडी या गावामधून ट्रेक सुरु होतो.दोन पठारे ओलांडल्यानंतर आपण किल्ल्याच्या लोखंडी शिडीपाशी पोहोचतो व तिथून आपल्याला किल्ल्याच्या शिखरावर पोहोचता येते.साधारणपणे दोन तासांच्या असलेल्या या ट्रेकमध्ये रस्त्यामध्ये झाडे नाहीत.जुना शिडीचा मार्ग अत्यंत खचलेला असल्यामुळे वन विभागामार्फत तेथे आता नवीन मजबूत शिडी लावण्यात आलेली आहे.या शिडीच्या मार्गावर जुन्या कातळात कोरलेल्या सुंदर पायऱ्या होत्या,परंतु ब्रिटिशांनी सर्वच किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्याच्या पायऱ्या तोफा लावून उडवून नष्ट केल्यामुळे आज तेथे लोखंडी शिडीचा आधार घेत वरती जावे लागते .सातमाळाचा विस्तृत पसरलेला डोंगर जर धड म्हणायचे ठरले तर राजधेर हा किल्ला त्याचा मुकुटमणी शोभेल अशाप्रकारे त्याची रचना आहे.गडावर एक सुंदर वास्तू असून स्थानिक त्याला किल्लेदाराचा वाडा,सदरेचा वाडा म्हणतात.सुंदर प्रकारे कोरीव काम केलेला हा वाडा आज देखील मजबूत स्थितीमध्ये उभा आहे.काहीसा जीर्ण झालेला असला तरी स्थापत्य कलेचा उत्तम नमुना हा वाडा आहे.या वाड्यास ३ कमानी असून तिचे खांब खूपच सुबक आहेत.पैकि मधल्या खांबावर कमळासारखे शिल्प दगडातच कोरलेले आहे.किल्ल्याच्या एका बाजूला जमिनीमध्ये थोड्याशा खालच्या बाजूला दोन गुहा कोरलेल्या आहेत.त्याकाळी दारुगोळ्याचं भांडार म्हणून या गुहा वापरल्या जायच्या परंतु आज ट्रेकर मंडळी मुक्कामासाठी देखील याचा वापर करत असावीत. अतिशय खंत वाटणारी व मनाला निराशा उत्पन्न करणारी एक बाब या संपूर्ण प्रवासामध्ये लक्षात येते ती म्हणजे समाजकंटक तरुणांनी या किल्ल्याच्या संपूर्ण वास्तूंवरती चुन्याने मोठ्या मोठ्या अक्षरात नावे लिहून ठेवलेली आहेत,ज्यामुळे ही संपूर्ण वास्तू विद्रूप झालेली दिसते.अशा प्रकारचे कृत्य खरोखर निंदनीय आहे.

                        गडावर जाताना एक वेगळ्या प्रकारची विरगळ आपल्या नजरेस पडते.विरगळ याचाच अर्थ त्यागडावर पराक्रम गाजविलेल्या वीरांच्या स्मृतीसाठी दगडामध्ये कोरीव काम करून उभारलेली एक छोटीशी स्मृती स्तंभा सारखी वास्तू. या किल्ल्यावर आढळणारी विहीर देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाहेरून किंवा दूरवरून बघताक्षणी हे कुठल्यातरी मंदिरासारखे असावे असं वाटतं.परंतु भूगर्भात असलेल्या विहिरीमधील पाण्याचे संरक्षण व्हावे,त्याचे बाष्पीभवन होऊन उडून जाऊ नये तसेच विहिरीमधील पाण्यामध्ये घाण वगैरे पडू नये व ते पाणी थंड राहावे यासाठी विहिरी वरती छोटा घुमटदेखील बांधण्यात आलेला आहे. ज्यामुळे बाहेरून बघायला ही विहिर सुंदर दिसते.परंतु या विहिरीमधील पाणी सध्या पिण्यालायक नाहि.त्यामुळे पाणि सोबत ठेवलेले बरे .किल्ल्यावरती पाण्याच्या टाक्यापेक्षा मोठे व तळ्यापेक्षा थोड्या छोट्या आकाराचा पाण्याचा एक साठा देखील आहे.याच्या जवळच सहजासहजी नजरेस न पडणारे एक जुने पुरातन शिवालय देखील तिथे आहे .या मंदिरामध्ये आजमितिस झुडपे वाढलेली असल्यामुळे दाटी झालेली आहे.


                         राजधेरवाडी या बेस व्हिलेज पासून चालत वर आल्यानंतर साधारणपणे पाऊण तासानंतर आपण किल्ल्याच्या खालील पठारावर पोहोचतो. यावेळी किल्ला उजव्या हाताला ठेवून आपल्याला चालत जावे लागते तेव्हा उजव्या हातालाच बरोबर एक खूप मोठी गुहा लागते.त्या गुहेमध्ये खालच्या बाजूस दोन ते तीन कमानी असलेले जुने बांधकाम आढळते. याला स्थानिक लोक घोड्याची पागा असेदेखील म्हणतात. किल्ला चढताना लोखंडी शिड्या चढून वर गेल्यानंतर एक जुन्या तटबंदी सारखी जागा दिसते.आता तेथे तटबंदी नसली तरी तिचे अवशेष आहेत.तिथून दगडात कोरलेल्या पायऱ्यांवरून आपल्याला सांभाळत वरती जावे लागते. या पायऱ्या काही ठिकाणी ढासळलेल्या आहेत.या पायऱ्यांच्या उजव्या बाजूने खोल दरी असल्यामुळे येथे चढताना विशेष काळजी घ्यावी लागते. पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर डाव्या हाताला एक छोटीशी गुहेसारखी जागादेखील दिसते. त्यावेळच्या सैनिकांसाठी बांधलेली ती देवडी असू शकते. 


                        राजदेरवाडी या छोट्याशा पण तितक्याच सुंदर अशा गावामधून जिल्हा परिषद शाळेच्या मागील डोंगरावरून आपला ट्रेक सुरू होतो.दोन मध्यम आकाराची पठारे ओलांडल्यानंतर आपण गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पठारावर येतो.येथून गड आपल्या उजव्या हाताला ठेवून आपण चालत गेलो असता गड माथ्यावर नेणारी शिडी आपल्याला लागते.या शिडीच्या जवळच जुनी जीर्ण झालेली शिडी देखील बघायला मिळते.जुन्या शिडीने चढणे किती अवघड असेल  आपल्याला याचा प्रत्यय येतो.इंग्रजांनी उध्वस्त केलेल्या पायऱ्यांचे अवशेष देखील आपण शिडीच्या खाली बघू शकतो.पायऱ्यांवरून वरती गेल्यानंतर आपल्याला सैनिकांसाठी बांधलेली देवडी , वरच्या बाजूला गेल्यावर छोटीशी गुहा व माची व बालेकिल्ला लागतो.तेथूनच पुढे चढून गेल्यानंतर उभ्या छोट्या कातळाच्या डोंगरामध्ये दोन सुरेख पद्धतीने कोरलेल्या गुहा आहेत ,हेच ते दारूगोळ्याचे भांडार .या भांडाराच्या उजव्या बाजूलाच किल्लेदाराचा वाडा किंवा सदरेचा वाडा देखील बघायला मिळतो. वाड्यापासून पुढे चालत गेल्यानंतर किल्ल्याचा छोटा परंतु ढासळलेला बुरुज व ध्वजस्तंभाची काठी दिसते.तिथून वरच्या बाजूला आपण संपूर्ण गड पाहायला निघतो.जागोजागी लागणारी पाण्याची टाकी,समोरच्या पठारावरील पाण्याचे विस्तीर्ण तळे,संपूर्ण गड परिसरात असलेले केळी सदृश्य वनस्पतींचे जंगल,बांधीव घुमटआकार असलेली विहीर,तळ्याच्या बाजूला असलेले शिवशंभूचे जीर्ण अवस्थेतील मंदिर हे सर्व अवशेष पाहून साधारणपणे तासाभरात आपण गड उतरायला सुरुवात करतो.पाच राजेशाह्यांचे वर्चस्व झेललेला हा किल्ला संपूर्णपणे बघून निश्चितच मन धन्य होते.

************************************

राजधेर किल्ल्याच्या माहितीचा संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

************************************

इतरहि किल्ल्यांची सचित्र माहिती वाचण्यासाठी या ब्लॉगवरील पोस्ट्स नक्कीच वाचा.

**********************************

 माहितीचे स्त्रोत :-google,youtube,विकिपीडिया, स्थानिक गाईड:- राजधेरवाडी.

**********************************

              ट्रेकमधील सहभागी सदस्य :-

1. संदिप काकड

2. सुहास कोळेकर

3. मनोहर दरगोडे

4. रत्नाकर भामरे

5. विष्णु खैरनार

6. ⁠उमेश शार्दूल

7. जीवन सूर्यवंशी

8. सुनील मानकर

9. संजय ब्राह्मणकर

10. हिरालाल फड

11. सुनील काळे

12. गजानन आडके

13. दीपक भंडारे

14. संदीप वर्मा

15. देविदास घाडगे

16. देवांग जोशी

17. स्वरूप जाधव 

 18. किसन काकड

************************************

                  काहि इतर क्षणचित्रे










































Comments