रामजी पांगेरांच्या कन्हेरगडावर ट्रेक
पावसाळा हा ऋतू ट्रेकर मंडळींसाठी पर्वणीचा असतो.कारण या ऋतूमध्ये सह्याद्रीच खुललेलं रूप अत्यंत मनमोहक दिसतं.अशावेळी हा सह्याद्री ट्रेकर मंडळींना खुणावतच असतो.सळसळ कोसळत्या पावसात एखादा ट्रेक करणे म्हणजे हे प्रत्यक्ष शिवकालीन मावळ्यांच्या आयुष्याचा थोडासा कानोसा घेतल्यातलाच प्रकार.त्यामुळे इतर मोसमांपेक्षा पावसाळ्यामधील ट्रेक खास करून लक्षवेधी ठरतात. गड पायथ्याशी फुललेली हिरवळ,फुलांचे घोसच्या घोस व ताटवे,हिरव्याजर्द झाडांवरती चिवचिवणारे असंख्य विविध कर्णमधुर आवाजांचे पक्षी,गड माथ्यावरून फेसाळणारे रोंरावत आवाज करत खाली कोसळणारे असंख्य धबधबे....पृथ्वीवर स्वर्ग असेल तर जणूकाही हाच ! हा स्वर्ग याची देही याची डोळा अनुभवायचा असेल तर निसर्गात जायलाच हवे !
तसं बघायला गेलं तर नाशिक वरून दिंडोरीमार्गे नांदुरी-कळवण परिसरात गेलं तर खूप सारे ऐतिहासिक महत्त्व असणारे गड-किल्ले आजही दिमाखात उभे आहेत.त्यापैकीच एक म्हणजे कन्हेरगड.खाजगी वाहनाने नाशिक मधून दिंडोरी नांदुरी मार्गे या गडाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागतो.गिरीदुर्ग या प्रकारातील अजंठा सातमाळ या डोंगररांगेतील किल्ला असलेला कन्हेरगड हा मध्यम स्वरूपामध्ये गणला जातो.या किल्ल्याची सर्वसाधारणपणे समुद्रसपाटीपासूनची उंची 3582 फूट इतकी आहे.परंतु चढण काहिशी उभी आहे.किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सादडविहीर या गावातून गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी साधारणपणे दीड तास वेळ लागतो तर कन्हेरवाडी या गावामधून गडमाथ्यावर जाण्यासाठी दोन तासांचा वेळ लागतो.किल्ल्यावर पाण्याचे ६ - ७ टाके उपलब्ध असले तरी पाणी जवळ ठेवण्याचा सल्ला दिला जातो.किल्ल्यावर २ गुहा असून त्यामध्ये १० ते १५ माणसांच्या मुक्कामाची देखील सोय होऊ शकते.गुहेकडे जाणारी वाट थोडीशी अवघड आहे.
बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला एक बुरुज व मोठ्या आकारातील नेढे हे या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे.बुरुज सुस्थितीत असला तरी त्याची वरील बाजूने बऱ्याच प्रमाणात पडझड झालेली आहे. नेढं म्हणजेच डोंगराला आरपार पडलेले मोठ्या आकाराचे भगदाड.ऊन,वारा,पाऊस यामुळे छोट्याशा छिद्राची वर्षानुवर्षे झीज होऊन डोंगराला आरपार भगदाड पडते त्यालाच नेढं असे म्हणतात.नांदुरी जवळीलच पिंपळा उर्फ कंडाळा या किल्ल्यावर देखील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे नेढे आपल्याला बघायला मिळते.त्या खालोखाल बऱ्यापैकी मोठे नेढे या कन्हेरगड किल्ल्यावर आहे.किल्ल्याच्या विस्तीर्ण पठारावर लुसलुशीत गवत,फुलांचे ताटवे,असंख्य ओहोळ व धबधबे बघून ट्रेकचा थकवा विसरायला होतं.
गडावरून सप्तश्रुंगी, मार्कंड्या, रावळ्या, धोडप, कंचना आणि हंड्या अशी संपूर्ण सातमाळ रांग दिसते.धोडप किल्ल्याच्या बाजूस तोंड करणाऱ्या २ गुहा गडमाथ्याच्या एका टोकाला खोदलेल्या आहेत.गडावर तुम्हाला जुन्या वाड्यांचे काही अवशेषही पाहायला मिळतील.गडमाथा हा खूप मोठा आणि प्रशस्त आहे. येथे तुम्हाला 6 ते 7 पाण्याच्या टाक्या, भगवान महादेवाची पिंड आणि अनेक ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतील. नाशिक वरून दिंडोरी मार्गे वणी-नांदुरी गडापासून पुढे गेल्यानंतर आठंबा हे गाव लागते.या गावापासून पुढेच सादडविहीर या गावापासून आपल्याला गडाची चढाई करता येते.सादडविहीर गावामधून वरती गडावर जाण्यासाठी एक स्पष्ट रुळलेली पायवाट आहे.पायवाटे मार्गे कातळ कोरीव पायऱ्यांमधून वरती जाण्यासाठी साधारणतः अर्धा ते पाऊण तास लागतो. इतिहास प्रसिद्ध हा किल्ला तसा आजमीतिला बराचसा दुर्लक्षित आहे.
या किल्ल्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जानेवारी १६७२ साली औरंगजेबाच्या आदेशावरून दिलेरखान याने मोगल सैन्यासह या किल्ल्यावर हल्ला केला होता. त्या वेळी कण्हेरगडाचे किल्लेदार रामजी पांगेरा हे होते. गडावर सुमारे सातशे मावळे होते. गडाला मोगल सैन्याने वेढा घातला होता. या वेढ्यावर अचानक हल्ला चढवण्याची व्यूहरचना किल्लेदार रामाजी पांगेरा यांनी आखली. मदतीची वाट पाहणे शक्य होते पण मदत वेढा भेदून आत येणे अशक्य होते. मोगल सैन्य संख्येने फार जास्त होते. या शिवाय किल्ला फार उंच नव्हता. त्यामुळे मोगल सैन्याचा वेढा पूर्ण होण्याच्या आत वेढा तोडणे आणि सैन्य उधळणे हा ही हेतू त्यात होता. तसे झाले तर पळत असलेल्या मोगल सैन्याची लांडगेतोड करता आली असती.
त्यामुळे पहाटेच्या अंधारात रामजी पांगेरा यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी मोगलांच्या भल्यामोठ्या सैन्यावर तुफान हल्ला केला. यावेळी फक्त ७०० मावळे रामजींसोबत होते. अचानक पडलेल्या छाप्याने मोगल सैन्य गोंधळले. सातशे मावळ्यांनी बाराशेच्यावर मोगल कापून काढले. पण तरीही संख्याबळाच्या जोरावर दिलेरखानाने पळणारे मोगल सैन्य थांबवले. मराठ्यांनी पराक्रमाची शिकस्त केली. संख्येने कमी असूनही मराठे तसुभरहि मागे हटले नाहीत. सुमारे तीन तास कण्हेरगडाच्या परिसरात हे घनघोर रणकंदन सुरू होते. रामजी आणि त्यांच्या मराठ्यांनी शौर्याची पराकाष्ठा केली. प्रतिहल्ला झाल्यावर कोणतीही कुमक शिल्लक नसल्याने मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राण दिले. सभासदाची बखर यात या लढाईविषयी लिहून ठेवलेले आहे, की "टिपरी जैसी सिमगीयाची दणाणते तैसे मराठे कडाडले.' सिमगीयाची म्हणजे शिमगा या सणात जशी टिपरी हलगीवर वारंवार कडाडते तसे मावळे तुटून पडले होते. त्यामुळे या किल्ल्यावर भर पावसात ट्रेक केल्यानंतर एक वेगळेच स्फुरण तनामनामध्ये दाटून येते.निश्चितच आपला समृद्ध ऐतिहासिक वारसा तसेच रणशूर परंपरा जाणून घेण्यासाठी अशा गड किल्ल्यांची सफर करायलाच हवी.
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एवढा समृद्ध ऐतिहासिक व घनघोर लढाईचा इतिहास,वारसा लाभलेला असूनदेखील या गडावर किंवा गडाच्या पायथ्याशी किंवा गड परिसरात कोठेही साधी रामजी पांगेरा यांच्या नावाची पाटी,स्मारक,एखादी वीरगळ अशा कुठल्याही प्रकारचा इतिहास दर्शवणारा पुरावा आपल्याला बघायला देखील मिळत नाही.हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीला समजण्यासाठी या गडावर किंवा गडाच्या पायथ्याशी अशा प्रकारचा संपूर्ण इतिहास व एक स्मारक गड परिसरात असणे खूपच आवश्यक आहे.
****************************
ट्रेकमधील सहभागी सदस्य :-
सचिनभाऊ गोसावी
सुहास कोळेकर सर
किशोरभाऊ अहिरे
भरतराव पवार
कैलासभाऊ तांदळे
शामभाऊ रसाळ
प्रशांतभाऊ करपे
*****************************
माहितीचे स्त्रोत :- स्थानिक ग्रामस्थ,गुगल,गाईड लांडगे,चामरलेणी ट्रेकर्स ग्रुप , माउंटन लव्हर्स ग्रुप नाशिक.
*****************************
काहि क्षणचित्रे















Comments