सातमाळ डोंगररांगेतील सर्वात मोठा- किल्ले अहिवंत
ज्याप्रमाणे पुणे जिल्हा हा शिवरायांचे वास्तव्य लाभलेल्या सर्वाधिक किल्ल्यांनी समृद्ध असलेला एक जिल्हा आहे त्याचप्रमाणे नाशिक मधील कळवण,चांदवड हे तालुकेदेखील वैविध्यपूर्ण,उंच,बलाढ्य,बेलाग अशा किल्ल्यांनी समृद्ध असेच तालुके आहेत.छोटे - मोठे धरून या ठिकाणी खूप सारे किल्ले आहेत तर साल्हेर सारखे जागतिक वारसा स्थळाच्या शर्यतीत असणारे किल्ले देखील येथेच आढळतात,हि निश्चितच नाशिककरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.
आमचा ग्रुप रविवारी शक्यतो अशा किल्ल्यांवरतीच ट्रेक ठरवतो ज्या ठिकाणी हौस किंवा फोटोग्राफीची गरज भागवण्यासाठी येणाऱ्या नवख्या युवकांची- युवतींची गर्दी नसते.शक्यतो दुर्लक्षित असणाऱ्या किल्ल्यांचा इतिहास माहीत करून घेऊन त्याच ठिकाणी ट्रेक ठरविण्याकडे आमचा कल नेहमीच राहिलेला आहे.या यादीतच कळवण तालुक्यामधील अहिवंत या किल्ल्याकडे आम्ही रविवारी मोर्चा वळवायचे ठरवले.सातमाळा डोंगररांगेमधील हा सर्वात मोठ्या आकाराचा किल्ला आहे.या किल्ल्याची चढाई देखील ट्रेकर्स मंडळींसाठी खुणावणारी आहे त्याच प्रकारे या किल्ल्याचे शिखर व पठार देखील तेवढेच विस्तृत आहे.अहिवंत किल्ला हा तत्कालीन काळामधील एक महत्त्वाचा किल्ला गणला जातो.या किल्ल्यावर आढळणाऱ्या गुहा,पाण्याचे टाके,वाड्यांचे अवशेष यांच्या समृद्धतेवरून हा किल्ला त्याकाळी महत्त्वाचा किल्ला होता हे लगेच लक्षात येते. अहिवंतच्या जवळ असणारा अचला व मोहनदर या दोन किल्ल्यांची निर्मितीच मुळात अहिवंत किल्ल्याच्या सुरक्षेसाठी करण्यात आली होती.यावरून अहिवंत किल्ला किती महत्त्वाचा होता हे लक्षात येते.
निजामशाहीच्या ताब्यात असणारा हा किल्ला मुघल बादशहा शहाजहानने त्याचा प्रमुख सरदार शाहिस्तेखानाच्या मदतीने जिंकून घेतला.या कामी शाहिस्तेखानाने अलावर्दीखान या प्रमुख सरदाराची नेमणूक केली होती.या परिसरातील प्रमुख १८ किल्ले अलावर्दीखानाने जिंकून घेतले होते व त्या सर्व किल्ल्यांवरती त्याने फारसी लिपीमध्ये एक शिलालेख गडाच्या मुख्य कमानी जवळ करून ठेवलेला आपल्याला आजही बघायला मिळतो. त्यानंतर इसवीसन १६७० मध्ये शिवरायांनी मुघल बादशाह औरंगजेबाकडून हा किल्ला जिंकून घेतला होता.हा किल्ला तेव्हा संतापलेल्या औरंगजेबाने परत मुघल साम्राज्यात शामील करण्याची जबाबदारी महाबतखान व दिलेरखान या सरदारांवर नेमली व त्यांना अहीवंतगड जिंकून घेण्याच्या मोहिमेवर पाठवून दिले. या दोन्ही मुघल सरदारांनी पुढील व मागील बाजूने गडाला तीव्र कडक वेढा घातला परंतु चिवट मावळ्यांनी एक संपूर्ण महिनाभर तीव्र लढा दिला.
याबाबतची ज्योतिषाची व मुंगळ्याची एक दंतकथा खूप प्रसिद्ध आहे.असे सांगण्यात येते की मुघलांच्या छावणीमध्ये एके दिवशी एक ज्योतिषी आला.त्या ज्योतिषाला दिलेरखान व महाबतखान यांनी विचारले की किल्ला कधी ताब्यात येईल तेव्हा त्याने आपल्या पोतडीतून साखर बाहेर काढली व त्या साखरेपासूनच त्याने अहिवंत गडाची प्रतिकृती तयार केली.त्या प्रतिकृतीमध्येच त्याने दिलेरखान व महाबतखानाचे मोर्चे सांभाळलेली जागा देखील दाखवली.नंतर त्या ज्योतिषाने आपल्या पोतडीतील एका छोट्या डबीमधून मुंगळादेखील बाहेर काढला.तो मुंगळा त्याने साखरेच्या अहिवंत गडावर सोडला,तर तो मुंगळा पहिल्यांदा महाबतखानाच्या मोर्चा दाखविलेल्या जागेकडे गेला व तिथून तो दिलेरखानाच्या मोर्चाकडे जाऊन मग तो महादरवाज्यातून आत आला,यावरून ज्योतिषाने असे भविष्य कथन केले की अहिवंतगडावर येत्या सहा दिवसानंतर महाबतखानाकडून जोरदार मोर्चा चढविला जाईल,परंतु दिलेरखानाकडून हा किल्ला ताब्यात येईल व झाले देखील तसेच ! ही भविष्यवाणी सहा दिवसानंतर खरी ठरली व महाबतखानाच्या माऱ्यापुढे चिवट मावळ्यांनादेखील शरणागती पत्करावी लागली,कारण गडावरील दारूगोळा तसेच अन्नधान्य,भांडार संपत आलेले होते.त्यामुळे सर्व मावळ्यांना सही सलामत गडावरून खाली जाऊ देण्याच्या अटीवर मावळ्यांनी गड सोडण्याचे ठरविले परंतु त्यांना माहीत होते की महाबतखानाचा मारा तीव्र आहे त्यामुळे त्यांनी दिलेरखानाकडे दूत पाठवून अशी विनंती केली व गड मुघलांच्या स्वाधीन करून दिला. यानंतर बराच काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता.परंतु या परिसरातील किल्ल्यांप्रमाणेच सन १८१८ साली हा किल्लादेखील ब्रिटिशांच्या अखत्यारित गेला.
बेस् व्हिलेज असलेल्या दरेगावातून ट्रेक सुरू केल्यानंतर अहिवंत किल्ल्याचा आकार घोड्याच्या नाले प्रमाणे दिसतो. मोठ्या वाड्याचे भग्न अवशेष, पाण्याची लहान मोठ्या आकाराची टाकी, गडाच्या विस्तीर्ण पठाराच्या खालोखाल असणाऱ्या मोठमोठ्या गुहा, कातळात कोरलेल्या पायऱ्या, शेजारील बुध या डोंगरावरील असणारे बुरुज, गडावरील मारुतीचे व सप्तशृंगी देवीचे,खंडेरायाचे प्राचीन मंदिर,जुना तलाव व जुन्या कोठाराचे अवशेष इत्यादी या गडावरील पाहण्यालायक वास्तू आहेत.
गडाच्या पठारावरील खालील बाजूने असणाऱ्या गुहा या पठाराच्या खालील बाजूस कोरलेल्या असल्यामुळे त्या खालून दिसणे शक्य नाही.या गुहांच्या जवळ उतरण्यासाठी पायऱ्या होत्या परंतु आता त्यांची झीज झाल्यामुळे तेथे उतार आहे त्यामुळे या गुहांमध्ये उतरताना जरा जपूनच उतरावे लागते.या गुहांमधून आजूबाजूच्या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे सहज शक्य आहे. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी दोन ते अडीच तासांचा वेळ लागू शकतो. दरे गावातून गाईड घेतला तर अधिक उत्तम राहील.किल्ल्याच्या शिखरावरून अचला,मोहनदर,धोडप,रावळ्या-जावळ्या,मार्कंड्या सहज दिसून येतात.
नाशिक वरून सप्तशृंगी देवीसाठी प्रसिद्ध असलेल्या वणी वरून कळवण मार्गाने दरेगावकडे जाता येते.नाशिकपासून या किल्ल्याचे एकेरी अंतर ६६-७० किलोमीटर पडते. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची सुमारे ४०२४ फूट इतकी आहे. दरेगाव तसेच अहिवंतवाडी या दोन मार्गांनी या किल्ल्यावरती चढाई करता येते.यापैकी दरेगावकडून जाणारा मार्ग अतिशय रुंद आहे तर अहिवंतवाडीकडून जाणारा मार्ग तुलनेने छोटा आहे.गडावर गुहा असल्या तरी त्या मुक्काम करण्या लायक नाहीत तसेच गडावर कायमस्वरूपी पिण्याचे पाणी नसल्यामुळे गडावर शक्यतो मुक्काम करणे सोयीस्कर नाही परंतु शेजारील वणी गावात किंवा दरेगाव,अहिवंतवाडी गावात मुक्कामाची सोय व घरगुती जेवणाची सोय होऊ शकते.
आम्ही भल्या पहाटे नाशिक मधून निघालेलो होतो.ट्रेक शक्यतो आम्हाला दिवस उगवताना सुरू करायचा होता कारण ऑक्टोबर हिटच्या झळा खूप तीव्र लागत होत्या.दिलेल्या अगदी अचूक वेळेत सगळी मंडळी नाशिकला एकत्र जमा झालो व बेस् व्हिलेजला पोचून वेळ न दवडता ट्रेक लगेचच सुरु केला. बेस व्हिलेज असलेल्या दरेगावकडे जाणाऱ्या वाटेवर रस्त्याच्या डाव्या बाजूला गाडी लावून अहिवंत किल्ल्याच्या पाठभिंतीने आम्ही चढाई सुरू केली.अगदी सुरुवातीपासूनच चढाई उभी होती.पुढे जाऊ तसतशी ही चढाई सुसह्य होत गेली.अहिवंत गडाची चढाई कमी असली तरी या किल्ल्याचे पठार खूपच रुंद,विस्तृत व मोठे आहे.साधारणपणे २५-३० मिनिटांच्या चढाईनंतर आपण लगेचच गडाच्या विस्तीर्ण पठाराच्या अलीकडे असणाऱ्या खांबटाकी गुहेपाशी प्रथम येऊन पोहोचतो.त्याच ठिकाणी जुन्या बुरुजांचे अवशेष देखील आहेत.या ठिकाणी सैनिकांच्या देवड्यांसाठी या गुहांची निर्मिती करण्यात आलेली असावी.या गुहांच्या डाव्या बाजूने आता सध्या रेलिंग लावलेले आहेत.या रेलिंगच्या काठाकाठाने आपण गडाच्या पठारावर जाऊ शकतो.याच रेलिंगच्या डाव्या बाजूने खालच्या बाजूला उतरणाऱ्या काही रेलिंग लावल्या आहेत,तेथून देखील एक मार्ग खालील गावामधून गडावरती येऊन पोहोचतो.सुरुवातीलाच लागणाऱ्या या खांबटाकी गुहा २० माणूस आरामात मावतील इतक्या मोठ्या व आजही भक्कम आहेत.या गुहांमधून समोरच्या परिसरावर लक्ष ठेवणे सोपे जाते.काहीशा दुर्लक्षित असल्यामुळे या गुहांमध्ये मुक्काम करणे तितकेसे सोयीस्कर नाही.गुहा पाहून पुढे गेल्यानंतर गडाच्या पठारावर पोचल्यानंतर आपण या गडाचा घोड्याच्या नालेसारखा " U " आकार अनुभवू शकतो.थोडेसे अंतर पुढे चालत गेले की एक विशाल पाण्याचे टाके आपल्याला लागते.या टाक्यापासूनच पुढे चालत गेले की गडाचे मुख्य प्रवेशद्वार व कातळ कोरीव पायऱ्या आपल्याला लागतात.पावसाळ्यामध्ये वाहत्या पाण्यामुळे व दलदलीमुळे या पायऱ्यांवरती तीव्र शेवाळ असते.त्यामुळे येथे चालताना खबरदारी घ्यावी.
मुख्य प्रवेशद्वारापासून वरती आल्यानंतर गडाच्या पठारावरून डाव्या बाजूने चालत असताना बरेचसे अंतर पुढे चालत गेल्यानंतर गडावरील सप्तशृंगी देवीची व मारुतीची दगडात कोरलेली मूर्ती व छोटेखानी मंदिर आपल्याला बघायला मिळते.
या मंदिराच्या जवळच कमान व वाडा सदृश्य बांधकामांचे जीर्ण अवशेष देखील बघायला मिळतात.येथून जसजसे पुढे जाऊ तसतसे जुन्या पडक्या वाड्यांचे अवशेष जागोजागी आपल्याला दिसतात.याचाच अर्थ लष्करी व सामरीदृष्ट्या गड महत्वाचा होता.याच ठिकाणी मोठ्याल्या आकारातील तळी देखील दिसतात व येथून आपण सप्तशृंगी गडाच्या दिशेने पठारावरून पुढे चालत गेले असता अत्यंत उभ्या अशा बुधल्या किंवा बुधा या सुळक्यापाशी येऊन पोहोचतो.
अहिवंत गडावरून बुधावर किंवा बुधावरून अहिवंत गडावर येण्यासाठी छोटी खिंड वजा वाट आहे.ही वाट अगदी ८५ अंशात उभी असून येथे चढणे जिकीरीचे आहे.त्यामुळे आपण गड चढण्यास सरावलेले असाल,आपल्याकडे दोर व पायामध्ये उत्तम प्रतीचे शूज असतील तरच आपण अहिवंत उतरून बुधल्या सुळक्यावरती चढावे.अहिवंत उतरणे व बुधल्या सुळक्यावर चढणे हा एक उत्तम प्रतिचा थरारक अनुभव आहे.ट्रेकचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर निश्चितच बुधल्या सुळक्यावरती चढावे.बुधल्याकडे जाण्यासाठी अहिवंत उतरतानाच्या पायऱ्या देखील ८० अंशात उभ्या असल्यामुळे तेथेदेखील विशेष खबरदारी घ्यावी.या पायऱ्या उतरल्यानंतर आपण बुधल्या व अहिवंत या दोन्हींच्या मध्ये असणाऱ्या चिंचोळ्या खडकांवरती येऊन पोहोचतो.येथून दिसणारा नजारा मनाला आनंदित करून टाकतो व समोर दिसणारा उभा बेलाग बुधल्या सुळका आपल्याला त्यावर मोहीम सर करण्यासाठी खुणावत असतो.
बुधल्यावर चढण्यासाठी सुरुवातीच्या दोन ते तीन पायऱ्या आता तेथे नाहीत त्यामुळे चढताना तिथे सुरुवातीला कसरत होते.एकमेकांच्या आधाराने आम्ही वरती चढून गेलो.बुधल्याच्या कड्यावरती एक टेहळणी बुरुज देखील बांधलेला आम्हाला बघायला मिळाला व बुधल्या कड्याच्या शिखरावरती तीन मोठमोठ्या आकाराची पाण्याची टाकी देखील होती हे बघून खूप आश्चर्य वाटते की इतक्या उभ्या कड्यावर इतक्या मोठ्या आकाराची पाण्याची टाकी व टेहळणी बुरुज बांधला आहे.याअर्थी या बुधल्या कड्याचे त्यावेळी संरक्षणदृष्ट्या खूप महत्व निश्चितच होते.बुधल्याचा सुळका सर केल्यानंतर आम्ही पुन्हा त्याच वाटेने खाली कसरत करत उतरून आलो व पुन्हा अहिवंताच्या ८० अंशातल्या पायऱ्यात चढून पुन्हा अर्धा अहिवंत पाहण्याकडे वळलो.
बुधल्या करून आल्यानंतर अहिवंत चढलो व पुन्हा एकदा बुधल्या सुळक्याकडे मन भरून पाहून घेतलं.बुधल्याची अतिबिकट चढाई,तेथील बांधकाम केवळ या गोष्टी बघूनच त्या काळातील प्रकर्षाने कराव्या लागलेल्या संघर्षाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.अहिवंतला अर्धा वळसा आमचा झालेलाच होता.अर्ध्या भागातून पुढे गेल्यानंतर पुन्हा लोखंडी रेलिंग लागतात.या ठिकाणी अहिवंतचा तीव्र उभा उतार आपल्या नजरेत भरतो.या तीव्र उताराच्याच एका बाजूला रेलिंगच्या खाली असणारी भल्या मोठ्या आकाराची गुहा आम्हाला बघायची होती.या गुहेतून दिसणारा नजारा व गडाच्या वरतून दिसणारी गुहा हे देखील एक विलक्षण दृश्य होते.गडाच्या पठाराच्या खडकाखालील बाजूस या गुहा कोरल्या असल्यामुळे वरतून सहजासहजी या गुहा दिसतच नाहीत.पठारावरून या गुहेत उतरण्यासाठीची वाट थोडीशी निसरडी आहे.पाय घसरला तर सरळ खालील उभ्या कड्यावरून आपला कपाळमोक्ष होऊ शकतो.त्यामुळे पठारावरून गुहेत उतरताना जराशी काळजीच घ्यावी.या गुहा देखील अत्यंत काळजीपूर्वक अशाच बांधलेल्या दिसून येतात.या गुहांमध्ये देखील दोन ते तीन प्रकारचे वेगवेगळे कंपार्टमेंट बनवलेले दिसून येतात.तसेच या गुहेत एक मध्यम आकाराचे पाण्याचे टाकेदेखील कोरलेले आढळते.गुहेमध्ये खांबांचे देखील बांधकाम झालेले असावे परंतु आता तेथे फक्त छताजवळचेच अवशेष शिल्लक आहेत.या अतिविशाल गुहेमधून समोरच्या संपूर्ण प्रांतावर लक्ष ठेवणे सहज शक्य जाते.
ही गुहा देखील या आहिवंतगडाचे एक आकर्षणच म्हणावे लागेल.या गुहेच्या जवळपासच्या सर्वच डोंगरांवरती धबधबे विपुल प्रमाणात बघायला मिळतात.गुहा पाहून,मनसोक्त फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी करून,पेटपूजा करून व हे दृश्य डोळ्यात साठवून आम्ही पुढील भागाकडे वळलो.
या विशाल गुहेच्या पठाराच्या वरच्या बाजूने पुढे चालत गेले असता येथे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर लागते,जे इतरत्र कोठेही बघावया मिळत नाही,ते म्हणजे "बाळंतीण देवीचे मंदिर व गंधकाचे गरम पाणी असलेले कुंड".अशी आख्यायिका सांगितली जाते की या "बाळंतीण देवीला मूल होत नसलेल्या जोडप्यांनी नवस केला असता त्यांना अपत्य प्राप्ती होते " तसेच येथील गंधकाच्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान केल्याने विविध प्रकारचे त्वचारोग नाहीसे होतात.या बाळंतीण देवीच्या मंदिरात जवळपासच्या गावांमधून मोठ्या प्रमाणावर भाविक-भक्त येऊन नमस करतात व नवसपूर्तीदेखील करतात.बाळंतीण देवीची मूर्ती व हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर हे या गडावरील एक वेगळी बाबच ठरेल.हे मंदिर पाहिल्यानंतर गडावरील सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी आमच्या पाहून झाल्या होत्या व तिथून आम्ही गड उतरण्यास प्रारंभ केला.निश्चितच,अहिवंत गड व बुधल्या सुळका हा ट्रेकर्सना एक खरोखर विलक्षण अनुभव ठरू शकतो.
नेहमीप्रमाणेच हा रविवारदेखील ऐतिहासिक आठवणींनी समृद्ध करून जसे काही टाईम ट्रॅव्हल करून आल्यासारखे तत्कालीन इतिहास चवीने चघळत व त्याच रंगारंग गप्पा करत आम्ही परतीच्या मार्गाकडे लागलो,मनामध्ये परत पुढच्या रविवारचे वेध सुरूच होते.
**********************************
किल्ले अहिवंत येथील ट्रेकचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टच करा.
बुधल्या कडा संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी येथे टच करा.
**********************************
किल्ले अहिवंत ट्रेकमधील सहभागी सदस्य :-
पोपटराव सोनवणे साहेब
सचिनभाऊ गोसावी
श्यामराव रसाळ
बाळासाहेब बेळगावकर
सुहास कोळेकर सर
**********************************
काहि इतर क्षणचित्रे
***********************************



































Comments