किल्ले अहिवंत चा राखणदार- किल्ले मोहनदर ऊर्फ शिडका किल्ला
जिवनमें यह अमर कहानी,
अक्षर अक्षर गढ लेना...
और शौर्य कभी सो जाए तो-
मराठा साम्राज्य पढ लेना |
छ्त्रपती शिवरायांच्या युद्धनीती, कूटनीतीबद्दल बोलावे तितके कमीच आहे.शिवरायांच्या गड किल्ल्याच्या निर्मितीबाबत तसेच या प्रत्येक गडावरील इंजीनियरिंगबाबत बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी माहित आहेत व या माहीत असलेल्या गोष्टी आपणा सर्वांना अचंभित करणाऱ्याच आहेत.जसे की,"सर्वात उंच गडमाथ्यावर विपुल प्रमाणात पाण्याची सोय करणे,गुप्त वाटांची जागा हेरून ठेवणे शत्रूला चकवा देण्यासाठी तोशीस करून ठेवणे,इ".केवळ आणि केवळ याच कारणामुळे शिवराय स्वराज्य निर्मिती करू शकले व स्वराज्य टिकवून देखील ठेवू शकले.त्यामुळेच ते प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनले.आज देखील छत्रपती शिवराय आपल्या सर्वांसाठी यामुळेच प्रेरणादायी आहेत.छत्रपती शिवरायांनी दूरदर्शीपणा वेळेत दाखवत अनेकविध गड किल्ल्यांची,टेहळणी बुरुजांची जागोजागी निर्मिती केली."प्रमुख गडांच्या सुरक्षेसाठी त्यांनी आसपासच्या डोंगरांवरती विपुल प्रमाणात किल्ले,बुरुज,टेहेळणी नाके बनवून तो गड शत्रूच्या हाती कसा पडणार नाही याची कडेकोट सोय ठेवलेली दिसून येते."
"याच श्रृंखले मधील एक म्हणजे किल्ले मोहनदर उर्फ शिडका किल्ला".सुप्रसिद्ध सप्तशृंगी देवीच्या वणी गडाकडे जातानाच डाव्या हाताला उंच डोंगराच्या भिंतीला मधोमध एक भले मोठे खिंडार पडलेले दिसते.हाच तो मोहनदर उर्फ शिडका किल्ला.मुख्य रस्त्यावरून जाताना हे खिंडार पाहून प्रत्येकाला नवल वाटते की या खिंडारामध्ये कसे पोहोचता येत असावे.बऱ्याच जणांना याची कल्पना देखील नाही की हा एक संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावलेला किल्ला आहे.मोहनदर किल्ला प्रामुख्याने अहिवंत किल्ल्याच्या सुरक्षेसाठी व एक प्रकारे बॅकअप साठी म्हणून बनविण्यात आलेला किल्ला होय.आजूबाजूच्या परिसरावर टेहळणी करण्यासाठी,मुघलांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी मोहनदर किल्ल्याची निर्मिती केली गेलेली होती.मोहनदर किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ३९०० फूट इतकी आहे.
दूरवरून अगदी ठसठशीतपणे दिसणारे या गडाच्या भिंतीला पडलेले नेढे कोणाच्याही नजरेत सहज भरते व एक उत्सुकता निर्माण करते.या नेढ्यामधूनच वरती गडमाथ्याला नेढ्याच्या पूर्व बाजूने जाता येते.मोहनदर किल्ल्याच्या याच नेढ्याबद्दल एक दंतकथा फारच रंजक आहे.असे सांगितले जाते की महिषासुर व त्याचे दोन भाऊ असलेले असूर यांनी आसपासच्या परिसरामध्ये उच्छाद मांडलेला होता.त्यांना शासन करण्यासाठी,त्यांचा वध करण्यासाठी सप्तश्रूंगी देवी अक्राळ-विक्राळ रूप घेऊन त्यांच्या मागे निघालेली होती.अशावेळी मोहनदर डोंगराच्या मागील बाजूस महिषासुर रेड्याच्या रूपामध्ये पळाला.तेव्हा त्याला पकडण्यासाठी,मारण्यासाठी देवीने विराट रूप घेऊन या मोहनदर डोंगरास लाथ मारलेली होती.त्यामुळे ते भगदाड/नेढे पडले अशी सुप्रसिद्ध आख्यायिका आहे.
एका सुस्थितीतील किल्ल्यावर असायला हवेत तेवढे अवशेष आजदेखील मोहनदर किल्ल्याच्या गडमाथ्यावरती आहेत.पाण्याचे टाके,टेहळणी बुरुज,तटबंदी व इतर जीर्ण अवशेष माथ्यावर आपल्याला बघायला मिळतात.
नाशिक वरून दिंडोरी,वणी मार्गे अंदाजे ६६ ते ७० किलोमीटर आल्यानंतर सप्तश्रुंगी वणी गडाच्या समोर असणाऱ्या मोहनदरी या गावामधून आपल्याला ट्रेक चालू करता येतो.मोहनदरी या गावांमधून सरळसोट उभी चढाई करत साधारणतः अर्ध्या तासानंतर आपण मोहनदर किल्ल्याच्या सुप्रसिद्ध नेढ्यामध्ये पोहोचतो.गडाच्या भिंतीपासून नेढ्यापर्यंत जाण्यासाठी लोखंडी शिडी लावण्यात आलेली आहे.गडाची चढाई कमी असली तरी ती दमछाक करायला लावणारीच आहे.नेढे अत्यंत विस्तृत असून रुंदीला जास्त असल्यामुळे नेढ्यामध्ये आरामात बसून आजूबाजूचा परिसर आरामात न्याहाळता येतो.नेढे म्हणजेच ऊन,वारा,पाऊस यामुळे डोंगराच्या भिंतीला आरपार पडलेले मोठे भगदाड किंवा छिद्र होय.या नेढ्यामुळे खिडकी प्रमाणे डोंगराच्या किंवा किल्ल्याच्या दोन्ही बाजूसचा परिसर न्याहाळता येतो.आपणाजवळ ड्रोन असेल तर या ठिकाणी उत्तम उत्तम शॉट्स घेता येतात.नेढ्या मधून आसपासच्या गडकिल्ल्यांचे हि आरामात दर्शन होते.नेढ्याच्या पूर्व बाजूने संपूर्ण डोंगराला वळसा घातल्यानंतर मागच्या बाजूच्या वाटेने आपल्याला गडमाथ्यावर पोहोचता येते.गडमाथ्यावर भगवा डौलाने फडकताना दिसतो तसेच गडमाथ्यावरील विविध जीर्ण अवशेष आपण बघू शकतो.
मोहनदरी गावामध्ये पोहोचल्यानंतर आश्रमशाळेच्या बाजूला गाडी लावून आश्रमशाळेच्या डाव्या बाजूनेच आम्ही गड चढायला सुरुवात केली.गडाची चढाई जरी जास्त वेळ लावणारी नसली तरी ती अंगावर येणारी उभी चढाई आहे त्यामुळे दमछाक निश्चितच होते.त्यातल्या त्यात गवत भरपूर प्रमाणात उंच वाढलेले असल्यामुळे रुळलेली पायवाट दिसेनाशी होते.अशावेळी मळलेल्या पायवाटा धुंडाळत आपल्याला जावे लागते.एखादा गाईड सोबत असेल तर अधिकच उत्तम ! गडाच्या पश्चिमेकडून आम्ही गड चढायला सुरुवात केली व सर्वात आधी गडाच्या शिखरावरती पोचून तेथील अवशेष पाहिले.इतक्या बिकट व अरुंद जागेमध्येदेखील इतक्या उत्तम प्रकारची सुरक्षा प्रणाली त्याकाळी मावळ्यांनी-छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीने उभी केली याचं निश्चितच नवल वाटते व आपण त्यांना नतमस्तक होतो.गडमाथा व अवशेष पाहिल्यानंतर आम्हि सोबत आणलेले डबे सोडून यथेच्छ पेटपूजा केली.
सर्वप्रथम गडमाथा पाहिल्यानंतर खाली नेढ्याकडे वळलो.गडमाथ्यावरून नेढ्याकडे जाणारी वाटदेखील बिकटच होती.एकतर प्रचंड वाढलेले गवत व त्यामुळे झाकलेली उरली सुरली मळलेली पायवाट त्यातच गड माथ्याच्या आजूबाजूने फिरणाऱ्या वानरांचा उच्छाद ! सोबतच गडाच्या भिंतीला असणारे मोठमोठ्या आकाराचे आगेमोहोळ यामुळे अगदी शांततेत आवाज न करता एकमेकांना खाणाखुणांनी सुचवतच नेढ्याकडे आमची वाटचाल चालू होती.पायाखालील वाट अगदी चिंचोळी असून तीव्र उभा उतार असल्यामुळे जीवाचा धोका निश्चितच होता त्यातच गवताखालून एखादा सर्प वगैरे येईल याची देखील भीती कायम होती.तरीही सगळी निडर मंडळी नेढ्याला समोर ठेवून वाटचाल सुरू होती. सरतेशेवटी आम्ही नेढ्यात पोहोचलोच.नेढ्याचे दृश्य पाहून निश्चितच प्रत्येकजण विस्मयचकित झालेला होता इतके प्रचंड हे नेढे होते.नेढ्यामध्ये चढण्यासाठी मजबूत लोखंडी शिडी होती.त्या शिडीवरून चढून प्रत्येकाने नेढ्यातून समोर दिसणाऱ्या विशाल दृश्याचा आनंद घेतला परंतु ते नेढे जसे काही आम्हाला स्वर्गाच्या द्वाराप्रमाणेच भासत होते.नेढ्याच्या वरच्या बाजूला प्रचंड प्रमाणात मोठ्या मोठ्या आकाराचे खूप संख्येने आगेमोहोळ असल्यामुळे आमच्या सर्वांचा संवाद लष्कराप्रमाणे केवळ खानाखुणांवरच अवलंबून होता.आम्ही आमचे मोबाईल देखील सायलेंटला लावून घेतलेले होते कारण नुकताच शितकड्यावर मधमाश्या चावल्यामुळे झालेला प्रसंग आमच्या डोळ्यासमोर होता आणि हा धोका पत्करायला आम्ही तयार नव्हतो कारण पळण्यासाठी जागा देखील नव्हती व पायाखालची वाट देखील पळण्याजोगी नव्हती,तरीसुद्धा नेढ्यामध्ये पुरेपूर वेळ आम्ही घालविला.मनभरून नेढे,डोंगर,आजुबाजुचा प्रांत बघून घेतला.यथेच्छ फोटो-व्हिडिओ काढून घेतले व आम्ही नेढ्याचा निरोप घेऊन पूर्व बाजूने डोंगर डाव्या हाताला राहील अशा दिशेने किल्ला उतरायला सुरुवात केली.किल्ला उतरताना आम्ही कमीत कमी १५ ते २० वेळा तरी मागे वळून वळून परत परत ते नेढे पाहतच होतो इतकी त्या नेढ्याची मोहिनी आमच्यापैकी प्रत्येकाच्या मनावर होती.साधारणपणे अर्ध्या तासानंतर परत आम्ही उतरून आमच्या गाडी जवळ पोहोचलो व परतीच्या वाटेला लागलो ते या निर्णयाची झिंग मनामध्ये ठेवूनच !
ट्रेक करण्यासंदर्भात बरेच मतप्रवाह समोर येतात.त्यातील काही सकारात्मक तर काही नकारात्मकता दर्शवतात.मी तर ह्या मताचा आहे की ट्रेक का करावे तर आपल्याला हे मराठीपण सहजासहजी मिळालेले नाही.यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे.खूप सार्या शूरवीरांनी यासाठी बलिदान दिलेले आहे.ज्ञात - अज्ञात अशा कित्येक मावळ्यांनी प्रत्येक गड किल्ल्यावर थोडे का होईना परंतु आपले रक्त सांडलेले आहे,श्रम वाहिलेले आहेत,त्या शिवशंभूच्या चरणी- छत्रपती शिवरायांच्या चरणी तसेच स्वराज्याच्या चरणी आपले कुटुंब,मूलबाळ,पत्नी,नातेवाईक,आपले घरदार या सर्वांवर तुळशीपत्र ठेवून स्वार्थाला,सर्व प्रकारच्या सुखांना,आरामदायी आयुष्याला तिलांजली दिलेली आहे.तुमच्या - माझ्या घरातील स्वातंत्र्य असो,सण-उत्सव साजरे करण्यामागील आनंद असो,महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन म्हणून आपल्या वाडवडिलांचे नाव-आडनाव लावण्यामागील आनंद असो किंवा आपल्या देवी-देवतांची आपल्या मनाप्रमाणे धार्मिक अधिष्ठाने-विधी पूर्ण करण्यात मिळणारा आनंद असो या सर्वांसाठी आपल्या शूरवीर मावळ्यांनी केलेल्या कष्टाला,वाहिलेल्या श्रमाला,त्यागलेल्या स्वार्थाला तसेच भोगलेल्या अगणित हाल-अपेष्टेला सीमा नाहीत.त्यामुळे सर्व सुखे भोगत असलेले आपण किमान एवढं तरी करू शकतो की त्यांनी जे साम्राज्य उभे केले त्या साम्राज्याच्या जीर्ण अवशेषांना जाऊन आपण पाहू तरी शकतो व तेथे नतमस्तक होऊन आपली श्रद्धा-निस्वार्थ भावना अर्पण करून त्यांच्या कष्टाला-बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करू शकतो.किमान एवढे तरी आपण निश्चितच करू शकतो,यासाठीच आपण जमेल तसे,जमतिल तितके ट्रेक करायलाच हवेत.(ता.क.- हे विचारदेखील किल्ले मोहनदरच्याच नेढ्यात सुचलेत !)
*********************************
मोहनदर किल्ल्यावरील ट्रेकचा संपूर्ण सविस्तर मार्गदर्शक व्हिडीओ पाहण्यासाठी येथे टच करा.
**********************************
ट्रेकमधील सहभागी सदस्य :-
सचिनभाऊ गोसावी
शामराव रसाळ
कृष्णाजी वळवी
सुहास कोळेकर सर
**********************************
काहि इतर क्षणचित्रे
************************************
























Comments