शिवरायांवर गर्भसंस्कार झालेला किल्ले माहुली
महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांच्या गड- किल्ल्यांना खूप महत्त्व आहे.त्यातच ज्या किल्ल्यांवर शिवरायांचे प्रत्यक्ष वास्तव्य राहिलेले आहे किंवा ज्या किल्ल्यांवर शिवरायांच्या नेतृत्वामध्ये लढाया किंवा मोहिमा झालेल्या आहेत तसेच ज्या किल्ल्यांवर शिवरायांनी प्रत्यक्ष भेटी दिलेल्या आहेत असे किल्ले तर शिवप्रेमींसाठी तसेच ट्रेकर्ससाठी नव्हे तर उभ्या महाराष्ट्रासाठी दैवतांपेक्षा कमी नाहीत. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा गडकिल्ल्यांवरती महाराष्ट्राची जनता गर्दी करते ते केवळ उभ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजेच छत्रपती शिवरायांचे सानिध्य अनुभवण्यासाठी,त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी,तेथील प्रसंग जिवंतपणे अनुभवण्यासाठी...
वर उल्लेख केलेच आहे की खूप कमी गड-किल्ल्यांना शिवरायांचे प्रत्यक्ष वास्तव्य लाभले किंवा पदस्पर्श लाभला.बोटांवर मोजण्या इतक्या काही गड-किल्ल्यांमध्येच याही गडाचा उल्लेख होतो तो म्हणजेच तालुका शहापूर,जिल्हा ठाणे येथील किल्ले माहुली ! स्वराज्याच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या अस्तित्वात माहुली किल्ल्यास अनन्य साधारण महत्त्व आहे.त्यास कारण देखील तसेच आहे.आपल्या सर्वांना माहितीच आहे की शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला होता. परंतु हे फार थोड्या लोकांना माहित आहे की शिवजन्मापूर्वी गरोदर असलेल्या राजमाता जिजाबाई या काही काळ या माहुली किल्ल्यावरच वास्तव्यास होत्या. निजामशाहीच्या काळामध्येच स्वराज्य स्थापनेच्या धामधुमीतच एक दुर्दैवी घटना घडली की ज्यामुळे छत्रपती शहाजीराजांना जिजाबाईंना माहुली किल्ल्यावर तात्काळ हलवावे लागले होते. अहमदनगरच्या निजामशहाने भर दरबारात राजमाता जिजाबाईंचे वडील म्हणजेच लखोजीराजे जाधव यांची निर्घृणपणे हत्या घडवून आणली होती. साहजिकच हा शहाजीराजांना तसेच जिजामातांना देखील धोका होता. तशातच राजमाता जिजाबाई या गरोदर असल्यामुळे छत्रपती शहाजीराजे हा धोका स्वीकारण्यास तयार नव्हते त्यामुळेच जिजाबाईंच्या वास्तव्यासाठी शिवनेरी किल्ला तयार होईस्तोवर काही काळापुरते त्यांना शहाजीराजांनी स्वतः जातीने किल्ले माहुली येथे आणून ठेवले होते. म्हणजेच थोडक्यात असे म्हणायला हरकत नाही की स्वराज्य स्थापनेचे गर्भसंस्कार छत्रपती शिवरायांवर माहुली किल्ल्यापासूनच होण्यास सुरुवात झाली होती. राजमाता जिजाबाईंना माहुली किल्ल्यावर आणून ठेवल्याचे कळाल्यानंतर निजामशहाने या किल्ल्याकडे मोर्चा वळवला व युद्ध व बरीचशी आक्रमणे येथे चालू झाल्यामुळे पुन्हा येथील मुक्काम हलवून शिवनेरीवर गरोदर जिजाबाई जाऊन वास्तव्य करू लागल्या. व शिवाई देवीच्या आशीर्वादाने तेथेच शिवजन्म घडला. यवनांच्या तावडीतून महाराष्ट्राला मुक्ती देणारा, सुराज्य-स्वराज्याचे स्वप्न दाखवून नवचेतना पेटविणारा युगपुरुष म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. जन्मापूर्वीचे हेच वास्तव्य माहुली किल्ल्यावर लाभल्यामुळे हा किल्ला देखील उभ्या महाराष्ट्राचे आराध्य आहे. तसेच पुण्यातील विस्कटलेली घडी बसविण्यासाठी राजमाता जिजाबाई शिवनेरी वरून निघाल्यानंतर बाल शिवाजी सोबत परत काही काळ याच माहुली किल्ल्यावर वास्तव्यास असल्याचे दाखले देखील मिळतात.त्यामुळे देखील या किल्ल्याबद्दलचे आकर्षण नेहमीच वाटत राहिले होते.आणि अशातच थरारक आणि उल्लेखनीय ट्रेकिंग साठी सुप्रसिद्ध असलेला,ताज्या दमाच्या हरहुन्नरी ट्रेकर्सची रेलचेल असलेला जल्लोष ट्रेकिंग ग्रुपच्या सोबत माहुली किल्ल्यावर माझा ट्रेक अखेर निश्चित झाला. ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची व उत्साहाची बाब होती. कधी एकदा रात्र सरते व या किल्ल्यास भेट द्यायला निघतो येथील सगळी ऐतिहासिक ठिकाणे,येथील पावन भूमी बघतो असेच झाले होते.
महाराष्ट्राच्या इतिहासातील अपरिचित स्थळे, पुसला गेलेला इतिहास,सहसा इतरांसाठी विस्मरणात गेलेली परंतु ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असलेली ठिकाणे, शारीरिक क्षमतेचा कस पाहणारे ट्रेक आयोजित करण्यासंदर्भात जल्लोष ग्रुप चा पुढाकार होता हे मी यापूर्वी ऐकून होतो. या ट्रेकच्या निमित्ताने तो प्रत्यक्ष मला अनुभवायला देखील मिळाला.आणि निश्चितच हा अनुभव मला समृद्ध करून जाणाराच होता.सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे नियोजन अगदी काटेकोर तंतोतंत व कुठलीही कसर न राहू देणारे असेच होते.ग्रुपमधील सगळे ट्रेकर्स देखील एकमेकांच्या साथ -संगतीने चालणारे,वागणारे,एकमेकांशी मिळून -मिसळून राहणारे असेच होते. रविवारी नाशिकमधून भल्या पहाटेच आम्ही माहुली किल्ल्याकडे कूच केली. आमच्या दोन वाहनांमध्ये मिळून एकूण आम्ही 12 शिवभक्त ट्रेकर्स होतो. नाशिक मधून घोटी -इगतपुरी -कसारा -आटगाव या मार्गाने माहूली किल्ल्यापर्यंतचे अंतर साधारणपणे एका बाजूने 102 किलोमीटर इतके होते.गिरीदुर्ग या प्रकारात मोडणाऱ्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणपणे 2800 फूट इतकी आहे. या किल्ल्याच्या ऐतिहासिक उपलब्धीमुळे राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा यास मिळालेला आहे. मध्य रेल्वेचे आसनगाव हे या किल्ल्यापासून जवळचे रेल्वे स्थानक आहे.या किल्ल्याची चढाई सोपी या श्रेणी मधली जरी असली तरी चाल भरपूर आहे.मुंबई प्रांताजवळील हवामान दमट असल्यामुळे जास्त घाम जातो.त्यामुळे या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी येताना पाणी पुरेसे ठेवणे खूप आवश्यक आहे.
हा किल्ला सुरुवातीला निजामशहाच्या ताब्यामध्ये होता. नंतर तो मुघलांच्या अखत्यारीत गेला. त्यानंतर तो शिवरायांनी जिंकून घेतला होता परंतु पुरंदरच्या तहावेळी तो पुनश्च मुघलांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुघलांना द्यावयाच्या 21 किल्ल्यांमध्ये हा देखील किल्ला होता. यावेळी शिवरायांनी युक्तीचा वापर करीत एकाच डोंगररांगेवर असलेले हे तीन किल्ले देत आहोत असे भाषण केवळ माहुली हा एकच किल्ला दिला आणि या चातुर यामुळे शिवरायांनी स्वराज्यामधील दोन किल्ले मुघलांच्या ताब्यात जाण्यापासून वाचविले होते. माहुली,पळसगड व भंडारगड हे दुर्ग त्रिकूट असून हे तीनही किल्ले आम्ही दहा प्रमाणे तुम्हाला देत असल्याचे शिवरायांनी भासवून दिले व प्रत्यक्षात माहुली हा एकच किल्ला त्यांना दिला होता. माहुली किल्ला तत्कालीन स्वराज्यामधील एक प्रमुख किल्ला असल्यामुळे इतक्या वर्षानंतरदेखील या किल्ल्यावरील ऐतिहासिक अवशेष पडझड झालेले असून सुद्धा बघण्यासारखे आहेत.महादरवाजा,कोकण दरवाजा,हनुमान दरवाजा,दारुगोळ्याचे भांडार,माहुलेश्वर महादेव मंदिर,मुख्य कमान,पहारेकऱ्यांच्या देवड्या,कातळ कोरीव पायऱ्या,विविध वीरगळी हे सर्व ऐतिहासिक अवशेष आपल्या डोळ्यासमोर तत्कालीन इतिहास जिवंत करतात व आपण येथेच शिवरायांच्या आठवणीने नतमस्तक होऊन जातो. माहुली किल्ल्याच्या जवळपासच्या प्रदेशामधील जंगल देखील खूप दाट असून जैवविविधतेने समृद्ध असेच आहे. विविध प्रकारचे जंगली प्राणी,पक्षी,रानटी श्वापदे येथे भरपूर प्रमाणात बघायला मिळतात. पायथ्यापासून गडमाथ्यापर्यंत जाण्यासाठी साधारणपणे दीड तासांचा वेळ लागतो. गडावर राहण्यालायक जागा नाहीत तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे त्या सोयीने ट्रेकर्स मंडळींनी येणे आवश्यक ठरते. निजामशाही,मुघलशाही,मराठेशाही व त्यानंतर पेशवेकाळ व ब्रिटिशांची राजवट या किल्ल्याने अनुभवलेली आहे.भौगोलिक रचनेमुळे नाशिक,सुरत,जव्हार,नाणेघाट,जुन्नर,पुणे,अहमदनगर अशा प्रमुख तत्कालीन स्थळांना जोडला जात असल्यामुळेदेखील या किल्ल्यास अनन्यसाधारण महत्त्व होते.
बेस व्हिलेज पासून गडाच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी साधारणपणे तास ते दीड तास लागू शकतो. तसा गड अगदीच उभा आहे. त्यामुळे चढताना बरीच दमछाक होते.गडाची चालदेखील भरपूर आहे. गड चढताना सरळ धोपट चालायचा पायवाटेचा मार्ग नाही तर बहुतांशी ठिकाणी मोठमोठाले दगड पार करून वरती चढून ते ओलांडून पुढे जावे लागते. दमटपणा आर्द्रता असल्यामुळे जंगलातून पुढे जाताना व पुढे गेल्यानंतर उन्हाच्या तीव्र झळा लागत असल्यामुळे लवकर दमशक होण्याची शक्यता असते परंतु आपल्याला ट्रेकिंगचा तसेच चालण्याचा पुरेसा सराव असेल तर दमछाक कमी होते. गड माथ्यावर पोहोचल्यानंतर आम्ही सरळ डाव्या बाजूने वजीर सुळका दुरून पाहण्यासाठी गेलो. वजीर सुळका तसेच कडेलोट पॉईंट व त्या बाजूने दिसणारे इतर शिखरे व सुळके मनाला मोहून टाकत होते. यथावकाश फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही पुन्हा येऊन महादरवाज्याकडे खाली उतरलो.
महादरवाजाची मुख्य कमान आज पडझड झालेल्या अवस्थेत असून कमानीच्या वरच्या बाजूचे दगड बरेचसे पडलेले आहेत. या कमानीवर कोरलेले शरभाचे शिल्प तसेच कळसाचे शिल्प देखील कोसळून खाली पडलेले आहे. महादरवाजातून आत आल्यानंतर उजव्या व डाव्या बाजूस पहारेकरांच्या देवड्या आपल्याला दिसतात तसेच थोडे पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला दगडात कोरलेल्या आणखी काही देवड्यांसारख्या लेण्या देखील दिसतात. येथूनच पुढे दगडातील कातळ कोरीव पायऱ्या ओलांडून पुढे गेल्यानंतर एक जिवंत झरा लागतो. या झऱ्याच्या बाजूसच झाडाखाली प्राचीन महादेवाची पिंड देखील आहे.त्याच्याच बाजूला शिवप्रेमींनी स्थापन केलेली शिवरायांची सुबक मूर्ती देखील आहे. गडावर माहुलेश्वर महादेव मंदिर देखील बघण्यासारखे आहे व सदरेच्या वाड्याचे व राजवाड्याचे अवशेष देखील जीर्ण अवस्थेतील असून ते बघण्यासारखे आहेत.
उगाच उभा महाराष्ट्र शिवरायांना दैवत मानत नाही. अशा स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन आल्यानंतर तत्कालीन इतिहासाची दाहकता आपल्याला कळाल्याशिवाय राहत नाही. हा वारसा पुढच्या पिढीकडे नेण्यासाठी या पिढीने एकदा का होईना अशा स्थळांना निश्चितच भेट देऊन फोटो,व्हिडिओ व इतर माध्यमांमधून हा इतिहास अजरामर कसा राहील याकडे कटाक्षाने लक्ष द्यायलाच हवे ! आज आपल्याला जे स्वराज्य प्राप्त आहे ज्या स्वातंत्र्याचा आज आपण उपभोग घेतो हे आयुष्य आपण मनमुराद जगतो आहोत त्यासाठी आपल्या पूर्वजांनी सांडलेले रक्त घेतलेले परिश्रम केलेला त्याग भोगलेली दुःखे व अनन्वित अत्याचार याची जाणीव ठेवून आपल्या पुढच्या पिढीस सक्षम करण्याचे कार्य आपणच या माध्यमातून करायला हवे. हा दैदीप्यमान वारसा कालांतराने नष्ट व उद्ध्वस्त होणारच आहे. तत्पूर्वी या सर्व मावळ्यांच्या या कार्यास उतराई होण्यासाठी म्हणून का होईना परंतु आपण अशा स्थळी आवर्जून जायलाच हवे. फक्त एका गोष्टीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे ते म्हणजे या स्थळांचे पावित्र्य आपल्या कुठल्याही कृतीमुळे भंग होणार नाही याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
माहुली किल्ल्यावरील ट्रेक दरम्यान अनुभवलेल्या या गोष्टींची, प्रकाशाने अनुभवलेल्या या ऐतिहासिक क्षणांची झिंग काही केल्या डोक्यावरून उतरत नव्हती. यथावकाश ट्रेक संपल्यानंतर आम्ही शिवघोषाचे उच्चारण करीत गड उतार झालो. उतरताना देखील आमच्या चर्चा याच चालू होत्या की पुढचा ट्रेक कुठला करायचा !
************************************
माहितीचे स्त्रोत :- स्थानिक ग्रामस्थ माहुली, सदस्य जल्लोष ट्रेकिंग ग्रुप,गुगल,यूट्यूब,विकिपीडिया.
**********************************
माहुली किल्ला ट्रेक मधील सहभागी सदस्य:-
1. संदिप काकड
2. सुहास कोळेकर
3. शाम रसाळ
4. मनोहर दरगोडे
5. तुकाराम महाले
6 .सुदाम धोंगडे
7. गजानन आडके
8. सचिन भावसार
9.विष्णु खैरनार
10.उमेश शार्दुल
11. पंकज घुगे
12. गजानन कदम
*************************************
*************************************
ट्रेक मधील इतर काही क्षणचित्रे
**************************************






























Comments