दूंधा,बिष्टा,कऱ्हा,अजमेरा... दुर्ग भटकंती
दूंधा,बिष्टा,कऱ्हा,अजमेरा... दुर्ग भटकंती
दुर्ग भटकंती हा नेहमीच आमच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे.असे खूप सारे गड-किल्ले आहेत जे रेंज ट्रेकने करता येतात.रेंज ट्रेक म्हणजेच एक किल्ला सर करून त्याच ओळीतला त्याच डोंगर रांगेतला दुसरा किल्ला लगेच करणे.रेंज ट्रेक करण्यामध्येसुद्धा एक वेगळीच मजा असते.जोपर्यंत अंगातली झिंग उतरत नाही,पाय थकत नाहीत,जवळचे अन्न व पाणी संपत नाही व सूर्य पूर्णतः मावळत नाही तोपर्यंत होता होईल तितके नजरेच्या टप्प्यामधील गडकिल्ले सर करण्यामध्ये मिळणारा आनंद काही औरच असतो.रेंज ट्रेक करताना ओळीमध्ये येणारे काही किल्ले छोटे तर तुलनेने काही किल्ल्यांची भटकंती खूप असते,रेंज ट्रेक मधील काही किल्ले खूपच सोपे तर काही जीवघेणेदेखील असतात.काही किल्ल्यांचे शिखर चिंचोळे-निमुळते असते तर काही किल्ल्यांचे पठार अवाढव्य असते,जे फिरायलाच तास-दोन तास लागतात.त्यामुळे अशावेळी रेंज ट्रेक केल्याने अधिकाधिक किल्ल्यांची सैर होते.
किल्ले बिष्टा :-
नाशिकमधील बागलाण म्हणजेच सटाणा तालुका हा त्या तुलनेने वैविध्यपूर्ण गड-किल्ल्यांसाठी समृद्ध असाच आहे.या सटाणा तालुक्यामधीलच दूंधा, बिष्टा, कऱ्हा व अजमेरा या चार रेंज ट्रेकमधील गड-किल्ल्यांची दुर्ग भटकंती करायचे जल्लोषच्या चमुने ठरवले.१५-२० दिवसांपूर्वीच याचे नियोजन झालेले होते.त्या हिशोबाने आदल्या दिवशी मुक्कामाची जागा,प्रवासासाठी गाड्या,रेंज ट्रेक करावयाच्या किल्ल्यांचा क्रम,सोबत घ्यावयाच्या साहित्याची यादी, सुरक्षादर्शक व प्रथमोपचाराचे साहित्य,ट्रेकसाठी लागणारा अंदाजीत वेळ व प्रवासाहून निघण्याची अंदाजीत वेळ या बाबतीमधील काटेकोर नियोजन करण्याची जबाबदारी रत्नाकरभाऊ भामरे यांनी लीलया पेलली होती.व आम्ही सर्व १० मावळे रेंज ट्रेकला निघण्यासाठी तयार होतो.
पूर्व नियोजनानुसार ठरल्याप्रमाणे आम्ही शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास नाशिकहून सटाण्याकडे प्रस्थान केले.सटाणा तालुक्यामधील बिजोटे या गावामध्ये आमचा मुक्काम ठरणार होता.आमचे ग्रुप मेंबर रत्नाकर भाऊंच्या जवळचे असलेल्या दांपत्याने रात्रीच्या मुक्कामाची, सकाळच्या अंघोळी -चहा नाश्त्याची अगदी अप्रतिम सोय ठेवली.
तेथूनच आम्ही गड चढायला सुरुवात देखील दुसऱ्या दिवशी सकाळी केली.बिजोटे गावाव्यतिरिक्त कोटबेल या गावापासून देखील आपल्याला किल्ल्याची चढाई करता येते. बिजोटे येथून चढाई तुलनेने सरळसोट उभी व दाट झाडेझुडपांमधून थोडक्यात आव्हानात्मक आहे. व कोटबेल येथून केली जाणारी चढाई तुलनेने सोपी आहे.कोटबेल या गावाबद्दल एक खूप सुंदर ऐतिहासिक माहिती ऐकायला मिळाली ती म्हणजे, "वनवासात असताना पांडव या भागामध्ये आले होते. याच ठिकाणी डेरमाळ जवळच्या बारी म्हणजेच खिंडीमध्ये भिमाची पत्नी हिडिंबा देवीचे मंदिर आहे.याच ठिकाणी भीमाने महादेवाची पूजा केली होती ते भीमाशंकर मंदिरदेखील याठिकाणी आहे.या महादेवाच्या पिंडीवर एक कोटी बेलपत्र वाहण्यासाठी पांडवांनी या भागात जी बेलाची झाडे लावली होती,त्यामुळेच या भागाला कोटबेल म्हणजेच एक कोटी बेल" असे नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते.
बिष्टा किल्ल्यासह या भागामधील इतर किल्ल्यांची निर्मितीच मुळात पहाऱ्यांच्या चौक्यांसारखीच करण्यात आली होती.या भागातून होणारा व्यापार तसेच नागरी सुरक्षा हा किल्ले निर्मितीमागील प्रमुख हेतू होता.त्यामुळेच उंच डोंगरांवर तसेच लागून असलेल्या डोंगरांवर मुख्य किल्ला बांधायचा व त्याच्या आजूबाजूच्या डोंगरांवरून तटबंदीची रचना करून त्याला सुरक्षा प्रदान करायची अशी या भागातील किल्ल्यांची रचना होती.या भागातीलच नव्हे तर भटकंती किंवा ट्रेकिंगसाठी त्या ठिकाणचा स्थानिक माहितगार व्यक्ती गाईड म्हणून घेणे कधीही सोयीस्करच ठरते.तशी बिष्टा किल्ल्याची चढाई उभीच! किल्ल्याच्या सुरुवातीलाच उभ्या पहाडामध्ये आपल्याला ३ खांबटाकि विस्तीर्ण गुहा लागतात.या गुहा पाहून पुढील खिंडीमधून वर आल्यानंतर आपण किल्ल्याच्या शिखरावर पोचतो.तेथे आपल्याला तंबू किंवा शामियाना सदृश्य रचना उभारण्यासाठी कातळामध्ये बांबू कोरण्यासाठी केलेली रचना बघायला मिळते.शिखरावर काही बुजलेल्या अवस्थेतील टाके,काही जिवंत टाके,तुटलेल्या तटबंदीचे व वाड्यांचे अवशेष देखील दिसून येतात.या किल्ल्याकडे येण्यासाठी नाशिक -सटाणा -दुंधेश्वर- कोटबेल या मार्गाने १२१ किलोमीटर एक बाजूने प्रवास करावा लागतो.मध्यम श्रेणीमध्ये येणाऱ्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३३७९ फुट इतकी असून कोटबेल पासून बिष्टा किल्ल्याचा ट्रेक पूर्ण करण्यासाठी साधारणपणे तीन-साडेतीन तास लागू शकतात.गड उतरून आल्यानंतर पायथ्याशी असणाऱ्या गोकुळवाडी या वस्तीवरील सुंदर अशा महादेव मंदिराचे आम्ही दर्शन घेतले.या मंदिरामधील महादेवाच्या मूर्तीच्या मांडीवर बालविष्णू पहुडलेली नाविन्यपूर्ण मूर्ती बघायला मिळते तसेच शबरीमातेची मूर्ती देखील येथे आहे.
*किल्ले कऱ्हा :-
कऱ्हा हा या रेंज ट्रेकमधील अजून एक किल्ला.कोळीपाडा व कऱ्हेवाडी हे या ट्रेकचे बेस व्हिलेज गावे आहेत.त्यापैकी कोळीपाडा येथून ट्रेक सुरू करणे सोयीस्कर ठरते.कोळीपाडा या गावापासून ट्रेक सुरू केल्यानंतर पहिल्या पठाराला वळसा घालून आपण किल्ल्याच्या कातळटोपीखाली येतो.तेथूनच आपल्याला गडावर जाणाऱ्या कातळकोरीव छोटेखानी जीर्ण पायऱ्या लागतात.येथून पुढे आपल्याला तटबंदी व बुरुजाचे जीर्ण अवशेष लागतात.येथून पुढे थोडासा चढ चढून आल्यानंतर गडमाथ्यावरील भवानी मंदिराजवळ आपण येऊन पोहोचतो.याच भवानीदेवीच्या मंदिरासाठी पंचक्रोशीत हा किल्ला प्रसिद्ध आहे.किल्ल्याच्या शिखरावरून आजूबाजूच्या परिसरातील गड किल्ल्यांचे विहंगम दर्शन होते.बऱ्यापैकी त्रिकोणाकृती आकार असलेला हा किल्ला विस्ताराने तसा मध्यमच आहे.भवानीमातेच्या मंदिरामागे एका विस्तृत पाण्याच्या खांब टाक्याचे देखील दर्शन होते.भवानी मातेच्या मंदिराच्या डाव्या हाताला देखील दोन विस्तृत अशी टाकी आहेत.या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३०७४ फुट इतकी असून संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी एक ते दीड तास तास वेळ लागू शकतो.
या किल्ल्याचा ट्रेक संपल्यानंतर आम्ही दोधेश्वर महादेव मंदिराच्या समोर असणाऱ्या कुंडामध्ये गायमुखाखाली थंडगार पाण्यामध्ये अंघोळी करून आमचा ट्रेकचा थकवा घालवला व रत्नाकरभाऊंच्या मावसभावाकडे मळ्यामध्येच भारतीय बैठक मारून बाजरीची भाकरी,ठेचा,चटणी,झणझणीत पातवड्यांची भाजी असे सुग्रास गरमागरम जेवण केले व अधिक वेळ न दवडता पुढील ट्रेकसाठी लगेच निघालो.
किल्ले अजमेरा :-
अजमेर - सौंदाणे येथील किल्ले अजमेरा हादेखील या रेंज-ट्रेकमधील एक प्रमुख किल्ला होय.२८५४ फूट इतकी याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे.पायथ्यापासून पाहिले तर अतिशय उंच दिसणाऱ्या या किल्ल्यावर साधारणपणे अर्ध्या-पाऊण तासाच्या चढाईनंतर गड माथ्यावर पोहोचता येते. अजमेरा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पहाडेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली.गडाच्या शिखरावर पश्चिमेला काही पाण्याची विस्तीर्ण टाकी आहेत.तेथेच गडाची भगवी निशाण काठी देखील आहे.या किल्ल्याचा संपूर्ण ट्रेक करण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागू शकतो. या परिसरातील किल्ल्यांचा दगड ठिसूळ असल्यामुळे गड चढताना व उतरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
किल्ले दूंधा :-
दुंधेश्वर डोंगररांगेतील शेवटचा किल्ला म्हणजेच किल्ले दूंधा.दगडधोंड्यांनी व दाट जंगलांनी व्यापलेली वाट चालून पुढे गेल्यानंतर लगेच कातळकोरीव पायऱ्या आपल्याला लागतात. दगडांवरून चढून वर जाणे सोपे व्हावे म्हणून दगडांमध्ये लोखंडी साखळ्या बसवलेल्या आहेत. अजून थोड्याशा चढाईनंतर वरती दोन झाडांच्या मध्ये शंकराचे मंदिर आहे. छान तांब्याची शंकराची पिंड असलेल्या या मंदिराच्या मागे पाण्याचे छोटे कुंड असून मंदिराकडे तोंड करून उभे राहिले तर डाव्या हाताला चालत गेले असता तेथे पाण्याचे एक टाके आहे.हे टाके पाहून परत मंदिराकडे येऊन त्याच्या मागील वाटेने गडशिखराकडे चालत जावे लागते.शिखरावर जुन्या वाड्याचे अवशेष व एक टाके आहे,परंतु तेथे प्रचंड प्रमाणात जंगली झाडे वाढलेली असल्यामुळे ते अवशेष नीटसे पाहता येत नाहीत.गडाच्या परत मागील बाजूने अजून एक टाके असून त्याला भीम टाके म्हणतात.या टाक्याच्या चारी बाजूने कातळात बांबू रोवण्यासाठी मोठमोठाली छिद्रे कोरलेली दिसतात,जेणेकरून उन्हाळ्यात यावरती छत किंवा कनातिचे आच्छादन टाकता यावे म्हणजे बाष्पीभवनाने टाक्यांमधील पाणी उडून जाणार नाही.टाक्यांमधील पाणी जपून वापरण्यासाठी लढवलेली ही शक्कलदेखील आपल्याला आश्चर्यचकित करून जाते.हा किल्लादेखील टेहळणीसाठीच प्रामुख्याने वापरला जायचा.या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची २२८० फुट इतकी असून संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी एक ते दीड तास वेळ लागू शकतो.
अगदी मजेमजेत व गप्पांच्या संगतीमध्ये बागलाण म्हणजेच सटाण्याकडील या चारही गड -किल्ल्यांचा रेंज - ट्रेक कसा पार पडला हे आम्हाला समजलेदेखील नाही.एका अर्थाने जणूकाही ही भटकंती आमची ट्रेकची मॅरेथॉनच होऊन गेली. सेलबारी-डोलबारी-दुंधेश्वर डोंगररांगेचे हे सौंदर्य आम्हाला जणू काही मोहिनीच घालत होते,इतके की आम्हाला सगळ्या जगाचा विसर पडला होता."एकदा का तुम्ही गड वाचायला शिकलात की तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पडत जाता".गड-किल्ल्यांच्या भटकंतीचे हे प्रेम टप्प्याटप्प्याने वाढतच राहते आणि म्हणूनच ही मुशाफिरी पुन्हा-पुन्हा सह्याद्रीकडे यायला बाध्य करते.
************************************
अपरिचित दुर्ग भटकंती मधील या चारही किल्ल्यांचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे टच करा.
************************************
अपरिचित दुर्ग भटकंती मधील सहभागी सदस्य :-
रत्नाकर भामरे
मनोहर दरगोडे
तुकाराम महाले
भास्कर सोनवणे
सुदाम धोंगडे
विष्णूतात्या खैरनार
हेमंत गोसावी
सचिन भावसार
सुधीर सावंत
सुहास कोळेकर
************************************
दुर्ग भटकंती मधील काही क्षणचित्रे
*************************************











































































Comments