भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

 


                दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे.हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते.पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात.हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो.या सणाला भारतात बव्हंश ठिकाणी सुट्टि असते. हा एक पवित्र हिंदु सण आहे जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक आहे.

          दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ". याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. अर्थात दिवाळी. काही जण दिपवाळी असे देखील म्हणतात, पण शुद्ध शब्द हा दीपावली आहे. वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे.काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो याच दिवसात.पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही.


        वसुबारस / वाघबारस

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहूमूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.


    धनत्रयोदशी

आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्‍नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.



               धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. (याला तेलुगूमध्ये गुडोदकम् म्हणतात.) यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.जैनधर्मीय या दिवसाला 'धन्य तेरस' वा 'ध्यान तेरस' म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला

नरक चतुर्दशी आख्यायिका -



          नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे.

      

    लक्ष्मीपूजन


            नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात. आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.

   बलिप्रतिपदा




              कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला "शुभा" असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. 

   गोवर्धन पूजा


         मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले.विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.

   भाऊबीज


               कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते.बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.


प्राचीन भेंडोळी उत्सव




                दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीची अमावास्या या दिवशी तुळजापूरमध्ये साजरा होणारा एक ऐतिहासिक,उल्लेखनीय उत्सव तो म्हणजे "भेंडोळी उत्सव".या उत्सवाला "फेस्टिवल ऑफ फायर" असेही म्हणतात. महिषासुरासोबत(म्हैस) तुळजाभवानी देवीच्या झालेल्या तुंबळ युद्धामध्ये श्रीदेवीजींचे रक्षक मानल्या जाणाऱ्या आठ विविध प्रकारच्या भैरवांनी देवीला मदत केली होती,त्याचाच हा उत्सव काळभैरवाच्या टेकडीवरती साजरा केला जातो.तसेच तुळजाभवानी देवी व अष्ट विविध भैरव या भावा बहिणींची भेट म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.भारतामध्ये केवळ तुळजापूर व काशी या दोन ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो.परंतु काशीला जो भेंडोळी उत्सव होतो तो फुलांचा होतो व तुळजापूर मध्ये होणारा भेंडोळी उत्‍सव आगीशी खेळून होतो. 



             या दिवशी भल्या पहाटे पाच वाजेच्या सुमारास काळभैरवाचा तेलाने अभिषेक करण्याची परंपरा देखील आहे.यावेळी सर्व पुरुष मंडळी उघड्या अंगाने काळभैरवाच्या मंदिरामध्ये जमून काळभैरवाला गोडेतेलाचा अभिषेक करतात.यावेळी "काळभैरवाचा चांगभले"असा जयजयकार देखील केला जातो.काळभैरवाला खोंडबळे,मटण भाकरी याचा नैवेद्य दाखविला जातो तसेच काळभैरवाच्या गांजासाठीदेखील दक्षिणा वाहिली जाते.प्रसादासाठी म्हणून पंचामृत वाटप केले जाते.तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागील बाजूला असलेल्या काळभैरवाच्या टेकडीवरील काळभैरवाच्या मंदिरासमोर या भेंडोळी उत्सवाची सुरुवात होते.एकूण ८ भैरव आहेत,जे श्री देवीजींचे रक्षक मानले जातात.




                  सर्वप्रथम काळभैरवाचे पुजारी एका साठ्यावरती भेंडोळीची रचना करतात.यावेळी भेंडोळीच्या साठ्यावरती केळीच्या खोडाची बांधणी केली जाते व त्याला बांधण्यासाठी चिंचेचा पाला व कोवळ्या फांद्यांचा वापर केला जातो तसेच त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे पलिते बांधून त्याला गोडेतेलामध्ये भिजवून घेण्यात येते.हा पूर्ण प्रचंड साठा जवळपास सात ते आठ फूट लांबीचा असतो.काळभैरवाच्या मंदिरासमोर हा साठा दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी असतो.सायंकाळी सात ते साडे सातच्या सुमारास हा साठा संपूर्णपणे बांधून तयार झाल्यानंतर याची मंदिरसंस्थानतर्फे विधिवत पूजा अर्चा केली जाते व मान्यवरांच्या हस्ते या भेंडोळीला प्रज्वलित केले जाते. काळभैरव मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या कालनाशक कुंडामध्ये भेंडोळी धरण्यासाठी इच्छुक तरूण आंघोळ करतात व धोतर व बनियन असे वस्त्र परिधान करून ओल्या अंगाने आईराजा उदोउदो,सदानंदिचा उदोउदो,बोलभवानीमातेकि जय..काळभैरवाचा चांगभले या जयघोषात भेंडोळी पकडतात. यावेळी या भेंडोळीच्या पुढील व मागील बाजूस साधारणतः प्रत्येकी दहा ते पंधरा पुरुष मंडळी भेंडोळी आपल्या खांद्यावर तोलून धरतात व मधल्या बाजूला भेंडोळीला प्रज्वलित केलेले असते.यावेळी रस्त्यामध्ये भाविक या भेंडोळी वरती गोडेतेल ओतत असतात.ही भेंडोळी प्रज्वलित केलेली असताना याची आग खूप मोठी भडकलेली असते व त्याची दाहकता तिव्र असते.काळभैरव मंदिराच्या टेकडीवरती प्रज्वलित केलेली ही भेंडोळी संबळ,ढोल-ताशांच्या वाद्यांच्या साथीने व भाविकांच्या गर्दीने अरुंद बोळामधून तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत श्री चिलोजीबुवा व श्री  तुकोजीबुवा यांच्या मठासमोरील पायऱ्या चढत तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यामध्ये येते.तेथे महंत श्री तुकोजीबुवा यांच्या हस्ते तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रचंड पेटलेल्या भेंडोळीची परत पूजा केली जाते, त्यावरती गोडेतेल ओतले जाते. दशावतार मठाचे मुख्य महंत श्री मावजीनाथ बुवा यांना वर्षातून एकदाच तोही याच दिवशी मंदिरामध्ये प्रवेश असतो.या दिवशी मंदिर संस्थांनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मावजीनाथ बुवांचा भर पेहराव आहेर नवे कपडे देऊन सत्कार केला जातो व मंदिर परिसरातील श्री दत्त मंदिराजवळ त्यांच्या हस्तेदेखील भेंडोळीची पूजा केली जाते.संबळे आवेशाने संबळ वाजवित असतात.तेथून ही भेंडोळी कल्लोळ तीर्थाच्या पायऱ्या चढून शहाजी महाद्वारामधून आर्य चौकात येते. तेथेदेखील याचे रिंगण पार पडते व तेथून डुल्या मारुती मंदिरांमध्ये ही भेंडोळी येते.तेथे भगवती विहिरीमधील पाण्याने क्षिरसागर कुटुंबातील पुरुषांच्या हस्ते या भेंडोळीला शांत केले जाते.भेंडोळी शांत केल्यानंतर ती भेंडोळी प्रज्वलित करण्यासाठी वापरलेल्या पलित्याचे अर्धवट जळालेले कापड घरी नेण्यासाठी अक्षरशः हमरातुमरी होते,चेंगराचेंगरी होते. कारण हे अर्धवट जळालेले भेंडोळीचे कापड घरी नेऊन,विधिवत पूजा करून घरी ठेवणे हे शुभ लक्षण मानले जाते.पेटविलेल्या भेंडोळी ची दाहकता खूपच तीव्र असते.आगीच्या प्रचंड मोठ्या मोठ्या ज्वाळा उसळत असतात तरीही भाविकांना इजा झालेले आजवर ऐकिवात नाही. या भेंडोळी उत्सवासाठी संपूर्ण गाव भेंडोळी उत्सव पाहण्यासाठी आलेले असते तसेच इतर ठिकाणावरून देखील भाविक,नागरिक हा भेंडोळी उत्सव पाहण्यासाठी गर्दी करताना दिसून येतात.या भेंडोळी उत्सवाला खूप वर्षांची जुनी परंपरा आहे.अंधारावर प्रकाशाचा विजय,वाईट विचारांना चांगल्या विचारांनी जाळून नवी सुरुवात अशा आशयाचा हा भेंडोळी उत्सव असतो. या भेंडोळी उत्सवाचा प्राचीन इतिहास आज सापडत नाही,तरीही खूप प्राचीन काळापासून हा साहसी विधी चालू असल्याचे ऐकायला मिळते.





    कोळेकर परिवाराची सेवा

       " विशेष बाब आमच्यासाठी म्हणजे या भेंडोळी उत्सवासाठी काळभैरव टेकडीपासुन संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसरात,गाभाऱ्यात व आर्य चौक ते डुल्या मारुती या भेंडोळीच्या संपूर्ण चार ते साडेचार किलोमीटर परिसरात रांगोळी काढण्याचा मान आमच्या कोळेकर परिवारातील पुरुषांना असतो व या माध्यमातून श्रीदेवीजींची पूजा,श्री देवीजींची सेवा करण्याचा मान आम्हा कोळेकर घरांकडे वर्षातून एकदा येत असतो.ही आमच्यासाठी आनंदाची,गर्वाची बाब आहे.यावेळी रांगोळी काढण्यासाठी मंदिराचे पुजारी घरी येऊन आम्हाला रितसर निमंत्रण देऊन मानाचे श्रीफळ,विडा व शाल देऊन विधीवत निमंत्रण देखील देतात व हे निमंत्रण स्वीकारून आमचे सर्व जेष्ठ कोळेकर व तरुण सर्व पुरुष आम्ही रांगोळी काढण्यासाठी मंदिर व परिसरामध्ये जातो.


                संपूर्ण भेंडोळीच्या प्रदक्षिणा मार्गावर आम्हा पुरुषांतर्फे रांगोळी काढून झाल्यानंतर डुल्या मारुतीच्या मंदिरामध्ये आम्हाला श्रीफळ देऊन याची सांगता केली जाते.काळभैरवाच्या पुजाऱ्यांतर्फे रांगोळी देखील पुरविली जाते.जवळपास 50 ते 55 किलो रांगोळी यासाठी वापरण्यात येते."विविध मंडळांच्या पदाधिकार्यांतर्फे आम्हां सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात येतो.










 या थरारक,साहसी व धाडसी अशा भेंडोळी उत्‍सव संदर्भातील सर्व व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॕनल वर देखील उपलब्ध आहेत.तुम्ही यु ट्यूब वरती जाऊन "suhasshrirangkolekar "असे सर्च करून तेथे असलेले व्हिडीओ पाहू शकता.




    माहितीचे स्त्रोत :- 

कोळेकर परिवारातील ज्येष्ठ मंडळी, 

मंदिर परिसरातील पुजारी वर्ग,(काळभैरव मंदिर व श्री तुळजाभवानी मंदिर )

गुगल,युट्युब तसेच विकिपीडिया.


 फोटो सौजन्‍य :- 

कोळेकर परिवार,तुळजापुर.


विशेष सहकार्य :- 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापुर.

 पुजारी वर्ग,श्री काळभैरव मंदिर तुळजापूर.

श्री अंबिका तरुण मंडळ,तुळजापुर 


               काही क्षणचित्रे



























*****धन्यवाद ****

संपूर्ण लेख आवडल्यास आपल्या नावासह कमेंट नक्की करा.

श्री सुहास श्रीरंग कोळेकर ,श्री क्षेत्र तुळजापुर 

Comments

Unknown said…
Very informative article
Vandana k said…
Very nice
Anjali k said…
Very nice information about bhindoli
Daulat said…
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
It's been an amazing to keep forward our tradition with all the family beautifully.The way you defines a each eord about the festival is just fabulous.We should have to know the basics of our culture.Its helpful to future generation.Keep motivate us through your blog.We are always eager to learn a new things from you. Thanks for above valuable information.

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई