रविवार भटकंती Sunday trek to किल्ले हरगड, डांगसौंदाणे, नाशिक.
रविवार हा आम्हां फिरस्त्यांसाठी,भटकंती करणाऱ्यांसाठी एक पर्वणी देणारा ,आनंदाचे क्षण वेचून देणाराच दिवस असतो.या रविवारची आम्ही अगदी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहतो व शुक्रवार उजाडला की शुक्रवारच्या संध्याकाळपासून रविवारी कुठल्या ट्रेकला जायचं याची तयारी आम्हा सर्व जॉगर्सची सुरू असते. ठरलेल्या ठिकाणाची युट्युब,गुगल द्वारे माहिती घेण्यात,साहित्य जमवण्यात,त्याची तयारी करण्यातच आमचा एक दिवस आनंदाने कसा जातो ते कळतही नाही व रविवारी ट्रेक हा आमचा हक्काचा,विरंगुळ्याचा क्षण होऊन जातो.
हा रविवार म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा वार,सह्याद्रीच्या कुशीत शिरण्याचा वार,दूर कुठून तरी पाणावलेल्या डोळ्यांनी आलेले लेकरू आपल्या आईच्या पदरात ज्या आत्मीयतेने शिरतं तसाच हा आमच्यासाठीचा वार, घरापासून दूर राहून नोकरी करणार्या सर्वच चाकरमानी नोकरदारांसाठी आपापल्या पैतृक घरी परतण्याचा आनंद देणाराच हा आमचा वार व हा आमचा विरंगुळा.
आधीपासूनच असं वाटायचं की प्रत्येकाला काहीतरी एक छंद असलाच पाहिजे,परंतु स्वतःला कोणता छंद जोपासावा हे त्याचं अंतर्मन वेळ आलं की बरोबर सांगतं. त्यासाठी आवर्जून शोध घेण्याची गरज पडत नाही.तसाच मलाही आमच्या चामरलेणी जॉगिंग ग्रुप मधील उत्साही सदस्यांमुळे ट्रेकिंगचा जसा काही नादच लागला व हा नाद आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनून गेला. सरकारी नोकरीच्या रहाटगाडग्यात मनामध्ये सारखा सारखा असलेल्या तेच तेच टेन्शन, एक प्रकारचा तोच तोच कंटाळवाणा रुटीनचा भाग यामधून बाहेर निघण्याचा एक उत्तम मार्ग मला भेटला तो म्हणजे ट्रेकिंग करणे.प्रत्येक जण आपापल्या परीने रविवारचा आनंद घेतो. कोणी मौज मस्ती करतो,कोणी फिरायला जातात, कोणी खाऊन पिऊन आराम करतात,कोण घरातली शिल्लक कामं करतात,परंतु आम्ही आमच्या ग्रुप तर्फे दर रविवारी जवळच्या किंवा दूरच्या कुठल्याही उल्लेखनीय किल्ल्यांवरती किंवा टेकड्यांवरती,उंच अशा डोंगरांवरती आम्ही ट्रेक आयोजित करतो.जवळपासच्या सर्वच डोंगरावरती,किल्ल्यावरती ट्रॅक झालेले होते व नाशिकमधील गुजरातच्या सीमेजवळ असलेल्या तालुका म्हणजे डांगसौंदाणे ज्याला सटाणा असेही म्हणतात या डांग सौंदाणे येथील किल्ले आम्ही पाहिलेले नव्हते.त्यामुळे साहजिकच तिकडील सर्व किल्ले आम्हाला खुणावत होते.त्यापैकीच एक किल्ला म्हणजे "हरगड." या" हरगड "किल्ल्याचे नाव या यापूर्वीच ऐकलेलं होतं, तेथे जायची उत्सुकता ही तितकीच होती .फक्त योग्य वातावरण ट्रेकिंगसाठी असणे आवश्यक होते.त्यामुळे सुंदर,निरभ्र आकाश होण्याची आम्ही वाट पाहत होतो व ती संधी मिळताच आम्ही हरगड किल्ल्यावरील ट्रेकसाठी चे नियोजन केले. व रविवारी भल्या पहाटेच सर्व सदस्यांनी एकत्र जमून डांगसौदाणे कडे म्हणजेच हरगड किल्ल्या कडे प्रयाण केले.
तत्कालीन बागलाण या प्रांतावर तेव्हा बागुल घराण्यातील राज्यकर्ते राज्य करत होते.त्या काळामध्ये हरगड किल्ल्याला लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीने खूप महत्व होते.मुळात हरगड किल्ल्याची निर्मिती सुरत मार्गे नाशिक वरुन जाणाऱ्या व्यापारी मार्गावर देखरेख ठेवण्यासाठीच केली गेलेली होती.त्यामुळे सहाजिकच या किल्ल्यावर सैनिक लष्करी सामर्थ्य दारुगोळा विपूल प्रमाणात असणे ओघाने आलेच.तसेच प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे जुन्या टांकसाळीचे पुरावे येथे असल्याची बाब देखील नमूद आहे.गडाच्या माथ्यावरती असणाऱ्या विस्तीर्ण पठारावर फिरल्यानंतर तेथील वेगवेगळ्या प्रकारच्या इमारतीच्या वाड्यांच्या अवशेषांवरून आपल्याला याची जाणीव होते की येथे लष्करीदृष्ट्या सामर्थ्याच्या इमारती, टांकसाळ तसेच इतर दारूगोळ्यासाठीची कोठारे येथे भरपूर प्रमाणात असावीत. आणि यामुळेच हा किल्ला शत्रूला सहजासहजी सर करता येणार नाही अशा प्रकारे विचार करून अगदी बेलाग पद्धतीने बांधण्यात आलेला होता.
नाशिकपासून डांगसौंदाणेकडे जाण्यासाठी रस्ता थोडासा चांगला आहे व मध्ये मध्ये काहीसा खराब आहे.त्यामुळे आपण जर तिकडील किल्ल्याचे ट्रेकिंगचे नियोजन करत असाल तर आपण जितक्या लवकर निघणे शक्य असेल तितक्या लवकर निघालेलेच बरे.कारण या प्रवासामध्ये दोन ते तीन तास आपल्याला लागू शकतात. आमची ट्रेकिंगसाठीची हक्काची गाडी म्हणजेच श्री सचिन गोसावी यांची गाडी घेऊन आम्ही नाशिक मधून निघालो. रस्त्यात सोग्रस फाटा या ठिकाणी तुम्हाला चहा नाश्त्यासाठी ची उत्तम सोय उपलब्ध असते.त्यामुळे तुम्हाला चहा नाश्ता करायचा असेल तर तुम्ही सोग्रस फाटा या ठिकाणी चहा नाश्ता करून फ्रेश होऊन पुढे निघू शकतात.
देवळा मार्गे सटाणा जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला गोदावरी बेकरी नावाचे एक हॉटेल व बेकरी आहे. तेथे उत्तम प्रकारचे गव्हापासून बनवलेले स्नॅक्स,खारी,टोस्ट मिळतात हे आम्ही ऐकून होतो.त्यामुळे आम्ही सगळ्यांनी गाडीमधून तेथे थोडासा ब्रेक घेतला व तेथून खाण्यासाठी म्हणून खारी,टोस्ट वगैरे विकत घेतल्या.इतर काही खाण्यायोग्य बरंचसं साहित्य घेतलं व आम्ही तिथून पुढे निघालो.
साधारणपणे अडीच ते तीन तासांच्या नाशिकवरून प्रवासानंतर आपण मुल्हेर गावाच्या जवळ येऊन पोहोचतो.या गावाला वळसा घालून थोडं पुढे गेलं की तेथूनच आपल्याला हरगडकडे जाणारा प्रवास सुरु होतो. तेथे तुरळक वस्ती आहे.शेतांवरती बांधलेली काही झोपडीवजा घरी आहेत तेथेच आपल्याला थांबावे लागते व तेथून हरगड किल्ल्यावरती जाणारा प्रवास सुरू होतो कारण येथून पुढे जाणारा डांबरी रस्ता पावसामध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेलेला असल्यामुळे अलीकडच्या आंब्याच्या झाडाखाली कट्ट्याबाजूला आपल्याला गाड्या लावाव्या लागतात व तिथून आपल्याला आपला पायी प्रवास सुरू करावा लागतो.पायथ्यापासून हरगड किल्ल्याचे दिसणारे दृष्य खरोखर मनाला मोहून टाकणारे व विलोभनीय असेच असते.आजूबाजूला असलेली दाट झाडी,सीताफळ वगैरे इतर फळांची नैसर्गिकरीत्या वाढलेली झाडे तसेच डोंगरावरती नैसर्गिकरित्या वाढलेल्या झेंडूच्या फुलांची प्रचंड ताटे हे आपल्या मनाला सुखावून जातात. या परिसरात बाजरीचे,कांद्याचे पीक जास्त घेतले जाते. हरगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या तुरळक वस्ती मध्ये सुद्धा शेतांमधुन बाजरीची लागवड केलेली आम्हाला जास्त आढळली व तिथूनच आमचा पायी प्रवास सुरू झाला.
ट्रेक सुरू करण्यापूर्वी आम्ही शेजारील मुल्हेर या गावामधून वाटाड्या म्हणजेच ज्याला आपण गाईड म्हणतो तो सोबत घेतलेला होता.कुठलाही ट्रेक सुरू करण्यापूर्वी गाईड घेणे ही खूपच आवश्यक बाब असते कारण आपण ज्या ठिकाणी जातो तेथील गड-किल्ल्यांची,जंगलाची आपल्याला माहिती नसते.अशा वेळी जंगलातील वाटांमुळे आपण रस्ता चुकू शकतो.भरकटलेल्या रस्त्यांमधून जाताना आपल्याला इजा देखील होऊ शकते तसेच किल्ल्यांवरील जंगलांमध्ये सहसा हिंस्त्र प्राण्यांचा वावर देखील असतो.त्यामुळे आपल्याला धोका पोहोचू शकतो.त्यामुळे अशा वेळी आपण एक माहितगार माणूस गाईड,वाटाड्या म्हणून ठेवणे खूपच आवश्यक असते.हा गाईड आपल्याला कमी वेळेत योग्य ठिकाणी पोहोचवतो तसेच आपण सुरक्षित कसे खाली येऊ याची देखील आपल्याला सूचना तो देत राहतो तसेच आपल्याला जर किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करायचा असेल,टेंट लावायचा असेल,जेवण करायचे असेल तर या सर्व बाबींची आपला गाईड तरतूद देखील करून ठेवू शकतो.त्यामुळे गाईड घेणे ही एक सुरक्षित बाजू कुठल्याही ट्रेकची असते.
हरगड हा किल्ला साधारणपणे बर्याचशा लोकांसाठी अपरिचित असलेला असाच किल्ला आहे.जवळपास राहणाऱ्या बऱ्याच लोकांना देखील या किल्ल्याची कल्पना तितकीशी नाही.तसेच हरगड हा किल्ला दिसायला छोटा दिसत जरी असला तरी याची चढाई खूपच प्रचंड आहे.साधारणतः पायथ्यापासून ते वरती असणाऱ्या तोफेपर्यंत पोचायला अडीच ते तीन तास उत्तम ट्रेकरलादेखील लागू शकतात.अतितीव्र वळसा घेत चढत जाणारी चढाई तसेच जागोजागी लागणारे काट्याकुट्यांचे जंगल,ढासळणारे कडे, मोकळी झालेली माती, गोल दगड यामुळे आपल्याला सुरक्षित जाण्यासाठी वरती पोचण्यासाठी तब्बल अडीच तासांचा वेळ ट्रेकिंगसाठी लागणे अपेक्षित असते.
ट्रेक सुरू असताना आम्हाला जागोजागी दगडात कोरलेल्या गणपतीच्या मुर्त्या पाहायला मिळत होत्या.आम्ही याची गाईडकडे विचारणा केली असता त्याने आम्हाला माहिती दिली की साधारणपणे हरगड या परिसरात असणारे जे पाच किल्ले आहेत या पाच किल्ल्यांच्या डोंगराच्या परिसरात एकूण एकवीस गणपती आहेत असे त्याने आम्हाला सांगितले.हे पाच किल्ले म्हणजे साल्हेर-मुल्हेर हरगड, मोरा व न्हावी. या संपूर्ण ट्रेक मधील अजून एक मनाला आनंद देणारी बाब ती म्हणजे रस्त्यात जागोजागी लागणारे झेंडूच्या फुलांचे ताटवे.येथे पावलोपावली झेंडूमधील मखमली या छोट्या प्रकारच्या झेंडूचे भरघोस ताटे आम्हाला बघायला मिळायचे.ते बघून मन प्रसन्न होऊन जात होते.निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली रंगांची उधळण या ठिकाणी आम्हाला बघायला मिळत होती.ही फुले,हे फुलांचे ताटवे आमच्या पायांनी पायदळी तुडवले जाणार नाहीत याची आम्ही कसोशीने काळजी घेत आमचा ट्रेक पुढे चालू ठेवला. मूलनिवासी आदिवासी निसर्गपूजक आहेत.ते निसर्गालाच देव मानतात तसेच निसर्गामधील विविध शक्तींना ते देव मानतात. जसे की, वाघ,डोंगर,वायू,पाणी,अग्नी व इतर काही .व ते ज्यांना देव मानतात अशांच्या दगडी मुर्त्या बनवून त्या त्या ठिकाणी त्यांची शेंदूर लावून पूजादेखील केली जाते. या डोंगरांमध्ये बिबट्याचे वास्तव्य जास्त असल्याचे आम्हाला ऐकायला मिळाले त्यामुळे याठिकाणी वाघाची सुद्धा दगडी छोटी-छोटी मंदिर मुर्त्या बनवलेल्या आम्हाला आढळल्या. तसेच जागोजागच्या प्रवासामध्ये मारुतीच्या सुद्धा दगडामधे कोरलेल्या मुर्त्या आम्हाला बघायला मिळाल्या. अगदी काही दिवसांपूर्वीच रात्री बिबट्याने आमच्या गाइडच्या जनावरांच्या कळपामधील एका वासराला ओढत नेऊन त्याची शिकार केल्याची देखील त्यांनी सांगितले.हे ऐकून आम्ही सगळे सावधपणे आमचे पाऊल टाकत होतो व आमचा ग्रुप कोठेही मागे राहणार नाही, ग्रुप मधला व्यक्ती आमच्या पासून चुकणार नाही याची आम्ही कसोशीने काळजी घेत,एकमेकांना आवाज देत आमचा ट्रेक चालू ठेवलेला होता.
ट्रेकिंग दरम्यान घ्यावयाची अजून एक सर्वात महत्त्वाची काळजी ती म्हणजे आपण आपले डीहायड्रेशन होऊ न देता आपला ट्रॅक कसा सुरक्षित होईल याची खबरदारी घेणे आवश्यक असते.कारण ट्रेक करत असताना ,डोंगर उंच चढत असताना शरीरामधून मोठ्या प्रमाणावर घाम जातो तसेच वरून लागणारे ऊन आपल्या अंगातील क्षार,पाणी कमी करतात. त्यामुळे आपल्याला ओठ कोरडे पडणे,गती मंदावणे यासारखा त्रास होऊ शकतो.अशावेळी आपण डोळ्यावरती गॉगल,डोक्यावरती टोपी ,फुल टी शर्ट असणे आवश्यक आहे.टी-शर्ट फुल नसतील तर बाजारामध्ये सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या असलेली स्लीव्ज घालने हादेखील एक उत्तम पर्याय आहे.तसेच आपल्याकडे लिंबू पाणी व ओ आर एस पावडर glucon-d पाण्यामध्ये मिसळलेली असणे आवश्यक आहे.तसेच मेडिकल मधून मिळणाऱ्या ग्लुकोजच्या गोळ्या किंवा किराणा दुकानांमधून मिळणारी ग्लुकोजची बिस्किटं आपल्या सोबत ठेवणं व डीहायड्रेशन जाणवलं की वेळोवेळी पाणी,लिंबू पाणी व ओ आर एस पावडर,बिस्कीट गोळ्या हे थोडं थोडं खाऊन पुढे चालत राहणं हा एक सयुक्तिक मार्ग आहे.
फोटो काढणे हा आमच्या सगळ्यांचाच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय प्रत्येक ट्रेक मधे असतो.त्यामुळे या ट्रेक मध्ये सुद्धा आम्ही आमची फोटोची हौस भागवून घेतली. शक्यतो सर्वांकडेच चांगल्या प्रतीचे कॅमेरे असलेले मोबाईल होते त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी फोटो काढत काढत पुढे जात होतो.साधारणतः अर्ध्या तासाच्या चढाईनंतर मूळ किल्ल्याच्या पायथ्यापासून खरी तीव्र चढण सुरू होते.येथे असणारे उभे कडे आपल्या चढण्याचा,चालण्याचा, ट्रेकिंगचा खरा कस पाहतात.तसेच या कड्यांवरील माती निखळून गेलेली आहे,जागोजागी पावसामुळे पडझड झालेली आहे. त्यामुळे येथून वरती चढताना विशेष काळजी घ्यावी लागते.यासोबतच साबरीचे काटे जागोजागी आपल्याला टोचण्याची भीती असते.वेगवेगळ्या प्रकारच्या कॕक्टसच्या जाती देखील इथे आहेत त्यामुळे चढताना त्यांचे काटे अंगाला टोचणार नाहीत,त्यांचे काटे अंगात रुतणार नाहीत याचीही खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे.तसेच पावसामुळे येथील गवत साधारणतः पुरुषभर उंचीचे झालेले असल्यामुळे आपल्याला खालील पायवाट दिसत नाही. या वाढलेल्या गवतामुळे खाली असलेल्या तीव्र उताराचा देखील अंदाज येत नाही.त्यामुळे आपले एक चुकीचे पडलेले पाऊल आपल्याला मृत्यूच्या दरीमध्ये देखील नेऊ शकते. त्यामुळे आपल्याला चढताना अंदाज घेऊन अगदी व्यवस्थित,सुरक्षित,सावकाश चढणे खूप आवश्यक आहे.
हरगड किल्ल्याच्या शिखराच्या दिशेने जाणारा पहिला सुळका सर केल्यानंतर खऱ्या अर्थाने तिथून गडाची जीवघेणी चढाई चालू होते.जीवघेणी ही अशा अर्थाने कारण या ठिकाणी केवळ अर्धा पाऊल बसेल अशा प्रकारच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत.अंगावर येणाऱ्या,तीव्र उताराच्या,चारही बाजूंनी उंचच उंच गवताने वेढलेल्या व कायमस्वरूपी गडाच्या शिखरावरून पावसाच्या माऱ्यामुळे वाहत आलेल्या मातीने काहीशा बुजलेल्या अशाच या पायऱ्या आहेत. त्यामुळेच की काय या पायऱ्या चढणे काहीसे धोकादायक ठरते कारण एका बाजूला उंच गवतामुळे गडाचा तीव्र उतार आपल्या सहजपणे बघून लक्षात येत नाही व अशावेळी या कातळात कोरलेल्या पायऱ्यांवरून पाय घसरून दुर्घटना होण्याचा दाट संभव असतो. या उभ्या चढणी वरून जाताना आपल्याला दोन वेळा काटकोनामध्ये नागमोडी वळणे घेत चढत जावे लागते व वरती गेल्यानंतर वरून तुटलेले कडे असल्यामुळे तेथे चढताना आपल्याला विशेष खबरदारी घ्यावी लागते.या दोन तुटलेल्या कड्यांवरून व ढासळलेल्या पायऱ्यांवरून चढून गेल्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला समोर दृष्टीपथास येते ती पहिली कमान. ही पहिली कमान आज पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आहे.
पहिला सुळका व त्यानंतर येणारी कमान पार केल्यानंतर गडावर जाणारी उभ्या चढणीची चढाई खऱ्या अर्थाने येथून सुरू होते.या बाजूला ट्रेकर्सचा खऱ्या अर्थाने कस लागतो. हरगड किल्ल्याचा प्रमुख दरवाजा येथे आपल्याला बघायला मिळतो परंतु येथे जाणारी वाट बहुदा इंग्रजांनी तोफेने उडवलेल्या असल्यामुळे या परिसरात आता पायर्यांच्या ऐवजी पूर्णपणे दगडधोंड्यांचा खच पडलेला दिसतो. इतरही किल्ल्याप्रमाणेच इंग्रजांनी इथल्या ही पायर्यांची नासधूस केल्याचे दिसून येते. संपूर्णपणे दगडात कोरलेल्या या पायऱ्यांचा उतार तीव्र दरीच्या बाजूने असल्यामुळे आपल्याला येथे चढताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. मराठ्यांचा हा समृद्ध वारसा टिकून राहू नये तसेच त्या काळातील क्रांतिकारकांना,मावळ्यांना व इतर योद्ध्यांना लपण्यासाठीच्या जागा मिळू नयेत यासाठी इंग्रजांनी प्रत्येक मजबूत किल्ल्याच्या पायऱ्या अशाप्रकारे तोफा लावून उडवून दिल्या होत्या.हरगड किल्ल्यावर सुद्धा या घटनेची पुनरावृत्ती झालेली आपल्याला बघायला मिळते त्यामुळे गडावरचा जो प्रमुख दरवाजा आहे या दरवाजाला पोहोचताना मात्र आपली खरच खूपच दमछाक होते.कारण खालच्या बाजूने उभी चढण चढून यावे लागते व गडाच्या प्रमुख दरवाज्याला पोहोचताना खाली कुठल्याही प्रकारचा आधार नसतो.अशा वेळी पावसाचं पाणी पडून सर्व दगड निसरडे झालेले असतात, केवळ एकच पाऊल ठेवता येईल एवढीच जागा आपल्याला असते. दगड निसरडे झालेले असतात अशावेळी ट्रेकर्सना खरी कसरत करत करतच कडेकपारी यांचा आधार घेत झाडाच्या मुळ्या,वेली यांना पकडून गडाच्या प्रमुख दरवाजाच्या खालीपर्यंत पोहोचावे लागते. दरवाजा व खालची बाजू यामध्ये साधारणतः सात फुटांचे अंतर आहे जेथे पायऱ्या किंवा चढण्यासाठी कुठलीही खाच नाहीये. काहींनी चढण्यासाठी तात्पुरती सोय म्हणून चार ते पाच दगड एकावर एक रचून थोडीशी सोय तिथे केलेली दिसून येते. परंतु एक जण वरती जाऊन आधारासाठी वरती खेचून घेणारा असेल तर आपण पटकन वरती पोचू शकतो.
गडाचा हा प्रमुख दरवाजा अत्यंत कलात्मकतेने बनवलेला असून यावरती सुंदर नक्षी देखील कोरलेले आपल्याला बघायला मिळतात.तसेच आजही याची मजबुती आपल्या नजरेत भरते.अजूनही हा प्रमुख दरवाजा अजिबात खिळखिळा झालेला नसल्याचे आपल्याला बघायला मिळते. केवळ या दरवाजावरूनच आपल्याला हा गड किती मजबूत होता याची प्रचीती यायला वेळ लागत नाही.त्यावेळची बांधकाम शैली,बांधकामातील तंत्रज्ञान व बांधकाम मजबूत राहण्यासाठी केलेली उपाययोजना हे बघून आपण खरंच नतमस्तक व्हायला होतं.या दरवाजामध्ये एका वेळी सहा ते सात माणसे आरामात उभे राहू शकतील इतका हा प्रशस्त आहे.या दरवाजामधून वरती जाणाऱ्या कातळामध्ये कोरून बसवलेल्या अशा पंधरा ते वीस मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत ज्या पायर्यांमधून आपण गडाच्या बालेकिल्ल्याकडे जाऊ शकतो.
गडाचा हा दरवाजा प्रशस्त,मजबूत व ऐसपैस जरी असला तरी या दरवाजाची वरच्या बाजूने उघडणारी कमान अगदी जीर्ण अवस्थेत आलेली असून मोडकळीस आलेली आहे.तसेच त्यावरती बरेच गवत,जंगली वनस्पती वाढल्याने व त्यांची मूळं खोलपर्यंत उतरल्यामुळे या कमानीचे खूप सारे नुकसान देखील झालेले आपल्याला बघायला मिळते.दरवाज्याच्या या बाजूने आपण गडाच्या वरती निघून आल्यानंतर तेथे एक प्राचीन शिलालेख देखील दगडामध्ये कोरलेला आहे परंतु तो आता खूपच पुसट झालेला बघायला मिळतो.त्यामुळे त्यावरील मजकूर वाचता येण्याजोगा नाही.या दरवाजामधून वरती आल्यानंतर आपल्याला पुन्हा काही बाजूने चढून जावे लागते.व या चढ्यावरती खूप सारे पुरुषभर उंचीचे गवत देखील आहे.या गवतामध्ये लपलेले किडे कर्णकर्कश्य आवाजामध्ये तुमची चाहूल लागल्यानंतर ओरडतात. हा आवाज इतका तीव्र असतो की आपल्या कानांना देखील असह्य वेदना व्हायला सुरुवात होते.अशावेळी आपण मोठ्याने टाळ्या वाजवत पुढे पुढे चालत राहावे जेणेकरून या किड्यांचा आवाज काहीसा कमी होऊन जातो.परंतु चालत राहताना खाली गवताचा व खालील पायवाटेचा कानोसा घेत,अंदाज घेत चालत राहणे योग्य राहील कारण थोडीशी देखील चूक आपल्याला पाय मुरगळू शकतो व पायाला गंभीर इजा होऊ शकते.आजूबाजूला असलेल्या कमी उंचीच्या झाडांवरती येथे घातक,विषारी अशा प्रकारचे साप असतात त्यामुळे काळजीपूर्वकच चालावे.
किल्ल्याच्या परिसरातील लोक अशा प्रकारच्या सापांना" येलाशी "म्हणतात तर याच सापांना इतर काही स्थानिक बोलीभाषेमध्ये "फोडसा" असे देखील म्हणतात.कारण हा विषारी साप चावल्यानंतर अंगावरती खूप मोठे मोठे फोड येतात,सूज येते व काही क्षणातच माणसाचा मृत्यू देखील होतो.
या किल्ल्यावरील प्रमुख आकर्षण म्हणजे अजस्त्र तोफ.नाशिक जिल्ह्यातील बागलाण परिसरात हरगड किल्ला आहे. बागलाण परिसरात दोन मुख्य डोंगररांगा आहेत, सेलबारी रांग व डोलबारी.डोलबारी डोंगररांगाच्या दक्षिणेला आहे. या दोन पर्वतरांगा पूर्व-पश्चिम दिशेने एकमेकांना समांतर धावतात. हरगड हा किल्ला सेलबारी या डोंगररांगेत आहे. हे सर्व किल्ले बुरहानपूर- सुरत या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आले होते . हा रस्ता दोन डोंगररांगांमधून जातो.खान्देशातील सुपीक जमीन आणि बंदरांचे शहर सुरत यांच्यामध्ये वसलेले हे प्रमुख किल्ले आहेत .त्यामुळेच येथे तोफ असणे आवश्यक व पर्यायाने क्रमप्राप्तच होते. हरगड किल्ल्यावरील प्रचंड,अजस्त्र तोफ हे या किल्ल्याला भेट देण्याचे प्रमुख आकर्षण ठरते.किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आपण वरती आल्यानंतर किल्ल्याच्या वर विस्तीर्ण पठार आहे.हे पठार संपूर्ण फिरण्यासाठी आपल्याला साधारणतः वीस मिनिटांचा वेळ लागतो.मुख्य प्रवेशद्वारामधून आल्यानंतर समोरील चढा चढून वर आल्यावर लगेचच आपल्याला तोफेचे दर्शन होते.या तोफे पासून पुढे पंधरा मिनिटे चालत गेल्यानंतर मारुतीचे एक मंदिर व भगवा ध्वज आपल्याला बघायला मिळतो.आजही सुस्थितीत असलेली ही तोफ जवळपास चौदा फूट लांबीची,वजनदार व तितकीच मजबूत असून ही पंचधातूची आहे. एवढी अजस्त्र,वजनदार तोफ या गडावर कशी आणली असेल हा एक पडणारा मोठा प्रश्नच आहे.निश्चितच ही तोफ या गडावर बनवलेली नसणार,कारण याचे कुठल्याही प्रकारचे पुरावे या गडावर उपलब्ध नाही आहेत. हरगड किल्ल्यावर बागुल,मुघल व मराठा या तिन्ही राजवटींच्या काळामध्ये टांकसाळ होती अशी जाणकारांकडून माहिती मिळते.येथे लष्करी छावणी असल्याचे सुद्धा पुरावे मिळतात तसेच दारुगोळा,तलवारी,लष्करी इतर सामग्री येथे असल्याचे देखील पुरावे मिळतात.येथील मुल्हेर मुठीच्या तलवारी देखील प्रसिद्ध आहेत. तोफ पाहिल्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यानंतर गडाच्या विस्तीर्ण पठारावर मोठ्या मोठ्या वाड्यांचे भग्नावशेष आपल्याला बघायला मिळतात.म्हणजे निश्चितच या ठिकाणी वस्ती होती.मोठे वाडे याचा अर्थ इथे खूप सारी चहल पहल असावी. दक्षिणेकडील बाजूस उतरत्या बाजूला एका वाड्याचे जिल्हा अवस्थेतील अवशेष आपल्याला परत बघायला मिळतात तसेच या वाड्या जवळच महादेवाचे एक प्राचीन छोटेसे मंदिर देखील आहे.या मंदिराच्या समोरील बाजूला मारुतीची दगडामध्ये कोरलेली मूर्ती असून या मूर्तीच्या पायथ्याशी तोफेचे प्राचीन गोळे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात.
संपूर्ण गड पाहून झाल्यानंतर व गडाचा ट्रेक संपूर्ण झाल्यानंतर उतरताना गडाच्या मधल्या बाजूस वन विभाग व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून बांधलेली नवीन जी तटबंदी आहे त्या बाजूने उतरल्यावर खालच्या बाजूला एक सुंदरसे अतिप्राचीन गणपती मंदिर आपल्याला बघायला मिळते.अगदी सुंदर असे हे मंदिर आहे व या मंदिराच्या समोरच्या बाजूस विस्तीर्ण असे जलाशय देखील आहे.या जलाशयामध्ये आता पानवेली खूप प्रमाणात वाढलेल्या असल्यामुळे खालील पाणी सहजासहजी निदर्शनाला येत नाही.मजबूत,भक्कम अशा दगडी बांधकामामध्ये बांधलेले हे गणपती मंदिर असून या गणपतीच्या मूर्तीच्या खालील बाजूला मोठी अशी महादेवाची पिंड देखील दगडामध्ये कोरलेली आहे. या मंदिराचा गाभारा विस्तीर्ण असा मोठा असून बाहेरील सभामंडप आठ मोठ्या दगडी खांबांचा असून तेथे सुद्धा विस्तीर्ण असा परिसर भाविकांना थांबण्यासाठी उपलब्ध आहे.या मंदिराचे बांधकाम खूप जुने असून आजही हे मंदिर सुस्थितीमध्ये आहे,तरीही या मंदिराचा जिर्णोद्धार करणे आवश्यक आहे.कारण या मंदिराच्या वरच्या बाजूला तसेच सभामंडपाच्या घुमटाच्या बाजूने देखील जंगली वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येतात. या मंदिराच्या समोर असलेल्या जलाशयामधीलच फुले भाविक महादेव तसेच गणपतीच्या मूर्तीवर वाहण्यासाठी घेतात.स्थानिक प्रशासनाने या मंदिराचा जीर्णोद्धार करून सुशोभन केले तर येथे भाविकांची,पर्यटकांची रीघ लागेल.
याच गणपती मंदिराच्या अलीकडील बाजूला एक रामाचे प्राचीन मंदिर देखील दगडामध्ये कोरलेले अतिभव्य असे आपल्याला बघायला मिळते जे आज प्रचंड जीर्णावस्थेत आहे.या मंदिराच्या सभामंडपावरदेखील खूप मोठ्या प्रमाणावर पानवेली तसेच जंगली झाडांची गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते.स्थानिकांच्या सांगण्यानुसार हे मंदिर जरी रामाचे मंदिर असले तरी या मंदिरातील राम-लक्ष्मण-सीता यांच्या दगडी -कोरीव- सुबक मूर्ती चोरीला गेलेल्या आहेत व या मंदिरामध्ये आता सध्या स्थानिक ग्रामदेवतेची मूर्ती ठेवलेली आहे. या राम मंदिरावरती अत्यंत सुबक व कलाकुसरीने दगडांमध्ये कोरीव काम केलेले आपल्याला आढळून येते.दाक्षिणात्य पद्धतीचे बांधकाम या मंदिराचे असल्यामुळे हे मंदिर या ठिकाणी उल्लेखनीय ठरते.या मंदिराला लागूनच उजव्या हाताला अत्यंत सुंदर अशा प्रकारचे पाण्याचे एक टाकेवजा तळे देखील बांधलेले आढळते.त्यामधील पाणी अत्यंत निर्मळ,शुद्ध व निळ्याशार रंगाचे असे असलेले पाहायला मिळते,परंतु हे टाकेसुद्धा पूर्णपणे जंगली झाडांच्या विळख्यात असलेले दिसून येते.हरगड किल्ल्याच्या या परिसरात धार्मिक देवदेवतांची असलेल्या मंदिरांची संख्या - टाक्यांची संख्या व ती बांधण्याची पद्धत पाहता हे निदर्शनास येते की येथे धार्मिक अनुष्ठाने देखील होत असावीत.म्हणजेच येथे तात्कालीन ग्रामस्थांचा व इतर ठिकाणावरून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ असणे लगेचच जाणवते.याबाबतचा सविस्तर इतिहास सांगणारे तेथे कोणी उपलब्ध नव्हते.बर्याचशा लोकांना याबद्दल सविस्तर माहिती नाही.त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा आज मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित दिसून येतो आणि याही गोष्टीची जाणीव होते की त्या काळी या ठेव्याला सोनेरी महत्त्व असावे.
संपूर्ण गड उतरून खाली आल्यानंतर शेवटच्या ठिकाणी आपल्याला गडाची एक कमान वजा प्रवेशद्वार दिसते जे आजही बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे आणि पडझड झालेली असून सुद्धा जुन्या इतिहासाच्या काळातील वैभवाची साक्ष देणारी ही कमान आजही तितक्याच दिमाखात या किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित करत दिमाखाने उभी आहे.
हरगड किल्ला संपूर्ण फिरल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लगेचच जाणवते ते म्हणजे त्या काळातील परिस्थितीमध्ये हरगड किल्ल्याला धार्मिक - ऐतिहासिक तसेच लष्करी सामर्थ्य व महत्त्व तितकेच होते.आज जरी हा संपूर्ण किल्ला दुर्लक्षित अवस्थेत असला तरी त्या काळामध्ये या ठिकाणी सैनिक - भाविक - पर्यटक - लष्करी व इतर कारणांसाठी येणारांची येथे रेलचेल असावी.तत्कालीन प्रशासनाच्या दृष्टीने सोयीचा असणारा हा किल्ला आज त्याच्या सोनेरी वैभवाची साक्ष आपल्या अंगाखांद्यावर खेळवत आजही तितक्याच दिमाखात उभा आहे,जितक्या वैभवात तो त्यावेळी उभा होता.
हरगड किल्ल्याकडे कसे पोहोचाल:- आपण मुंबई वरून नाशिकला येत असाल तर मुंबई मार्गे नाशिक येथून पुढे तसेच देवळा सटाणा मार्गे किक्वारी गावातून मुल्हेर या गावाकडे यावे. मुल्हेर गावातून स्थानिक लोक आपल्याला मार्ग सांगू शकतात.सध्या या मार्गावर सिमेंट रोडचे काम चालू असल्यामुळे आपल्याला प्रवासामध्ये थोडा त्रास होऊ शकतो.
किल्ल्यावर ट्रेकिंग करताना काय काळजी घ्याल :-
किल्ल्यावर ट्रेकिंग करताना सर्वात प्रथम आपल्या पायात सी टी आर चे शुज असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा पाय घसरून इजा होण्याचा धोका असू शकतो.
तसेच आधारासाठी एखाद्या झाडाची मजबूत काठी आपल्या सोबत ठेवणे आवश्यक आहे जी ऐनवेळेला सुरक्षेसाठी म्हणून देखील वापरता येऊ शकते.
गडावरती पाणी उपलब्ध नसल्यामुळे आपण आपल्या सोबत मुबलक प्रमाणात पाणी सोबत ठेवणे खूप आवश्यक आहे.साधारणपणे दोन ते तीन लिटर पाणी आपण आपल्या ट्रेकिंग सॅक मध्ये ठेवू शकता.
तसेच ग्लुकोज पावडर व ओ आर एस पावडर याशिवाय बिस्किटे व हलका आहार देखील आपण सोबत घेऊन जाऊ शकता.
फुल स्लीव्ज असलेले टी-शर्ट घालने खूप आवश्यक आहे.तसेच डोक्यावर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बफ किंवा टोपी व डोळ्यावरती गॉगल देखील असणे आवश्यक आहे.
आपला ट्रेकिंगला जाणारा ग्रुप जर मोठा असेल तर पुढील बाजूने असणारा व्यक्ती व मागील बाजूने असणाऱ्या व्यक्ती यांच्याकडे मोठ्या आवाजाच्या शिट्ट्या देखील असणे खूप आवश्यक आहे.
गडावर तोफेच्या बाजूला मुक्काम करण्यासाठी ऐसपैस पठार उपलब्ध आहे,त्यामुळे आपण मुक्कामासाठी टेन्ट व इतर साहित्य देखील घेऊन जाऊ शकतात परंतु आपल्या कृतीमुळे गडावरील गवताला आग लागणार नाही याची खबरदारी फक्त घेणे आवश्यक आहे.
या ट्रेक मागील प्रेरणा :- चामरलेणी जॉगिंग ग्रुप , म्हसरूळ , नाशिक.
फोटो सौजन्य :-
सुहास श्रीरंग कोळेकर सर,सचिन भाऊ गोसावी,किसन आण्णा काकड, संजय भाऊ गोसावी,पोपटराव सोनवणे साहेब(नायब तहसिलदार) ,कृष्णा कुश वळवी सर.
हरगड किल्ल्याविषयी माहिती चे स्त्रोत :-
बापू सोनवणे,गाईड,मुल्हेर.
स्थानिक ग्रामस्थ मुल्हेर,
स्थानिक ग्रामस्थ हरगड वस्ती.
"युग पवार awesome yug युट्युब चॅनेल"तसेच गुगल व विकिपिडीया.
****************** काही क्षणचित्रे ****************
******* धन्यवाद ****
















































































Comments
हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय....
तुमचा छंद खूप धाडसी वृत्तीने चालू आहे. आपण सर्वजण खूप मेहनत घेत आहात... आपले ट्रेकिंग हे दुसऱ्यांसाठी खूप खूप प्रेरणादायी आहे.
मला खूप गोष्टी आपल्यापासून शिकण्यास मिळत आहेत...
मनापासून धन्यवाद सर.....