आदिवासींचा कल्पवृक्ष मोहु
आदिवासींसाठी वरदान मानल्या जाणाऱ्या मोहाच्या वृक्षास कल्पवृक्ष असेही म्हटले जाते.बहुउपयोगी अशा प्रकारचा हा मोहाचा वृक्ष खूपच कामाला येतो.या वृक्षाच्या वेगवेगळ्या भागांपासून वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आदिवासींना वेळोवेळी होत असतात.
उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच मार्च - एप्रिलच्या सुमाराला या वृक्षाच्या टपोऱ्या,मोत्यांसारख्या फुलांपासून उत्तम प्रकारची मोहाची दारू बनवली जाते.याचे औषधी गुणधर्महि तितकेच आहेत.
ही फुले पूर्णतः गळून गेल्यानंतर त्या ठिकाणी येणाऱ्या मोहाच्या फळांपासून आरोग्यदायी, रुचकर व तितकीच गुणकारी भाजी देखील बनविली जाते.काहिशी अंड्याच्या भाजीप्रमाणे लागणारी ही भाजी आदिवासी भागामध्ये चवीने खाल्ली जाते.
आजूबाजूला मिळणाऱ्या वृक्षांच्या मोठ्या पानांचा द्रोण बनवला जातो व या द्रोणामध्येच या झाडाची ही फळे ज्याला मोहठ्या असे म्हणतात, ती गोळा केली जातात. विळा ,चाकू किंवा तत्सम धारदार वस्तूने त्याचेवरील साल काढले जाऊन आतील गर भाजीसाठी वापरला जातो.तसेच या फळांमधील मोठ्या आकाराचे बी याचा देखील वापर केला जातो.पूर्णतः परिपक्व झालेल्या फळांमधील बी काढून त्याचे देशी घाण्यावरती तेल गाळून घेतले जाते, जे तेल स्वयंपाकासाठी आदिवासी भागामध्ये वापरण्यात येते.
बहुउपयोगी अशा प्रकारचा हा मोहाचा वृक्ष जागोजागी दिसून येतो.
****************




Comments