आदिवासी बांधवांची अक्षय तृतीया

 


                  अक्षय तृतीया या सणाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत असाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया या तिथीला खूप महत्त्वाचे मानले जाते .

          अक्षय तृतीया या तिथीला एवढे महात्म्य प्राप्त होण्याचे कारण देखील तसेच आहे ,कारण असे सांगितले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा नदी इंद्रलोकांमधून पृथ्वीवरती अवतरली होती .याच दिवशी  परशुराम यांचा जन्म झाला होता. त्रेता युगाची सुरुवात याच दिवशी झाली होती असे सांगितले जाते .याच दिवशी व्यासांनी श्री गणेशा कडून महाभारत लिहून घेण्यास सुरुवात केलेली होती. याच दिवशी महाभारताचे युद्ध देखील संपलेले होते तसेच दुर्गामातेकडून महिषासुराचा वध याच दिवशी झाला होता .पांडवांना सूर्यदेवाकडून अक्षय पात्र याच दिवशी प्राप्त झालेले होते. याच दिवशी श्रीकृष्णाने परममित्र सुदाम्याचे पोहे देखील खाल्ले होते. याच दिवसापासून कुबेराला इंद्राचा खजाना देखील दिला गेला होता.

 


                आजच्याच दिवशी वृंदावन मधील श्रीकृष्ण भगवान चे चरण सर्वांना पाहण्यासाठी खुले होतात. चार धाम पैकी एक प्रमुख असलेल्या बद्रीनाथाचे कपाट आजच उघडले जातात तसेच ओडिसा येथील जगन्नाथ पुरीच्या सर्वप्रसिद्ध रथयात्रेचे रथ बनवण्यास देखील आजपासूनच सुरुवात केली जाते. इतके अतिशय महत्त्व व महात्म्य आजच्या या पवित्र तिथीचे असते.

 अक्षय तृतीया या सणाला मराठवाड्यामध्ये आकिती असे म्हटले जाते. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये या सणाला आखाजी असे म्हटले जाते ,तर काही ठिकाणी आखाती असेही म्हटले जाते.

           


            अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आढळून येते .मराठवाड्यामध्ये आमरस,पुरणपोळी करून पितरांना नैवेद्य दाखवून हा सण साजरा केला जातो .तर उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी भागातील बांधव गौराईचे पूजन करून, घागरी फुंकून ,गौराईंचे विसर्जन करून, वाजत गाजत सवाद्य मिरवणूक काढत, गोडधोड पदार्थ किंवा नदितील माशांचा नैवेद्य दाखवून हा सण साजरा करतात.यावेळी पारंपारिक वाद्यांच्या गजरात नृत्य केले जाते .तसेच पारंपारिक गीते देखील म्हटले जातात.


              जून किंवा जुलैमध्ये लागवड करण्यायोग्य धान्याची एक चाचणी म्हणून आदिवासी बांधव साधारणतः सात दिवस विविध प्रकारचे धान्य जसे मका ,गहू ,नाचणी ,वरई, तांदूळ अशा धान्यांचं गौराई म्हणून मातीच्या भांड्यामध्ये किंवा दुरड्यांमध्ये पळसाची पाने टाकून लागवड करतात. अक्षय तृतीया म्हणजेच आखात्या आल्या याचाच अर्थ पावसाळा लवकरच जवळ आला व सुगीचे दिवस सुरू होतील असा अंदाज आदिवासी बांधवांचा असतो. घरातील ज्या मुलीच्या नावाने गौराई पेरले असतात त्या मुलीने कांदा ,कच्चा आंबा खायचा नाही असा दंडक असतो कारण त्यामुळे गौराई हिरव्या होतील ,त्या पिवळ्या होणार नाहीत असा समज देखील असतो. शेवटी गौराईंचे विसर्जन झाल्यानंतर त्या गौराईंची पाने तोडून पुरुष कानाजवळ ती पाने खोचतात तर महिला तीच पाने केसांमध्ये माळतात.

सात दिवसानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी ते उगवलेले धान्य गावातील सार्वजनिक पाणवठ्याच्या ठिकाणी नेऊन त्याची सवाद्य मिरवणूक काढून गावातील मंदिरामध्ये जमून पारंपारिक गीते गातात ,नैवेद्य दाखवला जातो व तदनंतर शेवटी सार्वजनिक पाणवठ्याच्या ठिकाणी विहिरीमध्ये, वाहत्या नदीमध्ये, बंधाऱ्यामध्ये अशा गौराईंचे विसर्जन करून प्रसाद वाटप केला जातो.


Comments

Popular posts from this blog

सह्याद्री मित्र संमेलन समिती आयोजित किल्ले विश्रामगड प्रमोशनल ट्रेक

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

छन्नी-हातोड्याचे घाव सोसून सजलेला किल्ले इंद्राई