मार्कंडेय ऋषी पर्वत ट्रेक
मार्कंडेय पर्वत
वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेला , निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेला, ट्रेकर मंडळीचा खरा कस पाहणारा हा किल्ला म्हणजेच मार्कंडेय किल्ला .सप्तशृंगी वणी येथून समोरच दिसणारा हा मार्कंडेय किल्ला सप्तशृंगी वनी मधून पाहताना अत्यंत कठीण व चढण्यासाठी अतिशय दुर्गम असाच वाटतो. परंतु वनी पासून कळवण जाणाऱ्या मार्गावरून आपण वन विभागाने बांधलेल्या सिमेंट काँक्रीटच्या पायऱ्यांपासून आपण गडाच्या अर्ध्या भागापर्यंत सहजतेने पोहोचू शकतो. मधल्या भागामध्ये लोखंडी उंच जिने देखील वनविभागाने बांधलेले दिसून येतात. दोन्ही बाजूला उंच उंच पर्वत व खाली खोल दरी बघायला मिळते . तेथून पुढे मार्कंडेय ऋषींच्या मंदिरापर्यंत जाईपर्यंत दोन्ही बाजूला लोखंडी मजबूत रेलिंग असल्यामुळे त्याला धरून वरती चढणे सोपे ठरते, परंतु चढ उभा असल्यामुळे चढणे थोडेसे कठीणच असते .त्यातच बारीक पाऊस असेल तर जास्तच मऊ चिखल होऊन पाय दगडांवरून घसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे उत्तम दर्जाचे सी टी आर शूज घालूनच ट्रेकिंग करण्याचा सल्ला या ठिकाणी दिला जातो.
बारीक पडणाऱ्या भुरभुर पावसामध्ये येथे जाणे अत्यंत सुखदायक ठरते. गडावर सर्वात वरती दाट धुके असते, त्यामुळे हे दृश्य अत्यंत मनमोहक , लोभस दिसते. सोमवती अमावस्या या दिवशी येथे यात्रा भरते. येथे दूर दूर वरून मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अमुलाग्र असते. काही हजारांपासून काही लाखापर्यंत ही संख्या एका दिवसापर्यंतच पोहोचते . तसेच आसपासच्या प्रदेशांमधून व गुजरात मधून सुद्धा मोठ्या संख्येने भाविक येथे पायी येऊन दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे असतात. आपल्याला चालायची, फिरायची तसेच ट्रेकिंगची सवय असेल तर हा किल्ला चढणे तितकेसे अवघड नाही परंतु जर सवय नसेल तर आपल्याला काही ठिकाणी अडथळा येऊ शकतो. सिमेंट काँक्रीटच्या वन विभागाने बांधलेल्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर लोखंडी उंच शिडी लागते. ती शिडी चढून वर आल्यानंतर डाव्या बाजूला पवित्र रामकुंड लागते. या रामकुंडामध्ये आलेले सर्व भाविक स्नान करताना दिसून येतात. पवित्र रामकुंडा मधून पुढे आल्यानंतर मार्कंडेय ऋषी किल्ल्याचा कातळकडा जिथे सुरू होतो तेथूनच एका स्वामींचा आश्रम देखील तेथे आहे .या आश्रमामध्ये आपल्याला क्षणभर विसावा घेता येतो तसेच आपल्याकडील पाणी संपले असेल तर पाणी देखील तिथून घेता येते. बालेकिल्ल्याच्या म्हणजेच मार्कंडेय ऋषींच्या मंदिराजवळ आल्यानंतर अगदीच उभा कडा चढल्यानंतर डाव्या बाजूला विसाव्यासाठीची थोडीशी जागा दगडामध्ये कोरून काढलेली आहे तेथेच दोन गुहा देखील आपल्याला दिसतात. त्यांना " ध्यान गुंफा "असे देखील म्हणतात. या गुंफांमध्ये बसून ध्यान केले जायचे असे स्थानिकांनी सांगितले. संपूर्ण गड चढण्यासाठी साधारणता दीड ते दोन तास लागू शकतात व या ध्यान गुंफांच्या वरती आल्यानंतर आपल्याला मार्कंडेय पर्वतापासून पुढेच सप्तशृंगी वणी गड दिसायला सुरू होतो.
बालेकिल्ल्याच्या जवळ आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला उजव्या बाजूला ठेवलेली गणपतीची सुंदर मूर्ती दिसते, त्या मूर्तीच्या डाव्या बाजूलाच एका घुमटाखाली पाण्याचे टाके देखील दिसते. याला " कमंडलू तीर्थ "असे नाव देण्यात आलेले आहे .आलेले भक्त भाविक या कमंडलू तीर्थामधील पाणी बाटल्यांमध्ये भरून ते तीर्थ म्हणून प्राशन करतात. या तीर्थाच्या वरती गेल्यानंतर पुढे एक विस्तीर्ण खूप मोठे टाके देखील दिसते . आलेले भाविक या टाक्यांमध्ये देखील स्नान करतात व तेथून तसेच पुढे चढून मार्कंडेय ऋषींच्या मंदिरामध्ये जातात. हे मंदिर पर्वताच्या अगदी चिंचोळ्या भागामध्ये शिखरावरती बांधलेले आहे एकावेळी साधारणपणे 20 ते 30 माणसे समोर उभे राहू शकतील व मंदिरामध्ये दहा माणसे उभे राहून दर्शन घेऊ शकतील अशा प्रकारचे हे छोटेसे मंदिर आहे . आत मध्ये मार्कंडेय ऋषींची महादेवाची पिंड घेऊन बसलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते . मंदिराच्या भोवती सुरक्षादर्शक लोखंडी रेलिंग मजबुतीने बांधण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई च्या वरती ज्या प्रकारचे मंदिर आहे अगदी त्याच प्रकारचे मंदिर देखील मार्कंडेय पर्वताच्या शिखरावर आपल्याला बघायला मिळते. शिखरावरील मार्कंडेश्वराच्या मंदिराला उभे राहिले असता समोर आपल्याला वनी सप्तशृंगी गड तसेच रावळ्या ,जावळ्या, धोडप हे किल्लेदेखील स्पष्टपणे दिसून येतात. वनी सप्तशृंगी गडाच्या बाजूला सर्वात मोठे नेढे असलेला मोहनदरी हा किल्ला देखील आपल्याला दिसून येतो.
इतिहास सांगतो की या मार्कंडेय पर्वतावरतीच मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतले होते. त्यामुळे त्यांनी तेथे मार्कंडेय ऋषींना अमरत्वाचे वरदान देखील दिलेले होते. मार्कंडेय ऋषींनी पांडवांना सृष्टीच्या उत्पत्तीची व विनाशा नंतरची कहाणी देखील ऐकवल्याचे इतिहासात नोंद आहे. प्रत्यक्ष महादेवांनी मार्कंडेय ऋषींना या ठिकाणी महामृत्युंजय मंत्र प्रदान केलेला होता. त्यामुळे प्रत्यक्ष यमदेखील तीन वेळा येऊन मार्कंडेय ऋषींचे प्राण घेऊ शकला नव्हता. धर्मग्रंथांच्या नुसार पृथ्वीवरील आठ अमर लोकांच्या यादीमध्ये मार्कंडेय ऋषींचे देखील नाव आहे. मार्कंडेय ऋषींचे वडील मर्कंडू ऋषी होते. त्यांना व त्यांच्या पत्नीला संतान नसल्यामुळे त्यांनी महादेवांची भक्ती केली व वरदान प्राप्त केले. महादेवांनी त्यांना वरदान दिले गुणहीन दीर्घायु मुलगा हवा की केवळ सोळाव्या वर्षी मृत्यू होणारा गुणवान मुलगा हवा .त्यावेळी मर्कंडू ऋषींनी गुणवान सोळाव्या वर्षी मृत्यू पावणारा मुलगाच हवा असे वरदान मागून घेतले. जेव्हा मार्कंडेय ऋषींना कळाले की आपला सोळाव्या वर्षी मृत्यू होणार आहे तेव्हा ते जराही विचलित न होता महादेवाच्या भक्ती मध्ये लीण झाले व त्यांनी महादेवाला प्रसन्न करून घेत महामृत्युंजय मंत्र प्राप्त करून घेतला.
मार्कंडेय ऋषींच्या बाबतीमधील एक वायरल पोस्ट आपण सगळ्यांनी व्हाट्सअप वर वाचलेलीच होती .त्या पोस्टमध्ये असे लिहिलेले होते की ट्रेकिंग साठी आलेल्या मुलांच्या ग्रुपपैकी एक मुलगा त्या गुहेमध्ये जाऊन तिकडे गायब होतो व इतर मुले तो आत मध्ये गेलेला मुलगा हरवला किंवा आत मध्येच मृत्यू पावला असे समजून त्याच्या घरी येतात .सहा महिन्यानंतर तोच मुलगा त्या मार्कंडेश्वर पर्वतावरून परत वापस आपल्या घरी येतो व आपल्या आई-वडिलांना विचारतो की मी केवळ एक दिवसासाठी तिथे थांबलेलो होतो तर माझे मित्र काही तास सुद्धा माझी वाट न बघता का निघून आले? मला तेथे मार्कंडेश्वर मुनी भेटले असं जेव्हा तो सांगतो तेव्हा आपल्या मनुष्याचा सहा महिन्यांचा कालावधी हा मार्कंडेश्वर मुनींसाठीचा एक दिवसांचा कालावधी होता असा अर्थ त्या पोस्टमध्ये देखील होता.
मंदिर पूर्णपणे उतरल्यानंतर मंदिराच्या जिथून पायऱ्या सुरू होतात त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला मंदिराखालील पठारावरून आपल्याला खालच्या बाजूने देखील उतरता येते. उतरण्यासाठी पायऱ्या हा चांगला पर्याय तर आहेतच परंतु ज्यांना खरी ट्रेकिंग करायची असेल त्यांनी या पायऱ्यांच्या विरुद्ध बाजूने असलेल्या चिंचोळ्या बारी मधून उतरून ट्रेकिंग करणे खूपच सुंदर अनुभव ट्रेकिंग साठी ठरू शकतो . कारण या बारीमध्ये जागोजागी उंचच उंच डोंगरांची रांग तसेच खोल घळया लागतात ,वाहणाऱ्या मधुर पाण्याचे झरे, डोलावणारे सुंदर गवत , फुलांचे ताटवे आपल्याला या घळी मधून उतरून ट्रेकिंग करताना आनंद देऊन जातात. खाली उतरून येईपर्यंत बऱ्याच ठिकाणी अवघड पॅचेस आपल्याला बघायला मिळतात, परंतु जेथे अवघड पॕच आहेत तेथेच ट्रेकर मंडळींना खरा आनंद व तेथेच खरा कस लागतो.
साधारणपणे खाली उतरेपर्यंत मंदिरापासून हा भाग चार ते साडेचार किलोमीटरचा आहे .त्यामुळे ट्रेकिंगचा खरा आनंद घ्यायचा असेल तर मंदिराच्या पायऱ्यांवरून चढून वर यावे व मंदिराचे दर्शन केल्यानंतर पठाराच्या मागच्या बाजूच्या बारीतून खाली उतरावे . संपूर्ण बारीतून घळ खाली उतरून आल्यानंतर साधारणपणे जंगलामधून आपल्याला दोन ते अडीच किलोमीटर पुन्हा गावापर्यंत जाता येते व तेथून आपल्या गाड्या जिथे पार्क केलेले आहेत तिथून गाड्या घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला देखील जाता येते.

























Comments
जो मुलगा गुहेत गेला..ती गोष्ट खरी आहे का?
Time Travel बद्दल हे एक उदाहरण आहे.